नवम्बर 13, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

 

प्रकरण १ले

देवाच्या वचनाशी पहिला सामना

प्रारंभापाशी आरंभ
(उत्पत्ती १)
“ प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.”
ठssssप्प ! येथेच आम्ही पुरते अडकून गेलो.
हापेले, ईसा आणि मी नुकतीच सुरवात केली. आम्ही प्रार्थना करून कागद, पेन घेतले, पुस्तके उघडली. सर्व तयारी पूर्ण झाली आणि अगदी पहिल्याच वचनापाशी आम्ही अडकलो. पण जर आम्ही सुरुवातच करू शकलो नाही तर आम्ही शेवटही करू शकणार नव्हतो. आम्हाला दिलेली मुदतही संपत आली होती.
फोलोपा भाषेत ‘उत्पन्न केली’ हे कसे म्हणायचे? हा शब्द अजून या भाषेत माझ्या ऐकण्यातच आला नव्हता. बहुधा मी निरीक्षण करून आणि प्रश्न विचारून शब्द शिकत होतो. समजा कोणी झाड तोडत असेल तर मी विचारत असे, तुम्ही काय करत आहात? ते म्हणत, नी डिटॅपो. आणि लगेच मी ते लिहून घेऊन लक्षात ठेवण्यासाठी घोकून पाठ करत असे. जर ते स्वयंपाक करत असतील किंवा बागकाम करत असतील तर मी प्रश्न विचारून त्यांच्या कृतीचे वर्णन करायला सांगत असे. जास्तीत जास्त ते शब्द आत्मसात करण्याचा मी प्रयत्न करत असे.
पण ज्या गोष्टी तुम्ही डोळ्यांनी पाहू शकत नाही त्यांचे शब्दात तुम्ही कसे वर्णन करणार ? किंवा तुम्ही अमूक शब्द शोधत आहात त्याचे वर्णन तुम्ही कसे करणार ? मी त्या गावात एकसारख्या फेऱ्या मारत होतो, लोकांचे निरीक्षण करत होतो, त्यांच्याशी गप्पा मारत होतो, नवे शब्द शिकत होतो, ते काही गोष्टी का व कशा करतात ते जाणून घेत होतो. पण या सर्व शोधात मी कोणाला काही उत्पन्न करताना पाहिले नव्हते. विशेष म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितले तसे कोणाला काही करताना पाहिले नव्हते. कोणीच नसत्यातून असते उत्पन्न करताना आढळला नव्हता.
हापेले, ईसा व मी पराकाष्ठा केली पण आम्ही काय प्राप्त करणार व शेवटी कोठे येऊन थांबणार याची आम्हांला कल्पना नव्हती. आम्हांला साजेसा शब्दच सापडत नव्हता. ‘करणे,’ ‘रचना’ यासाठी आम्हांला शब्द सापडले होते. पण हे समर्पक शब्द नव्हते. ‘काहीतरी नवीन गोष्ट अस्तित्त्वात आणणे’ या वर्णनासाठी आमच्याकडे शब्द नव्हता.
आम्ही विचार केला आपण तसेच पुढेच काम करायला लागू या; कदाचित कालांतराने आपल्याला योग्य शब्द सापडेल. तरीही पुढे जाण्यापूर्वी आम्ही पुन्हा प्रार्थना केली. देवाने ही सर्व परिस्थिती हाती घ्यावी आणि आम्ही शोधत असलेला शब्द सापडण्यासाठी कार्य करावे अशी त्याला विनवणी केली. फोलोपा भाषेत नक्कीच कोठे ना कोठे हा शब्द असायलाच हवा होता.
आम्ही भाषांतराचे काम पुढे चालू ठेवले पण तेही काही सोपे नव्हते.
“मग देव बोलला प्रकाश होवो,” आणि प्रकाश झाला.
माझ्याकडे डेइ म्हणजे “प्रकाश” शब्द होता. पण “होवो” कसे म्हणायचे? असे काही कृती करणारे लोक तेथे नव्हते आणि हा शब्दही वापरात आढळला नाही. देवाची क्रियापदे मानवाची क्रियापदे नसतात.
पण देवाने ही क्रिया केली होती. त्याने प्रकाश निर्माण केला; आणि पाहिले की तो चांगला आहे. त्याने जर हे केले होते तर तो आम्हालाही प्रकाशित करू शकणार होता. आम्ही तो अनुवाद केला खरा, पण आमचे कितपत बरोबर आहे याची आम्हाला खात्री नव्हती. अजून तरी नव्हती. पण हे कच्चे काम होते आणि आम्ही पुढे जात राहिलो.
असे आम्ही सहा दिवसांच्या निर्मितीचे आणि देवाने सातव्या दिवशी विसावा घेतल्यापर्यंतचे भाषांतर केले. आणि आम्हीही विसावा घेतला.
गावात एक सण जवळ आला होता आणि काही पुरुष शिकारीला जाण्याची तयारी करू लागले होते. हापेले व ईसा त्यांच्यासोबतच्या जायला निघाले. त्यामुळे आता नुकतेच सुरू झालेले भाषांतरांचे काम निदान एक आठवडाभर तरी बंद पडणार होते.
ते लोक म्हणाले, “तुम्हाला यायला नाही आवडायचे! हे फार कठीण आहे. सेतु वोपु ही शिकारीची जागा फार दूर आहे. तिथे जाणे अवघड काम आहे. खूप खडकाळ, जळवांची, चढउताराची, चिंचोळी वाट आहे. तुम्हाला मुळीच जमणार नाही.”
सर्व संभाषणातून मला समजले की मी त्यांच्यासोबत जावे अशी त्यांची इच्छा होती आणि मीही गेलो.
दुसऱ्या दिवशी आम्ही पर्जन्यवृष्टीच्या घनदाट जंगलात जायला निघालो. वाट अगदी सरळ वर चढावाची आणि तशीच सरळ उतरणीची होती. पर्यटकांसाठी काहीही संरक्षणाच्या सोयी, पाट्या, खुणा नव्हत्या. ते खोरे कधीच कोरडे पडत नसते. निम्मी वाट तर दलदलीतूनच चालायची होती; तर निम्मी वाट ओढ्यानाल्यांमधून पार करायची होती. वाट नदीतून, दलदलीतून, पडलेल्या ओंडक्यांमधून, अरुंद दऱ्यांमधून, सुळके चढून उतरणीची, कड्यांच्या उतारांवर उघड्या पडलेल्या झाडांच्या मुळांच्या आधाराने चढण्याची होती. फोलोपा लोक ही सारी वाट अनवाणी, सूर्याशी चढाओढ करीत, अथक, बेडरपणे चालतात.
मध्यान्हाच्या सुमारास आम्ही पहिल्याने थांबलो. दिवस लहान असल्याने व जळवांचे प्रमाण मोठे असल्याने ह्या लोकांना मध्ये कोठे थांबायला आवडत नाही. गरजच पडली तर जळवा नसलेल्या जागी, एखाद्या पडलेल्या झाडाच्या जमिनीलगत नसलेल्या फांद्यांवर थांबणे ते पसंत करतात. असे झाड दिसताच मी विसाव्यासाठी थोडा वेळ थांबायला लगेच तयार झालो. आम्ही सारे एखाद्या तारेवर पक्षी बसावेत तसे फांद्यांवर चढून एका रांगेत बसलो.
माझी अवस्था लपून राहण्यासारखी नव्हतीच. एक जण मला म्हणाला, “हेटो अली, तू तर मरणार.” त्याच्याकडे पाहत खिशातून ओला झालेला रुमाल काढून मी कपाळ पुसले. कोणीतरी म्हटले, ‘तू काहीतरी खा ना?’ हे शब्द स्वागतार्हच होते. कोणीतरी याबाबतीत पुढाकार घ्यावा याची मी केव्हापासून वाट पाहात होतो. मी दुपारच्या जेवणासाठी तयार होतो पण कोणीच हालचाल करत नव्हते. सारे माझीच वाट पाहात होते.
कदाचित काहीतरी अल्पोपहार घेण्याची ही वेळ असावी. मला शक्ती यायला काहीतरी खाणे गरजेचे होते. मी पिशवी काढली. सर्वांना पाहायची उत्सुकता होती की कॅरलने माझ्यासाठी काय बांधून दिलेय. चमकत्या लाल पांढऱ्या तपकिरी कागदात एक चॉकलेट होते.
ज्या संस्कृतींत सारे काही वाटून खायचे असते तेथे खाजगी क्षण उपभोगायचे सुख नसते. आवरण काढताच त्यांवर ४० नजरा रोखल्या गेल्या. समोरच्याच निसर्गावर नजर टाकत या नजरा हेरत असता कानावर शब्द पडले, ‘फेलेरे? चांगले लागते?’ मी म्हटले, “फेलेरॅपो. चांगले लागते. तुला थोडे हवेय का?” त्याने असे काही हावभाव केले की मी एक तुकडा तोडून त्याला दिला. तो मिटक्या मारत खात असता ४० डोळे त्याच्यावर खिळलेले होते. कोणीतरी त्याला विचारले, “फेलेरे?” तो म्हणाला  “माझ्या भावांनो, हे काय असेल ते असो पण याच्या चवीने मी वेडा झालोय.”  ते म्हणाले, “ते कशासारखे लागते?” त्याच्या उत्तरासाठी माझे कान मी टवकारले. ताड्कन तो म्हणाला, “डुकराच्या काळजासारखे.” सर्वांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. मी अशा वर्णनाने चॉकलेटची तुलना कधीच केली नसती. पण त्यांच्यासाठी ती सर्वोत्कृष्ट तुलना होती. त्यांच्या मते अन्नात सर्वोत्तम डुक्कर होते आणि त्यातही त्याचे काळीज. मग १८ तुकडे करून मी सर्वांना चॉकलेट वाटून दिले. सर्वांनी मिठ्ठास चव घेतली आणि सर्वोत्कृष्ट चवीची पावती दिली. मग मी माझी सॅन्डविचेस काढली आणि त्यांनी सहलीत खाण्याच्या त्यांच्या भाज्या, मुळ्या, फळे काढली. जरा हात पाय मोकळे झाल्यावर पुन्हा रपेट सुरू केली.
ते झोपण्यासाठी नेहमी एखादी कडा-कपार गाठत असत म्हणजे पावसाची काळजी नसे. १२ तास आम्ही चालत होतो. घामाने कपडे ओले झाले होते. चिखलाने बूट व पाय माखले होते. थोडे विसावतो तोच पाऊस सुरू झाला. काही जण शेकोटीसाठी लाकूडफाटा व रानातील खाद्य गोळा करायला गेले आणि त्यांनी जेवण बनवून खाल्ले. मग झोपायची तयारी करू लागले. मुसळधार पाऊस पडत होता, पण आम्ही कपारीत उबदार व सुरक्षित होतो. माझी मानाची जागा सर्वांच्या केंद्रस्थानी होती. माझ्या एकट्याकडे पांघरूण व छोटेसे अंथरुण होते. त्यांचा बिछाना म्हणजे पाल्यांची, झाडांच्या सालींची बिछायत, पांघरायला लहानसा टॉवेल किंवा कापडाचा तुकडा.
लवकरच सारे घोरायला लागले. शेकोट्या विझून गेल्या आणि थंडी वाढू लागली. माझ्या पांघरुणाखाली पाच लोक असल्याचे मला जाणवले. मी फारशी हालचाल केली नाही की कूस बदलली नाही. फारसे झोपलोही नाही. रात्रभर संततधार चालूच होती. समोर अथांग सागरासारखे विस्तीर्ण चिंब जंगल पसरलेले होते. आमच्या सुळक्याच्या तळाशी एखाद्या ठिपक्याप्रमाणे थोडीशी कोरडी भूमी दिसत होती. पहाटे पाऊस ओसरू लागला.
धुक्याचे साम्राज्य पसरले. पानांची सळसळ आणि पावसाच्या थेंबांचा आवाज चालू असता गडद अंधारात मला एका दिशेने कुजबुज तर दुसऱ्या दिशेने कोणीतरी बोलत असल्याचा तेही स्वत:शीच बोलत असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तो हळूहळू वाढू लागला आणि सर्वच दिशांनी कानी पडू लागला. ही सारीजण प्रार्थना करत होती. मला फक्त माझ्यापासून जवळच असलेल्या सोपीयाचे शब्द समजत होते.
तो म्हणत होता “हे प्रभू , तुला माहीत आहे की आम्ही शिकारीला निघालो आहोत. आम्हाला काय हवे आहे तेही तू जाणतोस. या जंगलातले सर्व प्राणी तुझेच आहेत. त्यातले तुला जे ठेवायचे ते तू ठेव. पण आम्हाला त्यातले थोडे दिलेस तर मेहरबानी होईल. आमच्या शिकारी कुत्र्यांना मदत कर. त्यांना काही होऊन मरू देऊ नको. आम्हाला त्यांची गरज आहे. घरी बायको व मुले आहेत त्यांना सांभाळ व सुरक्षित राख. त्यांना आजार येऊ देऊ नको. शत्रुंपासून त्यांचा बचाव कर. बागेत डुकरांनी घुसून पिकांचा नाश करू नये असे कर.” अशी काही वेळ प्रार्थना चालू होती. मग विषय हेटो अलीचा सुरू झाला. तो म्हणाला, “आम्ही अंधारात या जमिनीवर आहोत. तू हेटो अलीला आमची भाषा शिकव. म्हणजे तो आम्हाला तुझे वचन देऊ शकेल. आणि आम्ही प्रकाशात येऊ.” तो आणखीही काही प्रार्थना करत होता पण मला एवढेच समजले. पण हे ऐकून मी भारावून गेलो. किती विरोधाभास !  त्यांच्यासाठी मी एक जगाच्या पाठीवरून आलेला महान गोरा मिशनरी होतो. त्यांची भाषा व जीवनशैली शिकून त्या ग्रंथाचे भाषांतर करायला आलो होतो. पण येथे ज्यांना देवाच्या वचनाची मुळीच ओळख नव्हती अशा २० शिकाऱ्यांच्या मध्ये मी दडपला गेलो  होतो. ते उघड्या जमीनीवर पालापाचोळ्यात झोपले होते. आणि दिवसाची सुरूवात अशा प्रकारे माझ्यासाठीच्या प्रार्थनेने करत होते. मी खूप खजिल झालो. असे पुढे कित्येकदा घडणार होते.

Previous Article

देव तुम्हाला क्षमता देईल जॉन ब्लूम

Next Article

कमकुवतपणाशी युध्द थांबवा स्कॉट हबर्ड

You might be interested in …

आत्म्याचे फळ ममता /दयाळूपणा

स्टीफन व्हीटमर ममता किंवा दयाळूपणाचा (kindness) दर्जा कमी केला जातो.  दयाळूपणा/ममता म्हणजे काहीतरी आनंददायी, सुंदर असून जसे काही त्याचा संबंध नेहमी हसतमुख असण्याशी आहे अशी आपली धारणा असते. अशा व्यक्तीचे सर्वांशी जमते, ती कुणाला दुखवत […]

लेखांक २: जेव्हा देव अन्यायी वाटतो

जॉनी एरिक्सन टाडा (लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या  वर्षी  पोहोण्यासाठी उडी मारताना जॉनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतर नवी  कौशल्ये व अशा स्थितीमध्ये असलेल्यांना मदत […]