दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आनंदाचा विजय

डेव्हिड मॅथीस

“चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही; त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा” (मार्क १६:६).

पवित्र नगरातील त्या रस्त्यावरचे ते शब्द खरे वाटणार नाहीत इतके सुंदर होते. ते इतके अपेक्षेपलीकडचे, मती गुंग करणारे होते की गेल्या तीन दिवसांत झालेला ह्रदयभंग, नाश यांच्या अगदी विरुध्द झालेला तो नाट्यमय बदल होता. हे आतवर नीट समजायलाच कित्येक दिवस अथवा आठवडेही लागणार होते.

ह्या बातमीचा प्रभाव खऱ्या रीतीने समजून घेण्यास शिष्यांना त्यांचे उरलेले संपूर्ण आयुष्य घालवावे लागणार होते. तो खरोखर उठला आहे. खरंच, सर्व अनंतकाळभरही त्याचे लोक ख्रिस्ताच्या मरणामध्ये देवाने दाखवलेली प्रीती आणि पुनरुत्थानामध्ये विस्फोट झालेल्या देवाच्या  सामर्थ्यापुढे विस्मित होत उभे राहतील.

मेंढरांची दाणादाण झाली

हे होत आहे असे येशूशिवाय कोणीच पहिले नव्हते. त्याने त्याच्या शिष्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते की त्याला जिवे मारण्यात येईल आणि नंतर तो पुन्हा उठेल (मार्क ८:३१, मत्तय १७:२२,-२३, लूक ९:२२). सर्वात प्रथम त्याने जेव्हा पहिल्याने मंदिराचे शुध्दीकरण केले त्यावेळी त्याने असा इशारा दिला (योहान २; १९). त्याच्या खटल्याच्या वेळी काहींनी त्याच्या विरुध्द साक्ष दिली की त्याने असे विचित्र दावे केले आहेत (मार्क १४:१८, मत्तय २६:६१). नंतर त्याने योनाच्या चिन्हाबद्दल सांगितले. “योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील” (मत्तय १२:४०); आणि ज्याला धिक्कारतील तोच कोनशीला होईल, हे ही सांगितले (मत्तय २१;४२).

पण आपल्या शिष्यांना तयार करण्यास त्याने हे केले तरी अक्षरश: त्याचे क्रूसावर जाणे ही कल्पनाच त्यांच्या विचारधारेच्या विरुध्द असल्याने ते ती आपल्या ह्रदयात व मनात सामावू शकले नाहीत. तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक (यशया८:१४) होता. इतका काळ वाट पाहिलेल्या मशीहाने असे जावे हे त्यांना मान्य नव्हते. त्याच्या अगदी गंभीर, बिकट वेळी त्याचे शिष्य त्याला सोडून पळून गेले व जगाच्या  पापाचा भार एकटे वाहून नेण्यास तो पुढे सरसावला. आणि सर्वात मोठा भार म्हणजे – त्याच्या पित्याने त्याचा केलेला त्याग. त्याच्या एका सलगीच्या मित्राने त्याला धोका दिला होता. त्याच्या शिष्यांतील प्रमुखाने त्याला तीन वेळा नाकारले. त्याच्या मृत्यूनंतर शिष्य विखुरले गेले. “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याच्यावर ऊठ; मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील” (जखऱ्या १३:७) ह्या भविष्याची पूर्ती झाली. त्यांनी घराची दारे बंद करून घेतली (योहान २०:१९). त्यांच्यापैकी दोघेजण यरूशलेमेस जाण्यास रस्त्यावर बाहेर पडले (लूक २४:१३) आणि स्त्रियांकडून बातमी आली ती त्यांना विलक्षण कल्पना वाटली (लूक २४:११). ती त्यांच्या कल्पनेपलीकडची होती पण देवासाठी तशी नव्हती. असे स्वप्न वास्तवात होऊ शकते का? असे कोणते महासामर्थ्य असेल का जे नवे युग आणील – पुनरुत्थानाचे युग – आणि शेवटच्या शत्रूवर, मृत्यूवर विजय मिळवील?

विस्मयाने व्याप्त

जेव्हा त्यांनी हे प्रथमच ऐकले तेव्हा त्यांना धक्काच बसला. मार्क सांगतो की, “त्या कापत होत्या व विस्मित झाल्या होत्या; त्यांनी कोणाला काही सांगितले नाही, कारण त्या भयभीत झाल्या होत्या” (१६:८). त्या विस्मयाने व्याप्त झाल्या होत्या. जर बातमी इतकी नेत्रदीपक नसती तर कदाचित त्यांनी उत्सव केला असता. पण हे इतके अवाढव्य, इतके विस्मयकारक होते की लगेचच आनंद उत्सव करण्यापलीकडचे होते. त्यांना जबरदस्त धक्का बसला होता. जेव्हा आपण या वास्तवाचा संदेश स्वीकारतो तेव्हा आपल्यासाठीही ईस्टर हेच करतो. येशू जिवंत आहे हे सत्य इतके स्फोटक, जग उलथून टाकणारे आहे.
ते तात्पुरते सुख देणाऱ्या आनंदाच्या अगदी पलीकडचे आहे. प्रथम एक पूर्ण विस्मय आणि नंतर भीतीयुक्त एक महान आनंद. आणि नंतर आनंद करण्याचे व इतरांना सांगण्याचे सामर्थ्य. “तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या” (मत्तय २८:८).

दु:ख खोटे ठरले

पण आता त्याच्या दु:खसहनाचे काय? गुलगुथा येथे सहन केलेल्या त्या उग्र यातनांचे काय? होय. सी एस लुईस यांनी म्हटल्याप्रमाणे “या पुनरुत्थानाच्या युगाची पहाट ही त्या यातनांचेही गौरवात रूपांतर करील.” आता दु:खावर आनंदाने विजय मिळवला आहे. अखेरीस दिवसाने रात्रीवर अधिकार घेतला आहे. प्रकाशाने अंधाराच्या ठिकऱ्या उडवल्या आहेत. मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत केले आहे (इब्री २;१४). “मरण विजयात गिळले गेले आहे” (१ करिंथ १५:५४).

ईस्टर ही आता येणाऱ्या त्या महान दिवसाची वार्षिक रंगीत तालीम झाली आहे. तेव्हा आपण संदेष्टे व प्रेषित यांच्याबरोबर गाऊ “अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे” (१ करिंथ १५:५५)?

जसे येशूच्या अखेरच्या दिवसातील क्रूसापर्यंतच्या तपशिलाची आठवण केल्याने आपल्याला आपल्यावर येणाऱ्या अग्नीपरीक्षांना तोंड देण्यास तयार केले जाते तसेच ईस्टर आपल्याला त्यानंतर येणाऱ्या विजयासाठी तयार करतो. ईस्टर आपल्याला दैवी वैभवाच्या घटनेची चुणूक दाखवतो.

ख्रिस्त उठवला गेला आहे. दिवस आता अंधारात जाणार नाही तर रात्र ही पहाटेच्या उजेडात उठवली जात आहे. अंधार सूर्याला ग्रासू शकत नाही तर प्रकाश हा सावल्यांना हुसकून टाकत आहे. पाप आता जिंकणार नाही तर मरणाला विजयाने ग्रासून टाकले आहे.

विशेष विजयी

वेदनांचे सुद्धा गौरवात रूपांतर होईल हे हमखास. पण ईस्टर आपल्या वेदना दडपून टाकत नाही. आपली हानी तो कमी करत नाही. आपली ओझी आहे तशीच असतात त्यांच्या सर्व ओझ्यासह, त्यांच्या सर्व धोक्यासह. आणि हा उठलेला ख्रिस्त अविनाशी जीवनाच्या प्रकाशमान डोळ्यांनी पाहतो आणि म्हणतो, “यांच्यावर सुद्धा मी विजयासाठी दावा करीन. ही सुद्धा तुला आनंद देतील. ही सुद्धा, अगदी ही सुद्धा मी आनंदाचे प्रसंग करीन. मी विजय मिळवला आहे आणि तुम्ही विशेष विजयी व्हाल”

ईस्टरच्या वेळी आपली सर्व दु:खे दाबून ठेऊन आनंदी चेहरा दाखवणे असा याचा अर्थ नाही. याउलट ज्या वेदना तुम्हाला व्यापून आहेत त्यांच्याशी पुनरुत्थान कनवाळूपणे बोलते. तुम्ही कितीही हानीमुळे दु:ख करत असाल, कितीही भाराने तुम्ही थकले असाल त्यांना ईस्टर म्हणतो, “हे असेच सर्वदा राहणार नाही. नव्या युगाची सुरुवात झाली आहे, येशू उठला आहे, आणि मशीहाचे राज्य आता येथे आहे. त्याने मरण, पाप व नरक यांच्यावर विजय मिळवला आहे. तो जिवंत आहे आणि राजासनावर आहे, आणि तो तुझ्या शत्रूंना, तुझ्या सर्व शत्रूंना त्याच्या पायाखाली घालत आहे.”

तुमच्या जीवनात जे चुकीचे घडत आहे त्याच्यावर तो इलाज करील व त्याला एक वैभवी आकार देईल आणि तुमच्या शत्रूंचा नाश करील एवढेच नाही तर तुमच्या वेदना, दु:ख, तुमची हानी, तुमचे ओझे हे पुनरुत्थानाच्या खोल किमयेने अनंतकालिक महान आनंदात त्याचे  रूपांतर करील. हा विजय एक दिवस तुमचा होईल असे नाही तर तुम्ही विशेष विजयी व्हाल (रोम ८:३७).

जेव्हा तो तुमचे अश्रू पुसून टाकील तेव्हा आपले चेहरे असे चकाकू लागतील की जसे तुम्ही रडलाच नव्हता. हे सामर्थ्य आपल्याला त्याच्या शहरातील बागेकडे – नव्या यरूशलेमेकडे नेते. उठलेल्या येशूच्या आवाजात पुनरुत्थान म्हणते, “तुम्हांला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल” (योहान १६:२०) आणि “तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही” (योहान १६:२२).

ईस्टर म्हणतो, ज्याने मरणावर विजय मिळवला आहे. त्याने त्या मरणालाच आता आपल्या आनंदाचा सेवक बनवले आहे.

Previous Article

माझ्या पापाने तेथे त्याला धरून ठेवले

Next Article

अधीरता म्हणजे नियंत्रण करण्यासाठी युद्ध

You might be interested in …

तुम्हाला चांगला मृत्यू  हवा आहे का?

मार्शल सीगल १० सप्टेंबर २०२२ हा दिवस मी विसरू शकत नाही. आमचा पहिला मुलगा चालू लागला तो हा दिवस नाही. त्याच्या शाळेचा तो पहिला दिवस नव्हता. तो पहिल्यांदा सायकल शिकण्याचा तो दिवस नव्हता. नाही. १० […]

करोनाच्या कहरामध्ये वधस्तंभाचा दिलासा स्टीफन विल्यम्स

“ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त […]

आणखी एक नवे वर्ष दरवाजा ठोकत आहे

मार्शल सीगल ख्रिस्तजन्माच्या आनंदाचे इतक्या पटकन नव्या वर्षाच्या चिंतेत रूपांतर का होते? बहुधा याचे कारण असेल की ख्रिस्तजन्माचा जो आनंद वाटत होता तो ख्रिस्तामध्ये खोलवर रुजलेला नव्हता. ज्या वेळी आपण बक्षिसे वेष्टणात गुंडाळत होतो तेव्हा […]