Pages Menu
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on Aug 6, 2019 in जीवन प्रकाश

उत्तर न मिळालेल्या प्रत्येक प्रार्थनेसाठी                         ग्रेग मोर्स

उत्तर न मिळालेल्या प्रत्येक प्रार्थनेसाठी ग्रेग मोर्स

माझ्या धाकट्या भावाला बरे कर अशी प्रार्थना मी रोज देवाकडे केली.

ऑटीझम च्या बंधनातून माझ्या भावाची सुटका व्हावी म्हणून याकोबासारखा मी देवाशी झगडलो. माझे गुडघे सुजले होते, माझी पाठ दुखू लागली. प्रार्थना करता करताच मी झोपून जायचो. दिवसांचे आठवडे झाले; आठवड्यांची वर्षे. मी रोज विनवणी करायचो आणि परिणामी माझा विश्वासच मी जवळजवळ गमावू लागलो.

यापूर्वी देवाने माझे ऐकले की नाही असा प्रश्न मी कधीच केला नव्हता. त्याने उत्तर द्यावे म्हणून इतकी तपशीलवार प्रार्थना मी पूर्वी कधीच केली नव्हती. मी माझ्या पापाचा अधिक द्वेष करावा म्हणून मी मागत असे, त्याचे राज्य यावे म्हणून मी मागत असे त्याची प्रीती अधिक समजावी म्हणून मी मागत असे. त्याचे गौरव दिसावे, त्याच्या लोकांची सेवा करता यावी म्हणून मी प्रार्थना करत असे. मी योग्य प्रार्थना, देवाने प्रेरित केलेल्या प्रार्थना करत होतो, पण त्या सुरक्षित होत्या. अशा प्रार्थनांना शेवटची तारीख नव्हती आणि देव नाही म्हणेल अशी स्पष्ट पावती नव्हती.

निदान झाले आणि धैर्य मिळावे म्हणून नव्हे तर आवश्यक असल्याने माझा भाऊ बरा व्हावा म्हणून मी खास प्रार्थना करू लागलो. माझ्या विनंतीला एक नाव होते, एक हास्य होते, एक गोंधळलेला भाव होता. देवाचे या प्रार्थनेचे उत्तर दिसण्याजोगे असणार होते, तपासून पाहता येणार होते, सार्वजनिक असणार होते. देवाचे होय किंवा नाही हे फक्त विश्वासाच्या डोळ्यांपेक्षा अधिक दिसणारे होते. तो माझ्या भावाला बरे करणार होता किंवा करणार नव्हता.

आणि आता अठरा वर्षे झाली तरी अजून तो बरा झाला नाही.

वैयक्तिक रीतीने घेणे

अगणिक प्रार्थना केल्यानंतर मी ज्याची अपेक्षा केली नव्हती ते घडले: देवाचे “नाही” हे मी वैयक्तिक रीतीने घेण्यास सुरुवात केली. तो एका प्रिय व्यक्तीला बरे करत नव्हता एवढेच नाही तर तो मला उत्तर देत नव्हता. माझ्या प्रार्थनेची सुरुवात मोठ्या उत्साहाने झाली होती. पण जसजसे पाउस पडला, वादळ आले, थकून माझे पाय दुखू लागले, ठोठावण्याने हात दुखू लागले आणि फक्त दार ठोठावणाऱ्याचा असहाय आवाजच  तेवढा ऐकू येऊ लागला.

माझे विचार चक्राऊ लागले. मी शंका घेत नव्हतो, माझ्या पत्नीला वाईट वागवत नव्हतो, दूषित वृत्तीने मागत नव्हतो – मग त्याने नकार इतका का लांबवला? इतकी वर्षे मागितल्याने त्याने नक्कीच माझ्यामध्ये पवित्रीकरणाचे काम स्थिर केले होते. एक आश्चर्य करून त्याचा गौरव करण्यासाठी मंच नक्कीच तयार होता. तोही ऑटीझमचा नक्कीच द्वेष करत होता. आता जेव्हा बापा असे म्हणून मी प्रार्थनेची सुरुवात करत होतो तेव्हा मी थोडा कचरू लागलो. कोठेतरी माझ्या भावासाठी केलेल्या प्रार्थना माझ्या पित्याने ऐकले की नाही, काळजी घेतली की नाही हे जाणून घेण्याच्या भावनांनी मिश्रित झाल्या. ज्याची  बालकासारख्या विनंतीने सुरुवात झाली होती त्याचे लवकरच अनाथासारख्या नाखुशीत रूपांतर झाले. आणि माझ्या विचारात मी एकटाच नव्हतो. माझ्यासोबत सैतान बसलेला होता. “नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते” (याकोब ५:१६). “तू आता कित्येक वर्षे प्रार्थना केली आहेस. किंवा तुझा पिता त्याच्या इतर मुलांच्या प्रार्थना ऐकताना दिसतोय. तू खरंच का नीतिमान आहेस? तो तुला का उत्तर देत नसावा? “आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो” (स्तोत्र ११५:३). तुझ्या भावाचे रोगनिवारण त्याला आवडणार नाही असे नाही का तुला वाटंत?”

शांततेमध्ये उत्तरे

“ पण जसा माझ्या खाचेमध्ये मी तडफडत होतो तसे योग्य वेळी देवाने माझ्या भावाला बरे केले”… अशा  वाक्याने ह्या लेखाचा शेवट करावा अशी माझी इच्छा होती… संघर्ष , शंका आणि गोंधळ यातून – आणि ते कायम सुखात राहू लागले असे फास्ट फॉरवर्ड करणे मला आवडते. पण माझ्या प्रार्थना अजूनही एका शांततेत रेंगाळलेल्या आहेत. अजूनही मी कुजबुजणाऱ्या शंकाशी झगडतो. सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये (लूक १८:१-८) ह्या मोहाला बळी पडू नये अशा येशूच्या इशाऱ्याला मी अजूनही बळी पडतो.

त्याने जे मला द्यायचे राखून ठेवले आहे त्यासाठी जेव्हा मी जी विनवणी करतो तेव्हा त्यात टिकून राहायला आशा लागते. त्यासाठी तो मला मत्तय ७ मधून दोन सत्त्यांना धरून रहायला शिकवत आहे. जे प्रार्थनेचे उत्तर न मिळालेल्या दरीत भरकटत आहेत त्यांना हे उत्तेजनाचे ठरेल अशी मला आशा वाटते.

१. देव चांगले देऊन उत्तर देतो

जेव्हा सैतान कुजबुजतो की देवाने तुला आणि तुझ्या भावाला असफल केले आहे, – जसे तो तुम्हालाही योग्य जोडीदार मिळत नाही, किंवा तुमच्या मुलाविषयीच्या प्रार्थना ऐकत नाही किंवा तुमच्या मित्राचे तारण व्हावे म्हणून म्हणून तुमच्या प्रार्थना ऐकत नाही तेव्हा असेच कुजबुजतो –  अशा वेळी येशू आपल्याला अभिवचन देतो की त्याचा पिता तुमच्याकडे लक्ष देत नाही असे नाही आणि तो तुम्हाला “चांगल्या गोष्टी” देईल.

“मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल” (मत्तय ७:७-११)?

त्याच्या गरजू मुलांच्या अंत:करणातून आलेली प्रार्थना ही हवेत सोडलेल्या बाणाप्रमाणे असते की देव नेहमीच नवे आशीर्वाद आपल्याकडे कोठेतरी पाठवील. आपले ठोठावणे, शोधणे हे व्यर्थ नसते. ते माझ्यामध्ये आणि माझ्या भावामध्ये काहीतरी करत आहे. त्याने रोगनिवारणाचा पुढचा दरवाजा उघडला नसेल पण प्रार्थनेच्या परिणामाने त्याने कृपेचे किती इतर दरवाजे आणि खिडक्या उघडल्या आहेत हे फक्त स्वर्गातच कळेल.

आपला देव त्याच्या मुलांना जे मागतात त्यापेक्षा वाईट असे कधीच देत नाही. आणि जे आपण मागतो ते अगदी तसेच क्वचितच देतो पण नेहमी आपण जे मागतो त्यापेक्षा अधिक चांगले देतो.

२. देव बाप या नात्याने उत्तर देतो

हे विश्वासाने धरून ठेवणे आवश्यक आहे. देव पिता म्हणून देतो (आणि राखून ठेवतो). जर देवाने त्याच्या प्रीतीचा अनुभव सतत ठेवला तर आपण जीवनभर अनुत्तरित प्रार्थना मध्ये टिकून राहू. जर तो आपला “स्वर्गातील पिता”  आहे व त्याचे राज्य यावे म्हणून आपण वाट पाहत असलो तर त्याच्या स्मिताने व मिठीमध्ये सर्व निराशा कमी होतील. (नष्ट झाल्या नाही तरी.) पण अनुत्तरित प्रार्थना ह्याच क्षणी ते आपल्यापासून हिरावून घेते. निराशा आपल्याला पित्याच्या घरातून पळवून नेते. ती आपल्याला सांगते की देव हा कठोर धनी आहे, आपल्या आशीर्वादावर तो अधिकार चालवतो, तो आपल्याला कळसूत्री बाहुलीसारखे हाताळतो. पण एका वाक्याने येशू वाट पाहणाऱ्या लोकांना सबल करतो. “मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल?” (मत्तय ७:११)

जेव्हा इतर सर्व चांगले आपल्यापासून राखून ठेवले जाते तेव्हा देव हा आपला पिता आहे ही जाणीव पकडून ठेवणे हा अनुत्तरित प्रार्थनेत भरकटताना मिळणारा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. अनुत्तरित प्रार्थनांची उत्तरे देव एखाद्या कठोर न्यायाधिशाप्रमाणे देत नाही. देव त्याच्या लोकांच्या अनुत्तरित प्रार्थनांची उत्तरे बापाप्रमाणे देतो.

आपण खूप वेळ प्रार्थना करत राहणार नाही

तुम्ही आणि मी प्रवास करत आहोत -वाटते त्यापेक्षा अधिक लवकर- उत्तरे मिळतील अशा येणाऱ्या राज्याकडे. आपल्या पित्याचे राज्य जे त्याने आनंदाने त्याच्या पुत्राला आणि पुत्र व कन्यांना बहाल केले आहे. आपण आपल्या घरापासून केवळ काही दिवसांच्या वाटेवर आहोत. रस्त्यावरून  जाताना आपण काय प्रार्थना केली हे आपल्याला कदाचित आठवणार नाही पण देवाला आठवेल. आणि आपल्याला खात्री आहे की तो त्याचा विश्वासूपणा सिद्ध करील. आणि या जगात आपण तिरप्या नजरेने ज्या अनुत्तरित प्रार्थना पाहिल्या होत्या त्यातील न दिसणारे उत्तर दिलेले आशीर्वाद तो आपल्याला दाखवील. आणि त्याचे आपल्याशी असले व्यवहार एकेक आवरण काढून तो दाखवत असताना त्याच्या सुज्ञतेने आपल्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळतील .

आणि आता पृथ्वीवर जे आपण कधीमधी अडखळत म्हणतो ते आपण गात राहू: “आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात” (रोम ८:२८).  सर्व गोष्टींमध्ये अनुत्तरीत प्रार्थनाही येतात. त्याची मेंढरे जरी हरवली तरी तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही तशीच  कोणतीच प्रार्थना दुर्लक्षित होणार नाही. आता आपले सुजलेले गुडघे आणि दुखणारी पाठ ओरडते “प्रभूजी, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका” (मार्क ९:२४). लवकरच मरण आपली प्रार्थनेची बैठक  संपवेल आणि आपल्या प्रभूला तोंडोतोंड पाहण्यास आपण उठू आणि आपल्याला दिसेल की आपण विचारले नाही इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या प्रार्थनांना उत्तरे मिळाली आहेत.