जनवरी 21, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

माझे कोणतेच दु:खसहन देवाला चकित करत नाही वनिथा रिस्नर

मला आता काय होणार? किती कठीण होणार आहे अजून? ही परीक्षा अजून किती काळ चालणार आहे?

माझ्या काळजीच्या मध्यभागी हे प्रश्न बहुधा येत राहतात. मला खात्री हवी असते की ही समस्या तात्पुरती आहे. माझी गहन काळजी निरर्थक आहे. आणि सध्या जे घडत आहे त्यातून  चांगले घडेल.

काही दिवसांपूर्वी एका नव्या प्रकृतीच्या समस्येने मला ग्रासून टाकले. ह्यामागचे काय कारण असावे याबद्दल मला नक्की समजेना. मी पूर्वी पोलिओग्रस्त असल्याने त्याच्या वेदना मला सोडत नाहीत आणि त्यात ही भर. ही नवी समस्या मला काही आठवडे त्रास देत होती अन् काही आराम मिळेना. त्यामध्ये अनेक अज्ञात बाबी होत्या. मी बायबल उघडून देवाचे वचन वाचत होते पण माझे मन दुसरीकडेच भरकटत होते.

मग मी माझा फोन घेतला आणि माझा प्रश्न गूगलवर टाकला. अनेक प्रश्न तर्हेतर्हेने विचारून मी खूप शोधले. माझी लक्षणे काय सांगतात हे पाहण्यासाठी. खरंच एवढी काळजी करण्याची गरज आहे का? मी विचार करू लागले. मला खात्री हवी होती की मी ठीक होणार होते. मला काही आशादायी उत्तरेही मिळाली. तरीही मला नक्की स्वस्थता वाटेना. मी पुन्हा बायबल वाचू लागले. उगाच प्रभूबरोबरच्या माझ्या  वेळेत यासाठी व्यत्यय आणायला नको होता. मी विचार केला; माहिती हे उत्तर नाही.

मग मी वाचले, “देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागराच्या लाटा गर्जून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले तरी आम्ही भिणार नाही” (स्तोत्र ४६:१-३). मी किती मूर्खतेने वागले याची  जाणीव मला झाली. मी उत्तरासाठी दुसरीकडेच का शोध घेत होते? माझी समस्या ही माहितीच्या कमतरतेमुळे होती असे मला का बरं वाटले? मला देवापेक्षा गूगलकडून खात्री का हवी होती?

इंटरनेटवर उत्तरे शोधणारी मी काही एकटीच नाही. आकडेवारी सांगते की दररोज ५५ कोटी लोक असा शोध करतात. याचा अर्थ दर सेकंदाला ६३,००० लोक. प्रत्येकाला माहिती हवी असते, जसे काही माहिती हे आपल्या सर्व समस्यांना उत्तर आहे.

माझ्या कानात ४६वे स्तोत्र घुमत होते. मी डायरीत लिहू लागून स्वत:ला आठवण करू देऊ लागले. जे काही घडते ते देवाने पूर्वीच योजून ठेवलेले असते (यशया ३७:२६). जे अस्तित्वात नाही ते तो अस्तित्वात आणतो  (रोम. ४:१७).  त्याच्या इच्छेशिवाय एकही चिमणी भूमीवर पडत नाही (मत्तय १०:२९). देवाला काहीही अशक्य नाही (यिर्मया ३२:१७).

देवाला जहाजांबद्दल सर्व ठाऊक आहे

सहजपणे मी लिहिले, ‘देवाला जहाजांबद्दल सर्व ठाऊक आहे.’

हे विधान मी एलिझाबेथ इलियटच्या “बी स्टील माय सोल” या पुस्तकात वाचले होते. यामध्ये ती एमी कारमायकलचा अनुभव सांगत होती. एमी ही तरुण मिशनरी त्यावेळी जपानमध्ये होती. एका वृद्ध मिशनरी दांपत्यासोबत ती प्रवास करत होती. त्यांना उशीर झाला कारण त्यांचे जहाज आलेच नाही. पुढच्या जहाजासाठी त्यांना कित्येक दिवस थांबावे लागले. आणि एमीला वाया गेलेला वेळ, इतरांची झालेली गैरसोय याची काळजी वाटू लागली. तिला या वृद्ध मिशनरीने शांतपणे प्रतिसाद दिला. “देवाला जहाजांबद्दल सर्व काही ठाऊक आहे.”

‘देवाला जहाजांबद्दल सर्व काही ठाऊक आहे’ हे एमीचे आयुष्यभर ब्रीदवाक्यच बनले – आणि आता माझे. मला ते आठवण करून देते की देवाचे सर्वांवर नियंत्रण आहे आणि जे काही घडते त्याचा तपशील त्याला ठाऊक असतो. जरी आपण उत्तराची वाट पाहत असतो तरी आपल्याला काळजी करण्याची गरज नाही.

देव काय कल्याण करतो?

तेथे मी प्रार्थना करत बसले होते आणि मी कबूल केले की माझ्या काळजीमध्ये मी देवाला आणतही नाही.
कदाचित पटकन मी एखादी प्रार्थना करत असेनही पण अक्षरश: मी अशी वागते की सर्वकाही माझ्या ज्ञानावर अवलंबून आहे. आणि सहजच विचार करते की ज्ञान हे माहितीद्वारे मिळते. पण जेव्हा मला आठवते की, “देव मूर्खांना या जगाचे ज्ञान बनवतो” (१ करिंथ १:२०) आणि  “देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे” (१ करिंथ १:२५), तेव्हा मला समजते की अधिक माहितीने मला खरंतर काही मदत होणार नाही. निदान मला हवी तशी.

मी स्वत:ला दिलासा देणे तरी थांबवले पाहिजे की मी ठीक होईन, सर्व काही ठीक होईल. आपण जे ख्रिस्तामध्ये आहोत त्या आपल्याला खात्री दिली आहे की आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या कल्याणासाठी होईल. आता पृथ्वीवर आपण ज्या गोष्टींसाठी रडतो त्यासाठी स्वर्गात आपण कृतज्ञ असणार आहोत. आपल्याला खात्री दिली आहे की देव जे उत्तम ते आपल्यापासून कधीही राखणार नाही.

मी असे सांगत नाही की दिलेल्या मर्यादेत आपण शोध करू नये किंवा आपल्याला जे घडते अथवा आपल्या सभोवती जे घडते ते समजून घेऊ नये. अशी काही पावले  आपण उचलायला हवीत. पण काहीही असो मला देवाला या प्रक्रियेमध्ये घ्यायला हवे, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन घेत. अनपेक्षित गोष्टींची धास्ती बाळगण्याची मला गरज नाही. मला जे काही घडते त्याने देव चकित होत नाही.

‘समजा जर’ ऐवजी ‘असे झाले तरी’

याची सुरुवात झाली तेव्हा मी ज्याच्याशी बोलत होते तो विश्वाचा देव, ज्याचे शब्द बायबलच्या पानांमध्ये लिहून ठेवले आहेत तो एकटाच माझी परिस्थिती बदलू शकतो आणि त्यामध्ये मला बदलतो. त्याचे ज्ञान आणि सांत्वन याची मला गरज आहे. त्याच्या ज्ञानाची – इंटरनेट मधून एकत्रित केलेल्या मनुष्याच्या  ज्ञानाची नाही.

काही वर्षांपूर्वी मी स्वत:ला व इतरांना आठवण करू देण्यासाठी एक लेख लिहिला होता. असा की जरी माझी भयानक स्वप्ने जरी खरी ठरली तरी देव तेथे असणार. तो मला उचलून घेईल आणि माझे सांत्वन करील. जेव्हा आपण ध्यास धरून गूगलमध्ये शोधत राहतो तेव्हा आपण विचार करतो जर सर्वांत वाईट घडले तर आपण काय करू? इतरांच्या एकत्रित ज्ञानाने आपण आपली भीती शमवण्याचा प्रयत्न करतो. अधिक माहितीने काही अमक्या तमक्या माहितीने आपल्या मनाला दिलासा मिळेल असे आपण समजतो. सत्य हे आहे की आपल्यापैकी कोणाच्याही जीवनात अत्यंत वाईट गोष्ट घडू शकते.

देवावर भरवसा ठेवणे म्हणजे जरी अत्यंत वाईट घडले तरी देव पुरेसा आहे. ‘जर असे घडले तर’ ऐवजी ‘असे घडले तरी’ वापरण्याने आपण एक मोठा बदल करू शकतो. अनिश्चित भविष्याच्या आपल्या अवास्तव भीतीची आपण देवाच्या न बदलणाऱ्या प्रेमळ खात्रीमध्ये अदलाबदल करतो.

जरी सर्वात वाईट घडले तरी

हे मी लिहित असताना करोना व्हायरस फैलावत आहे अनेकांच्या मनात भीती निर्माण करत, अनेकांना विचार करायला लावत की अजून किती लोक ह्या साथीमुळे मरणार आहेत. कदाचित असंख्य किंवा पूर्वसूचनेप्रमाणे इतके धोकादायक नसेलही. पण जरी अत्यंत वाईट घडले तरी देव तेथे असणार.

आपल्या रक्षकाला झोप लागत नाही. तो आपला रक्षक आहे आणि तोच आपल्या जीवनाचे रक्षण करील (स्तोत्र १२१:३,५,७). काहीही घडले तरी- “अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणार्‍या देवाविषयी मी उल्लास करीन” (हबक्कूक ३:१७,१८).

म्हणून जर पुढच्या वेळेला मला कशाची तरी काळजी वाटली आणि त्या दशेत मी दिवसभर सर्व कामे पार पाडली आणि जरी मला रात्री झोप आली नाही, तरी मी प्रार्थना करते की मी या जगाकडून खात्री मिळवण्याकडे वळू नये असे कर. मी प्रार्थना करते की, “जो समुद्राला म्हणतो यापुढे तू येत कामा नये”  (ईयोब ३८:११), त्याच्या हातात सर्व परिस्थिती संपूर्ण नियंत्रणाखाली आहे हे मी आठवावे. मी प्रार्थना करते की जे घडत आहे त्याची मला भीती वाटू देऊ नको. मी देवाकडे वळावे, गूगलकडे नाही. आणि जरी सर्वात वाईट घडले तरी मी हे समजून विसावा घ्यावा की, “मृत्यूच्छायेच्या दरीतून जरी मी जात असले तरी तिथे देव माझ्याबरोबर असेल” (स्तोत्र २३:४).

 

Previous Article

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

Next Article

आत्म्याचे फळ लेखांक २ स्टीफन विल्यम्स

You might be interested in …

देव सर्वाचा  उपयोग करतो

वनिथा रिस्नर काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने विचार न करता असे काही उद्गार काढले की त्यांमुळे मी दुखावली गेले. माझा पहिला प्रतिसाद म्हणजे मी  अस्वस्थ झाले.  नंतर मी मनामध्ये तिच्याबद्दलच्या तक्रारींचा मनातला मनात पाढा वाचू […]

संपादकीय

किती भरकन् नवं वर्ष जुनं ही झालं ! जानेवारी २०१६ असं  लिहिणं विशेषत्रासाच वाटलंनाही हे तुमच्या ध्यानात आलं का?- नव्या वर्षात आल्यावर निदान मी तरी चुकीनं कोणत्याच पत्रावर वा लेखावरजानेवारी २०१५ असं लिहिलं नाही. सत्य […]

भावंडातील वैमनस्य

जॉन पायपर स्टेफनीचा प्रश्न पास्टर जॉन , माझा प्रश्न भावंडातील वैमनस्यासबंधी आहे. उत्पत्तीमध्ये दिसते की प्रत्येक कुटुंबावर  भावंडातील हेव्याचा परिणाम झाला. त्यापैकी काही – काईन आणि हाबेल, याकोब आणि एसाव, राहेल आणि लेआ, योसेफ आणि […]