जनवरी 28, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

 देवाच्या प्रीतीचा अनुभव जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

“माझी खात्री आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान अगर भविष्य अशा गोष्टी, बले, आकाश, पातळ किंवा कोणतीही सृष्टवस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची जी आपल्यावरील प्रीती आहे, तिच्यापासून वेगळे करण्यास समर्थ होणार नाही” (रोम ८:२८-२९).

आपण देवाच्या प्रीतीचा अभ्यास केला. देवाने कालवरीवर कशी प्रीती व्यक्त केली ते पाहिले. आपण अपात्र, पापी असताना आपल्या ठायी त्याने प्रीती करावी असे काहीही नसताना वधस्तंभावर प्राण देणारी टोकाची प्रीती केली. तो आपल्याला देवाच्या कुटुंबाचा घटक बनवतो. देव केवळ ख्रिस्तामध्ये आपल्यावर या प्रीतीचा वर्षाव करतो. आपण ख्रिस्तात आहोत म्हणून देव आपल्यावर ख्रिस्तासारखीची प्रीती करतो. त्याची सार्वभौम प्रीती मंडळीच्या कल्याणार्थ वापरतो हे आपण शिकलो. आता या प्रीतीचा आपण अनुभव घ्यायचा.

देवाची प्रीती सार्वभौम आहे. त्याचा पराक्रमी भुज हळुवारपणे काळजी घेणारा आहे. पण देवाची सार्वभौम प्रीती कार्यरत झालेली आपल्या नेत्रांना दिसत नाही. त्याऐवजी आपल्यावर कोसळणाऱ्या आपत्तीकडेच आपण पाहतो. आम्ही निसर्गाच्या क्रौर्याचा बळी पडलो आहोत किंवा आमच्यावर आलेली आपत्ती निष्कारण आली आहे असे आपण म्हणतो. अशावेळी तर उलट आपण त्याच्या प्रीतीविषयीच्या खात्रीलायक वचनांच्या आधारावर उभे राहावे. २ करिंथ ५:७ नुसार “आम्ही दृश्य नव्हे तर अदृश्य गोष्टींकडे पाहतो.” हे तत्त्व ख्रिस्ती जीवनात दृढ धरले पाहिजे. आपला विश्वास वरचेवर ढळतो आणि त्याच्या सुज्ञतेवर आपण आक्षेप घेतो. त्याच्या प्रीतीबद्दल शंका घेतो. स्तोत्र ३१:२२ मध्ये दावीद म्हणतो, “ मी तर अधीर होऊन म्हणालो, मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे” आपली आरंभी अशीच प्रतिक्रिया असते. देवाचे मुख, त्याचे आपली काळजी घेणे, त्याचे प्रेम करणे यांच्याशी आपला संबंध तुटला आहे असे आपल्याला वाटते. पण याच वचनात दावीद पुढे म्हणतो, “तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकला.” देव आपला त्याग करू शकत नाही कारण आपण त्याची मुले आहोत. आपण त्याच्या पुत्राशी जडलेलो आहोत. आपण त्याच्या दृष्टीपासून सुटू शकत नाही. पण शंका व अविश्वास यांना जर आपण स्थान देऊ तर त्याच्या प्रीतीला आपणच वंचित होऊ. सियोनाने म्हणजे देवाच्या लोकांनी देवाच्या प्रीतीला प्रश्न करून म्हटले, “देवाने माझा त्याग केला आहे. देव मला विसरला आहे” (यशया ४९: १४). पण देवाने त्याच्या लोकांना जबरदस्त प्रतिसाद दिला तो १५व्या वचनात आहे. तो म्हणतो, “स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या बाळाचा विसर पडेल काय? पण मी तुला विसरणार नाही.” दृढ मानवी बंधनाचे देव उदाहरण देतो व आपल्या प्रीतीचे समर्थन करतो. पण उच्च रीतीचे मानवी प्रेमही देवाच्या प्रीतीशी तुलना करू शकत नाही. तिचे वर्णनच करता येत नाही. आई तान्ह्या बाळाला विसरू शकते. माता या पापीच आहेत. नैसर्गिक प्रेमावरही स्वार्थीपणा वर्चस्व पावू शकतो. मानवी प्रेम अपयशी ठरते. पण देवाचे प्रेम कधीच अपयशी होत नाही. देव विसरत नाही. एवढेच नव्हे तर विसरू शकतही नाही. हे देवाच्या प्रेमाविषयी अगदी समर्थ विधान आहे. आपल्या तारणावर देवबाप किती काळजीपूर्वक कडक पहारा ठेवतो पहा. आपली खात्री पाहिजे की तो आपल्याला कधीच टाकणार नाही, मग आपल्यावर वाटेल तितक्या आपत्ती येवोत.

यहूदाचे साम्राज्य बाबिलोनच्या बंदीवासात गेले. तेव्हा आपण देवापासून पूर्णपणे विभक्त झालो आहोत असा त्यांना अनुभव आला. त्याचे कारण होते त्यांची अवज्ञा, बंडखोरी आणि मूर्तिपूजा. त्या राष्ट्रांचे बोलणे व्यक्तींमधील संभाषणाप्रमाणे वचनात  दाखवले आहे. त्याचे आपल्या जीवनाला लागूकरण करता येते. देवाशी आपला संपर्क तुटला असे ज्यांना वाटते तेव्हा त्यांनी विलापगीत ३:१-२० मधील रहस्य जाणावे. यिर्मया आत्मिक भावनांच्या तळाशी गेला. तो म्हणतो, “माझी विपत्ती  व माझे भ्रमण, कडुदवणा व विष यांचे स्मरण कर. माझा जीव त्यांचे स्मरण करत राहतो म्हणून तो माझ्याठायी गळाला आहे.” पण लगेच २१व्या वचनात त्याच्या मनाचा कल बदलतो. “हे मी मनात आणतो म्हणून मला आशा आहे.” या वचनांनी कित्येक निराश जनांना आशा मिळाली. उत्तेजन मिळाले. “आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया आहे. कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते. तुझी सत्यता थोर आहे.” विलापगीत ३:२२-२३ नुसार त्याच्या मन:स्थितीमध्ये हा नाट्यमय बदल कसा झाला? त्याच्या सद्यस्थितीमुळे तो देवाच्या हातात पडतो. ते राष्ट्र एवढ्या खोल पापात रुतले होते. तरीही देवाच्या प्रीतीपासून त्यांची ताटातूट झाली नाही. या राष्ट्राला देवाने कडक शिक्षा दिली. पण त्यांच्यावरील प्रीती त्याने थोपवली नाही. आपणही देवाच्या महान विश्वासूपणाबद्दल बोलू या. सद्यस्थितीकडून देवाकडे वळू या. त्या परिस्थितीकडे देवाच्या प्रीतीतून पाहू या.

हा लेखक देवाकडे कसा वळला? त्याने देवाच्या प्रीतीवर लक्ष केंद्रित केले. त्याच्या कळवळ्याकडे विश्वासूपणाकडे नजर लावली. आपणही तेच करावे. म्हणून देवाच्या प्रीतीविषयीची अशी वचने आपण ह्रदयात जपून ठेवावीत. आणि विपत्ती, शंका, अविश्वास यांनी उचल खाताच त्यांचा शस्त्राप्रमाणे वापर करावा.

शासनातून देवाची प्रीती

देवाच्या वचनांच्या आधारे त्याच्या प्रीतीचा अनुभव कसा घ्यावा यावर आपण विचार करत आहोत. अत्यंत पापात रुतलेले असताना देव तीव्र शिक्षा करतो. तरी तो प्रीती कधीच थांबवत नाही. हे सत्य आपल्याला कसे उभारी व समाधान देते ते आपण पाहिले. आता पाहू या या शासनातून देवाची प्रीती कशी व्यक्त होते.

देवाच्या सार्वभौमत्वाची व प्रीतीची खात्री झाली की विपत्ती येणार नाही अशी अपेक्षा करणे चूक ठरेल. इब्री लोकांस पत्रात आपल्याला समजते की, विपत्तीद्वारा मिळणारे शासन हा त्याच्या प्रीतीचा पुरावा आहे. इब्री १२:५,६ म्हणते, “जो बोध पुत्राला करावयाचा तसा तुम्हाला केला तो तुम्ही विसरला काय? माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको. आणि त्याजकडून दोष पदरी पडला असता तू खचू नको. कारण ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो.आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो.” आपण देवाच्या प्रीतीचा विचार करताना तो आनंद, सुख देईल असाच मर्यादित विचार करतो. उलट त्याची प्रीती न्याहाळताना ख्रिस्ताचे विश्वासूपण आणि आपले ख्रिस्तासारखे होणे या दृष्टिकोनातून पाहावे. शासन हे पित्याच्या निष्ठुरतेचे चिन्ह नव्हे तर आपल्या पुत्राच्या कल्याणासाठी नितांत प्रेमाने काळजीने वागणाऱ्या पित्याचे चिन्ह होय. “दैवी शासन खेदाचे वाटते.” (इब्री १२:११).
ते हेतुपुरस्सर असते. नाहीतर त्या शासनामागील उद्देश सफल होणार नाही. तरीही देव आपल्या अमर्याद व परिपूर्ण प्रीतीतून आपल्यावर शिक्षेचा अतिरेक करणार नाही. जी आपत्ती आपल्या कल्याणासाठी नाही अशी आपत्ती तो आपल्यावर आणणार नाही. आपण खात्री बाळगावी की आपल्यावर आलेले दु:ख निष्कारण आलले नाही. विलापगीत ३:३३ म्हणते, “तो मुद्दाम कोणास पीडा करत नाही. मानवपुत्रांस दु:ख देत नाही.” देव नाराजीने परंतु विश्वासूपणे शासन करतो. आपल्यावरच्या आपत्तीने तो सुख पावत नाही. पण ख्रिस्तासारखे अधिक होण्यासाठी जे काही करायचे त्यातून तो आपल्याला वगळणार नाही. आपल्या अपरिपक्व अवस्थेमुळे आपल्याला शिक्षा होणे योग्य व आवश्यक आहे. याचा अर्थ आपल्या कुठल्यातरी पापामुळेच आपल्या जीवनात आपत्ती येते असा नाही. आपण जे काही करतो त्यावरून देव आपल्याला हाताळत नसतो. तर आपण जे काही आहोत त्यावरून देव आपल्याला हाताळत असतो. आपण सर्वजण आपल्या ह्रदयातील अधर्म कमी अधिक प्रमाणात मान्य करतो. तरीही आपण स्वत:मधील गर्व, दैहिकता, फुशारकी, स्वार्थीपणा, महत्त्वाकांक्षा, हट्टीपणा, स्वधार्मिकता, प्रीतीचा अभाव, देवावरील अविश्वास यांची व्यापकता लक्षात घेण्यास अपयशी ठरतो. त्यांच्याकडे देवाच्या नजरेतून पाहत नाही. जसा भट्टीतील सोन्याचा मळ वर येतो तशा विपत्तीमध्ये या सर्व निराशामय भावना उफाळून वर येतात. एखाद्या विपत्तीतून विशिष्ट कल्याण झाल्याचे नेहमीच निदर्शनास येणार नाही. पण देव आपल्या चारित्र्याचा एखादा विशिष्ट पैलू हाताळत आहे हे आढळून येईल. तरी देव त्याला संतोषविणारी कोणती गोष्ट घडवून आणत आहे याचे पूर्णत्वाने आपल्याला ज्ञान होणार नाही. “तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास तुम्हाला प्रत्येक कामात सिध्द करो” (इब्री.१३:२१). “सर्व काही कल्याणार्थ” (रोम ८:२८) याचा अर्थ त्याच्या पुढच्या वचनात स्पष्ट केला आहे. देव जी गोष्ट करतो ती म्हणजे ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखे होत जाणे. आपत्तीमध्ये आपले काहीच भले नसते. लोक आपल्यावर अन्याय अधर्म करतात तेव्हा त्यात आपले काहीच भले नसते. पण देव आपल्या अगाध ज्ञानाने व प्रीतीने आपल्या जीवनातील सर्व भलेभुरे प्रसंग घेतो, ते एकत्र घुसळतो आणि त्या सर्वातून तो इच्छित असलेले कल्याण बाहेर निघते. आई लोण्याची बिस्किटे बनवते ती खायला रुचकर लागतात. मोठी लज्जत येते खाताना. कच्चे मळलेले पीठ खाताना ती मजा येणार नाही. पण ते पीठ उष्णतेने बेक करून किंवा तळून आई ती एवढी चवदार बनवते म्हणून ती खाताना लज्जत येते. त्यातील एकेक अन्नपदार्थ स्वतंत्रपणे खाऊन मजा येणार नाही. मैदा, साखर इ.  रोम ८:२८ मधील ‘सर्व काही’ या मळलेल्या कच्च्या पीठाप्रमाणे आहे. ते मुळात चवदार नाही. आपण ते धिक्कारतो. भट्टी नको म्हणतो. पण अगम्य, अगाध ज्ञान, सुज्ञता असणारा देव त्याच्या अमर्याद कौशल्याने ते सर्व एकजीव करतो. विपत्तीच्या अग्नीत ते भाजतो. एक दिवस आपण नक्की म्हणू ‘वा’ हे काय छान आहे! विपत्कालातील देवाचे शासन जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा त्या शासनाला आपल्या अगर इतरांच्या पापाच्या पातळीवर आणू नये. अनेक लोक ख्रिस्ताप्रमाणे फार विपत्तीतून गेलेले आपण पाहतो. याविषयीचे सत्य ईयोब १:८ मध्ये पाहा. देव स्वत: ईयोबाविषयी म्हणतो की, “या भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.” ईयोबाने अनुभवलेल्या सर्व विपत्तीतून येशूखेरीज दुसरा कोणी गेला नाही. एक व्यक्ती म्हणते, “ईयोबाचे पुस्तक देव चांगल्या माणसाला अधिक चांगला कसे बनवते याविषयी आहे” म्हणून विपत्तीचा सबंध पापाशी लावून निराश होऊ नये. या शासनामागे दुसराही काही उद्देश असू शकतो. योसेफाच्या भावांना योसेफापेक्षा शासनाची अधिक गरज होती. तरी त्यातील एकालाही योसेफासारखे दु:ख सहन करावे लागले नाही.

 

Previous Article

फार जोराने धावण्यापासून सावध राहा जॉनी एरिक्सन टाडा

Next Article

लक्ष विचलित  झाल्यास तुम्हाला मोठी किंमत द्यावी लागेल लेखक: जॉन ब्लूम

You might be interested in …

जेव्हा येशू पुन्हा येईल

जॉन ब्लूम (रेव्ह. वि. आ. सत्राळकर यांनी “ जॉय टू द वर्ल्ड” या गीताचे केलेले मराठीकरण शेवटी दिले आहे.) “ जॉय टू द वर्ल्ड” ख्रिस्तजयंतीच्या या सुप्रसिद्ध आणि आवडत्या गाण्याने  गेल्या वर्षी ३०० वर्षे  पूर्ण […]

येशूवर आणि त्याने वधस्तंभावर यावर विचार

येशूवर आणि त्याने वधस्तंभावर यावर तुम्ही विचार करत असताना खाली दिलेले काही विचार तुम्हाला आणखी मदत करतील. पाप म्हणजे फक्त वाईट गोष्टी करणे एवढेच नाही. तर “चांगल्या” गोष्टींनाच आपले अंतिम ध्येय करणे हे ही पाप […]

बंडखोरीविषयी मुलांना ताकीद देणे

जॉन पायपर तरुणांना ( आणि प्रौढ लोकांनाही ) बंड करण्याच्या पथावर जाऊ न देण्याची ताकीद  देणे हे अत्यावश्यक आहे कारण हा रस्ता त्यांना त्यांच्या नाशाकडे नेतो हे वारंवार सिद्ध होत असते. तरुण जेव्हा या रस्त्यावर […]