जनवरी 2, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवाचे निसर्गावर सामर्थ्य — भाग २

 

जेरी ब्रिजेस

जेरी ब्रिजेस  ( १९२९ -२०१६) हे गेल्या काही दशकातील नामवंत ख्रिस्ती लेखकांपैकी एक आहेत. त्यांची अनेक पुस्तके जगप्रसिद्ध झाली असून अनेकांना त्यांच्या ख्रिस्ती वाटचालीत खोल मार्गदर्शन करणारी ठरलेली आहेत. त्यांच्याशी जवळून परिचय असणाऱ्यांची साक्ष आहे की, ते अत्यंत दयाळू व नम्र असे होते व देवाबरोबर नम्रतेने चालणे हे एकच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. पुढील काही लेखांतून देवावर विश्वास ह्या त्यांच्या पुस्तकाचा अनुवाद वाचकांना सादर केला जात आहे.

 

शारीरिक आपत्ती

देवाचे निसर्गावरही नियंत्रण आहे. बरे वाईट हवामान तो धर्मिकावर व अधार्मिकावरही पाठवतो. आपण वाईट हवामानाविषयी तक्रार करायची नाही. नैसर्गिक आपत्ती देखील त्याच्या नियंत्रणाखालीच येतात. निसर्ग व हवामान ही त्याची न्यायाची साधने आहेत हे आपण पाहिले. आता शारीरिक आपत्तीविषयी पाहू या.

आजार, दुखणी आली की आपण कचरतो. मुले जन्मतात त्यांच्यात काही वेळा मोठे अपंगत्व आढळते. कॅन्सर होतो. कितीही काळजी घेतली तरी वेदनामय आजार होतात. उपचार चालत नाहीत. निरोगी व्यक्ती अकाली असाध्य आजाराने पछाडते. देव शारीरिक आपत्तीवर सार्वभौम आहे का?
जेव्हा देवाने इस्राएलांची सुटका करण्यासाठी मोशेला पाचारण केले तेव्हा मोशेने सबब सांगितली; “मी बोलण्यास जिभेचा जड असून मुखाचा जड आहे.”  हे शारीरिक अडखळण त्याने पुढे केले. देव म्हणाला, “मनुष्याचे तोंड कोणी केले आहे? मनुष्यास मुका, बहिरा, डोळस किंवा अंधळा कोण करतो? मीच परमेश्वर ना? (निर्गम ४:१०-११). बहिरेपणा, मुकेपण, अंधत्व या नावांनी देव अडथळे दाखवून देतो. या शरीरिक त्रुटी केवळ जीन्समुळे किंवा जन्माच्या वेळच्या अपघातामुळे निर्माण होत नाहीत तर देवाचा हेतू पूर्ण होण्यास ह्या गोष्टी साधनीभूत होतात. देवाच्या सार्वभौमत्वाशिवाय अशी व्यक्ती जन्माला येत नाही. त्यामागे कोणतेही कारण असो त्यात देवाचा हात असतो. योहान ९:२ मध्ये शिष्य त्या जन्मांधाबद्दल येशूला विचारणा करतात, “रब्बी, ह्याच्या आईवडिलांनी पाप केले म्हणून हा असा जन्मला का?” येशू म्हणतो, “ह्याच्या आईवडिलांनी पाप केले म्हणून नव्हे तर त्याच्या जीवनातून देवाची महत्कृत्ये प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्मला (योहान ९:३). जन्मत: काही कमतरता घेऊन तो जन्मला असे येशू म्हणत नाही. देव त्या मनुष्याच्या अंधत्वावर नियंत्रण चालवीत होता. बहिरेपणा, अंधत्व, मुकेपणा यांचा प्रभू देव आहे. तोच प्रभू कॅन्सर, संधिवात, मतिमंदत्व व असाध्य रोगांवरही सार्वभौम देव आहे. ह्या गोष्टी अपघाताने घडत नाहीत. त्याच्या नियंत्रणाखाली घडतात.

मग आपण प्रश्न करू; हा सार्वभौम देव आपल्याला संकटे, दु:खे, वेदना सहन करायला का लावतो? या प्रश्नाचे उत्तर या अभ्यासापलीकडचे आहे. पण आदामाच्या पापामुळे सर्व निर्मिती दु:ख संकटाखाली आली आहे (रोम ८:२०). त्याचे मूळ मानवाच्या पतनात आहे. भले करणे, अगर दु:ख पाठवणे देवाच्या लहरीनुसार घडत नाही. तर मानवाच्या पापाला त्याने निर्धाराने केलेला हा प्रतिसाद असतो. निर्मितीला त्याने नैराश्याच्या जरी अधीन केलेले असले तरी तोच त्या दु:ख, वेदना संकटावर सत्ता गाजवतो. त्यांना कलाटणी देऊन तो त्याद्वारे आपले कल्याण करतो व त्याचे गौरव करून घेतो.

निसर्गनियम जितके त्याच्या काबूत आहेत तितकेच अनुवंशिक  आजार व रोगराईचे नियमही त्याच्या काबूत आहेत. त्या समस्यांवर आपण विचार करणार नाही. पण देवावर विश्वास व भरवसा टाकण्याच्या पातळीवरून त्यांना हाताळू. पहिली गोष्ट ही करायची की, देव आमच्या शरीरावर सत्ता गाजवतो हा विश्वास ठेवायचा. आजार, दुखणी, संकटे आपोआप येतात म्हटले तर विश्वास ठेवायला काही उरतच नाही. मात्र देव सार्वभौम आहे  हे समजो न समजो आपण त्याच्यावर विश्वास टाकू शकतो.

वंध्यत्व

खूप वर्षे मूल होण्यासाठी पती-पत्नी प्रार्थना करतात. पण यावरही देवच अधिपती आहे असे देवाचे वचन सांगते. देवाने हन्नेची कूस बंद केली होती (१ शमुवेल १:५). देवाने लेआची कूस वाहती केली होती (उत्पत्ती ९:३१). साराने म्हटले, “देवाने मला संतान दिले नाही” (उत्पत्ती १०:२). देवाचा दूत शमशोनाच्या आईला म्हणाला, “तू वांझ आहेस पण तू गरोदर होऊन पुत्र प्रसवशील” (शास्ते १३:३). जखऱ्याला दूत म्हणाला; “तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे, तुझी बायको अलीशिबा हिला पुत्र होईल” (लूक १:१३). मूल देणे न देणे ही गोष्ट देवाच्या हातात असल्याचेही वचने दर्शवतात. स्तोत्र १३९:१३ म्हणते, “तूच माझ्या आईच्या उदरी माझी घटना केली.”  केवळ गर्भधारणा करणे त्याच्या हाती आहे असे नव्हे तर उदरातील मूल तोच वाढवतो. देव आपल्या सार्वभौमत्वाचा आपल्या शरीरावर व निसर्गावर ताबा चालवतो.

रोग, दु:ख, शोक, संकटे, वेदना, वंध्यत्व अगर कुटुंबवत्सलता याविषयी आपण देवावर कसा विश्वास टाकायचा? देवाच्या हातात हे सर्व आहे. तोच हे घडू देतो. त्यासाठी प्रथम हे समजून घ्यावे की, त्याची प्रीती परिपूर्ण आहे. तो संपूर्णपणे सार्वभौम आहे आणि त्याचे ज्ञान व सुज्ञता अगाध आहेत. विलापगीत ३:३१-३३ म्हणते, “प्रभू कायमचा त्याग करणार नाही. जरी तो दु:ख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करतो. तो कोणावर मुद्दाम पीडा आणत नाही. मानवपुत्रास दु:ख देत नाही.” देवाला क्लेश, दु:खे पाठवण्यात आनंद नसतो. त्याचा हेतू आपल्याला त्यावेळी माहीत नसतो. पण त्याच्या अमर्याद सुज्ञतेने तो आपल्यावर ह्या गोष्टी येऊ देतो. तो दु:ख वाया जाऊ देत नाही. त्याचा वापर करून तो त्याचा उद्देश पूर्ण करतो. आपले मन दुखो अगर शरीर दुखो, आपण देवावर विश्वास टाकू शकतो. दु:ख संकटात त्याच्यावर भरवसा टाकणे म्हणजेच त्याचा स्वीकार करणे. स्वीकारणे व अधीन होणे अगर माघार घेणे यात फरक आहे. आपल्यापुढे पर्याय नसतो तेव्हा आपण माघार घेतो. खूप वेळा नको म्हणत आपण देवाच्या अधीन होतो. पण “स्वीकारणे” यात इच्छेचा भाग येतो. स्वीकारण्याची वृत्ती देवावरील विश्वास व्यक्त करते. देव आपल्यावर प्रेम करतो. तो उत्तम तेच करतो ही खात्री त्या विश्वासात असते. स्वीकारणे म्हणजे संततीप्राप्तीसाठी, आरोग्यासाठी प्रार्थनाच न करणे असे मुळीच नाही. आपण प्रार्थना करायची पण विश्वासाने करायची. देव करू शकतो पण त्याच्या अमर्याद सुज्ञतेने तो ते न करणे देखील पसंत करतो. त्यामुळे त्याच्या इच्छेला योग वाटेल तेच त्याने करावे अशी प्रार्थना करायची. विश्वासाने  त्याची इच्छा स्वीकारायची. ती साकार होईपर्यंत प्रार्थना करायची. गारांमुळे होणारा पिकांचा नाश तुम्ही अनुभवला नसेल, घर पडल्याने ढिगाऱ्याखालून वस्तू शोधून काढण्याची शोकमग्न कृती तुम्हाला करावी लागली नसेल . कदाचित अंशत: बहिरेपणा, दृष्टीदोष तुम्ही अनुभवला असेल. पण आपल्या अनुभवांवर आपला विश्वास नसावा, तर देवाच्या वचनातील सत्यांवर असावा.

हबक्कूकला प्रश्न पडला देव कोठे आहे? त्याच्याभोवती त्याला सर्वत्र अनीती माजलेली दिसत होती. अखेर त्याने निर्णय घेतला, देव काय करीत आहे हे मला उमगले नाही तरी मी त्याच्यावर भरवसा टाकीन. मग नैसर्गिक आपत्ती येवो, काहीही येवो. परमेश्वरावर भाव ठेवण्याचा त्याने निर्धार केला आणि तो म्हणतो, “अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातले कळप नाहीसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे (हबक्कूक३:१७-१९).

Previous Article

व्यस्त असण्यापेक्षा चांगले

Next Article

भारतात सुवार्तेवर झालेले हल्ले

You might be interested in …

गेथशेमाने बाग

लेखांक १                                         प्रस्तावना आपण दु:खसहनाचा सण पाळत आहोत. ख्रिस्ती धर्म हा मुलखावेगळाच धर्म आहे. कारण इतर धर्मांत जयंत्या, क्वचितदा पुण्यतिथ्या पाळल्या जातात. पण दु:खसहनाचा, लाजिरवाण्या मरणाचा सण फक्त ख्रिस्ती धर्मच पाळतो. वास्तविक दु:खासारखा जिव्हाळ्याचा […]

सहजतेने केलेली उपासना

ग्रेग मोर्स त्या उज्ज्वल दिवसाची सुरवात मोठ्या आशेने आणि खात्रीने झाली होती. पतनानंतर एदेन मधील मनुष्याच्या जीवनाशी सदृश्य असणारा हा दिवस होता: देवाचे  पुन्हा मनुष्यांमध्ये निवासस्थान झाले होते. इस्राएल लोकांच्या मुक्कामामध्ये निवासस्थान उभे होते. आपल्या […]

वधस्तंभ – देवाची वेदी

 डॉनल्ड मॅकलोईड प्रत्येक विश्वासी व्यक्तीचा प्रायश्चित्तासबंधीचा काही तरी सिद्धांत असतो. अखेर विश्वास हा वधस्तंभावर गेलेल्या तारणाऱ्यावर भरवसा आहे आणि ह्यासबंधी काही समजले नाही तर विश्वास हा अशक्य आहे. विश्वासाला पहिल्यापासून माहीत असते की वधस्तंभावर कोणी […]