अक्टूबर 10, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

‘माझी आई’

लेखांक ३

“प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला, आणि मला मातेसमान अशी जी त्याची आई तिलाही सलाम सांगा” ( रोम १६:१३).

तारणाचा पाया पवित्र शास्त्र! शास्त्र शिकवण्याची पहिली जागा घर. शास्त्र परिणामकारकतेनं ऐकण्याचा पहिला प्रसंग म्हणजे घरातील उपासना. त्यासाठी आपण आज शास्त्रातलं एका नमुनेदार कुटुंबाचं चित्र पाहणार आहोत. तारणाच्या

महान ग्रंथात तारलेल्यांचा एक चित्रमहाल आहे. त्या चित्रमहालातील एका प्रसिद्ध कुटुंबाचं चित्र आहे ते! तारणाऱ्याच्या अद्वितीय चित्राबरोबर बसण्याचा मान ज्या थोड्या संतांना मिळाला आहे, त्यापैकी हे चित्र आहे.

त्या कुटुंबातील धन्य मातेला संत पौलासारखा महान संत ‘माझी आई’ असं म्हणतो. किती प्रीतीनं भरलेलं संबोधन! तारलेल्यांचं एकमेकांमधील नवीन नातं! त्यातील जिव्हाळा, सर्वच अपूर्व, नवनवलाईनं भरलेला! पहिल्या शतकातील ज्या कुटुंबांची आपल्याला माहिती आहे, त्यात ह्या कुटुंबाप्रमाणं संपूर्ण कुटुंबांची माहिती फारच थोड्या कुटुंबांची वर्णिली आहे. पौलासारख्या संतानं त्या साध्वीला ‘आई’ म्हणावं! अद्वितीयच असलं पाहिजे ते कुटुंब!

त्या कुटुंबाचा पाया कशावर घातला आहे ते पाहू या. त्या बापघरातील बाप एक दिवशी सकाळी शेतातून घरी यरुशलेमास येत होता. यरुशलेमच्या फरसबंदीच्या अरुंद रस्त्यावर त्यानं मोठी गर्दी पाहिली. कुतुहलानं कोपरखोळ्या देत त्यानं गर्दीतून वाट काढली. गर्दीच्या मध्यभागी पोहंचला. पाहातो तो काय? दहा हजारात देखणा असलेला एक पुरुष! पण दु:खातिशयानं त्याचा चेहरा काळवंडलेला आहे. मारानं, काट्यांच्या मुगुटानं, गोठल्या रक्तानं माखला आहे. कुरूप झाला आहे. एक अजब वधस्तंभ त्याच्या खांद्यावर आहे. त्याच्या ओझ्यानं तो खाली कोसळत आहे. काही क्रूर शिपाई तरीही त्याला मारीत आहेत. तो मात्र तोंडातून एक शब्दही काढत नाही. मारण्याची शिकस्त करूनही तो उठत नाही, असं ते धटिंगण पाहातात. मग यहूदी नसलेल्या या खेडवळाला ते वेठीला धरतात. त्याच्या इच्छेविरुद्ध तो खांब उचलायला ते धटिंगण त्याला भाग पाडतात. तो पुरुषश्रेष्ठ उठतो. आणि आपल्या वधस्तंभाची अखेरची वाट चालू लागतो. शिमोन कुरनेकर त्याचं ते अद्वितीय दु:खसहन जवळून पाहतो. त्याच्या खांबाच्या एका टोकाला हात लावतो. खांब वाहायला मदत करतो. त्याच्या पवित्र रक्तबिंदूंना चुकवत चुकवत वधस्तंभाची वाट चालतो. पहिल्यानं वेठ म्हणून, मग सहानुभुतीनं, मग प्रीतीनं, अन् अखेर भक्तीनं! तिथंच त्याला तो आपला तारणारा म्हणून पत्करतो. घरी येतो. आपल्या आवडत्या सोबतीणीला ती अद्वितीय गोष्ट सांगतो. तिचंही परिवर्तन होतं. आपल्या दोन मुलांसकट ते संतसमुदायात समाविष्ट होतात. पौलाची मदत करतात. तारणग्रंथामध्ये सर्वकाळचे नमूद केले जातात. हा महानमान का बरं मिळाला? ते संपूर्ण घराणं तारलं होतं म्हणून!शिमोन कुरनेकर बाप, अलेक्झांद्र मुलगा, रूफ दुसरा मुलगा. अखेर त्यांची अनामिक आई धन्य!

या गौरवाचं कारण काय? कुटुंबातील उपासना.

(अ) घरातला बाप – शास्त्रातल्या सर्व नामवंत कुटुंबांमध्ये ही बापमंडळी उपासना करीत असलेली तुम्हाला दिसेल. अब्राहामानं वेदी बाधली. परमेश्वराचं नाव घेऊन प्रार्थना केली. इसहाकानं, याकोबानं, ईयोबानंही तसंच केलं (ईयोब १:५).

(ब) घरातील आई – (२ तीम. १:४-५; तसेच २ तीम. ३:१४-१५ वाचा). या तरुणाच्या आईनं आणि तिच्याही आईनं आपल्या मुलांना, आपल्या नातवांना शिकवण्याची किती काळजी घेतली पाहा.

(क) घरातली मुलं – (अनुवाद ६:२०-२१ वाचा). तारलेल्या घरातील मुलं देखील शास्त्राविषयी कौतुक दाखवतात. आईबापांना प्रश्न विचारतात.

(ड) या प्रकारे सर्व कुटुंब शास्त्रामध्ये मग्न असतं. ( अनुवाद ४:९,१०; ५:२९; ६:२, ७ ही वचनं वाचा.) यावरून तुम्हाला देवाच्या वचनाबद्दलची आईबापांची जबाबदारी तुम्हाला कळून येईल. तुमच्या घराचं तारण होईल. ते बाहेर जाईल. पौलासारख्या संतांनासुद्धा आपल्या उपकारांनी, प्रेमळ वर्तनानं ‘आई’ म्हणायला लावील. सेवेकरी यावर का जोर देतात हे समजायचं असल्यास (२ पेत्र १:१०-१२ वाचा). तुमचं कधीही पतन होऊ नये ही आमची इच्छा आहे.

Previous Article

कौटुंबिक उपासनेत पवित्र शास्त्राचे स्थान

Next Article

कौटुंबिक उपासनेत पवित्र शास्त्राचे स्थान

You might be interested in …

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर अनुवाद : क्रॉसी उर्टेकर एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन […]

आपल्या जीवनकाळात येशू पुन्हा येईल का?

लेखक: स्टीफन विटमर येशूच्या काळापासून लोक दावा करत आहेत की अखेरच्या दिवसातील घटना त्यांच्या स्वत:च्या दिवसातच होणार. १९व्या शतकात विल्यम मिलर नावाच्या एका बायबल पंडिताने येशू मार्च २१, १८४४ या दिवशी येणार असा दावा केला. […]

देव तुम्हाला क्षमता देईल

जॉन ब्लूम बायबलमध्ये देवाने समाधान, उत्तेजन, मार्गदर्शन आणि खात्री देणारे मोलवान खडे काही ठिकाणांमध्ये विखरले आहेत.  मला अपेक्षा नसताना मी माझी वैयक्तिक भक्ती करत असताना अगदी किचकट अशा निर्गमच्या काही जागी मला ते दिसले. पूर्ण […]