नवम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

नम्रतेने तुमचा जीव तजेलदार करा

जॉन ब्लूम

जर तुम्ही काही काळ ख्रिस्ती असाल तर खालची ही वचने नक्कीच पाठ असतील. पठणाचा प्रयत्न करून नव्हे तर अनेक वेळा ऐकून ऐकून.

तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल” (नीती. ३:५-६).

हे अभिवचन किती आवडते आणि मुक्त करणारे आहे बरे! आपण नश्वर आहोत आणि आपल्या समजण्यापलीकडे असलेले कितीतरी आहे, हा विचार आपल्याला भारून टाकतो. पण जो सर्वज्ञ आहे त्यावर भरवसा टाकण्याच्या ह्या आज्ञेमध्ये आपल्याला एक सुरक्षित ठिकाण आढळते जेथे आपण आपला विवेक राखू शकतो. जर ही कनवाळू आज्ञा आपण पाळली तर देव आपला जीवनक्रम चालवील, ह्या अभिवचनामध्ये आपल्याला शांती मिळते. मग ह्या वचनाचा वारंवार उल्लेख केला जातो यात नवल नाही. पण पुढची दोन वचने आपल्याला विशेष परिचित नसतात.

तू आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणा समजू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्त्व असे होईल” (नीती. ३:७,८).

देवाने दिलेल्या मार्गदर्शनाइतकाच त्याने दिलेल्या अभिवचनाचा तजेला तितकाच मोलवान आहे असे मला वाटते.

सारखे पण एकच नाही

हे वचन लेखकाने आपल्या मुलाला लिहिले आहे हे स्पष्ट आहे (नीती ३:१). पण ते आपल्यालाही आहे – यासाठी की ह्या ओळी आपण एकत्रितपणे वाचाव्या. ह्या वेगवेगळ्या कराव्या अशी त्याची इच्छा होती असे मला वाटत नाही. कारण इब्री काव्य व ज्ञानाचे  साहित्य याच्याशी ते समांतर आहे:

तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव” ही आज्ञा “ तू आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणा समजू नकोस” याच्याशी पूरक आहे. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस” ही आज्ञा  परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा” शी पूरक आहे.
आणि ६ व्या वचनातले अभिवचन  (म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल) हे ८व्या वचनातील  (हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्त्व असे होईल) या अभिवचनाशी पूरक आहे.

अशा समांतरतेमधली अलौकिक बुद्धिमत्ता अशी की ती लेखकाला परस्परांशी संबंध असलेली विधाने करू देते जी एकाकी विखुरलेली व अर्थहीन नसतात. वचन ५ आणि ६ जे म्हणते त्यामध्ये आणि वचन ७,८ जे म्हणते त्यामध्ये संबंध आहे, पण ती एकच गोष्ट सांगत नाहीत. ‘आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेवणे’ आणि  ‘आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणे न समजणे’ हे एकच नाही. (तरीही दुसरी बाब असल्याशिवाय पहिली असू शकत नाही.)

नम्र जनांना देव काय देतो
हे नीतिवचन काय करत आहे की, एका खोल सत्याचा हिरा देवाच्या ज्ञानाच्या प्रकाशात असा फिरवत आहे की त्यामध्ये आपल्याला प्रकाशाचे निरनिराळे पैलू दिसतील. खोल सत्य कोणते आहे? ते आपण त्याच अध्यायात अधिक स्पष्टपणे पाहतो. “उपहास करणार्‍यांचा तो अवश्य उपहास करतो, पण दीनांवर तो कृपाप्रसाद करतो” (नीती ३:३४). बायबलमधील या वचनाचा अनेकदा संदर्भ दिला जातो. हेच वचन याकोब ४:६ व १ पेत्र ५:५ मध्येही दिलेले आहे. “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”

ह्याच सत्याचा हिरा, लेखक या अध्यायात उंच धरत आहे. देव नम्र लोकांना त्याची कृपा, मर्जी देतो. जेव्हा तो हा हिरा फिरवतो तेव्हा तो ७-८ या वचनांवर पडतो.  “आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस,” “परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा”  जीवनामध्ये मार्गदर्शन आणि जिवाची सुधारणा या दोन्ही कृपा देव नम्र जनांना बहाल करतो.

पण ५-६ वचने आपल्या इतक्या परिचयाची आहेत म्हणून आपण ७-८ या वचनातील प्रकाशकिरणाकडे पाहू या आणि जर आपण देवाचे ऐकले तर आपल्याला कोणती कृपा दिली जाते हे शिकू या.

तुम्हाला वाटते तेवढे शहाणे तुम्ही नाहीत

प्रथम ही आज्ञा पाहा:  “तू आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणा समजू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा” (नीती ३:७).

“तू आपल्या दृष्टीने स्वत:स शहाणा समजू नकोस” असे सांगण्याचा परिणाम “परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा.” यापेक्षा वेगळा आहे.त्यामुळे लगेचच आपली जाणीव/जागरूकता उंचावली जाते आणि आपल्या संसाराच्या फुशारकीशी (१ योहान २:१६)आपण सामना करू लागतो. हा गर्व आपल्या पापस्वभावाचा भाग असून तो प्रत्येकामध्ये आहे. ह्याच गर्वामुळे आपल्याला वाटते की आपल्याला चांगले आणि वाईट याचे पुरेसे ज्ञान आहे. आणि या दोघांमध्ये आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. ही घातक समजूत आहे. 

नीतिसूत्राच्या लेखकाला माहीत आहे की हा गर्व किती मादक आणि फसवा आहे आणि म्हणून हा संपूर्ण अध्याय या मूर्खपणाविरुद्ध तो धोका दाखवत आहे. आता मादकपणे फसवे काय आहे तर वाईटाची सहज निवड करणे किती शहाणपणाचे दिसते; कारण जे ते निवडतात त्यांना त्याचे फायदे दिले जातात. जेव्हा त्याने दिलेली वाईटाची उदाहरणे आपण पुढे त्या अध्यायात वाचतो (३:२८-३४) तेव्हा आपल्याला असा विचार करण्याचा मोह होईल की आपण अशा सर्व वागण्यापलीकडचे आहोत. पण सत्य हे आहे की, जीवनातील तणावाच्या परिस्थितीमध्ये, जेव्हा आपण भितो, रागावतो, दु:ख सहन करतो किंवा आपल्याला धमकावले जाते अशा वेळी गोष्टी किती गोंधळून टाकणाऱ्या दिसतात.

ही आज्ञा आपल्या सर्वांनाच कठीण आणि बिकट परिस्थितीसाठी व निर्णयासाठी महान कृपा आहे. असे काही प्रसंग येतात की त्यावेळी आपल्याला देवावर भरवसा ठेवा असे निव्वळ सांगण्यापेक्षा आपल्या तोंडावर, जिवाला धक्का देणारी सूचना देणे जरुरीचे असते की आपल्या स्वत:च्या शहाणपणावर भरवसा ठेवू नको आणि वाईटापासून मागे फिर. आपले शहाणपण विश्वास ठेवण्यास कसे लायक नाही याची आठवण आपल्याला करून देण्याची गरज आहे.

नम्रतेचे पुन्हा उभारण्याचे सामर्थ्य

शेवटी जे स्वत:च्या दृष्टीने शहाणे नाहीत तर देवाची भीती बाळगतात आणि वाईटापासून मागे फिरतात त्यांना किती सामर्थ्ययुक्त अभिवचन दिले आहे ते पहा. “हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्त्व असे होईल” (नीती ३:८).

येथे लेखकाने जे शब्द निवडले आहेत त्याकडे लक्ष द्या: ‘आरोग्य’ ‘हाडांना सत्त्व’ हे पुन्हा उभारणी करणारे शब्द आहेत. हे शब्द तो का वापरतो?

कारण ह्या अनुभवी बापाला माहीत आहे की वाईटाचा मोह येणे व वाईट केल्याने जिवावर अत्याचार होणे म्हणजे काय आहे. त्याला माहीत आहे की “शांत अंत:करण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात” (नीती. १४:३०). दाविदाने जेव्हा लिहिले की “मी गप्प राहिलो होतो, तेव्हा सतत कण्हण्यामुळे माझी हाडे जीर्ण झाली” (स्तोत्र ३२:३), तेव्हा त्याचा अर्थ काय ह्याची जाणीव त्याला आहे. वाईट गोष्ट विवेकाशी बंड करते आणि देव व मानव यामध्ये एक भयानक संघर्ष निर्माण करते. आणि आपल्या मुलाने व आपल्या सर्व वाचकांनी देवाबरोबर शांतीचा अनुभव घ्यावा अशी त्याची इच्छा आहे (नीती ३:२). किंवा जर तो दुष्टाईत राहत असेल तर त्याने शांतीकडे फिरावे आणि ज्या देवाकडून तजेला देणारी शांती मिळवण्याचा मार्ग आहे त्याच्यासमोर नम्रतेने जगावे.

नम्र व्हा

जेव्हा पेत्र पुढील वचन लिहीत होता तेव्हा त्याला नीती. ३ मधले अस्सल हिरे आठवत होते.

“तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हांला उंच करावे. त्याच्यावर तुम्ही ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो” (१ पेत्र ५:५-७)

देव नम्र जनांना कृपा पुरवतो. जे त्याच्यावर संपूर्ण ह्रदयाने नम्रतेने विश्वास ठेवतात त्यांना तो मार्गदर्शनाची कृपा देतो. जे नम्रतेने स्वत:च्या दृष्टीने शहाणे समजण्यास नकार देतात त्यांना तो ताजेतवाने करणारी शांती देतो. जे स्वत:ला त्याच्या हाताखाली नम्र करतात त्यांना तो उंच करणारी  कृपा देतो. आणि जे नम्रतेने आपली चिंता त्याच्यावर सोपवतात त्यांची काळजी त्याच्या स्वत:वर घेणारी कृपा तो पुरवतो.

नीती ३:५-६ ही वचने जितकी परिचयाची आहेत तितकीच ७-८ ही वचनेही परिचयाची करून घेणे आपल्यासाठी चांगले आहे. असे काही समय असतात की आपल्या संपूर्ण ह्रदयाने देवावर भरवसा ठेवण्याची आठवण ठेवणे जरुरीचे असते आणि दुसरे असे काही समय असतात की आपण आठवण ठेवावी की आपण स्वत:च्या दृष्टीने शहाणे समजू नये. ही वचने  समान आहेत, परस्परांशी संबंधित आहेत, पूरक आहेत तरीही देवाच्या सुज्ञतेचे निराळे पैलू आहेत. आणि दोन्ही आपल्याला आठवण करून देतात की देवासमोर नम्र होत राहणे हे आपल्या जिवाच्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम आहे.

Previous Article

जर तुम्ही पकडले गेलात तर तुम्ही पश्चात्ताप करू शकाल का?

Next Article

उगम शोधताना

You might be interested in …

नातेसंबंधातील बहुतेक संघर्ष कसे सोडवावेत

लेखक:  जॉन ब्लूम आपल्यामधला आनंद हिरावून घेणाऱ्या, भावनांवर हक्क दाखवणाऱ्या, मन विचलित करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात प्रथम क्रमांक लागेल नातेसंबंधातील संघर्षांचा. नातेसंबंधातील संघर्षाइतका गोंधळ घालणारे व नाश घडवणारे दुसरे काही नसते. आणि यातले कितीतरी आपण टाळू शकतो.अर्थातच […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

 संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक २ येशू हा देवाच्या योजनेचे केंद्रस्थान आहे. येशू हाच अंतिम राजा व त्याचे राज्य हा जुन्या करारातील भाकि‍तांचा विषय आहे. त्याच्याद्वारे देवाची योजना, अभिवचने, भाकिते व करार प्रत्यक्ष पूर्ण होतात. […]

बाल्यावस्थेतून प्रौढत्वाकडे

ग्रेस टू यू च्या सौजन्याने  अपरिपक्वतेचे स्पष्ट लक्षण आहे स्वार्थ. लहान बाळे पूर्णपणे स्वकेंद्रित असतात . त्यांना हवे ते  ताबडतोब मिळाले नाही तर ती किंचाळतात.  स्वत: च्या गरजा आणि इच्छा याचीच तेवढी त्यांना जाणीव असते.  ती इतरांना मदत […]