दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुमच्या सर्वस्वाने स्वर्गाकडे नेम धरा

मार्शल सीगल

 जर स्वर्गात संपत्ती कशी साठवावी हे जर तुम्ही शिकला नसाल तर अर्थातच तुम्ही जगात संपत्ती साठवण्यात जीवन घालवाल – आणि एक अपार अक्षय आणि समाधानकारक गोष्ट गमवाल.

जेव्हा “स्वर्गात संपत्ती साठवा” हे आपण ऐकतो तेव्हा ते “अमुक अमुक योजनेत आपले पैसे टाकण्याचे विसरू नका”  “अल्पकाळसाठी  फायदे आणि खरेदी करण्यापेक्षा दीर्घकाळच्या आर्थिक योजनांना प्राधान्य द्या” यासारखे वाटेल. परंतु येशू हा काही विमा योजना किंवा निवृत्तीनंतरसाठीच्या योजना विकत नाहीये. स्वर्गात गुंतवणूक करणे म्हणजे सध्याचे सुख सोडून देणे नव्हे. याचा अर्थ आपल्या सुखाची जागा बदलणे आणि ते खोल रुजवणे – आतासाठी आणि अनंतकालासाठी.

या प्रक्रियेत जेव्हा जेव्हा आपण जगिक त्याग करतो तेव्हा येशू म्हणतो, “मी तुम्हांला खचीत सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता व सुवार्तेकरता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणार्‍या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही” (मार्क १०:२९-३०).

जगातील कोणत्याही अनुभवाची किंमत देऊन जेव्हा आपण स्वर्गात गुंतवणूक करतो तेव्हा इथे त्याचे भरपूर प्रमाणात प्रतिफळ मिळेलच – आणि येणाऱ्या काळातही. ह्यावेळी शंभरपट. जेव्हा तुम्ही तुमचे काही देऊन टाकता तेव्हा देव हे करील असा तुमचा विश्वास आहे का?

येशूने असेही म्हटले, “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे” (प्रेषित २०:३५). जेव्हा आपण स्वर्गात संपत्ती साठवतो तेव्हा आपण भविष्यासाठी तरतूद करत नसून, आपण आतासाठी आणि भविष्यासाठी आशीर्वाद धरून ठेवतो.
आजच्या उपभोक्त्यांच्या समाजात  निरनिराळ्या मथळ्यांमध्ये वारंवार वाचतो की- जे  स्वत:साठी विकत घेतात व पैसे वापरतात ते या जगातले अत्यंत सुखी लोक आहेत. इतरांच्या भल्यासाठी त्याग करून सुखाचा पाठपुरावा करण्याने विकणाऱ्या, खरेदी करणाऱ्या, साठवणाऱ्यांच्या या जगात आपण परके बनवले जातो. कारण यामुळे तुम्ही जे जगात आहे ते कवटाळून धरणाऱ्या लोकांच्या विरोधात जाल.

तुम्हाला काय दिले गेले आहे?

येथे आणि शास्त्रलेखात इतरत्र आपली संपत्ती म्हणजे आपल्याला देवाने जे दिले आहे त्याचा उपयोग करून जे काही आपण कमावतो आणि जमवतो ते सर्व. आपला पैसा, वेळ आणि शक्ती काय मिळवण्यात आपण वापरतो?

पहिले म्हणजे देवाने तुम्हाला काय दिले आहे? जे काही तुम्हाला आहे ते सर्व. “जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस” (१ करिंथ ४:७)? देवाने आपल्याला दिलेल्या देणग्या अगदी सहज आपण गृहीत धरतो आणि शेवटी त्याचे सर्व श्रेय स्वत:ला घ्यायला लागतो. विश्वासू कारभारीपण हे आपल्याला जे काही आहे ते सर्व दिले गेले आहे या खात्रीनेच सुरू होते (याकोब १:१७). आणि जे काही आपल्याला दिले आहे ते जे काही करता “ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा” (१ करिंथ १०:३१).

तर पुन्हा हा प्रश्न विचारू या की, देवाने तुम्हाला काय दिले आहे?  “जीवन, प्राण व सर्वकाही तो स्वतः सर्वांना देतो” (प्रेषित १७:२५). प्रथम त्याने तुम्हाला जीवन दिले आहे. ही एक चित्तथरारक आणि अमोल अशी देणगी आहे जिला अपार क्षमता आहेत. देवाने तुम्हाला जीवन व श्वास दिला आहे. तुमच्या पगाराची प्रत्येक नोट, तुमच्या कपाटातली प्रत्येक वस्तू, तुमच्या घराचा प्रत्येक इंच, तुमच्या गुंतवणुकीचा प्रत्येक पैसा.  एके दिवशी आपण प्रत्येक जण आपल्याला जे काही होते ते आपण कसे खर्च केले व  वापरले याचा हिशेब देणार आहोत. आणि आपल्यातील बहुतेकांना ‘खूप’ दिले गेले आहे. या ‘खूप’ ने आपण काय विकत घेतले? हे ‘खूप’ आपण कशाला मोल दिले आणि काय विकत घेतले याबद्दल काय सांगेल? आपण या जगात स्वर्गासाठी जगलो असे आपले ‘खूप’ सांगेल की आपल्याला या जगात अजून दिवस घालवता आले तर बरे अशी आपली इच्छा होती असे ते सांगेल?

गरिबांची आठवण करा

स्वर्गात संपत्ती साठवणे म्हणजे काय? याचा अर्थ आपल्याला या जगात जे आहे त्यातील शक्य तेवढे येशूच्या नावाने इतरांसाठी देणे. येशूने म्हटले, “जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणार्‍या थैल्या आपणांसाठी करून ठेवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही. कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल” (लूक १२:३३-३४).

तुम्हाला असे धन हवे का की जे कधीच अपयश देणार नाही? तुम्हाला अशी खात्री हवी आहे का की जी कधी कमी होत जाणार नाही? तुम्हाला अशी सुरक्षा, स्वातंत्र्य, आणि सौख्य हवे का की जे तुम्ही मेल्यानंतरही वाढत राहील आणि पसरत जाईल? मग जे तुम्हाला आहे ते विका, ज्यांना नाही त्यांना देण्यासाठी. येशूने त्या श्रीमंत तरुणाला म्हटले,  “पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल-नसेल ते विकून दरिद्र्यांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये” (मत्तय १९:२१). जे गरजू आहेत त्यांच्यासाठी आपल्या जगिक संपत्तीचा त्याग करायला जोपर्यंत आपण तयार होत नाही तोपर्यंत आपण स्वर्गात संपत्ती साठवायला सुरुवात करत नाही.
ख्रिस्ताची आज्ञा पाळण्याची सुरुवात अशी होते: गरिबांना पुरवणे. कुटुंबा-कुटुंबात, शहरा- शहरात  शतका-शतकात हे वेगळे दिसेल. पण येशूने आपल्याला हमी दिली की, “गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात” (मार्क १४:७) आणि हे अगदी प्रगत राष्टांनाही लागू आहे. देव आपल्याला आदेश देतो आम्ही “गरिबांची आठवण ठेवावी” (गलती २:१०). तर तुम्ही राहता तेथे कोण गरीब आहेत आणि तुम्ही त्यांच्या गरजा कशा भागवू शकाल?

महत्त्वाकांक्षी उदारपण

गरिबांची गरज भागवत असतानाच आपण आपली संपत्ती आणखी विविध प्रकारे स्वर्गात साचवू शकतो.
आपण विशेषकरून आपल्याजवळ असणाऱ्या विश्वासीयांच्या इतर गरजा पुरवू शकतो- आदरातिथ्याने आपले घर खुले करून, अडचणीच्या वेळी त्यांची बिले चुकती करून, सर्जरी झाल्यावर त्यांना जेवण पुरवून, कुणाला तरी विचारपूर्वक देणगी देऊन चकित करण्याने. आपल्या मंडळीतील सुवार्ताकार्याला मदत करून, तसेच मिशनरी कार्याला आधार देऊन. सुवार्तेला अपरिचित असलेल्यांचे  देवाच्या राज्यात स्वागत करण्याने आपली  संपत्ती स्वर्गात वाढणार नाही का?

आपण देतो आणि आपण चांगली कृत्ये सुद्धा करतो – एकाकी लोकांबरोबर वेळ घालवणे, जागा बदलताना पॅकिंगला मदत करणे, संडेस्कूल मध्ये शिकवणे, थकलेल्या पालकांच्या छोट्या मुलांना सांभाळणे, शेजार्‍यासाठी गरजेच्या वेळी जेवण बनवणे. पौल म्हणतो, “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल” (गलती ६:९). तर स्वर्गात संपत्ती साठवणे याचा असाही अर्थ होतो की, पैशाऐवजी आपला मदतीचा हात आणि वेळ देणे.

येथे देवाचे पाचारण केवळ आपल्या जीवन शैलीसंबंधी नसून उदारपणासाठी आहे आणि तेही महत्त्वाकांक्षी उदारपण. आपले उरलेसुरलेले देणे नाही तर स्वर्गात संपत्ती साठवणे. या संपत्तीचा पाठपुरावा करा, निराळ्या प्रकारे ही संपत्ती वाढवा. ही क्रांतिकारी उदारता आहे. जर येशू खरोखरच  मरण पावला पुन्हा उठला, आणि जे असे त्यागपूर्वक देतात त्यांना तो खरोखरच पारितोषिक देणार आहे तर अशा देण्याला नक्कीच अर्थ आहे.

भिऊ नका

अशा प्रकारची महत्त्वाकांक्षी उदारता कोठून येते? आपल्याला  स्वार्थी, कंजूष, आपल्यापुरतेच पाहायला लावणाऱ्या भीतीशी आपण कसे झगडावे? आपल्याला सर्वस्व देण्याचे सांगण्यापूर्वी येशूने काय म्हटले ते पहा: “हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणार्‍या थैल्या आपणांसाठी करून ठेवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही” (लूक १२:३२-३३).

जर तुम्ही स्वर्गात संपती साठवण्यासाठी मनात झगडताय तर प्रथम हे लक्षात ठेवा की तुम्हाला स्वर्गात एक पिता आहे. जो राजा तुमची वाट पाहत आहे. तो फक्त एक कनवाळू राजा किंवा दयाळू न्यायाधीशच  नाही तर त्याने तुम्हाला स्वत:चे मूल बनवले आहे. त्याच्याजवळ तुमचे वतन आहे (१ पेत्र १:५). तो तुमच्यावर पित्याचे एकनिष्ठ प्रेम करतो.

आणि तुमचा बाप कंजूष नाही. त्याला तुम्हाला राज्य द्यायचे आहे. जर तुम्ही त्याचे आहात तर “सर्वकाही तुमचे आहे … जग असो, जीवन असो, अथवा मरण असो, वर्तमानकाळच्या गोष्टी असोत अथवा भविष्यकाळच्या गोष्टी असोत, सर्वकाही तुमचे आहे; आणि तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे” (१ करिंथ ३:२१-३२). जेव्हा एखादी गरज आपल्यापुढे आ वासून असते तेव्हा त्या पाचशेच्या नोटेला किंवा काही तासांना धरून राहणे हे वेडेपण नाही का? तो तर तुमच्यापासून काहीही राखून ठेवणार नाही. देव जे काही तुम्हाला देऊ करणार आहे त्यावर मनन करा. त्याने जे देण्याचे वचन दिले आहे ते तुम्ही कधीही मोजूच शकणार नाही.

तुमचा पिता केवळ उदारच नाही तर तुम्हाला राज्य देण्यात त्याला आनंद आहे. तो नाखुशीने देत नाही तर  उत्सुकतेने आणि संतोषाने देतो. संतोषाने देणारा देवाला का आवडतो? पुढचे वचन ते स्पष्ट करते. कारण देव स्वत:च खुशीने आणि संतोषाने देणारा आहे (२ करिंथ ९:८). स्वर्गातून आपल्याकडे येणाऱ्या आनंदाच्या उदारपणामुळे आपल्यामधील संतोषाचा उदारपणा उजळून जातो.

अखेरीस स्वर्गात संपत्ती साठवल्याने देव आपल्याला फक्त पारितोषिकच देणार नाही तर तो स्वत:च स्वर्गाचे मोठे पारितोषिक असणार. इब्री लोकांस पत्रातल्या छळ सहन करणाऱ्या लोकांप्रमाणे आपल्याला जगात जे आहे ते आपण गरजू लोकांसाठी आनंदाने देऊ शकतो कारण आपल्याला ठाऊक आहे की “स्वर्गात आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे” (इब्री १०:३४). आणि चांगली व टिकाऊ मालमत्ता तो जे देतो ती नाही तर तो जे आहे तीच आहे.

Previous Article

सत्य काय आहे ?

Next Article

बार्थोलोम्यू झिगेन्बाल्ग – अठरावे शतक

You might be interested in …

धडा ४.  १ योहान १:५-७    खरी सहभागिता स्टीफन विल्यम्स

  तुम्हाला अशा लोकांशी कधी बोलण्याचा प्रसंग आला का, जे फार मोठमोठे दावे करतात पण त्यांचे जीवन त्यांच्या दाव्यांना पुष्टी देणारे नसते? ▫         मला पोहायचे कसे ते माहीत आहे; विणकाम काय सोप्पे आहे!; मी एक […]

त्याच्याबरोबर वृद्ध होताना भिऊ नका

लेखक : जेराड मेलीन्जर काही वर्षांपूर्वी माझे आजी व आजोबा अजूनही आमच्याबरोबर होते तेव्हा आम्ही एका पिकनिकला गेलो. आजी पहिल्यासारखी राहिली नव्हती. विस्मरण हळूहळू कायमचे झालेले होते. ते इतके वाढले की तिला माझे किंवा घरच्या […]