जनवरी 22, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुमच्यासाठी येशू कोण आहे वनिथा रिस्नर

शुभवर्तमान ही चांगली बातमी आहे हे मला ठाऊक आहे पण मी हे सहज विसरते की ही आश्चर्यकारक रीतीने चांगली बातमी आहे.
माझ्या ह्रदयाने याचे पुनरावलोकन करावे म्हणून मी देवाला विचारत होते की मला माझे पाप पुन्हा दाखव. आणि त्याने दाखवले. हे  भयावह होते.  मला फक्त त्याचा एक छोटा कोपराच दिसू शकत होता. मला माहीत आहे की माझ्या ह्या बाह्यस्वरूपाच्या आत अनेक प्रश्नार्थक हेतू आणि विचार यांचा गुंता झाला आहे. तर जाणीवपूर्वक स्वपरीक्षण करत असतानाच मी शुभवर्तमानातल्या येशूच्या शेवटच्या दिवसांचा वृत्तांत वाचत होते. तेव्हा मी माझ्यात आणि शिष्यांमध्ये दिसलेल्या साम्यामुळे अवाक् झाले.

पेत्रासारखीच मी अधीर होते. मी विचार करण्यापूर्वी बोलते आणि नंतर माझ्या अविचाराबद्दल खेद करते. मी ख्रिस्ताला अख्रिस्ती लोकांमध्ये नाकारले आहे. एकही शब्द न बोलता मी त्यांच्या टीका-टिप्पण्या ऐकल्या आहेत आणि माझ्या विश्वासाचा उल्लेखही केलेला नाही. मग मी माझ्या मनाला समर्थन करते की “मला एक शांत साक्षीदार व्हायचे आहे. पण सत्य हे आहे की मला फक्त शांतच राहायचे आहे.

याकोब आणि योहान यांच्यासारखाच मला अधिकार आणि मान्यता हवी आहे. मी हे चलाखीने करते. ते मी कोणत्या प्रकारे करते याची मला पर्वा नसते (त्यांनी त्यांच्या आईला ते विचारायला पाठवले). पण मला मान्यता आवडते. मला येशूच्या उजव्या किंवा डाव्या हाताला बसायला पाहिजे पण त्यासोबत जो प्याला आहे तो पिण्याची माझी इच्छा नाही.

पेत्र, याकोब, योहान यांच्याप्रमाणेच गेथशेमानेच्या बागेत माझा आत्मा उत्सुक असेल पण माझा आत्मा अशक्त आहे. मला अधिक उत्कटतेने प्रार्थना करायला हवी असते, अधिक धैर्याने सुवार्ता सांगायला हवी आहे आणि अधिक त्यागाने जीवन जगायला हवे आहे. पण मला यात दयनीय अपयश येते. जसे शिष्य झोपी गेले तसेच मी माझ्या स्वाभाविक प्रेरणांना बळी पडते.

येशूला ३० नाण्यांसाठी दगा देणाऱ्या यहूदासारखी मी पण आहे. यहूदाच्या कृतीने मी अस्वस्थ होते; येशू हा त्याला आपले साध्य पुरे करण्याचे साधन वाटला. कदाचित त्याला वाटले असेल येशूने जर रोमी साम्राज्य उलथून टाकले तर त्याच्या मागे जाण्यामुळे त्याला पैसा, मानमरातब व सामर्थ्य मिळेल. काही का असेना, यहूदाला येशूकडून जे पाहिजे होते ते मिळाले नाही. त्याला येशूकडून काय मिळेल या उद्देशाने तो येशूमागे गेला; येशू कोण होता यासाठी नाही.

आपल्यातला हा कल ओळखून पॉल ट्रीप म्हणतात, “आपल्यातील प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक यादीच्या खाली देवाने सही करावी असे वाटते आणि जर त्याने केली तर आपण त्याच्या चांगुलपणाचे गोडवे गातो. पण जर त्याने नाही केली तर आपण विचार करू लागतो की त्याच्या मागे जाणे खरंच योग्य आहे का”

मला आठवते की जेव्हा माझ्या मुलाला ह्रदयाचा विकार असल्याचे निदान झाले तेव्हा मी चकित झाले. मी नकळत भरभराटीच्या शुभवर्तमानावर कृती करत होते (जे म्हणते आर्थिक आशीर्वाद आणि शारीरिक रोगनिवारण हे नेहमीच आपल्यासाठी देवाची इच्छा असते). माझे ख्रिस्ती स्नेहीसुद्धा अशा सिद्धांतावर जोर देऊन मला सांगत होते की तू रोगनिवारण होण्याचा हक्क दाखव. अशा प्रकारचा दृष्टिकोन सांगतो की येशू हा तारणारा असण्यापेक्षा जादूचा दिवा किंवा सुदैव देणारा ताईत आहे जो आपले जीवन ठाकठीक करतो. कधीकधी आजही मी असा विचार करते.

माझे पाप हे शिष्यांच्या पापासारखे किती आहे हे मी पूर्वी पाहिलेच नव्हते. नंतर जे येशूच्या मरणाला कारणीभूत होते त्या प्रत्येकामध्ये  मी स्वत:ला पाहू लागले.

पिलाताने स्वत:चे हात धुतले आणि आपण निर्दोषी आहोत असे जाहीर केले. जसे काही आपला दोष दूर करणे इतके सोपे आहे. त्याला माहीत होते येशूला मरण्यासाठी दोषी ठरवणे हे चुकीचे होते. पण त्याला लोकांची भीती वाटली आणि त्याने ते केले. मला पण लोकांची भीती वाटते. ते काय म्हणतील याची काळजी मला वाटते. योग्य गोष्टीसाठी अप्रसिद्ध गोष्टीची बाजू घेणे हे सुरक्षितपणे सर्वानुमत स्वीकारण्यापेक्षा किती कठीण असते.

मग तेथे जमाव होता. तो सहज हेलकावे घेत होता. एका क्षणाला ते आपली वस्त्रे खाली अंथरून ‘होसान्ना’ चा गजर करत होते आणि पुढच्या क्षणाला ते ‘त्याला वधस्तंभी खिळा’ असे ओरडत होते. जेव्हा त्यांना दिसले की आपल्याला ज्या पद्धतीचा ‘सोडवणारा’ पाहिजे तसा येशू नाही तेव्हा ते सर्व त्याच्या विरुद्ध गेले. मी पण मला ज्या लोकांनी निराश केले त्यांच्याविरुद्ध मनाने गेलेली आहे आणि विचार न करता जमावामागे पण गेलेली आहे.

आणि शेवटी मुख्य याजक व परूशी  तेथे होते. ते येशूचा द्वेष करत असल्याने त्यांनी येशूला ठार मारण्याचा कट करण्यास सुरुवात केली. अर्थातच मी त्यांच्यासारखी नसणार.

पण कडू दु:खाने म्हणावे लागते की परूशांचा ज्या शास्त्रलेखांशी इतक्या जवळचा सबंध होता त्याच्याबरोबरच मी सुद्धा बसलेली आहे.

परूशी सर्व काही बरोबर करत होते असे भासत होते. ते नियमशास्त्र पाळत होते. ते शिक्षक होते. ते शास्त्रलेखांचा अभ्यास करत होते. त्यांना सन्मान मिळत होता. ते त्यांच्या वर्तनाचे समर्थन करत होते कारण त्यांच्या दृष्टीने येशू हा बंडखोर होता आणि तो याव्हेविरुद्ध चुकीचे बोलत होता.

आणि जेव्हा मी त्यांचे पाप पाहते तेव्हा ते माझ्या पापाशी खूपच जवळचे आहे अशी मला भीती वाटू लागते. त्यांना देवापेक्षा मानवांची प्रशंसा आवडत असे. ते त्यांची सर्व कृत्ये माणसांनी पहावी म्हणून करत असत. मेजवानीच्या वेळी त्यांना मानाच्या जागा आवडत आणि सभास्थानात ते उत्तम आसने घेत, बाजारात मुजरा घेणे त्यांना आवडे. त्यांची पापे त्यांना दिसत नव्हती. ते त्यांच्या कृतीविषयी अत्यंत चोख असत पण त्यांच्या वृत्तीबद्दल ते बेफिकीर असत. बाहेरून ते धार्मिक दिसत पण आतून ते पूर्णपणे ढोंगाने भरलेले होते.

पेत्र, योहान व याकोब देवाच्या कृपेने तारले गेले. आणि पुढे त्यांनी सर्व जगाची उलथापालथ केली (प्रेषित १७:६). यहूदा आणि ज्यांनी येशूला वधस्तंभी दिले ते जर जन्मले नसते तर ते त्यांच्यासाठी बरे होते (मत्तय २६:२४).

पण ह्या दोन गटांमधला फरक हा त्यांच्या स्वभावामध्ये नव्हता. ते सर्व धार्मिक लोक होते. त्यांनी येशूला कसे पाहिले हा तो फरक होता. यहूदी लोकांना येशू हा वाईट मनुष्य होता व त्यांच्या जीवन शैलीला तो धोकादायक होता. समुदायाला एका क्षणी तो संदेष्टा होता तर दुसऱ्या क्षणी तो गुन्हेगार होता. पिलातासाठी तो एक निर्दोष माणूस होता जो राजकीय चक्रात सापडला होता. यहूदासाठी येशू हा रब्बी, शिक्षक, काही काळ उपयोगी पडणारा असा  सामर्थ्यवान मनुष्य होता पण कधीच प्रभू नव्हता. शेवटच्या भोजनाच्या वेळी सुद्धा इतर शिष्यांनी त्याला प्रभू म्हटले (मत्तय २६:२२) पण यहूदाने त्याला रब्बी म्हटले (मत्तय २६:२५).

शिष्यांसाठी येशू हा ख्रिस्त होता, जिवंत देवाचा पुत्र होता. तो त्यांचा तारणारा आणि प्रभू होता आणि येशूने वधस्तंभावर काय केले त्याची सुवार्ता सांगत त्यांनी आपले आयुष्य वाहून दिले. कारण वधस्तंभांशिवाय त्याचे शिष्य किंवा जवळचे मित्रही अखेरीस अनंतकाळ देवापापासून दूर केले गेले असते.

म्हणून ह्या पुनरुत्थान समयी मला क्षमेची किती गरज आहे याची जाणीव मला होते. प्रभूला माझे ह्रदय ठाऊक आहे. माझी वृत्ती; ज्या दयाविरहित शब्दांचा मी विचार करते पण बोलून दाखवत नाही. मी काय दुष्टपणा करू शकते हे त्याला माहीत आहे आणि वधस्तंभावर त्याने या सर्वांची क्षमा केली. मी चांगली आहे म्हणून माझे तारण झाले नाही तर तो चांगला आहे म्हणून.

माझ्या अशा निरनिराळ्या वृत्ती व फसवे ह्रदय आणि त्याला क्रूसावर दिलेल्यांशी असलेली माझी सादृश्यता  असतानाही त्याच्या या अमर्याद प्रेमामुळे व कृपेमुळे मी ख्रिस्ताबरोबर अनंतकाळ घालवणार आहे.

Previous Article

येशू मेलेल्यातून उठला याची आठ कारणे जॉन पायपर

Next Article

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

You might be interested in …

लोकांना खुश करणाऱ्याची कबुली

मार्शल सीगल तुम्ही कोणीही असा, कोठेही असा, कोणत्याही वयाचे असा, तुम्ही एकतर लोकांना खुष करायला जगता अथवा देवाला. आणि तुम्हाला वाटत असेल की दोघांनाही खुष करता येणे शक्य आहे तर बहुधा तुम्ही लोकांनाच खुष करायला […]

सिरियन चर्च आणि रोम

सोळावे शतक प्रकरण ७  भारतातील ख्रिस्ती धर्म व युरोपातील ख्रिस्ती धर्म यात मूलभूत फरक आढळतो. परस्पर विरोधी मतांवरून युरोपातील ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये झगडे झाले तसे भारतात आढळत नाही. कारण भारतात पाश्चात्य मंडळ्यांचा एकच शत्रू होता व […]

लेखांक ४: कृपा आणि वैभव

 ख्रिस्ताच्या देहधारणाचे तिहेरी गौरव                                                             स्टीव्ह फर्नांडिस  आपल्या लोकांसाठी देहधारी होण्याच्या परिणामामधील त्याचे गौरव शेवटची बाब म्हणजे आपल्या लोकांसाठी देहधारी होण्याने झालेल्या परिणामांमुळे तो गौरवी ठरतो. पहिला परिणाम म्हणजे त्याच्या देहधारी होण्याद्वारे त्याने आपल्या व्यक्तित्वाचे […]