दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

सामान्य भक्तीचे शांत सामर्थ्य

स्कॉट हबर्ड

ख्रिस्ती या नात्याने आपल्याला फक्त बायबल वाचण्यातच रस नसतो. जे वाचतो ते आपल्याला भावले जावे, त्याने आपल्याला प्रेरणा द्यावी व आपल्याला बदलून टाकावे अशी आपली इच्छा असते. आपण लवकर उठून शास्त्रलेखांच्या पानावरून केवळ डोळे फिरवत नाही, आपण देवाला भेटायला येतो (१ शमुवेल ३:२१). आपण मधाची चव चाखायला, सोने गोळा करायला येतो (स्तोत्र १९:१०). आपण अवर्णनीय आनंदाने आणि गौरवाने भरून जाण्यासाठी येतो (१ पेत्र १:८). याचाच अर्थ आपली भक्ती जर रोजन् रोज सामान्य होत असेल तर हा अनुभव कित्येक वेळा निराशाजनक असू शकतो. विश्वासू बायबल वाचकला माहीत असते की, एकांतसमयाचे वेळ येतात आणि जातात पण कित्येकदा प्रखर आग न पेटवताच. आपण एकटे प्रभूसमोर त्याची मदत मागत असू, मनापासून वाचू आणि जेव्हा तेथून उठू तेव्हा अगदी नेहमी सारखेच -सामान्य वाटते. देवाच्या जिवंत, कार्यकारी, प्रेरित वचनाबरोबर घालवलेला वेळ सामान्य वाटला.

कधीकधी हा सामान्यपणा रेंगाळणाऱ्या आंधळेपणाने गौरवाकडे पाहण्याच्या परिणामाने येतो. मला त्या अम्माउसच्या वाटेवर असणारे शिष्य फार जवळचे वाटतात. येशूने त्यांना म्हटले,  “अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो” (लूक २४:१५)! देवाने आम्हाला निर्बुद्धपणा व मंद ह्रदयापासून राखावे कारण त्यामुळे प्रकटीकरणाच्या प्रकाशापासून आपले डोळे झाकले जातात.

तरीही याचे कारण नेहमी आपल्यामध्येच नसते. जर आपण आपले बायबल बरोबर वाचत असू तर जे एकांतसमय सामान्य वाटतात, आपले अंतर्ज्ञान उजळत नाहीत किंवा थेट लागूकरण मिळत नाही त्यानेही आपला फायदा होतो. जसे आपली बहुतेक जेवणे सामान्य असतात तरी ती आपले पोषण करतात, आपले मित्रांशी होणारे संवाद सामान्य असतात तरी आपले प्रेम वाढवतात, तसे आपले बहुतेक भक्तीसमय सामान्य असतात तरी ते आपल्याला येशू ख्रिस्ताच्या कृपेत व ज्ञानात वाढण्यास मदत करतात.

शास्त्रलेखाने संतृप्त

एक नवा ख्रिस्ती म्हणून कॉलेजमध्ये असताना मी खिशात शास्त्रपठणासाठी कार्डस ठेवत असे. त्यातले पहिले कार्ड होते २ तीम. ३:१६: “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरता उपयोगी आहे.” पौलाच्या या शब्दांवर मी तत्परतेने विश्वास ठेवला. याचा प्रत्यय मला योहान, रोमकरांस पत्र, फिलीपैकरांस पत्र आणि याकोबाचे पत्र या पुस्तकांतून मिळालाच होता. तरीही काही भागांतून असेच उत्तेजन मिळणे मला कठीण वाटत होते. आता विचार करा की जेव्हा पौलाने हे २ तीमथ्य मधले वचन लिहिले तेव्हा त्याच्या मनात खालील शास्त्रभाग सुद्धा होते.

  • शलमोनाची ज्ञानासंबधी नीती २:६ मधील चर्चा (२ तीम. २:७)
  • यशया २८:१६ मधील कोनशीलासबंधी यशयाचे भविष्य (२ तीम. २:१९)
  • गणना १६ मधील कोरहाचे बंड (यहूदा. वचन ११).
  • निर्गम ७-९ मधील मिसरातील जादूगारांचा वृत्तांत (२ तीम. ३:८).

आपल्याला यातून बोध व्हावा म्हणून अगदी थोडके जण यात खोलवर जातील. हे देवाचे प्रेरित, उपयोगी वचन म्हणून संदर्भ देणारे अगदी थोडकेच असतील. आपल्यातले बहुतेक जण त्या पानांतून भरकन नजर टाकून, न बदलता, प्रेरणा न होता पुढच्या पानाकडे जातील – सामान्य.

असे अनुभव टाळून जेथे देवाचा श्वास आपल्याला अधिक सामर्थ्याने जाणवतो अशा भागात आपण अधिक राहू आणि तरीही जर आपला जिवावर फक्त शिडकावा न होता देवाच्या वचनाने आपल्याला ओतप्रोत भरून जायचे असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे की असे जे परिच्छेद अस्पष्ट दिसतात त्यांच्यामध्ये अधिक वेळ घालवून धीराने समजून घेणे. असे परिच्छेद की जे एकदा दोनदा किंवा पाचव्या वेळी वाचूनही सामान्य वाटतात तरी हळूहळू देवाच्या गौरवाची व्याप्ती प्रकट करतात आणि आपल्याला येशूवरील विश्वासाने तारणासाठी ज्ञानी करतात (२ तीम. ३:१५).

दंवाप्रमाणे कृपा

एखाद्या दिवशी मिळालेल्या आशीर्वादाच्या तुलनेत आपल्या रोजच्या एकांत समयाचे मोल करूच शकत नाही. कित्येकदा ताबडतोब उमटलेला ठसा फसवू शकतो. भावना उंचावणारे समय नेहमीच आध्यात्मिक वाढ करत नाहीत तर सामान्य भक्तीसमय अपेक्षेपेक्षा अधिक फळ देतात.

जे.सी राईल यांनी म्हटले, “तुम्हाला रोज आणि रोज चांगले दिसत नाही म्हणून बायबलमधून काही चांगले मिळत नाही असा विचार करू नका. ज्याचा आवाज मोठा आणि जे सहज दिसतात त्यांचा परिणाम महान असे मुळीच नसते. मोठे परिणाम हे बहुदा शांत, निशब्द असतात आणि जेव्हा ते घडतात तेव्हा सहज ओळखू न येणारे असतात. चंद्राचा पृथ्वीवर घडणाऱ्या प्रभावाचा विचार करा. मानवाच्या फुप्पुसावर हवेचा घडणारा परिणाम पाहा. दंव किती निशब्दपणे पडते आणि गवत कसे नकळत वाढते हे आठवा. तुमच्या बायबल वाचनाने तुम्हाला वाटते त्यापेक्षा तुमच्या जिवामध्ये  मोठे कार्य होते.”

देवाची कृपा आपल्यावर कधी विजेसारखी पडते तर कधी दंवासारखी. काही भक्ती समयामध्ये देव आपल्याला खडकाच्या कपारीत ठेवतो व तो जात असताना त्याच्या मागे असणाऱ्या गौरवाची झलक दाखवतो ( निर्गम ३३:१८-२३). इतर वेळा तो आपल्यावर अंधाराचे आच्छादन घालतो की आपण काही पाहू शकत नाही ( यशया ५०:१०). तरीही जर आपण धीराने आणि विश्वासूपणे वाचत राहिलो आपल्या ज्ञानावर भरवसा न ठेवता देवाच्या ज्ञानासाठी विनवणी करतो तर देवाची कृपा जी कदाचित त्या क्षणी दडलेली असेल ती योग्य वेळी शांतपणे कार्य करेल.

म्हणून काही वेळा एकांतसमयी आपण “ मला काय वाटले” याऐवजी असा प्रश्न विचारणे उचित ठरेल की, “आतापर्यंत याचे काय परिणाम झाले आहेत?” माझ्या भावना कशाही असोत मी ख्रिस्ताच्या विविध पैलूंच्या गौरवाची संपत्ती भरून घेण्यास येत आहे का? देवाचे वचन मला अधिक पवित्र असा पती, पत्नी, भाऊ, बहीण, मित्र बनवत आहे का? प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार होण्यामध्ये मी वाढत आहे का ( २ तीम. ३:१७)?

दूध आणि मान्ना

अर्थातच सामान्य एकांतसमय हे आदर्श नाहीत. आम्ही आपल्या बायबलकडे येऊन काही परिणाम न होता परत जाण्याच्या  आशेने किंवा गोंधळून जाण्यासाठी येत नाही. आपण तर नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडाव्या ( स्तोत्र ११९:१८) यासाठी येतो आणि जाताना स्तुतीने भरून जातो. आणि जेव्हा ही आशा पूर्ण होत नाही तेव्हा आपले ह्रदय अस्वस्थ होते. तरीही सामान्य भक्तीसमय हे आपले शत्रूही नाहीत. रानात मिळालेल्या मान्न्याप्रमाणे तेही देवापासून आहेत. ते सुद्धा आपले पोषण करतात व आपल्याला टिकवून ठेवतात – अगदी नकळत रीतीने. देवाने दिलेले हे अन्न जर आपण धीराने व विश्वासूपणे खात राहू तर असे  सामान्य दिवस  आपण ज्या दूध आणि मधाची चव पाहण्यास आसुसलेलो आहोत त्यासाठी मार्ग खुला करतील.

आणि दरम्यान आपण कधी नाही तितके खोलवर जाणून घ्यावे की आपल्याला दिसण्यासाठी तोच दृष्टी देतो म्हणून त्याच्याचकडे आपण धाव घ्यायला हवी. स्तोत्रकर्त्यासोबत गाऊ या की,  “जसे दासांचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिणीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात” (स्तोत्र १२३ :२). देवाच्या योग्य वेळी जर आपण माघार घेतली नाही तर त्याचे शब्द उकलून  तो आपल्याला प्रकाश देईल (स्तोत्र ११९:१३०).

Previous Article

एक प्रसिध्द आणि विसरलेली प्रीती

Next Article

माझ्या पापाचा अनंतकालिक पारितोषिकावर परिणाम होतो का?

You might be interested in …

आपण अधिक चांगल्या देशाची उत्कंठा धरतो

डेविड मॅथीस गेल्या दोन तीन वर्षात टाळेबंदी व सामाजिक अस्थिरता यासोबतच  कित्येक शहरांना नवे अडथळे आणि धोक्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारी यंत्रणा, अधिकारी यांच्याकडे न्यायासाठी ओरड करून या मानवी प्रश्नांना उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला […]

 पंतैनस (इ. स. १५० – २१५)

प्रकरण ३                                     इतर देशांच्या तुलनेत भारताच्या इतिहासात एक उणीव आहे. इतर देशात ध्येयाला वाहून घेऊन प्रसंगी त्या ध्येयासाठी रक्तसाक्षी देखील झालेले पुष्कळ लोक आढळतात. त्यामुळे त्यांची लक्षवेधी जीवन चरित्रे वाचून उत्तेजनपर माहिती मिळवणे सुलभ होते. […]

अठरावे शतक : झिगेन्बाल्ग कालवश

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक  ३                             आता झिगेनबाल्गने स्थानिक पाळक व शिक्षकांना प्रशिक्षण देणारी संस्था सुरू केली. त्यात आठ विद्यार्थी होते. त्याने डॅनिश वसाहतीत दोन ठाण्यांवर एकेक मिशनरी नेमला. गव्हर्नरच्या विनंतीवरून कडलूर व चेन्नईमध्ये अशा […]