वनिथा रिस्नर

मला खूप आशीर्वाद मिळाला असे म्हणण्याची एक प्रचलित पद्धत आहे.
तुम्ही फेसबुक किंवा ट्विटर वर नजर टाकली तर किती लोकांना आज आशीर्वादित वाटते हे तुमच्या लक्षात येईल. आजच्या सामाजिक माध्यमांच्या जगात तुम्ही आशीर्वादित आहात असे म्हणणे हा नम्रतेचा आव आणताना एक फुशारकी मारण्याचा प्रकार असू शकतो.
कॉलेजची शिष्यवृत्ती? = आशीर्वादित. अचानक पगारवाढ?= आशीर्वादित. शानदार कुटुंब = आशीर्वादित.
ख्रिस्ती या नात्याने आपणही हे विधान वापरतो. आपल्या कुटुंबावर आशीर्वाद पाठवावा म्हणून आपण देवाकडे प्रार्थना करतो. आपली लायकी नसताना मिळालेली वरदाने ही देवाचे ‘आशीर्वाद’ आहेत असे श्रेय आपण त्याला देतो. आपल्या सेवेला आशीर्वाद मिळाला असे आपण म्हणतो. याचा खरा अर्थ काय? देवाचे आशीर्वाद आपण कसे समजून घ्यावेत?
चांगले जीवन
विश्वासी लोकांसाठी आशीर्वादित जीवन आणि यशस्वी जीवन याचा अर्थ एकच आहे का? चांगल्या जीवनाची ही एक ख्रिस्ती आवृत्ती आहे का? प्रेमपूर्ण विवाह, आज्ञापालन करणारी मुले, चैतन्यमय सेवा, निरोगी शरीर, यशस्वी करीयर, विश्वासू मित्र, आर्थिक भरभराट – जर या गोष्टी आशीर्वादित जीवनाचे गुणधर्म असतील तर हे सर्व असल्यास जीवन असामान्य रीतीने आशीर्वादित आहे असे म्हणावे लागेल.
पण ते खरे आहे का? जर एखाद्याला या सर्व गोष्टी असतील तर तो खरंच असामान्यपणे आशीर्वादित असतो?
देवाकडे जाण्याऐवजी त्यांना स्वयंपूर्ण आणि अभिमानी वाटत असावे. कदाचित काहीसे आत्मसंतुष्ट आणि स्वधार्मिकही. नाहीतरी त्यांच्या खडतर परिश्रमाचे फळ त्यांना आता मिळत आहे.
शिवाय त्यांना देवाकडे सुटकेसाठी याचना करण्याची गरज नसते कारण सर्व व्यवस्थित असते. त्यांना देवावर भरवसा टाकायचा नसतो कारण ते स्वत:वर भरवसा ठेवू शकतात. देवाने त्यांना भरण्याची गरज नसते कारण ते समाधानी आहेतच.
देवाचे मोलवान आशीर्वाद
माझी देवासाठीची इच्छा ही माझ्या गरजेतून निर्माण होते. आणि जेथे हानी होते तेथेच मला माझी गरज जास्त प्रकर्षाने जाणवते. गरजा पुरवल्या न गेल्याने मला माझ्या गुडघ्यावर नेले जाते. माझे प्रार्थनेचे जीवन खोल केले जाते. मला देवाच्या अभिवचनासाठी बायबल धुंडाळावे लागते.
जगिक आशीर्वाद हे तात्पुरते असतात. ते काढून टाकले जाऊ शकतात. ईयोबाचे सर्व आशीर्वाद एका घातक दिवशी नाहीसे झाले. माझेही आरामशीर जीवन काही आठवड्यांच्या काळात ओरबाडून घेतले गेले. माझा विवाह नाहीसा झाला. माझ्या मुलांनी बंड केले, माझी प्रकृती खालावू लागली. माझी स्वप्ने भंग पावली.
आणि तरीही या वेदनामय घटनांमध्ये मला देवाचे अत्यंत मोलवान आशीर्वाद अनुभवता आले. कधी नव्हता एवढा विश्वास मला मिळत गेला. कधी नव्हे इतकी प्रीती मला समजली. सांगता येणार नाही असे देवाशी जवळचे नाते मी अनुभवले. माझ्या परीक्षांनी माझा विश्वास इतका स्थिर केला की समृद्धी आणि श्रीमंतीने तो कधीही दिला नसता.
जरी माझ्या परीक्षा ह्या आशीर्वाद नव्हत्या तरी ती आशीर्वादाची साधने झाली. एका गीताचे शब्दार्थ मला आठवतात.
“तुमचे आशीर्वाद जर पावसाच्या थेंबातून आले तर? या जीवाच्या परीक्षा – पाउस, वादळ कठीण रात्री- ह्या नव्या वेष धारण केलेल्या तुझ्या दया आहेत ?”
आशीर्वादाची ही क्रांतीकरी कल्पना शास्त्रलेखांमध्ये पण ठामपणे सांगितली आहे.
एक समान धागा
नव्या करारात ‘आशीर्वाद’ या शब्दाला धरून ११२ संदर्भ आहेत आणि यातला एकही संदर्भ भौतिक समृद्धीशी संबंधित नाही. या खालील परिच्छेदांवर विचार करा: (धन्य याचा अर्थ आशीर्वादित)
“जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य… जे ‘शोक करीत आहेत’ ते धन्य… नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य… माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य” (मत्तय ५:३-४, १०-११).
“पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य” (लूक ११:२८)!
“ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापांवर पांघरूण घातले आहे ते धन्य” (रोम ४:७ हा स्तोत्र ३२:१ चा संदर्भ आहे).
“जो माणूस परीक्षेत ‘टिकतो तो धन्य” (याकोब १:१२).
“प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत… कोकर्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य.” (प्रकटी १४:१३, १९:९)
नव्या करारातील कोणत्याही संदर्भामध्ये भौतिक समृद्धीचा किंवा परिपूर्ण परिस्थितीचा निर्देश नाही. याउलट आशीर्वाद हे बहुतेक गरिबी, परीक्षा किंवा आध्यात्मिक फायदे यांच्याशी संबंधित आहेत आणि ते येशूशी विश्वासाने जडले गेल्याने प्राप्त होतात.
बायबलच्या शब्दाच्या अभ्यासानुसार, ‘आशीर्वादित’ असे भाषांतर केलेला मूळ ग्रीक शब्द ‘मकारीओ’ ह्या शब्दाचा अर्थ आहे पूर्णपणे तृप्त असणे. ज्यांना देवाची मर्जी लाभते त्यांचा याच्याशी संबंध आहे. याचा कोणत्याही परिस्थितीशी संबंध नाही.
तर मग आशीर्वाद म्हणजे काय? पवित्र शास्त्र दाखवते की आशीर्वाद म्हणजे देवाने दिलेली कोणतीही गोष्ट जी आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण समाधानी करते. येशूच्या अगदी जवळ नेणारी कोणतीही गोष्ट. कोणतीही गोष्ट जी आपल्याला क्षणिक गोष्टींचा त्याग करून अनंतकालिक गोष्टींना घट्ट धरून ठेवण्यास मदत करते. आणि बहुतेक या गोष्टी झगडणे आणि परीक्षा, वेदनामय निराशा आणि पूर्ण न झालेल्या इच्छा यांमध्ये लाभतात व त्या आपल्याला हे करण्यास मदत करतात.
खरे आशीर्वादित
यातना व हानी आपले परिवर्तन करतात. जरी त्या काही वेळा आपली उलथापालथ करतात तरी देवाबरोबर आपल्याला खोल जीवन जगायला भाग पाडतात – ज्याची पूर्वी आपण कल्पनाही करू शकलो नसतो. त्या आपल्याला केवळ देवामध्येच विसावा घेण्यास मदत करतात. आपण त्याच्यासाठी काय करू किंवा मिळवू यामध्ये नाही.
यातना व हानीमध्ये आपण त्याच्या सान्निध्याची आस बाळगतो. देव आपल्यासाठी, आपल्याबरोबर व आपल्यामध्ये काय आहे हे जाणून घेण्याची आपण उत्कट इच्छा बाळगतो. महान कुटुंबे, आर्थिक समृद्धी, आरोग्य या सगळ्या अद्भुत देणग्या आहेत ज्यासाठी आपण देवाचे आभार मानायला हवेत. पण ते देवाचे सर्वांत महान आशीर्वाद नाहीत. ते आपल्या देवामध्ये नाही तर त्याच्या देणग्यांमध्ये आनंद करायला लावतात.
देवाचे सर्वात महान आशीर्वाद नेहमी खुद्द देवामध्येच असतात. जेव्हा आपल्याला ते असतात तेव्हा आपण खरे आशीर्वादित असतो.
Social