जॉन पायपर
सत्य काय आहे ? आज कोणालाही हे विचारा आणि एका वादग्रस्त संवादाला तुम्ही सुरुवात कराल. कॉलेजच्या आवारात तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला उपहास, हेटाळणी आणि हशाला तोंड द्यावे लागेल. सत्य ह्या कल्पनेसाठी हा कठीण काळ आहे. धिक्क्कारल्याचे परिणाम मानवी समाजाला ग्रासून टाकत आहेत. राजकीय व सांस्कृतिक बाबीत सत्य लागू करणे यासाठीच आपण झगडत नसून सत्य अस्तित्वात आहे हे मानणे हाच प्रमुख झगडा आहे.
काही जण विचारतील सत्य काय एवढे महत्त्वाचे आहे? कोणालाच लबाडी ऐकायला नको असते आणि ज्या उत्तराचे परिणाम सर्व जगावर घडतील अशा प्रश्नाला खोटा प्रतिसाद नको आहे. तरीही सत्य ऐवजी ‘माझे सत्य’ आणि ‘तुझे सत्य’ हे सामान्यपणे मानले गेलेले शब्द आहेत. पण जेव्हा माझ्या सत्याचा तुझ्या सत्याशी संघर्ष होतो तेव्हा काय?
म्हणून आरंभाच्या बिंदूकडे जाऊ या आणि या प्रश्नाचे उत्तर देऊ या की: सत्य काय आहे?
बायबलमधला एक सर्वात गहन आणि अनंतकाळासाठी महत्त्वाचा प्रश्न एका अविश्वासी व्यक्तीने केला आहे. येशूला वधस्तंभी देण्यास स्वाधीन केले त्या पिलाताने. खटल्याच्या शेवटच्या तासाला त्याने येशूकडे वळून विचारले “सत्य काय आहे?” येशूने नुकतेच प्रकट केले होते की “मी ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” त्याला उपहासाचे प्रत्युत्तर म्हणून हा एक अर्थभरित प्रश्न त्याने केला.
दोन हजार वर्षांनंतर सुद्धा सर्व जग पिलाताच्या उपहासाचीच री ओढते. काही म्हणतात सत्य हा सामर्थ्याचा खेळ आहे. अज्ञानी जनतेचे नियंत्रण करण्यासाठी उच्चभ्रू समाजाने रचलेली ही एक महाकथा आहे. काही लोकांसाठी सत्य हे व्यक्तिनिष्ठ निवड आणि मत आहे. इतर काहींसाठी तो सुसंस्कृत मतांचा एक एकत्रित निवडा आहे. आणि तरीही इतर काही जण सत्याच्या कल्पनेलाच मानत नाहीत.
तर सत्य आहे तरी काय? बायबलच्या शिकवणीतून त्याची साधी व्याख्या अशी करता येईल: देवाचे अस्तित्व, गौरव, स्वभाव, इच्छा व मन याच्याशी जे सुसंगत आहे ते म्हणजे सत्य. आणखी एकाच मुद्यात: सत्य हे देवाचे स्वत:चे प्रकटीकरण आहे. हे सत्याचे बायबलनुसार स्पष्टीकरण आहे. कारण सत्याची व्याख्या देवाकडून येते. सत्य हे ईश्वरविज्ञान आहे.
सत्य हे सत्त्वशास्त्र (ontology) सुद्धा आहे – वस्तू जशा आहेत त्यासंबंधी. वास्तव हे आहे की याचे कारण देवाने तशी घोषणा केली आणि तसे केले. यामुळे देव हा सर्व सत्याचा जनक, उगम, निर्णय करणारा, नियंता, अंतिम प्रमाण आणि अखेरचा न्यायाधीश आहे.
जुन्या करारात सर्वसमर्थाला “सत्याचा देव” असे म्हटले आहे (अनुवाद ३२:४, स्तोत्र ३१:५; यशया ६५:१६). जेव्हा येशूने म्हटले “सत्य …मीच आहे” (योहान १४:६) तेव्हा तो आपण देव असल्याचा एक गहन दावा करत होता. तो हे सुद्धा स्पष्ट करत होता की, अखेरीस सर्व सत्याची देव आणि त्याचे गौरव यांच्या संदर्भातच व्याख्या करायला हवी. येशूने असेही म्हटले की देवाचे लिखित वचन हे सत्य आहे. त्यामध्ये सत्याचे केवळ काही मोती उधळले नाहीत; ते शुद्ध, न बदलणारे, अजिंक्य आहे आणि “शास्त्रलेखाचा भंग होत नाही” (योहान १०:३५). अर्थातच देवाचे लिखित वचन आणि देवाच देहधारी शब्द (येशू) यात कधीच मतभेद किंवा फरक असणे शक्यच नाही. कारण मुळात सत्य हे स्वत:शी कधीच विरोध करणार नाही. तसेच शास्त्रलेखांना ‘ख्रिस्ताचे वचन’ असे म्हटले आहे (कलसै ३:१६). तो त्याचा संदेश आहे. त्याचे स्वत:चे प्रकटीकरण आहे. दुसर्या शब्दात ख्रिस्ताचे सत्य आणि बायबलचे सत्य यांचा गुणविशेष एकच आहे.
शास्त्रलेख असेही म्हणतात की देव त्याचे मूलभूत सत्य निसर्गातून प्रकट करतो. “आकाश देवाचा महिमा वर्णिते” (स्तोत्र १९:१). “त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत” (रोम १:२०). त्याच्याविषयीचे ज्ञान मानवी ह्रदयात उपजतच असते (रोम १:१९). आणि त्याच्या नियमांची नैतिकता आणि उच्चता प्रत्येक मानवाच्या विवेकात असतेच (रोम २:५).
ही सत्ये संपूर्ण विश्वात स्वयंसिद्ध आहेत. रोम १:२० नुसार आपल्याला अंत:करणात माहीत असलेल्या ह्या गोष्टींच्या नकाराचा परिणाम नेहमीच जाणूनबुजून व दोषपात्र अशा अविश्वासात होतो. देवाच्या मूलभूत गोष्टी आणि त्याच्या नैतिक प्रमाणाचा शिक्का मानवी ह्रदयावर आहे की नाही असा ज्यांना संशय वाटतो त्यांना याची सिद्धता इतिहासातून, मानवी कायदेकानू आणि धर्म यातून दिसेलच.
तरीही निसर्गात आपल्याला जे दिसते किंवा आपल्या विवेकात जे आहे त्याचा अचूक अर्थ आपल्याला बायबलच्या प्रकटीकरणातूनच दिसतो. बायबल जे आपल्याला उद्धाराचा मार्ग देते आणि ख्रिस्ताचा अचूक वृत्तांत देते हाच कसोटीचा दगड आहे. त्याच्याकडेच सत्याचे सर्व दावे आणले गेले पाहिजेत आणि त्याच्याद्वारेच इतर सर्व सत्ये मोजली गेली पाहिजेत.
माझ्या म्हणण्याचा आशय हाच आहे की सत्य हे देवाशिवाय नाहीच. सत्याचे पुरेसे स्पष्टीकरण, ओळख, ज्ञान किंवा व्याख्या देव ह्या त्याच्या उगमाशिवाय होऊच शकत नाही. कारण तो एकच अनंतकालिक आहे, स्वयंभू आहे, तो एकटाच सर्वांचा निर्माणकर्ता आहे, तोच सत्याचा झरा आहे.
जर तुमचा असा विश्वास नसेल तर देवाचा संदर्भ न घेता सत्याची व्याख्या करायला सुरवात करा आणि त्या व्याख्या कशा कोसळतात ते पाहा. ज्या क्षणाला तुम्ही सत्याच्या मूलतत्त्वावर विचार करू लागता तेव्हा तुम्हाला विश्वाच्या परमत्वापुढे समोरासमोर आणले जाते – देवाची अनंतकालीन वास्तवता. याउलट लोक जेव्हा त्यांच्या मनातून देवाचा विचार दूर करतात त्या क्षणी सत्याची कल्पनाच अर्थहीन होते
मानवाच्या कल्पनेचा कसा ऱ्हास होत गेला ते अगदी हेच प्रेषित पौलाने रोम. १:२१-२२ मध्ये दाखवले आहे. “देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचा गौरव केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले.”
याचे गंभीर असे नैतिक परिणामही झाले आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती देवाच्या ज्ञानापासून सत्य बाजूला सारते त्यासंबंधी पौल लिहितो, “आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले” (रोम १:२८).
जर तुम्ही गंभीरपणे विचार करू लागलात तर तुमच्या लक्षात येईल की अगदी मूलभूत नैतिक फरक – चांगले आणि वाईट, चूक आणि बरोबर, सौंदर्य आणि कुरूपता किंवा मान आणि अपमान – यांना देवाशिवाय खरा आणि स्थिर अर्थ मिळूच शकत नाही. याचे कारण सत्य आणि ज्ञान यांना स्थिर उगम जो देव त्याच्याशिवाय महत्त्वच नाही.
सॉक्रेटीस, प्लेटो, अरीस्टॉटल, कांट, हेगेल इ. अनेक तत्ववेत्ते देवाशिवाय सत्याचा आणि मानवाचा उगम प्रतिपादन करण्यात अपयशी ठरले आहेत. खरंतर मानवजातीने तत्त्वज्ञानाकडून सर्वात महत्त्वाचा धडा शिकायला हवा होता तो म्हणजे आवश्यक आरंभबिंदू देव याला मानल्याशिवाय सत्य स्पष्ट करणे अशक्य आहे.
सत्य हे व्यक्तिनिष्ठ नाही. सत्य हे देवाने स्वत:चे केलेले प्रगटीकरण आहे. म्हणून ते ईश्वरज्ञानविषयक आहे. देवाने निर्माण केलेले आणि व्याख्या केलेले ते सत्य आहे आणि तो त्याच्यावर राज्य करतो. यामुळे प्रत्येक मानवासाठी ही नैतिक बाब आहे.
देवाने प्रकट केलेल्या या बाबीला प्रत्येक व्यक्ती कसा प्रतिसाद देते हे अनंतकाळासाठी महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्ती देवाचे सत्य कसे समजून घेते यावर तिचा/त्याचा राजकीय, सांस्कृतिक दृष्टिकोन आकार घेईल. हे ‘तुझे सत्य’ अथवा ‘माझे सत्य’ नसून ते देवाने दिलेले वास्तविक, स्वयंसिद्ध सत्य आहे. देवाने दिलेल्या या सत्याविरुद्ध बंड करणे आणि ते नाकारणे याचा परिणाम अंधार, मूर्खपणा, पाप, न्याय, आणि देवाचा कधीही न संपणारा क्रोध यामध्ये होईल. या सत्याचा स्वीकार करून त्याच्या अधीन होणे म्हणजे स्पष्टपणे पाहणे, निश्चितपणे समजणे आणि अनंतकालिक जीवन मिळणे होय.
Social