Pages Menu
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on Oct 1, 2019 in जीवन प्रकाश

उगम शोधताना                         लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

 

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर                             अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

प्रकरण ३ रे (उत्तरार्ध)

डोंगराळ प्रदेशातील दुर्गम भागात फोलोपा जमातीचे २५०० लोक राहात होते. १९६० पर्यंत कोणी गोरा मिशनरी तेथे जाण्याचे धाडस करत नव्हता. पुढे ऑस्ट्रेलियन गव्हर्मेंटमुळे तेथे कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाल्यावर

तेथे चर्च सुरू झाले होते. किरापारेके या सुवार्तिकाने तेथे चर्चची स्थापना केली होती. तो जन्मत: फोलोपा होता.

तो बाल्यावस्थेत असताना त्याच्या गावाचा विध्वंस करण्यात आला होता. त्याच्या कुटुंबियांसोबत तो सांबेरीगी भाषिकांच्या लोकगटास जाऊन मिळाला होता. त्या गावातील मिशनरीकडून त्याला सुवार्ता समजली होती.

तेव्हा त्याचे तारण होऊन तो ख्रिस्त झाला व नंतर सुवार्तिक बनला. त्यानंतर तो पुन्हा फोलोपा विभागात आला. त्यानेच फोलोपा लोकांना ख्रिस्ताची ओळख करून दिली व त्यांच्यासोबत तेथे काही दिवस राहून त्यांना ख्रिस्ताविषयी शिकवण दिली. एक दिवस देवाने त्यांच्यासाठी मिशनरी पाठवावे अशी प्रार्थना करण्याची सूचना देऊन व देव तुमची प्रार्थना नक्की ऐकेल अशी खात्री देऊन तो तेथून दुसरीकडे गेला. आणि ते आता मला म्हणत होते की देवाने आमच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आहे. त्यामुळे तो सनातनी ओवारापे अली त्यांच्यापुढे अधिक काही बोलण्यास असमर्थ ठरला. त्यांच्या भाषेत बायबल नसल्याने संदेशाची हवी तशी पकड बसत नव्हती. आता ही गोष्ट त्यांच्या आवाक्यात येणार होती. सध्या तरी ते आवाक्याबाहेर होते कारण तसा बराच गोंधळ होता.

दुसऱ्या फेरीच्या वेळी मी ॲलेक्स विन्सेंटसोबत फोलोपांच्या प्रचंड मदतीने व आवेशाने घर बांधायला सुरुवात केली. बाहेरून काही वस्तू आणलेल्या असल्या तरी पुष्कळ कच्चा माल व साहित्य स्थानिक रहिवाश्यांचे होते.

झाडांच्या खोडांपासून वासे, छतासाठी झावळ्या,  – इ॰ घर उभे राहाताच कॅरल व मुले आली. जमीन पण तयार झाली होती. खिडक्यांचे काम चालू होते. पण अजून पाणी आले नव्हते. तोवर लोकांची कॅरलशी ओळख झाली. आमच्या निराळ्या जीवनशैलीविषयी त्यांना खूप कुतुहल होते. आमच्याकडे चूल नव्हती. मुले आईपासून वेगळ्या बिछान्यात झोपत होती. तेथे रुळत असता आम्ही त्यांची बोली भाषा शिकत होतो. त्यांचा हेल व बोलत असता तोंडाची होणारी हालचाल व व्याकरण ही इंग्लिशपेक्षा वेगळी होती. थोडासा हेल बदलला तर वेगळ्याच अर्थाचा शब्द तयार होत होता. त्यांच्या भाषेत १४ स्वर व १४ व्यंजन असल्याचा आम्हाला शोध लागला.  तसेच वाक्य अगर वाक्यांशाच्या शेवटी  क्रियापद येते. वाक्यातला कर्ता एकूण संदर्भावरून ऐकणाऱ्याला सूचित केला जातो. कोण काय करत आहे ते एकूण गोळाबेरीज करून सूचित होते. उदा॰ समजा कोणीतरी हे बोलत आहे : “कामाला गेलो. मोठी झाडे पाडली. फांद्या छाटल्या. तासल्या. कुंपण बनवले. गावी परतलो.”  याहून तुम्हाला आणखी काही माहिती मिळणार नाही. तुम्हीच ओळखायचे की हे कोणाविषयी बोलले गेले आहे.

आतापर्यंत आम्ही पुष्कळ मित्र मिळवले. त्यांचा विश्वास संपादन केला. याशिवाय आम्ही पुढे काहीच करू शकलो नसतो. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पाईपलाईनची योजना आखली. मी मैलभर लांबीचा रबरी पाईप आणला. झऱ्यापासून सर्वांच्या हातभाराने खणून तो घरांपर्यंत टाकत आलो. सर्वांचाच फायदा झाला.

आम्हाला आवश्यक ते जुजबी वैद्यकीय प्रशिक्षण पण देण्यात आले होते. न्युमोनियासाठी आम्ही इंजेक्शनही देत होतो. गंभीर जखमा, अल्सर्स, पोटदुखी व किरकोळ आजारांवर उपचार करू शकत होतो. पुढे डेंटिस्टकडून दात उपटायला पण शिकलो होतो. कॅरल व मी दोघंही कामात व्यस्त असलो तरी कॅरलला आईची व पत्नीची भूमिकाही पार पाडायची होती. आम्ही गावात आल्याने तिला मुलांचे रीतसर होमस्कूलिंग करायची जास्तीची जबाबदारी होती. शिवाय ती शब्दकोशातून भाषांतराचा तपशील गोळा करून द्यायला मदत करत होती. टायपिंगचे सर्व काम करत होती. भाषा शिकून आम्हाला उच्चारात मदत करत होती. याखेरीज ओषधोपचाराचे अर्ध्याहून अधिक काम तीच निपटत होती. कधी कोणता प्रसंग चालून येईल याची शाश्वती नसायची. आम्ही  सतत देवावर विसंबून असायचो. येथे आल्यावर काही दिवसातच एक बाई घाबरीघुबरी होऊन आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन आली. ते घरंगळत जाऊन शेकोटीच्या विस्तवाच्या उष्ण राखेत पडले होते. त्याची कोवळी त्वचा त्यामुळे भाजली होती. पाठीवर जखमा झाल्या होत्या. पू भरला होता. त्यांवर माश्या घोंघावत होत्या. त्या मुलाला पूर्ववत करायला कॅरलला अतोनात परिश्रम घ्यावे लागले.

पण या प्रकरणामुळे आमचे या लोकांशी दृढ नाते जमले. मुलेही त्यांच्यात रमली. सर्वांची आवडती झाली. थोरामोठ्यांचेही त्यांना अडखळण राहिले नाही. हीथर तर त्यांच्यातलीच झाली होती. तिला त्यांच्यासारखीच वेशभूषा करायची असे . तशीच सुतळीची पिशवी व बाहुली तिला हवी असे. ती जशी लिहायवाचायचा शिकली तशी कागद पेन खडू घेऊन त्या बायकामुलांना गोळा करून त्यांची शाळा घेऊ लागली. तिलाच फारसे काही येत नव्हते. तरी तिच्याकडून बरेच लोक लिहायवाचायला शिकले. याउलट डॅन. अतिशय लाजाळू. कित्येक आठवडे दरवाजा ओलांडून तो बाहेर गेला नाही. दारापाशीच कार घेऊन खेळायचा. हळूहळू त्याची खेळायची जागा विस्तारली. एकदोघांशी मैत्रीही जमली. मग झाडाझुडपात शिरून शिकार करायला तो शिकला.

उकारुपामध्ये आयोजित केलेल्या प्रशिक्षणामुळे दोन वर्षे आम्हाला तिथे सारखी जा ये करावी लागणार होती. फोलोपा दुभाष्याला घेऊन आम्हाला तेथे जायचे होते. दहा अध्यायांचे भाषांतर करून तपासणीसाठी तेथे घेऊन जाणे बंधनकारक असे. तेथे तज्ञ लोक आम्हाला शिकवत असत. लवकरच आमच्यावर ही वेळ येणार होती.

पण अजून आमची तयारी झाली नव्हती.

म्हणूनच आजच्या पहाटे मला जास्तच हुडहुडी भरली होती व समोरचे सारे अधिकच धूसर दिसत होते. यापूर्वी सर्व यथास्थित घडले होते. पण आता या नवीन जगात आल्यावर भयानक व प्रदीर्घ आजाराशी सामना झाला होता. आता पहिलीत असल्याप्रमाणे नवी भाषा, नवी संस्कृती शिकून नव्याने आरंभ करायचा होता. आता माझी खरी कसोटी होती. माझ्याकडून ते फार लवकर अपेक्षा करत होते आणि माझी तयारी नव्हती. त्यामुळे माझ्याकडून हे काम होईल का अशी शंका मला भेडसावत होती. त्या सकाळी बायबल खोलीत मी प्रार्थना केली, “प्रभूदेवा, मी हे काम कसे करू मला समजत नाही. यापूर्वी मी किती आत्मविश्वासाने बोलायचो, आताचा तो मी नाही. तो दुसराच कोणी नील अँडर्सन होता. हा फार दुर्बल आहे. प्रभू मला मदत हवी आहे. मी स्वत: हे करू शकत नाही. तू मला मदत करशील का?  तू मला मदत करशील असे वचनात कोठे लिहिले आहे ते मला सांगशील का? मला तुझ्याकडून वचन हवंय.” धुके माझ्या माथ्यावर व छपरावर पसरले होते. सूर्य त्याहून फारच दूर उंचीवर प्रखरतेने तळपत होता. तो धुक्यात कधी शिरेल व धुके वर उचलून घेईल याची मी वाट पाहत होतो. रोजच मी बायबल उघडून मनन व प्रार्थना करत होतो. अखेर मला इब्री १३: २०-२१ वचन मिळाले.

“ज्या शांतीच्या देवाने सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यांतून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो. त्या येशूख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन.”

आमेन, असेच होवो; बरोबरच होते. मला गरज असलेले हवे ते वचन सापडले होते. देव मला सुसज्ज करणार असल्याचे अभिवचन देत होता. संपूर्ण शास्त्रभाग गुणसंपन्न आहे. बायबलभाषांतराचे काम उत्तमच होते. हे मला ठाऊक होते. आणि आम्ही त्याच्या इच्छेत असलेले कामच करत होतो यात तीळमात्र शंका नव्हती. त्यानेच मला येथवर आणले होते. आणि आता पुढे जे करायचे होते त्यासाठी तो मला सुसज्ज करत होता असे त्याने मला अभिवचन दिले होते.

ही वचने मला लाइफबोटच्या वल्ह्याप्रमाणे भासली. हेपल व ईसा मला दररोज बायबल खोलीमध्ये येऊन भाषा शिकवत असत. आज मी त्यांना सांगितले की, आता आपण भाषांतर करायला सुरुवात करणार आहोत. त्यांचा थंड प्रतिसाद होता, “ठीक आहे.”  मी काय म्हटलंय ते समजलं का त्यांना? ती त्यांची मातृभाषाच असल्याने त्यांना त्याचे विशेष वाटत नसावे.

आज प्रथमच आम्ही इब्री १३:२०-२१ वचने वाचून मनन करून ह्या वचनावर दावा करून प्रार्थना केली. देवाला विनवणी केली की त्याच्या इच्छेच्या परिपूर्तीसाठी त्याने आम्हाला सज्ज करावे. मग आम्ही उत्पत्तीकडे वळलो.