जनवरी 21, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

बार्थोलोम्यू झिगेन्बाल्ग – अठरावे शतक

 संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक १                 

प्रास्ताविक
रोमन कॅथॅालिक मंडळी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहंचली होती. अनेक मिशनरी पाठवून परिश्रम करत होती. पण चुकीच्या सुवार्तापद्धती वापरत होती. आणि प्रॅाटेस्टंट मंडळीनं तर अजून सुवार्ताप्रसारासाठी मिशनकार्य सुरू करण्याचा विचारही केला नव्हता ही खेदाची गोष्ट आहे. मूळ प्रारंभिक मंडळीनं जे प्रेषितांचं निर्भेळ शिक्षण स्वीकारलं होतं तेच प्रॅाटेस्टंट मंडळीनं स्वीकारलं होतं; पण तिचा मिशनकार्याचा कित्ता मात्र ती गिरवत नव्हती. त्यांच्या या तटस्थ भूमिकेची कारणंही स्पष्ट दिसतात. “ तारण सत्कर्मांनी नव्हे तर कृपेनेच विश्वासाच्या द्वारे होतं” ह्या मूळ शिक्षणाविषयीच्या मार्टिन ल्यूथरच्या चळवळीचा पुरस्कार करून त्या शिकवणीचा आग्रह धरत प्रॅाटेस्टंट लोक रोमन कॅथॅालिकांपासून वेगळे झाले. त्यामुळे आपला मतांगिकार, मूलभूत सिद्धांत, उपासनापद्धती याविषयीची सुसूत्र आखणी, मांडणी करण्याचे व्यवस्थापकीय काम करण्यात प्रॅाटेस्टंट मंडळी व्यस्त होती. ही गोष्ट अत्यावश्यक, तातडीची, महत्त्वाची व जिकीरीची असल्याने त्यांना जगभर मिशनरी पाठवण्याचा विचारही करण्याच्या कामी फुरसतच मिळाली नाही व मनुष्यबळही लाभले नाही. समुद्रप्रवासाबाबतही ते मागास होते. त्यामुळे ख्रिस्तीतर राष्ट्रांशी त्यांचा संबंधही येत नव्हता. त्यामुळं मिशन कार्याची त्यांना प्रेरणाही झाली नाही.
दुसरे कारण म्हणजे जगाचा अंतकाळ जवळ आल्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाल्याची त्यांची धारणा झाल्याने हे तातडीचे काम त्यांच्या हातून निसटले. मत्तय २८:१९-२० मधील ख्रिस्ताच्या महाआज्ञेचे पालन करण्याची त्यांना जाणीवही झाली नाही. १६ वे शतक संपून १८ वे शतक उजाडेपर्यंत परिस्थिती अशीच राहिली. पण त्या काळात त्यांच्या स्वत:च्या देशात मोठे संजीवन होऊन प्रॅाटेस्टंट ख्रिस्ती धर्मविश्वासाने घट्ट मूळ धरले. १८ व्या शतकात जेव्हा सुवार्ताप्रसार कार्याने जोर धरला तेव्हा १९ व्या शतकापर्यंत तर या कार्याला मंडळीतील सर्वसामान्य लोकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. या विलंबाची भरपाई करणारा पहिला मिशनरी म्हणजे बार्थालोमू झिगेन्बाल्ग !

पहिला प्रॅाटेस्टंट मिशनरी बार्थालोमू झिगेन्बाल्ग – ( १६८३ ते १७१९)
त्याचा इतिहास असा – १७ व्या शतकात पोर्तुगाल व स्पेनच्या भारतातील व्यापाराला उतरती कळा लागली. त्याचा फायदा प्रॅाटेस्टंटांना झाला. डच, इंग्लिश, फ्रेंच व डॅनिश लोकांनी आपापली ईस्ट इंडिया कंपनी स्थापून भारतात यशस्वी व्यापार करून खोऱ्याने पैसा कमावला. पण या ऐहिक संपत्तीपेक्षाही या देशाबाबत आपले काही धार्मिक,
आध्यात्मिक कर्तव्यही आहे असा त्यांनी विचारही केला नाही. सुमारे १०० वर्षे लागलेला हा कलंक पुसून टाकण्याचे श्रेय जाते ते सर्वात लहान असलेल्या डेन्मार्कला. कारोमांडेलच्या किनाऱ्यावरील त्रिंकोबार येथील डॅनिश वसाहतीत प्रॅाटेस्टंट मिशनचा प्रारंभ झाला. त्यात देवाचा हात कसा कार्यरत होता हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
१७०५ च्या मार्च महिन्यात एका संध्याकाळी डेन्मार्कचा राजा टपाल चाळत असता त्रिंकोबारच्या वसाहतीतील एका शिपायाच्या गरीब विधवेचे पेन्शनची मागणी करणारे पत्र त्याच्या वाचण्यात आले. तिच्या गावातील लोकांशी झालेल्या चकमकीत त्या ख्रिस्तीतरांनी अमानुषपणे तिच्या पतीची व मुलाची हत्या केली होती. ती कहाणी वाचून
त्या राजाचे मन द्रवले. त्याच्या मनात विचार आला, “या ख्रिस्तीतरांच्या आत्मिक गरजांसाठी व स्थितीसाठी आपण काय करीत आहोत? भारतातून आपण एवढी संपत्ती मिळवतो, पण शुभवर्तमानाची संपत्ती त्यांना द्यायला आपण काहीच करत नाही. त्यामुळे या व्यक्तिंची निष्ठुर मने बदलण्याचे काम आपण करू शकत नाही.” मग डॅा. लुटकेन
नावाच्या वृद्ध पाळकाला बोलवून त्याने हा सर्व वृत्तांत त्याला सांगितला आणि विचारले, “भारतातील मिशन कार्यासाठी लायक व्यक्ती मला कुठं सापडेल?”  तो पाळक स्वत:च तयार झाला. पण त्याच्या वयाकडे पाहून राजाने त्याला नकार दिला. मग त्या पाळकाने योग्य व्यक्ती शोधायला सुरुवात केली. तेव्हा मृतवत् जर्मनीत मूलवादी ख्रिस्ती सिद्धांतांचा पुरस्कार करणाऱ्या प्रॅाटेस्टंट लोकांमुळे मोठी जागृती होत होती. हॅले हे तेथील आंदोलनाचे केंद्र होते. बर्लिन येथील आपल्या मित्राच्या शिफारसीनं डॅा. लुटकेनला बार्थालोमु झिगेन्बाल्ग व त्याचा सहकारी हेन्टिक प्लुटशॅा हे दोन जर्मन पाळक मिळाले. या कामी झिगेन्बाल्गला पाचारण झाले तेव्हा तो २२ वर्षांचा होता.
तो २४ जून १६८३ ला जन्मला होता. त्याचे मायबाप मरण पावल्याने तो लवकरच अनाथ झाला. त्याची प्रकृतीही नाजुकच होती. त्याने बर्लिन व हॅले येथे झटून अभ्यास केला. तो कष्टाळू व धाडसी होता. हॅलेमध्ये धर्मनिष्ठेसाठी चालू असलेल्या कडक आंदोलनाचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता. जरा कचरतच तो पाळक झाला होता.
मिशनरी होण्याचा तर विचारही त्याच्या मनाला शिवला नव्हता. विद्यापिठातील प्रोफेसर एकदा म्हणाले होते की, “युरोपात १०० लोकांना देवाच्या चरणी आणणे एका विधर्म्याला देवाच्या राज्यात आणण्यासारखे आहे. कारण युरोपप्रमाणे भरपूर संधी व अनुकुलता इतर देशांमध्ये नाही.” प्रथम त्याला आफ्रिकेत मिशनरी म्हणून जाण्यास विचारणा झाली तेव्हा तो कचरला. पण जेव्हा त्याचे मित्र जायला तयार झाले, तेव्हा ते ऐकून तोही तयार
झाला. या सर्व प्रकरणी देवाचा हात असल्याची त्याची खात्री पटली होती. पण त्यांना कोपनहेगनला गेल्यावर कळलं की त्यांना भारतात त्रिंकोबारला मिशन सेवेसाठी जायचं आहे. ते दोघे मिळून २९ नोव्हेंबर १७०५ रोजी भारतात यायला निघाले. त्यांना राजाकडून पगार मिळणार होता. हॅलेतील गुरू व राजाच्या प्रार्थनाही त्यांच्या पाठीशी होत्या.
तंजावरमध्ये पाच बाय तीन मैलांच्या परिसरात डॅनिश वसाहत होती. तेथे सरकारी पाळक आठवड्यातून एकदा भक्ती घ्यायचा. पण ९० वर्षे तेथे राहूनही सुवार्ताकार्याचा विचारही त्यांना कोणाला शिवला नव्हता. दोन मिशनरी येणार ही कल्पनाही त्यांना रुचली नव्हती. डेन्मार्कच्या राजाला ते थेट विरोध करू शकत नसल्याने राजाचा उदात्त हेतू असफल
करण्याच्या कारवाया ते करू लागले. गुप्तपणे काही लोकांना हाताशी धरून गव्हर्नर हॅस्युअसने जोरदार विरोध करण्याची तयारी केली. सैतान हा देवाचा, देवाच्या योजनेचा, त्याच्या लोकांचा शत्रू आहे. तो सतत अडथळे आणत आला आहे. त्यावर देवाने कशी मात केली ते पाहू.
सात महिन्यांच्या दगदगीच्या दीर्घ प्रवासानंतर झिगेन्बाल्ग व त्याचा सोबती प्लुटशॅा या मिशनरींच्या जहाजाने ६ जुलै १७०६ रोजी त्रिंकोबारच्या किनाऱ्यावर नांगर टाकला. पण डॅनिश गव्हर्नरच्या कारस्थानामुळे त्यांना घेऊन जायला होडीच आली नाही. आपल्या देशबांधवांकडूनच त्यांना मोठा अडथळा होत होता. अखेर दुसऱ्या जहाजाच्या कप्तानाला दया येऊन त्याने होडीची व्यवस्था केली. सकाळी इच्छित स्थळी आल्यावर “गव्हर्नर साहेबांना वेळ नाही” असा निरोप देऊन दुपारपर्यंत शिपायाने फाटकापाशीच त्यांना थोपवून धरले. दुपारी गव्हर्नर येताच तिरसटपणे त्यांना म्हणाला, “तुम्ही येथे आलाच कशाला? कटकटच आहे तुमची. तुम्हाला कोणी अधिकार दिला? मिशनऱ्यांचं इथं काय काम? राजाला इथल्या परिस्थितीची काय कल्पना?” असे म्हणत आपल्या लव्याजम्यासकट तो किल्ल्याकडे निघाला. अशा स्वागतानं ते दोघे अवाक् झाले. तरी आपली राहायची जागा कुठं केली हे कोणीतरी सांगेल या आशेने ते दोघे त्यांच्यामागे लाचारपणे चालत राहिले. चौकात येताच सारे जण चार दिशांनी क्षणार्धात पसारही झाले. दिवस मावळून अंधार पडेपर्यंत त्यांना तिथेच थांबावे लागले. त्यानंतर त्यांची सोय झाली.
“मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायलाही जागा नाही” या वचनाने त्यांचे समाधान झाले. यानंतरही अशा निर्दयपणाचा अनुभव अनेक मिशनऱ्यांना आला. आपल्याच लोकांनी आपल्याच मिशनरींना केलेला विरोध हा प्रॅाटेस्टंट इतिहासाला कलंक आहे.. एकाही रोमन कॅथॅालिक मिशनरीला असा अनुभव आला नाही.
झिगेन्बाल्ग म्हणतो, “नामधारी ख्रिस्ती लोकांचे अशोभनीय वर्तन नेहमीच ख्रिस्ताच्या कार्याला खीळ घालते. आपल्या तोंडाने आपण धर्माचे कितीही गोडवे गाईले पण आपल्यामध्ये व्यसने, दारूबाजी, निष्ठुरपणा, खादाडपणा, शिवीगाळी, अपशब्द, फसवाफसवी व कपटकारस्थाने स्थानिकांना आढळली तर त्यांच्या त्या श्रेष्ठ मौखिक विचारांचा काही परिणाम होत नाही.”
या दोन मिशनऱ्यांना नव्याने काम सुरू करणे खूप अवघड होतं. कोऱ्या पाटीवर लिहावे त्याप्रमाणे त्यांना सुवार्ताकार्याचा नवा मार्ग शोधून सर्व अडचणींवर मात करायची होती आणि ख्रिस्त सादर करायचा होता. ही कामगिरी पार पाडत असता त्यांच्या ठायी सुज्ञता, कर्तबगारी, दमदारपणा, आवेश, निष्ठा यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. झिगेनबाल्ग ध्येयापासून न ढळता अडचणींवर मात करण्याचा मार्ग ठरवत असे.
वसाहतीत डॅनिश लोक होते. हे दोघे तर जर्मन होते. त्यांना भारतीयांमध्ये काम करायचे असल्याने डॅनिश भाषा शिकण्याचे काही कारणच नव्हते. त्यांच्या वसाहतीत पोर्तुगीज व भारतीय अशा मिश्र विवाहातून जन्मलेली प्रजा असल्याने ते तामिळ व पोर्तुगीज भाषिक लोक होते. म्हणून याच दोन भाषा शिकण्याचे त्यांनी ठरवले. पण या भाषा
शिकवणाऱ्या शिक्षकांना जर्मन भाषा येत नव्हती. म्हणून हे दोघे त्यांच्या बालवाडीत जाऊन त्या लहान मुलांबरोबर मुळाक्षरे पाठ करून गिरवू लागले. आठ महिन्यात ते स्थानिक लोकांशी बोलू लागले. त्यांचे बोलणे त्यांना समजू लागले. बारा महिन्यात ते अस्खलित बोलून उपदेश व वादविवाद करू लागले. तामीळ ग्रंथ वाचू लागले. फार
मेहनत घेऊन ते स्वत:चे स्वत:च शिक्षक बनले. स्थानिक भाषा शिकल्याशिवाय लोकांमध्ये काम करणे अवघड होते.
आपल्या वसाहतीतील खाजगी खोलीत काही जर्मन कामगारांसाठी ते उपासना घेऊ लागले. बरेच लोक त्यात सामील होऊ लागले. हळू हळू गव्हर्नरचा विरोध थोडाफार कमी होऊ लागला. त्याच्या परवानगीनेच ते सरकारी पाळकाच्या वेळेव्यतिरिक्त इतर लोकांच्या सोयीसाठी मंदिरात उपासना घेऊ लागले. मग त्यांनी वसाहतीतील मिश्र प्रजेकडे लक्ष वळवले. वर्ण व भाषा भिन्नतेमुळे स्थानिक लोक त्यांच्याशी संबंध ठेऊ शकत नव्हते. ह्यांचे मायबाप प्रॅाटेस्टंट असले तरी ते त्यांना रोमन समजत असत. झिगेन्बाल्गने लवकरच त्यांच्यासाठी पोर्तुगीज माध्यमाची शाळा काढली. तेथे त्यांना धार्मिक शिक्षणही दिले जात असे. आणखी एका प्रकारच्या लोकांमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली. पोटापाण्यासाठी वसाहतीत काही ख्रिस्तीतर चाकर कामाला येत असत. झिगेन्बाल्गच्या विनंतीवरून त्या चाकरांचे मालक त्यांना रोज दोन तास धार्मिक शिक्षणासाठी त्याच्याकडे पाठवू लागले. त्या दोघांचे भाषाज्ञान जसे वाढत
गेले तसे ते त्यांना अधिक उत्तम शिकवू लागले. आणखी एक कार्याची भर म्हणजे त्यांनी प्रॅाटेस्टंट मिशनचे पहिले वसतीगृह सुरू केले. पुढे अशी हजारो वसतीगृहे भारतात सुरू झाली. पण या संकल्पनेचा पायिक झिगेन्बाल्ग होता. आपल्या वेतनातून तो त्यांचे राहणे, खाणेपिणे व शिक्षणखर्च भागवीत असे. लहानपणीच मुलांना ख्रिस्ताकडे आणण्याचे हे काम त्याला फार महत्त्वाचे वाटले. पुढे मिशनरींनी वसतीगृह हेच आपल्या कामाचे एक ध्येय ठेवले.  “भारतीय मुलांचे शिक्षण” हे त्यांचे आवडते काम होते. ‘या वयात देवाला भिऊन वागण्याची वृत्ती मुलांमध्ये जागृत करता येते. हीच रोपे पुढे मंडळीचे आधारस्तंभ बनतात’ हा त्यांचा विश्वास होता. भारतात येऊन चार महिने होताच एकीकडे भाषा शिकत असता दुसरीकडे त्यांनी मिशनकार्य चालू ठेवले होते. प्रथम त्यांनी ख्रिस्ती धर्मविश्वासाची प्रश्नोत्तरावली शिकवायला घेतली. मे १७०७ मध्ये म्हणजे १० महिन्यांनी पाच चाकरांचे बाप्तिस्मे झाले. बाप्तिस्म्याची घाई न करता ६ महिने त्यांना रोज दोन तास शिकवल्यानंतरच त्यांचे बाप्तिस्मे केले. त्यामुळे ते विश्वासात दृढ झाले. या कार्यामुळे लोकांमध्ये ख्रिस्ती धर्माविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यांच्या प्रशस्त घरातील उपासनेत लोकांची गर्दी वाढू लागली. म्हणून झिगेन्बाल्गने मंदिर बांधण्याचे काम हाती घेतले. १४ जून १७०७ मध्ये मंदिराचा पायाभरणी समारंभ झाला. अधिकारी वर्गाने त्यांचा खूप उपहास केला. पण दोन महिन्यात मंदिर पूर्ण झाले व प्रॅाटेस्टंट मिशनचा पाया पक्का रोवला गेला. सर्व भारतीयांना पुढे अशा उपासनेत सामील केले जाईल असा संकेत देणारा त्यांच्या दृष्टीने हा सुवर्णदिन होता.

( पुढे चालू)









Previous Article

माझी चोरी माझ्या आत्म्याबद्दल काय सांगते?

Next Article

आत्म्याचे फळ – सौम्यता

You might be interested in …

इतरांचे भले चिंता

ग्रेग मोर्स माझ्या पत्नीवर त्या पापाचा परिणाम पाहीपर्यंत मला ते दिसतही नव्हते. इतकी उत्साही, बालसदृश, तडफदार, असणारी ती आता सहजतेने विनोद करेना, तिचे हास्य मावळले. ती शांत झाली, तिच्यातला जोम कमी झाला, ती पूर्वीची राहिली […]