Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मई 5, 2020 in जीवन प्रकाश

आपल्या पित्यापासून शक्ती मिळवणे  (पूर्वार्ध)                                       क्रिस विल्यम्स

आपल्या पित्यापासून शक्ती मिळवणे (पूर्वार्ध) क्रिस विल्यम्स

“ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, आपल्या जिवाविषयी, म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे; आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावे, ह्याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही? आकाशातील पाखरांकडे निरखून पाहा; ती पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत की कोठारात साठवत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खायला देतो; तुम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत; तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेषेकरून तुम्हांला पोशाख घालणार नाही काय? ह्यास्तव ‘काय खावे? काय प्यावे? काय पांघरावे?’ असे म्हणत चिंता करत बसू नका. (कारण ह्या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात.) तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील” (मत्तय ६:२५-३३)

 

२०१९ च्या शेवटच्या दोन महिन्यात चीनमध्ये जे घडले ते मार्च २०२० मध्ये भारतात एक दुष्ट स्वप्न ठरले आहे. आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जगभरात ११ लाख लोकांना लागण झाली आहे आणि ५९ हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. (हा लेख एप्रिलच्या आरंभी लिहिला गेला आहे. लेख वाचकांच्या हाती येईपर्यंत परिस्थिती खूप बदललेली असेल.) रोज आणि तासागणिक ही संख्या वाढतच आहे. आणि त्याचा प्रसार भयावह आहे. करोनाची वाढ आणि मृत्यू आणण्याचे त्याचे प्रमाण भीतीदायक आहे.

आता दूर असलेल्या चीन देशात ही साथ आहे अशी भीती नाही. तर ही जागतिक साथ आपल्या शेजारच्या मोहल्ल्यात आहे. ह्या रोगाची लागण फक्त दूरच्या लोकांनाच लागत आहे असे नाही. हा आपल्यातील कोणालाही होऊ शकतो. आपले जवळचे, प्रियजन यांना लागण होऊ शकते. आपल्यालाही लागण होऊ शकते. हे सर्व भीतीजनक आहे.

हा विषाणू मानवजातीशी जे युद्ध करीत आहे त्याचा मुकाबला करण्यास मानवी बुद्धीचे एकत्रित प्रयत्न, संपत्ती आणि सामर्थ्य अपुरे पडत आहेत. ही सुद्धा भीतीदायक गोष्ट आहे. काही म्हणतील की करोनाविरुद्धचे हे युद्ध आम्ही जिंकणार आणि त्यासाठी अनेक जण अंधश्रद्धा, दैवी आणि मानवी शक्तीचे दावे करतील. काही ख्रिस्ती लोकसुद्धा दावा करतात की जर आपण ख्रिस्तामध्ये आहोत आणि त्याच्यावर भरवसा ठेवतो तर आपल्याला काहीही होणार नाही. हे सर्वांत भीतीदायक आहे कारण त्याला बायबलमध्ये कोणताही आधार नाही.

हे फक्त एका आजाराविषयी नाही की जो फ्लू किंवा न्यूमोनियाचाच निराळा प्रकार आहे. येथे फक्त मृत्यूच नाही पण आपल्या नेहमीच्या जीवनात प्रचंड अडथळे आले आहेत. आपल्याला हवे तसे जगण्याची कोणालाच मुभा नाही. प्रांतीय व राष्ट्रीय टाळेबंदी झाली आहे. जगातील बहुतेक लोक त्यांच्या कामाला जाऊ शकत नाहीत. आपल्याला सांगण्यात आले आहे की अगदी जीवन मरणाचा प्रश्न असेल तरच तुम्ही दवाखान्यात जाऊ शकता. बसेस, रेल्वे बंद करण्यात आली आहेत. दुकाने, रेस्टॉरंट बंद आहेत. लग्नसमारंभ, उपासना यांना बंदी आहे. हे सर्व भीतीदायक आहे.

काम करून पैसा कमवण्याची सुरक्षा, आपल्याला नी आपल्या कुटुंबाला जगण्यासाठी पुरेशी कमाई करणे यावर बंधन आले आहे. राष्ट्रीय आणि जागतिक अर्थव्यवस्था ही नक्कीच खाली जात आहे पण आपल्या सर्वांना – विशेषत: गरीब आणि दरिद्री यांना जेव्हा पैसा संपेल तेव्हा चांगला चोप बसणार आहे. जर तुम्ही काम करण्यास जाऊ शकत नाही, जेव्हा तुमच्या नोकऱ्या जातात, जेव्हा कंपन्यांना इतका तोटा होतो की त्या बंद करण्याची कदाचित पाळी येईल तेव्हा आपल्या अस्तित्वाला गंभीर आव्हान दिले जाईल. आता सध्या तुमच्याकडे पैसे असले तरी तुम्हाला बाहेर जाऊन जे हवे ते खरेदी करता येत नाही. हे ही भीतीदायी आहे.

जागतिक पुढारी याला युद्धासारखी परिस्थिती म्हणतात. हे कसे, का व केव्हा संपेल हे खरे कोणालाच माहीत नाही पण आपल्या सर्वांवरच याचा परिणाम होत आहे. आणखी आठ आठवडे, सहा महिने – कोणाला ठाऊक? हे संपायला कितीही वेळ लागला तरी बहुतेक आपण पूर्वीसारखेच राहणार नाही. ह्या विषाणूच्या हल्ल्यातून आणि त्याच्या बिकट परिणामापासून सावरायला खूप वेळ लागणार आहे.

प्रसारमाध्यमे जोरदार निवेदने करीत आहेत, अनेक तर्क वितर्क सादर केले जात आहेत. अनेक खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत आणि ख्रिस्ती या नात्याने आपण या गोंधळात भर न टाकण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तरीही जे चालू आहे त्याची गंभीरताही कमी करू नये. आपले अधिकारी जे आपला देश सुरक्षित ठेवायला अतोनात प्रयत्न करीत आहेत त्यांना मान देऊन, त्यांच्या अधीन राहून, त्यांच्या सूचना आपण काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. यापुढे जाऊन आपण स्थिरता व सुरक्षितता आणण्यासाठी मदत केली पाहिजे. अशा वेळी “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाचे ऐकणार” असा विचार करणे आणि नियम मोडणे हे चुकीचे आहे. देवाच्या वचनाचा चुकीने वापर करून आपल्या उद्धटपणाला पुष्टी देणे योग्य नाही.

पाळक या नात्याने या दिवसांमध्ये माझ्या मनावर ओझे आले होते आणि मी माझे वैयक्तिक विचार प्रभूसमोर आणले. आणि प्रार्थना करीत प्रभूच्या वचनातून शोधू लागलो. मला काही शास्त्रभागाकडे जाण्यास प्रभूने मार्गदर्शन केले आणि देवाच्या वचनाद्वारे मला पुन्हा जे शिकण्यास मिळाले त्याद्वारे मला तुम्हांला उत्तेजन देऊन, त्यामध्ये समर्थ करण्याची इच्छा आहे.  भिण्याचे काही कारण नाही असा देखावा करत कोणीच शौर्याचा मुखवटा घालण्याचे कारण नाही. नाहीतर देवाने “भिऊ नका” असे शब्द शेकडो वेळा घातले नसते. कोणत्याच ख्रिस्ती व्यक्तीने असे समजू नये की देवावर भरवसा टाकण्यात आपल्याला झगडण्याची मुळीच गरज नाही. जर ख्रिस्ती असणे म्हणजे झगडणे, चिंता- काळजी न करणे असे देवाला म्हणायचे असते तर बायबलमध्ये मोठ्या चिंतेच्या वेळी देवावर विश्वास ठेवा असे शिक्षण दिले नसते.

१. हे जग आणि त्याची संपत्ती यांची असुरक्षितता

आपल्या शास्त्रभागाच्या २४व्या वचनाकडे जा “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्‍यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसर्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.” आता जरा मागे जाऊन १९-२१ ही वचने वाचा .

आता डोंगरावरच्या उपदेशाच्या आरंभी जा. हा उपदेश येशूने आपल्या शिष्यांना केला, समुदायाला नाही.  हा सर्व उपदेश प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना केला आहे आणि जगाला नाही. महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांना हा संदेश आवडत असे आणि त्यांनी आपल्या जीवनासाठी आणि चळवळीसाठी यातील शिकवण अंगिकारली. तथापि येशूने हा संदेश आपल्याला, त्याच्या शिष्यांना दिला आहे. ह्या अद्भुत संदेशाचे आपण लक्ष्य आहोत. आणि हे शिकून त्या शिक्षणानुसार आपण चालले पाहिजे. ५:१ वचन म्हणते “तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला, व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.”
हा उपदेश येशू कसा संपवतो? मत्तय ७: २४-२७ कडे वळू या. “ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणाएका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर खडकावर बांधले; मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल; त्याने आपले घर वाळूवर बांधले; मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले.”

याचा मुख्य विषय आहे आपण आपली जीवने कशी उभारावीत? प्रत्येक जण जो प्रभू येशूचे वचन व शिक्षण ऐकतो तो त्यानुसार जीवन जगतो किंवा जगत नाही. संपूर्ण बायबलमध्ये दाखवल्याप्रमाणे येशूच्या शिकवणीनुसार आपले सर्व जीवन संपूर्णपणे उभारल्याने आपले इथले जीवन आणि मरणानंतरचे जीवन सुरक्षित केले जाते. जे येशूच्या शिकवणीनुसार आपले जीवन उभारत नाही – त्यांचे घर, जीवन- ते कोसळून पडतील. आपली संपत्ती पृथ्वीवर साठवणे आणि आपले जीवन वाळूवर उभारणे हे घटक वादळ व तुफान आले की अनिश्चिती व कोसळण्याची खात्री देतात.

२. अनंतकालिक जग आणि सुज्ञान याची सुरक्षितता

अ. स्वर्गातील जग आणि संपत्ती

पुन्हा एकदा मत्तय ६:१९-२१ वचने पाहा. आपण स्वर्गात संपत्ती साठवत आहोत. स्वर्ग हे वास्तव आहे आणि कल्पना किंवा स्वप्न नाही. ज्यांनी आपल्या पापाचा पश्चात्ताप करून येशू ख्रिस्तावर तारणारा व प्रभू म्हणून विश्वास ठेवला आहे. त्यांना येशूबरोबर  स्वर्गात मरणानंतर  जीवन मिळण्याची खात्री आहे. नवा स्वर्ग आणि नव्या पृथ्वीमध्ये एक अनंतकालिक जग आहे. ख्रिस्ती लोक आपली संपत्ती स्वर्गात साठवतात. आपण या जगात असे राहतो की जे लोक येथे ‘बांधाबांध’ करीत आहेत आणि तेथे कायम आणि कायम राहण्याची तयारी करत आहेत. ही अनंतकालिक  जीवनाची आणि जगाची आशा आपली ख्रिस्तामधील  सुरक्षितता आहे.

आता ६:२२ -२४ वचने वाचा; ती आपल्याला शिकवतात की आपण एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करायला हवे. “डोळा शरीराचा दिवा आहे; ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल; पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल; ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा! कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्‍यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसर्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.”

तुमचा डोळा निरोगी ठेवा आणि तुमचे शरीर निरोगी राहील. तुमच्या आध्यात्मिक डोळ्याने अनंतकालिक संपत्ती, जग आणि तुम्हाला आता असलेली सुरक्षा पाहणे जरुरीचे आहे. ही खात्री आणि आशा तुमच्या सर्व शरीरात भरून राहायला पाहिजे. आणि त्यामुळे तुमच्या देवाच्या भक्तीला व सेवेला अर्थ यायला हवा.

मत्तय ७:२५ -३४ यामधील जे काही येशू शिकवत आहे ते पाहा. आणि मग तुमचे जीवन तुमच्या कुटुंबाचे जीवन येशूने सांगितलेल्या खडकावर सुज्ञतेने बांधा. शहाण्या मनुष्यासारखे बांधण्यात तुमची सुरक्षा आहे.  मग जेव्हा हादरून टाकणारे वादळ तुमच्यावर, तुमच्या आशा, आकांक्षा, स्वप्ने योजना, तुमच्या सर्व जीवनावर येऊन ते विस्कळीत करेल तेव्हा तुम्ही तुमचा खडक ख्रिस्त यावर स्थिर उभे राहिलेले असाल.

( उत्तरार्ध पुढच्या आठवड्यात)