Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जून 6, 2023 in जीवन प्रकाश

आपण अधिक चांगल्या देशाची उत्कंठा धरतो

आपण अधिक चांगल्या देशाची उत्कंठा धरतो

डेविड मॅथीस

गेल्या दोन तीन वर्षात टाळेबंदी व सामाजिक अस्थिरता यासोबतच  कित्येक शहरांना नवे अडथळे आणि धोक्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारी यंत्रणा, अधिकारी यांच्याकडे न्यायासाठी ओरड करून या मानवी प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण या युगात मिळणाऱ्या न्यायाने वाया गेलेला वेळ आणि विशेषत: गमावलेली जीवने परत मिळू शकत नाहीत. कारण लोक  मानवी न्यायाची अपेक्षा करतात दैवी न्यायाची नाही.

आपली उत्तम शहरे त्यांच्या लोकांप्रमाणेच खोलवर भग्न झाली आहेत. आणि जर त्यांचा पुनरुद्धार व्हयचा  असेल तर तो खरीखुरी आशा असलेल्या स्त्री पुरुषांकडूनच होईल. ख्रिस्ती आशेची परिणती इब्रीकरांच्या पत्रात १० ते १२ अध्यायात आपण पाहतो. ह्या आशेने मोशे, येशू आणि पहिली ख्रिस्ती मंडळी यांच्या जीवनात कसे कार्य केले हे आपण पाहतो. व आपल्या पुढील जीवनात चालण्यास आपण हीच आशा धरण्यास मदत होते.

त्याने संपत्तीपलीकडे पहिले


जुन्या करारातील सर्वात मोठी घटना ही निर्गमाच्या पुस्तकात  सुरू होते. त्यामधली महान व्यक्ती म्हणजे मोशे. देवाच्या लोकांचा उद्धारकच येऊ नये म्हणून फारोद्वारे सर्व मुलगे नामशेष करण्याची सैतानाची योजना देवाने उधळून लावली. प्रथम  त्यांची सोडवणूक करणाऱ्याची या हत्येपासून देवाने सुटका केली. त्याला पेटाऱ्यात ठेवले गेले व फारोच्या कन्येला तो सापडला. हा सोडवणारा त्याचा काटा काढणाऱ्याच्या घरातच वाढू लागला.

आणि जेव्हा तो प्रौढ झाला तेव्हा या मोशेने एक लक्षणीय निर्णय घेतला. “मोशे प्रौढ झाल्यावर, त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले (इब्री ११:२४-२५). हे त्याने “विश्वासाने” केले. ह्यामुळे काय साध्य झाले? आपण वाचतो, “‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती” ( इब्री ११:२६).


हेच विश्वास साध्य करतो. तो या अविश्वासी जगातील सध्याच्या संपत्तीकडे पाहतो आणि आपल्या डोळ्यांनी जे दिसते त्यामधून त्यापलीकडे पाहतो. तो आपल्याला दिसणाऱ्या दुय्यम वास्तवापलीकडे असलेला देव, त्याचे वचन, त्याचे हेतू व  त्याची अभिवचने या प्राथमिक वास्तवाकडे पाहतो. मोशेला हे ठाऊक होते की देवाने अब्राहामाला अविश्वासातून बाहेर बोलावले आणि त्याच्याद्वारे एक राष्ट्र उभे करण्याचे अभिवचन दिले. त्याच्या वंशामध्ये येणारा एक  सापाचे डोके ठेचण्याचे (उत्पती ३:१५) अभिवचन पूर्ण करणार होता.  मोशे या सापाच्या दातांना ओळखून होता. वयात येताच त्याला एक निवड करावी लागली. मिसरातील राजवाड्यात त्याच्या सभोवती असलेली संपत्ती, सुखसोयी, विशेष अधिकार, तो कसा नाकारू शकला? फक्त “पुढील पारितोषिकाकडे” पाहत असतानाच.  नष्ट होणाऱ्या सभोवतालच्या संपत्तीकडे नव्हे तर कायम टिकणाऱ्या दूरवरच्या, अभिवचनातील भविष्यातील संपत्तीकडे.

या भविष्यातील दिशेला – सध्यासाठीच नव्हे तर भविष्यासाठीही वापरलेल्या  विश्वासाला- आपण आशा असे म्हणतो.

तर मोशेच्या जीवनाने आशा पहिली. मिसराच्या धननिधींपलीकडे पाहात, ख्रिस्तामध्ये येत असलेल्या मोठ्या संपत्तीसाठी त्याने तुच्छता आणि छळाचा मार्ग निवडला.


येणाऱ्या आनंदासाठी त्याने सहन केले


तरीही या महान मोशेपेक्षा अधिक चांगला आदर्श म्हणजे ज्या संदेष्ट्याची मोशेने आशा धरली तो येशू. “कारण ज्या मानाने घर बांधणार्‍याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे त्या मानाने येशू हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे” (इब्री ३:३). मोशे हा विश्वासू सेवक होता. ख्रिस्त हा विश्वासू पुत्र होता (इब्री ३:५).

तर पुत्राची आशा आपल्याला काय शिकवते?

इब्री लोकांना कळसाचे उत्तेजन देताना लेखक आव्हान देतो, “आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे” (इब्री १२:१). त्यांना सहन करण्याची/टिकून राहण्याची  गरज होती. त्याने इब्री १०:३६ मध्ये म्हटले, “तुम्हांला सहनशक्तीचे अगत्य आहे.” टिकून राहणे म्हणजे शर्यतीत धावणाऱ्याला अडथळा होत आहे. कदाचित आतून किंवा बाहेरून, कदाचित थकवा, धावपट्टी खराब असेल किंवा निराशा आली असेल. येशूपुढे कोणताच आदर्श सरस नसणार. पण आपण फक्त येशूकडे पाहत नाही तर त्याची दृष्टी ज्यावर होती ते पाहतो. “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला” (इब्री १२:२).


मानवी देहातल्या देवाला सुद्धा सहन करण्याची व आशेची गरज होती. आणि आशेसाठी त्याने कोठे पहिले? फक्त सामान्य अडथळ्यांमध्ये टिकून राहायला नाही तर वधस्तंभ सोसताना टिकून राहण्यासाठी? त्याच्यापुढे जो आनंद ठेवला होता त्याकडे पाहताना – त्याचे कार्य पूर्ण करण्याचा आनंद, आपली वधू सुरक्षित करण्याचा आनंद, आणि सर्वात मोठा आनंद म्हणजे पित्याच्या अगदी जवळ जाऊन त्याच्या उजव्या हाताशी बसण्याचा आनंद.


खुद्द ख्रिस्तासाठी आणि ख्रिस्ती व्यक्तीसाठी आशा म्हणजे मानवी आशावाद नाही जो आपण स्वत:च उंचावत राहतो. ती स्वभावाची लवचिकता नाही, उल्हसित वृत्ती नाही, किंवा होकारात्मक विचार नाहीत. ख्रिस्ती आशा ही दैवी आहे. मोशेसाठी ते भोवतालच्या धनसंपत्ती, सुखसोयी पलीकडे पाहणे होते. आणि येशूने हेतुपूर्वक मरणापर्यंत दु:ख सहन केले कारण पलीकडे जो आनंद त्याची वाट पाहत होता त्याच्या  निश्चित आशेमुळे.  ह्या आनंदापुढे  प्रत्येक संकट फिके पडेल कारण  आपण देवाच्या सान्निध्यात त्याच्यासमोर  येऊ.

ते अधिक चांगल्याला बिलगून राहिले

शेवटी पहिल्या मंडळीचे ख्रिस्ती लोक. मोशे ख्रिस्त यांच्यासारखे आदर्श असामान्य म्हणून आपण बाजूला ठेवू शकू. पण आपलं काय? इब्रीकरांस पत्र आपल्याला आशेची मानसिकता शिकवते. फक्त मोशे आणि येशूद्वारे नाही तर त्या मंडळीत जे सामान्य, अनामिक, ख्रिस्ती जन होते त्यांच्याद्वारे सुद्धा.

आता सध्याच्या छळामध्ये ख्रिस्ती विश्वासात टिकून राहावे म्हणून आदेश देताना हे पत्र ते विश्वासात कसे टिकून राहिले, त्यांना काय आशा होती,  जेव्हा ते विश्वासात प्रथम आले ते दिवस, आणि त्या विश्वासात टिकवून ठेवणारी आशा  याची लेखक त्यांना आठवण करू देते.
“पूर्वीचे दिवस आठवा; त्यांमध्ये तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली; कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला; तर कधी अशी दया झालेल्यांचे तुम्ही सहभागी झालात. कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि [स्वर्गात]आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली” (इब्री १०:३२-३४).


त्यांच्यातील काही जणांना त्यांच्या विश्वासामुळे तुरुंगात टाकले गेले. त्यावेळी अधिकारी बंदिवानांना जेवण पुरवीत नसत. यामुळे त्यावेळचे ख्रिस्ती लोक पेचात पडले: आपल्या बंदिवान मित्रांसाठी पुढे जाऊन पुरवठा घेऊन जावा का? त्यामुळे त्यांच्याशी असलेली एकी दाखवून आपणही छ्ळासाठी आपल्याला उघड करावे का? जर ख्रिस्ती म्हणून त्यांनी स्वत:ला जाहीर केले तर त्यांची सर्व जगिक मालमत्ता लुबाडली जाणार होती. पण या जगिक गोष्टींपेक्षा त्यांना महान आशा होती. म्हणून ते पुढे गेले आणि त्यासाठी त्यांना छळ सहन करावा लागला.

त्यांनी त्यांच्या वतनाची  हानी आनंदाने सोसली कारण आपल्याला अधिक चांगले व टिकावू वतन आहे हे त्यांना  ठाऊक होते ते वतन म्हणजे ख्रिस्त – तो स्वत:च त्यांचे पारितोषिक होता.


हे पहिल्या ख्रिस्ती लोकांचे उदाहरण आपल्याला शिकवते की ख्रिस्ती आशा असे शिकवत नाही की, आपले सर्व चांगले, आपला सर्व आनंद, आपले पारितोषिक हे सर्व भविष्यात आहे. आपण भविष्याकडे पाहतो. पण आतासुद्धा आपल्याला ख्रिस्तामध्ये उत्तम आणि टिकणारे वतन आहे. आपल्याला तो आत्ताही आहे. आपली भविष्याची भक्कम आशा ही आपल्याला आज असलेल्या आनंदाशी जडलेली आहे. ती आपण  ख्रिस्तामध्ये अनुभवतो.

या युगात येणाऱ्या आंतरिक आणि बाह्य संकटात, अडथळ्यात ख्रिस्तच आपल्याला आता राखतो. ख्रिस्ती आशेचा अर्थ असा नाही की आपण रिकामे, एकटे असे, तो येईपर्यंत या मार्गात धावत राहणार. आपल्याला आता तो आहे ज्याने आपल्याबरोबर राहणार हे अभिवचन दिले आहे (मत्तय २८:२०). आणि तो उदारपणे आपल्याला त्याचा आत्मा देतो (योहान ३:३४).

येणाऱ्या नगराचा पाठपुरावा करा


आपल्याला टिकून राहण्याची खरंच गरज आहे.  आणि सध्याच्या दिवसात तर ही गरज अधिकच जाणवते. आपण ढोंग करीत नाही की आपली जगिक नगरे – त्यांची असमानता, सदोष न्याय, अपूर्ण संधी – यांसह आपली त्या सार्वकालिक नगरासाठी असलेली उत्कट इच्छा तृप्त करू शकतील. जे नगर पुढे येणार आहे त्याची आपण वाट पाहत आहोत (इब्री १३:१४). आपण अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतो कारण देवच  आपल्या साठी हे नगर तयार करत  आहे  (इब्री.११:१६). कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची आपण  वाट पाहत आहोत (इब्री.११:१०)

आता आपण स्वत:ला परके व प्रवासी असे समजतो (इब्री ११:१३). आपण अजून घरी नाही हे समजून घेत. पण आपल्याला आशा आहे तिची चव आपण घेत आहोत.

आणि त्या आनंदात आपण आपल्या सध्याच्या भग्न, पापी शहरांमध्ये जगिक नागरिक म्हणून काम करतो. आपला नांगर मात्र स्वर्गीय नागरिकत्वामध्ये रोवलेला आहे. जे पारितोषिक आपल्याला मिळणार त्यासाठी जी काही किंमत भरावी लागेल ती भरायला आपण तयार आहोत.