दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

कोमट जन माझ्याकडे येवोत

मार्शल सीगल

येशूसाठी तुमचे ह्रदय थंड होण्यास केव्हा सुरुवात झाली?

बहुतेक तुम्हाला तो दिवस अथवा आठवडा किंवा कदाचित वर्षही आठवत नसेल. तुम्ही जेव्हा आवेशी (उष्ण) होता तो वेळ बहुतेक तुम्हाला आठवत असेल. तुम्हाला बायबल वाचायची भूक होती, प्रार्थनेत राहून वेळ घालवण्यासाठी उत्साह होता, चर्चेमध्ये सेवा करण्यासाठी संधी शोधत होता, रविवारी सकाळी जमण्यास उत्सुक होता, तुमच्याकडे जे थोडे आहे त्यातून अधिकाधिक देण्यास अधीर होता, आपल्या जवळच्या कुणालाही येशूबद्दल सांगायला नेहमीच तयार होता.

आणि काही काळाने तुमची भूक कमी झाली, जरा अजून मन विचलित झालं, शिस्त आणखी कमी झाली, अधिक व्यस्त होऊ लागलात. आतल्या ज्वालेचा झोत कमी झाला आणि अखेरीस ती थंड झाली.

तुमचे ह्रदय थंड झाले असे कदाचित तुम्हाला वाटले नसेल. तुम्ही गृहीत धरले की जीवन इतके भरून गेले आहे की त्याच्या मागण्या वाढतच आहेत. तुमच्या तारुण्याची चेतना आणि भक्ती आता प्रगल्भ आणि स्थिर झाली आहे. आणि अर्थातच येशूला सर्व समजते. आयुष्यात पुढे वेळ आहेच पुन्हा गंभीर जगण्यासाठी.

असे कोमट होणार्‍या आपल्या कोणासाठीही कठोर सत्य हे आहे की आपली बेफिकिरी, गौण गोष्टीतली गुंतवणूक, जगिकतेमध्ये चतुरपणे झालेली आपली कैद अशा गोष्टींचे येशू लाड पुरवत नाही. आपल्या मार्गभ्रष्टपणाची तो कींव करत नाही. येशू आध्यात्मिक दुटप्पीपणाला तुच्छ लेखतो.

“तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते; पण तू तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे” (प्रकटी ३:१५-१६).

हे असे जीव आहेत की त्यांच्यातल्या पुरेशा उबदारपणामुळे चर्चमध्ये ते आरामशीर असतात, त्यांना पुरेशी भीती असल्याने ते अनैतिकतेमध्ये स्वत:ला लोटून देणार नाहीत, त्यांच्यामध्ये पुरेशी दोषी भावना असल्याने ते अधून मधून बायबल  वाचतात, पुरेशी गरज भासते म्हणून अडीअडचणीला मदत करतात. ते येशूला सोडून देत नाहीत पण त्याला ते स्वत:चे विशेष काही देऊ करत नाहीत. नरक टाळण्यासाठी ते पुरेसे ख्रिस्ती म्हणून राहतात. ते त्यांचा बहुतांशी वेळ, पैसा आणि लक्ष या जगात स्वर्ग शोधण्यात घालवतात.

रोग की लक्षणे?

तर असे कठीण शब्द बोलण्यास येशूला कोणी प्रेरणा दिली? लावदिकीया येथील मंडळीने. प्रकटीकरण २-३ मधील सात मंडळ्यातील ही सातवी मंडळी. ह्या एकाच मंडळीला होकारार्थी सांगण्यास येशूकडे काहीच नव्हते. थुवथीरा येथील मंडळी अनीती चालवून घेत होती  तरीही येशूने त्यांची कृत्ये, प्रीती, सेवा, विश्वास व धीर याबद्दल वाखाणणी केली (प्रकटी २:१९). सार्दीस येथील मंडळी इतकी झोपी गेली होती की जवळजवळ मृत होती. तरीही येशूने म्हटले की, त्यांच्यातील काही थोडके “लायक” आहेत (३:४). पण लावदिकीयाच्या कोमट मंडळीला त्याला असे काही प्रशंसा करणारे शब्द नाहीत तर एक भेदून जाणारी धोक्याची सूचना होती. आपल्या मंडळ्यांनी आध्यात्मिक कोमटपणा अनीतीसारखाच गंभीरतेने पहिला तर किती बरे! पण लावदिकीयाचा कोमटपणा हा एकच आजार नव्हता. ते एका मोठ्या गंभीर आजाराचे लक्षण होते – स्वावलंबीपणा.

“पण तू तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी ‘धन मिळवले आहे,’ व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस; पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही” (प्रकटी ३:१६-१७).

राजा येशूच्या भक्तीमध्ये लावदिकीया येथील मंडळी का थंड झाली? कारण त्यांना असलेली त्याची गरज ते विसरून गेले होते. त्यांना आता स्वत:बद्दल खात्री वाटू लागली होती,  ते आरामशीर बनले होते. त्यांना इतके यशस्वी वाटत होते की आपण किती  कष्टी, दीन, दरिद्री, अंध व उघडावाघडे आहोत हे त्यांना दिसत नव्हते. त्यांच्या परिस्थितीमुळे

त्यांचा हा स्वावलंबीपणा ठळक गुन्हा बनला होता. इतिहास सांगतो की त्यांचे शहर इ.स. ६० मध्ये भुकंपामुळे ग्रासून गेले होते आणि तरीही त्यांनी मदत नाकारली होती. लावदिकीयाचे लोक  इतके गर्विष्ठ होते की  मदत घेणे त्यांना कमीपणा वाटत होता. हाच गर्विष्ठपणा मंडळीतही होता. आजच्या प्रगत जगातही मंडळी (आणि लोकांत) असा गर्व कमी नाही.

येशूसाठी कोमटपणा ह्यासाठीच ही धोक्याची सूचना नाही तर येशूची प्रीती थंड करणारी जी गोष्ट त्यासंबंधी आहे. ती म्हणजे आपल्याला त्याची गरज असल्याचे नाकारणे.

तुला दिसावे म्हणून

येशू आश्चर्यकारक किळसेने म्हणतो – “ मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.” –  मग तो आता अधिक आश्चर्यकारक प्रेमाने जवळ येतो आणि म्हणतो,

 “मी तुला मसलत देतो की, श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे; तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्रे विकत घे; आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे” (प्रकटी. ३:१८).

त्याच्या निषेधामधला दयाळूपणा पहा. तुला वाटतंय तू श्रीमंत आहेस? मला तुला कल्पनेहून अधिक श्रीमंत करू दे. तुला वाटतंय तू सुरक्षित आहेस? मला तुला नीतिमत्तेची वस्त्रे घालू दे, जी कधीच फाटणार नाहीत की विटणार नाहीत. तुला वाटतंय तुला सर्व काही पुरेसे आहे? मला तुला फक्त दाखवू दे की तू किती आंधळा आहेस – आणि माझ्या प्रीतीपुढे अंधत्व कसे खपलीसारखे पडून जाते.

स्वावलंबी लोकांना कल्पना नसते की त्यांचा गर्व जपण्यासाठी त्यांना किती त्याग करावा लागतो. त्यांच्या नियंत्रणाला जसे ते कवटाळून राहतात तसे ते स्वर्गातील सार्वभौमाच्या मदतीला मुकतात. पूर्णपणे पाहू शकण्याची दयाळू आणि आश्चर्यकारक संधी ते सोडून देतात. ते येशूला गमावतात कारण येशू त्यांची सेवा करू शकत नाही – जोपर्यंत आपण  पश्चात्ताप करत नाही.

“जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो; म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर” (३:१९).  येशूचे हे कठोर शब्द जे कोमट आहेत त्यांचे ह्रदय उबदार करण्यासाठी आहेत. हे शब्द निराशा आणि स्वत:बद्दल कींव निर्माण करण्यासाठी नाहीत तर पश्चात्ताप व जागरूकता यासाठी आहेत.  या ठिकाणी “मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.” ह्यामध्ये शत्रुत्वाचा सूर नाही तर प्रीतीचा आहे. येशू म्हणत आहे, विनंतीही करत आहे की तुझ्यातली उष्णता आणि आवेश मला पुन्हा अनुभवायचा  आहे. तुझे ते कडू स्वावलंबन बाजूला ठेव आणि तुझ्यातला विझत असलेला तो अग्नी मला पुन्हा चेतवू दे.

राजा बाहेर आहे

कोमट माणूस कितीही भरकटला असला, येशूची काळजी आणि सामर्थ्याचा आपण कितीही वेळा नकार केला असला, आपली ह्रदये कितीही थंड झाली असली तरी तो आपल्याजवळ असतो, क्षमा करून आपल्याला पुन: उभारायला व आलिंगन द्यायला तयार असतो.

“पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकत आहे; जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन” (३:२०-२१).

हा स्वर्गाचा राजा आपण त्याला शोधावे म्हणून  आपल्याला सर्वत्र पळायला लावणार नाही. जरी आपण स्वावलंबीपणात गुरफटून जातो. प्रार्थना करत नाही आणि हळूहळू भरकटू लागतो तरी तो आपल्या जवळ असतो. तो दरवाज्यापाशी, बाहेरच आहे – आताही. आपल्याला तोंडातून ओकून टाकायला त्याला नको आहे. त्याच्या कृपेच्या आणि दयेच्या मेजवानीत  त्याला आपल्याबरोबर जेवायचे आहे, हसायचे आहे, गायचे आहे. त्याच्या मेजाजवळच फक्त नव्हे तर त्याच्या राजासनावर. आपल्या ह्रदयांमध्ये सध्या चढउतार होत असेल पण जेव्हा गौरवी पुनरुत्थित  ख्रिस्ताबरोबर चालू व राज्य करू तेव्हा नाही.

कोमटपणा आपल्याला संकटात टाकतो  कारण उबदारपणाच्या इशार्‍याने आपल्याला जिवंत वाटू लागते. जर आपण पश्चात्ताप केला नाही – जर सतत दार ठोठावणाऱ्या राजाचे आपण स्वागत केले नाही – तर आपण आपल्यासाठी अंधत्व, नग्नता आणि गरिबी निवडली आहे. आणि जो आपल्याला मोकळे करू शकला असता व दृष्टी देऊ शकला असता त्या येशकडून आपल्याला नाकारले जाईल आणि दोषी ठरवले जाईल.

पण जर आपला स्वावलंबीपणा त्याला समर्पण केला आणि आपली पहिली प्रीती संजीवित केली तर तो आपल्यामध्ये अग्नी प्रज्वलित करेल जो कधीही विझणार नाही.

Previous Article

जेव्हा देव अन्यायी वाटतो

Next Article

आता ते तुम्हाला समजण्याची गरज नाही

You might be interested in …

त्याच्याबरोबर वृद्ध होताना भिऊ नका

लेखक : जेराड मेलीन्जर काही वर्षांपूर्वी माझे आजी व आजोबा अजूनही आमच्याबरोबर होते तेव्हा आम्ही एका पिकनिकला गेलो. आजी पहिल्यासारखी राहिली नव्हती. विस्मरण हळूहळू कायमचे झालेले होते. ते इतके वाढले की तिला माझे किंवा घरच्या […]

विसाव्या वर्षी तुमचे जीवन कसे उद्ध्वस्त कराल?

जोनाथन पोकलाडा आपले जीवन उद्ध्वस्त करण्याच्या योजना कोणीच करत नसते. अपयश हे आपले ध्येय कोणीच बनवत नाही किंवा नव्या वर्षासाठी तसा निर्णय घेत नाहीत वा पंचवार्षिक योजना बनवत नाहीत. लहान मुले आपण दारुडे होणार असे […]

सामान्य भक्तीचे शांत सामर्थ्य

स्कॉट हबर्ड ख्रिस्ती या नात्याने आपल्याला फक्त बायबल वाचण्यातच रस नसतो. जे वाचतो ते आपल्याला भावले जावे, त्याने आपल्याला प्रेरणा द्यावी व आपल्याला बदलून टाकावे अशी आपली इच्छा असते. आपण लवकर उठून शास्त्रलेखांच्या पानावरून केवळ […]