अक्टूबर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

 ख्रिस्तजन्माचा सण: यशया ५३:२

“ तो त्यांजपुढे रोप्यासारखा, रुक्ष भूमितील अंकुरासारखा वाढला”  (यशया ५३:२).

जगाच्या आणीबाणीच्या जागतिक परिस्थितीसाठी, देवाच्या चुकलेल्या मंडळीसाठी देवाच्या अद्वितीय वचनात, बायबलमध्ये अगदी अनुरूप असा प्रभूच्या दु:खाचा, अपमानाचा, गरीबीचा, निरोप सर्वत्र पेरलेला आहे. वरील प्रतीक यशयाच्या ४० ते ६६ भाग २ मधील आहे. या विभागात चार सेवकगीतं आहेत. ती लक्षात घेतल्यावर या प्रतीकाचा अर्थ सापडेल.

(१)पहिलं सेवकगीत – यशया ४२:१-७ : देव – मानवाची सेवा
(२) दुसरं सेवकगीत – यशया ४९:१-९; व ५०:४-५: सेवक म्हणजे संदेष्टा.
(३) तिसरं सेवकगीत – यशया ५०:६-११ : सेवक म्हणजे रक्तसाक्षी.
(४) चौथं सेवकगीत – यशया  ५२:१३ ते ५३:१२ सेवकाचं दु:खसहन.

या सर्व सेवकगीतांच्या प्रकाशात अखेरच्या गीताचा अर्थ पाहू.

पहिल्या भागात सेवकाची, म्हणजे त्यानं केलेली देवाची म्हणून पातकी मानवाची केलेली सेवा आहे. दुसऱ्या गीतात तो देवाच्या वचनानं, संदेष्टा होऊन सेवा करतो. पण तिसऱ्या गीतात त्या सेवेसाठी त्याला दु:खसहन करावं लागतं. असलं अकारण दु:खसहन प्राप्त झाल्यानं तो देवाला हाक मारतो व स्वत:ला त्याच्या हाती सोपून देतो. तर या चौथ्या गीतात खुद्द यहोवा या दु:खसहनाचं विवेचन करतो. यशया ५२:१३-१५ मध्ये तो या वेदना विनाकारण नसून त्या त्याचं वैभव असल्याचं सांगतो. त्यामुळं तो अत्युच्च होणार असल्याचं नोंदवतो. हे स्पष्टीकरण ऐकून राष्ट्रे, राजे, लोक, दचकून तोंडावर हात ठेवतात, कारण दु:खाचा हा असला अर्थ त्यांनी कधीच ऐकलेला नसतो (५२:१५).

दुसऱ्या भागात ( यशया ५३:१-३ ) एका निराळ्या पद्धतीनं यहोवा मनुष्याबरोबर बोलत आहे. असल्या विलक्षण दु:खसहनानं पातकी मानवतेची आतली आध्यात्मिक जाणीव जागी होते. आणि यहोवासमोर ती बोलू लागते. हे कोण बोलत आहे? आठव्या वचनात तर देव म्हणत आहे की, “माझ्या लोकांच्या पातकामुळं त्याला ताडन करण्यात आलं.” म्हणजे हे बोलणारे देवाचे लोक आहेत. त्यांची आध्यात्मिक जाणीव, आतली दिव्य दृष्टी जागी झालेली मानवता आहे. ती काय म्हणतेय? दु:खसहन उपकारक आहे; आत्मयज्ञ व्यवहारात उपयोगी गोष्ट आहे; आणि वेदना वैभवाला जन्म देतात. असं ती म्हणते? यहोवा तेच तर म्हणतो. आपल्या सेवकाच्या सेवेतील दु:खसहनाचं हेच स्पष्टीकरण देतो. मग ही मानवता असलेली देवाची मंडळी दचकते. जागी होते. ते दु:खसहन परत मनानं, देवाच्या नजरेनं न्याहाळते. आणि तिला अर्थ समजतो, मग ती शरमिंदी होऊन जाते. आणि मग दुसऱ्या भागात देवासमक्ष आपली पापे नम्रतेनं पदरी घेते.

होय बापा, तू म्हणतोस तेच खरं! तू सांगितल्यावर, दाखवून स्पष्ट केल्यावर दिसलं. नाहीतर ते दु:ख, त्या यातना, वेदना, अपमान, पाहूनही आम्ही तुच्छतेनं हसलो व त्याकडे दुर्लक्ष केलं. तू सांगितल्यावर मग समजलं, नाहीतर ह्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला? आम्ही तर नाही विश्वास ठेवला. या दु:खदायी वेदनांमध्ये देवाचा भुज, हात आहे असं (५३:१) कोणाला वाटलं होतं? आम्हाला तर नव्हतं वाटलं. तहानेल्या रुक्ष भूमीत असलेल्या मुळाप्रमाणं त्याच्या जन्मापासून तो अपमान, गरीबीत हालअपेष्टेत वाढला. तो अखेर “तुच्छ मानलेला, टाकलेला, क्लेशांनी व व्याधींनी व्यापलेला, लाजिरवाणा” असा आम्ही त्याला पाहिला. तोंड फिरवलं, त्याला मानलं नाही. देवा!! क्षमा कर आमची!

“शुष्क भूमितील अंकुर” म्हणजे अपमान, दु:ख कष्टात, हाल अपेष्टेत झालेला ख्रिस्ताचा जन्म होय. खरंच तहानेल्या शुष्क जमिनीतील विद्रुप दिसणाऱ्या मुळाप्रमाणेच ख्रिस्ताचा जन्म झाला. आपण, मी त्याला मानलं का? कबूल केलं का? त्यावर खरा विश्वास ठेवला का?
हे मुकाट्यानं, एकटेपणानं अश्रू गाळणारे बंधू, भगिनी, धीर सोडू नको. सर्वश्रेष्ठ रक्तसाक्षी ख्रिस्त, एकटाच त्या अपमानास्पद वधस्तंभावर लटकलेला येशू, तुझा सोबती आहे. त्याचा जन्म पाहा. राजकुळ खुद्द दाविदाचं. पण पोट भरायला सुतारकी. जन्म घ्यायला जागा नाही. गुरांच्या गोठ्यात जन्म… पाण्याला पारखं झालेल्या तहानेनं तोंड वासलेल्या जमिनीत मळकटलेल्या मुळाप्रमाणं “रुक्ष भूमीतील अंकुरासारखा” तो जन्मला.

मरीयेला त्याची आई होण्याचा विलक्षण मान मिळाला. ते खालील कवनात पाहू:

  •  प्रभूच्या आईला मिळाला महान – धन्य विलक्षण आशीर्वाद
  •  विरोधाच्या बोला, चिन्ह व्हावयाला – नेमियेले बाळा – तुझ्या माई
  •  इस्राएलामध्ये व्हावया पतन – तसेच उत्थान – अनेकांचे
  •  ऱ्हदयातुनीया विचार येण्याला – प्रगट होण्याला – अनेकांच्या
  •  तुझ्या जिवातून परंतु जाईल- तरवार शिरेल- आरपार !

शिमोनानं या बाळाच्या समर्पणाच्या वेळी केलेल्या धन्यवादाच्या वेळी काढलेले हे उद्गार आहेत. त्यात तो मरीयेला म्हणतो, “पाहा, इस्राएलात अनेकांचं पतन व्हावं…अनेकांचं पुनरुत्थान व्हावं, त्याच्याविरुद्ध लोक बोलतील असं एक चिन्ह व्हावं म्हणून ह्याला नेमलं आहे. आणि पुष्कळ लोकांच्या अंत:करणातील विचार बाहेर उघड व्हावेत म्हणून खुद्द तुझ्या स्वत:च्या जिवातून देखिल तरवार भोसकून जाईल” (लूक २:३४). त्या पिकल्या फळानं, वृद्ध संत शिमोनानं देवाच्या आईला, मरीयेला, दु:खाच्या दुधारी तरवारीचा आशीर्वाद दिला. ख्रिस्त जन्म अन् दुधारी तरवार? दुनियेला काय समजणार यातलं रहस्य?

हा आशीर्वाद, दु:खाचा, कमालीच्या दु:खाचा आशीर्वाद आहे. तरवारीचा आणि गरीबीच्या गव्हाणीचा संबंध तरी काय आहे? तोच दु:खाच्या दुधारी तरवारीचा निरोप आज आपण वृद्ध शिमोनाच्या तोंडून ऐकणार आहोत. वर्षानुवर्षे आपण आनंदाचे संदेश ऐकत आलो आहोत. पण पवित्र आत्म्यानं भरलेल्या, मशीहाच्या आगमनाची वाट पाहाणाऱ्या या संताला पवित्र आत्मा नेमका याच वेळी या बाळाची व त्या दांपत्याची भेट घालून द्यायला घेऊन आला आहे, हे देखील त्या सार्वभौम देवाने चमत्काराने घडवून आणलं आहे, तो निरोप आपल्याला देण्यासाठीच. परिपक्व असलेला, पवित्र आत्म्याने भरलेला, पिकल्या केसांचा, जगाला कंटाळलेल्या, ज्याचे एक पाऊल पलीकडच्या जगात असून, दिव्य दृष्टी प्राप्त झालेल्या या संताला गरीबीचा गोठा आणि दु:खाची तरवार यात काय संबंध दिसला ते आपण पाहू. आणि त्या प्रकाशात आपलंही आत्मपरीक्षण करू.

“ इस्राएलात” हा शब्द वापरून तो देवाच्या निवडलेल्या, वेगळ्या केलेल्या लोकांची, मंडळीची कहाणी सांगतो. ख्रिस्तजन्माचा निरोप ख्रिस्ती लोकांना नाही तर कोणाला आहे? बाळंत्यात लपेटलेल्या या तान्हुल्याला देवानं कशासाठी नेमलं आहे? तरवारीसाठी. कसली तरवार? दुनियेतली? नाही हो! ज्याच्याविरुद्ध दुनिया बडबड करील, विरुद्ध बोलेल, असलं चिन्ह… म्हणजे वधस्तंभ… म्हणजे बहुतांच्या तारणासाठी कमालीच्या दु:खसहनाची,

बदलीच्या मरणाची तरवार आहे ती. आणि ती तरवार मरीयेच्या काळजाच्या आरपार जाणार. ही तरवार प्रथम इस्राएलांतील अनेकांच्या ऱ्हदयाचा ठाव घेऊन त्यांच्या काळजातून आरपार निघून जाणार आणि मरीयेच्याही ! प्रथम दुसऱ्यांच्या मग तिच्या ऱ्हदयातून आरपार जाईल ती तरवार! त्या ऱ्हदयांच्या आत दडलेले विचार खेचून काढत बाहेर येणार ती तरवार! पण कशासाठी? अनेकांच्या निखालस नाशासाठी! तसेच अनेकांच्या पुनरुत्थानासाठी म्हणजे पापाच्या मरणातून काढून नवीन जीवनात आणण्यासाठी. त्यासाठी त्यांचे ऱ्हदयात दडलेले विचार, मनोभाव बाहेर खेचून, ख्रिस्ताच्या आईच्या काळजाचा भेद करून जाणार ती तरवार! ख्रिस्तजन्माशी, गव्हाणीशी संबंध म्हणजेच तरवारीशी, वधस्तंभाशी संबंध! खरंच असं आहे?

असं झालं? त्यासाठी गव्हाणीशी संबंधीत सहा प्रकारचे लोक पाहू. मग या आशीर्वादावर प्रकाश पडेल. आणि आपण आत्मपरीक्षण करून आपण कुठं आहोत हे स्पष्ट पाहू शकू.

(१) हेरोद राजा – जुलमी, क्रूर, खुनी, अत्यंत अधम पातकी. त्याचा गव्हाणीशी संबंध आला. त्याचं ऱ्हदय या तरवारीनं आरपार चिरलं. आणि त्यातील त्याचे पातकी, खुनी विचार बाहेर उघड झाले. त्याचं पतनच झालं. त्या तरवारीनं त्याचा बळी घेतला.

(२) शास्त्री – देव व मनुष्य यातले धंदेवाईक मध्यस्थ, गरजवंत, गरीब, पातक्यांना वचनांचा उलगडा करणारे धर्ममार्तंड! शास्त्राचा अर्थ घेऊन शहरी घरातच बसले. गरजवंतांना गव्हाणीकडे पाठवलं त्यांनी! पण स्वत: जाऊन बाळाला पाहाण्याची इच्छाही केली नाही. तसं मनातही आलं नाही त्यांच्या! या अंधळ्या वाटाड्यांनी जन्मभर या बाळाचा हेवादावाच केला; आणि आपल्या अनुयायांसकट नरकाचीच वाट धरली.

(३) मेंढपाळ – ही भाबडी माणसं, मानवजातीच्या बालपणाचे दर्शक; धावतच गव्हाणीकडं गेली, आणि आपली भक्ती त्याला अर्पण केली.

(४) मागी – मानवजातीच्या ज्ञानी प्रौढत्वाचे हे दर्शक. अनेक मुलखं, प्रांत, तुडवत, अनेक संकटांशी मुकाबला करीत बाळाकडं गेले. त्याची अर्थपूर्ण उपासना केली.

(५) शिमोन व हन्ना संदेष्ट्री – मानवजातीच्या परिपक्वतेचं हे दर्शक! पिकली, परिपक्व अशी ही वृद्ध मंडळी भरल्या मनानं बाळाची मंदिरात जाहीर उपासना करतात व आपल्या घरी जातात.

(६) देवदूत – ही मानवजातीच्या पूर्णावस्था, आकाश दुभागून खाली येतात, घोष करीत बाळाची उपासना करतात. प्रथमच त्याची सुवार्ता गरीबांना सांगतात.

अशा प्रकारे देवाच्या मंडळीतील अनेकांच्या ऱ्हदयातील विचार प्रगट करून त्यांचा पूर्ण नाश किंवा पुनरुत्थान करण्यास गरीबीची ही गव्हाणी देवानं नेमली नव्हती असं कोण म्हणेल?

Previous Article

अन्यायाचं धन  (॥)

Next Article

ख्रिस्ताचं मन : फिलिपै २:५ (।)

You might be interested in …

नव्या वर्षासाठी आठ प्रश्न

डॉन व्हिटनी देवाशी अगदी विश्वासू असलेल्या लोकांनाही  थांबून आपल्या जीवनाची दिशा काय आहे याचा आढावा घ्यावा लागतो. खरं तर न थाबता, एका व्यस्त आठवड्यातून दुसऱ्या आठवड्यात जाणे आणि आपण कुठे चाललोत याचा विचार न करणे […]

इतरांचे भले चिंता

ग्रेग मोर्स माझ्या पत्नीवर त्या पापाचा परिणाम पाहीपर्यंत मला ते दिसतही नव्हते. इतकी उत्साही, बालसदृश, तडफदार, असणारी ती आता सहजतेने विनोद करेना, तिचे हास्य मावळले. ती शांत झाली, तिच्यातला जोम कमी झाला, ती पूर्वीची राहिली […]