जॉन ब्लूम
मी विशीचा असताना स्वर्ग या विषयावरच्या एका वर्गाच्या चर्चेमध्ये बसलो होतो. विषय होता स्वर्ग कसा असेल आणि आपल्याला तिथे का जायला पाहिजे? मला स्पष्ट आठवतंय की एका वर्ग पुढार्याने प्रामाणिकपणे म्हटले, “माझी हवेली आणि मर्सिडीज गाडी मिळवण्यास मी आतुर झालोय!”
मला त्या व्यक्तीची फारशी माहिती नव्हती पण अशा विधानाने स्वर्गाबद्दलची त्याची ओढ मुळीच प्रकट झाली नसावी. पण ह्या विधानाचा माझ्या मनावर लगेचच आणि कायमचा परिणाम झाला. मी माझ्या मनात एका भव्य हवेलीची व बाहेर असलेल्या अलिशान कारची एक पुसटशी प्रतिमा करू लागलो आणि त्यामुळे माझ्या मनात एक भयाण रितेपणा व्यापून राहिला. याचे कारण हवेली आणि कार यांच्याकडे माझे मुळीच लक्ष जात नाही हे नसून एका व्यक्तीच्या स्वर्गाविषयीच्या स्पष्ट आणि अतिशय उत्कट अशा अपेक्षेमध्ये देवाचा उल्लेखही नव्हता.
त्यावेळी हे मी किती स्पष्ट मांडू शकलो असतो याची मला कल्पना नाही पण माझ्या अंतर्मनात मला हे माहीत होते की, जर देव हाच स्वर्गाचा एकमेव आनंद नसेल, जर ख्रिस्ती लोकांचे अनंतकालिक पारितोषिक हे जगातील गोष्टींच्याच प्रगत आवृत्या असतील तर तो स्वर्ग मुळीच नसणार. असा स्वर्ग निदान मला तरी नको होता. अशा कल्पनेला उपदेशकाच्या व्यर्थतेचा सूर होता. मला नंतर खूपच निराश वाटू लागले.
तो वर्ग माझ्यासाठी स्पष्ट करणारा क्षण ठरला. मला दिसू लागले की अनंतकालिक जीवन मोलवान करणारी एकच गोष्ट आहे. जर निर्मित गोष्टी स्वर्गात आनंद देणार असतील तर त्या मला नको होत्या कारण जी एकच गोष्ट सध्या त्या गोष्टी आनंदित करू शकते ती मला हवी होती. मला खोलवर खरीखुरी हवी असलेली गोष्ट, जी स्वर्गाला स्वर्ग बनवू शकते ती मला हवी होती. मला देव हवा होता.
प्रत्येक पानावर स्वर्ग
येथे स्वर्ग म्हणताना मी ख्रिस्ती व्यक्तीची आपल्या या पतित शरीराच्या मृत्यूनंतरची आपली मधली अवस्था (२ करिंथ ५:८) आणि नवी निर्मिती (रोम ८:१८-२१) – ज्या सर्वाची आपण येणाऱ्या युगात अपेक्षा करतो, त्याचा सामान्यपणे उल्लेख करत आहे.
एका प्रकारे स्वर्गाची माहिती बायबल फार कमी प्रमाणात देते. स्वर्गाचे वर्णन बहुधा रूपक, चिन्हे यांद्वारे आपल्याला परिचित नसणाऱ्या प्रतिमांच्या चौकटीत असते व ते आपल्याला कदाचित विचित्र वाटते. पण दुसर्या प्रकारे बायबल स्वर्गासबंधी सर्वत्र बोलत राहते आणि हे आपल्याशी सध्या अनेक प्रकारे संबंधित आहे. बायबल हे प्रत्येक पानामध्ये हवेली व मर्सिडीजबद्दल बोलत नाही तर आपले जीव अधीरतेने ज्या तृप्तीची वाट पाहत आहेत त्यासंबंधी बोलते.
ही इच्छा आपल्या सर्व इच्छांच्या केंद्रस्थांनी आहे. ही तहान जगातील दुसर्या कशानेही भागणार नाही : आपली देवासाठी असलेली उत्कंठा.
आपली न शमणारी इच्छा
सी एस लुईस या इच्छेला आपल्या गाभ्यामधली इच्छा म्हणतात, “प्रत्येक जीवाच्या अंतरंगात एक सांगता न येणारी, शमता न येणारी इच्छा आहे. आपल्या पत्नीला किंवा जिवलग मित्राला भेटण्यापूर्वी, किंवा आपला व्यवसाय निवडण्यापूर्वी ती तिथे होती. आपल्या मृत्यूशैयेवरही ती असणार – जेव्हा आपल्या मनाला पत्नी, मित्र किंवा व्यवसायाची जाणीवही नसेल.”
ही “न शमणारी इच्छा” हा आपला छोट्या मोठ्या प्रमाणात दररोजचा अनुभव असतो. आपल्या दैनंदिन व्यवहारातही तिची उपस्थिती व्यापून असते. तरीही ज्या जगातील प्रत्येक विहिरीतून आपण पितो त्यांतून ही तहान भागली जात नाही. आणि कोणतीही स्वर्गीय हवेली व मर्सिडीज गाडी ही तहान शमवू शकणार नाही.
आपल्याला हजार विविध गोष्टी हव्या आहेत अशी कल्पना आपण करू शकतो, पण आपल्याला खरे ज्याची आस लागली आहे ती म्हणजे देव. त्याच्या सान्निध्याने आपल्याला तृप्ती मिळते, त्याच्या अनुपस्थितीने आपण तहानेले होतो आणि ओढ लागते. ही ओढ असते देवासाठी आणि स्वर्गासाठी.
देव स्वत: “जीवनी पाण्याचा झरा आहे.” त्याच्याशिवाय जे काही हौद आपण खणतो ते फुटके असणार (यिर्मया २:१३). तोच आपल्याला असे पाणी देऊ शकतो की ज्यामुळे आपली खोलवरची तहान भागू शकेल (योहान ४:१४). आपली न भागणारी तहान आपली न शमणारी इच्छा ही देवासाठी असणारी आस आहे (स्तोत्र ६३:१-२). आणि हेच बायबलच्या पानापानांतून प्रकट होते.
स्वर्गांचा स्वर्ग
ही इच्छा आपल्याला स्तोत्रांमधून सर्वत्र दिसते. विशेषकरून जी स्तोत्रे जगिक कुंडांचा फुटका रितेपणा दाखवतात.
“स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे” (स्तोत्र ७३: २५-२६).
जेव्हा ती घोषणा करतात की, “खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे” (स्तोत्र ८४:१०), आणि देव त्यांचा परमानंद आहे (स्तोत्र ४३:४) तेव्हा त्यातून हे आपण ऐकतो.
ही इच्छा आपल्याला मोशे या संदेष्ट्यामध्ये दिसते ज्याने ‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती (इब्री ११:२६). त्याने फक्त एकाच प्रतिफळची अपेक्षा केली – देव (निर्गम ३३:१८). हीच इच्छा आपल्याला प्रेषित पौलातही दिसते. ज्याने ख्रिस्त येशू त्याचा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे सर्वकाही हानी असे समजले; त्याच्यामुळे तो सर्व गोष्टींना मुकला, आणि त्याने त्या केरकचरा अशा लेखल्या; ह्यासाठी की, त्याला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा (फिली. ३:८) . हे एकच बक्षीस त्याच्यासाठी अमोल होते (फिली. ३:१४). आणि ही इच्छा आपण खुद्द येशूच्या तोंडून ऐकतो. “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे” (योहान १७:३). देव आपल्याला फक्त सार्वकालिक जीवनच देत नाही, तो स्वत:च जीवन आहे. सार्वकालिक जीवनाचा एकच उगम आणि अर्क आहे (योहान ११:२५-२६).
या अर्थाने बायबल हे स्वर्गाचेच पुस्तक आहे. कारण तारणाच्या इतिहासाच्या केंद्रभागी, बायबलच्या प्रगटीकरणाच्या शिखराला आपल्याला येशू या जगात का आला याचे एकच कारण समजते. “कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला” (१ पेत्र ३:१८). आणि आपल्याला तो खुद्द देव देत असतानाच स्वर्गही देऊ करतो. त्र्येक देव हा स्वत:च्या पूर्णत्वात स्वत: आपले जीवन आहे, आपला अंतिम लाभ, आपले महान पारितोषिक, आपला अनिर्वाच्च आनंद, आपले सार्वकालासाठी वतन, आणि आपले अनंतकालिक घर आहे. तोच आपला स्वर्गांचा स्वर्ग आहे.
वस्तू, सूर्य, महासागर
जोनाथन एडवर्डस यांनी शास्त्रलेखातून जसा स्वर्ग पाहिला तसा फार कमी लोकांनी पाहिला असेल:
“देवाच आनंद घेणे हे एकमेव सुख आपल्या जीवाला तृप्ती देऊ शकते. देवाचा परिपूर्ण आनंद घेण्यासाठी स्वर्गाला जाणे हे इथल्या कोणत्याही प्रकारच्या वास्तव्यापेक्षा अत्यंत पटीने सुखदायी आहे. आई, वडील, पती, पत्नी, मुले, किंवा जगिक मित्रांचा सहवास ह्या फक्त सावल्या आहेत. पण देव हाच अस्सल वस्तू आहे. ही विखुरलेली किरणे आहेत पण देव सूर्य आहे. हे केवळ झरे आहेत पण देव हा महासागर आहे.”
ह्यामुळे सावल्या, विखुरलेली किरणे या जगातील झरे यांची किंमत कमी होत नाही. “कारण प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे” (याकोब १:१७). तथापि ही देणगीच इतर देणग्यांना प्रथम अमोल किंमत देते. जेव्हा ती वस्तू, सूर्य, महासागर यांपासून वेगळे होते तेव्हा मात्र त्यांची किंमत कमी होते.
आणि येणाऱ्या युगात आपण प्रत्येक चांगली आणि परिपूर्ण देणगी मिळवू. मग ते काहीही असो, ते या जीवनात जे मिळाले व ज्याचा अनुभव घेतला त्यापेक्षा अतिशय चांगले असेल (१ करिंथ २:९). पण तरीही त्यांची जो आनंदाचा आनंद, प्रेमांचे प्रेम, प्रकाशांचा प्रकाश, स्वर्गाचा स्वर्ग त्याच्याशी कधीही तुलना होणे शक्य नाही. कारण जेथून सर्व सौंदर्य येते तो देव हाच सर्वस्वी तृप्ती करणारा असेल.
Social