वैयक्तिक दु:खसहनाला दोन प्रकारचे प्रतिसाद दिले जातात. आपण देवाविरुद्ध जाऊन म्हणू शकतो; १) “जर तू इतका महान , सामर्थ्यवान व प्रेमळ देव आहेस तर मी ह्या नरकासारख्या यातना का सहन करत आहे?” किंवा २) आपण पापी आहोत व आपल्याला कोणती चांगली गोष्ट मिळावी यासाठी आपली लायकी नाही हे आपण मान्य करतो व आपल्या असाह्यतेच्या वेळी आपण दया व मदतीची विनवणी करतो. जग हे देवाविरुद्ध जाणाऱ्या स्वधार्मिक लोकांनी भरलेले आहे व विश्वाच्या निर्माणकर्त्याने त्यांचे जीवन सुरळीत करावे असे ते गृहीत धरून चालतात. पण असे थोडके जण आहेत की ते समजून घेतात की देव आपला कशासाठीच ऋणी नाही आणि आपले चांगले होत असेल तर ते केवळ त्याच्या दयेने आहे आपल्या पात्रतेमुळे नाही.
लूक २३: ३९-३३ या वचनांतून दोन चोरांच्या गोष्टीतून लूक आपल्याला शिकवतो की आपण ज्या प्रकारे देवाला प्रतिसाद देतो त्याद्वारे आपल्याला फळ मिळते. हे दोन चोर क्लेशाला प्रतिसाद देण्याचे तसेच ख्रिस्ताच्या क्लेशाशी नाते दाखवण्याचे दोन निरनिराळे मार्ग दाखवतात.
पहिले त्या दोघांतला सारखेपणा पाहू या. दोघेही वधस्तंभावरचे दु:ख सहन करत आहेत. दोघेही गुन्हा केल्यामुळे दोषी आहेत. (“आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत” लूक२३: ४१.) दोघेही “यहूद्यांचा राजा येशू” हा येशूच्या डोक्यावरचा लेख पाहत आहेत. ते त्याच्या तोंडून येणारे उद्गार ऐकत आहेत (“हे बापा यांना क्षमा कर” लूक२३: ३४). आणि या दोन्ही चोरांना मरणापासून वाचायचे आहे.
आपल्यातील बहुतेकांमध्ये ह्या चोरांमध्ये असलेल्या या सर्व गोष्टी समाईक आहेत: आपल्या जीवनात दु:ख आहे /होते /असणार. आणि आपल्यातील कोणी म्हणू शकणार नाही की ‘यासाठी मी लायक नाही.’ आपल्यातील बहुतेकांनी ख्रिस्ताला वधस्तंभावर पाहिले आहे व त्याचा राजा असल्याचा दावा ऐकला आहे व त्याचे क्षमेचे कृपाळू शब्द ऐकले आहेत. आणि आपल्या सर्वांना या ना त्या प्रकारे मरणापासून सुटका हवी आहे.
पहिला चोर
पण या दोन चोरांचे मार्ग लोकांची दोन प्रकारांमध्ये विभागणी करतात. पहिला चोर म्हणतो, “तू ख्रिस्त आहेस ना? तर तुला आणि आम्हाला वाचव!” हे आध्यात्मिक कंगाल असलेल्या जगिक माणसाचे किती अचूक चित्र आहे! येथे ‘त्याच्या कृत्यांचे योग्य फळ’ मिळालेल्या त्याच्या शिक्षेकडे त्याने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्याला चूक व बरोबर, स्तुती व निंदा, चांगले वाईट यात काहीही रस नाही. येशू हा मशीहा आहे, यहूद्यांचा राजा आहे असा विश्वास तो ठेवीलही पण ते त्याच्या फायद्याशी सबंधित आहे. त्याला वधस्तंभावरून उतरवणाऱ्या कोणालाही तो राजा मानायला तयार आहे.
तर एक मानवी विभाग देवाशी दु:ख सहन करताना अगदी असेच वागतो. दु:ख सहनामुळे त्यांच्या जगिक, वैयक्तिक सुखाला बाधा येते. मग देव देव करायला काय हरकत आहे? “जर तू राजा असशील तर ह्या गोंधळातून मला सोडव.” “जर तू खरा असशील तर मला ह्या आर्थिक संकटातून, बेकारीतून, वैवाहिक संघर्षातून सोडव.”
हा चोर काही आत्म्यामध्ये भग्न झाला नव्हता, त्याला अपराधी वाटत नव्हते, तो नम्र किंवा पश्चात्तापी नव्हता. मला वाईट वाटते आणि मी बदलायला हवे अशा प्रकारचे विचार त्याच्या मनाला शिवलेही नव्हते.
दुसरा चोर
पण आता दुसऱ्या चोराकडे पाहा: तो आपल्या जोडीदाराच्या विचारांनी ओढला गेला नाही. तो त्याच्या बोलण्याने फसला गेला नाही. त्याने त्याचा निषेध करून म्हटले: “तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय?” (२३:४०).
दुसऱ्या चोराबद्दल हे दुसरे सत्य आहे की त्याला देवाची भीती होती. देव त्याच्यासाठी खरा होता. देव हा त्याचा निर्माणकर्ता होता आणि त्याला ठाऊक होते की कुंभाराविरुद्ध त्याने बनवलेले पात्र बंड करू शकत नाही आणि जिंकू शकत नाही. निर्मित मानवाने त्यांच्या निर्माणकर्त्यापुढे नतमस्तक होणे योग्यच आहे.
तिसरे, ह्या पश्चात्तापी चोराने कबूल केले की त्याचे चुकले आहे: “कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत” (२३:४१). आता त्याला स्वत:चे समर्थन करायचे नव्हते. तो इथे होता आणि ज्या देवाला तो भीत होता त्याच्यासमोर तो उघडा होता आणि तो त्याचा दोष झाकू शकत नव्हता.
चवथे, त्याने आपला दोष मान्य केलाच पण दिलेली शिक्षाही मान्य केली. “आपली शिक्षा तर यथान्याय आहे” देवासमोर नम्रतेची ही खरी कसोटी आहे. अनेक जण आपल्या पापाची कबुली देतात पण संकट आले की त्याच्यावर चिडतात. आणि तो राग असे दाखवतो की ते स्वत:ला देवासमोर लायक समजतात. इयोबासारखे फार थोडे लोक म्हणू शकतात “मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे; परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम!” पण हा पश्चातापी चोर त्याच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणाला इयोबासारखा झाला. त्याने देवाची भीती बाळगली आणि आपले दु:ख तक्रार न करता स्वीकारले.
पाचवे, त्या चोराने येशूची नितीमत्ता जाणून घेतली. “परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही” (२३:४१). आपणही त्या चोरासमवेत म्हणायला हवे की “हा माणूस फक्त चांगलेच करतो, हा फक्त खरेच बोलतो. हाच केवळ आपली निष्ठा, विश्वास, भक्तीला लायक आहे. आपण ह्याचेच अनुकरण करायला हवे.
आणि सहावे, आता हा चोर आणखी एक पाऊल पुढे टाकून येशू हा राजा आहे हे मान्य करतो. “अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा” (२३:४२). येशू आता जरी सहन करत आहे तरी त्याच्यावर राजा असल्याचा शिक्का आहे. ज्यांना पहायला डोळे आहेत त्यांना इथे वधस्तंभावर त्याचे सामर्थ्य दिसते – प्रीतीचे सामर्थ्य. जे त्याला छळणूक करणाऱ्या सर्वांवर राजा करते. आणि एक दिवस तो त्याचे महान नाव सिध्द करील आणि प्रत्येक गुडघा त्याच्यापुढे टेकला जाईल, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभ येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करील.”
आणि शेवटी आता हा पश्चातापी चोर आणखी एक गोष्ट करतो. तो देवाची भीती बाळगतो, आपले चुकले हे मान्य करतो, न्याय स्वीकारतो येशूच्या चांगुलपणाचे सामर्थ्य स्वीकारतो. आता तो दयेची याचना करतो; “अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा” (२३:४२).
दोन्ही चोरांना मरणापासून सुटका हवी होती. पण किती निराळ्या रीतीने त्यांनी सुटकेची याचना केली. १) “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हांलाही वाचव” (व. ३९). २) “अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” ह्या दोघांच्या विनंतीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.
मी पश्चात्ताप करण्याची का गरज आहे?
आता या पश्चात्तापी चोराच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी येशू कोणती प्रेरणा देत आहे? येशू त्याला म्हणतो, “तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” हे समजण्यापलीकडे चांगले आहे. येथे उशीर होणार नाही. आज येशूचा आत्मा आणि नवीकरण झालेल्या चोराचा आत्मा एकतेने सुखलोकात असणार. ह्या अभिवचनाला उशीर लागणार नाही.
सुखलोक म्हणजे काय? नव्या करारात हा शब्द दोन ठिकाणी आढळतो. २ करिंथ १२:३ मध्ये पौल म्हणतो “त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की, त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले, (सदेह किंवा विदेही हे मला ठाऊक नाही; देवाला ठाऊक आहे;) आणि माणसाने ज्यांचा उच्चारही करणे उचित नाही अशी वाक्ये त्याने ऐकली.” तर सुखलोक हा देवाचा स्वर्गीय निवास आहे जेथे देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी अवर्णनीय अशा गोष्टी आहेत. दुसरा उल्लेख प्रकटी. २:७ मध्ये आहे. तेथे येशू इफिस येथील मंडळीला म्हणतो, “जो विजय मिळवतो त्याला, ‘देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड’ आहे, ‘त्यावरचे’ फळ मी खाण्यास देईन.” आणि जर आपण प्रकटीकरणाच्या शेवटच्या अध्यायात पाहिले तर हे जीवनाचे झाड देवाच्या स्वर्गीय नगरात आहे. “नंतर त्याने देवाच्या व कोकर्याच्या राजासनातून ‘निघालेली’ नगरीच्या मार्गावरून वाहणारी ‘जीवनाच्या पाण्याची’ स्फटिकासारखी नितळ ‘नदी’ मला दाखवली. नदीच्या ‘दोन्ही बाजूंना’ बारा जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते ‘दर महिन्यास आपली फळे’ देते आणि त्या झाडाची ‘पाने’ राष्ट्रांच्या ‘आरोग्यासाठी’ उपयोगी पडतात” (२२:१).
पण या सर्वामध्ये येशूने त्या पश्चात्तापी चोराला एक गोष्ट सांगितली. “आज तू माझ्याबरोबर असशील.” आपण जेव्हा हे जग सोडतो तेव्हा खुद्द येशूच आपले समाधान असणार आहे या जाणीवेने आपण त्याच्यावर किती प्रेम करून त्याची प्रशंसा करायली हवी म्हणूनच आपण गाऊ शकतो, “हे सर्व जग तुम्ही घ्या पण मला येशू द्या”
Social