मार्शल सीगल
अधीर किंवा उतावीळ असणे हे एक वाईट पाप आपल्या सर्वांमध्येच असते आणि आपल्याला त्याचे समर्थन करायला आवडते – आम्ही थकलो होतो, आम्ही व्यस्त होतो. आमचं दुसरीकडे लक्ष होतं, मुलांचा फार गोंधळ चालू होता. कामाचा खूप ताण पडला होता. जोडीदार चिडला होता किंवा रुक्षपणे वागत होता. काल नीट झोप झाली नाही. जेव्हा तुमचा धीर संपतो तेव्हा किती सबबी आपण पुढे करतो?
मी बहुधा थकल्याची सबब पुढे करतो. ‘जर मला पुरेशी झोप आणि शांतपणा मिळाला तर मी बहुतेक अधीर होत नसतो’ असे समर्थन करताना तुम्ही स्वत:ला ऐकलेत? नाही, सत्य हे आहे की मी उतावळा आहे आणि जेव्हा मी थकलेला असतो तेव्हा माझी अधीरता बाहेर पडते. थकवा कोणालाही पाप करायला लावत नाही; थकवा आणि इतर ताण आपले पाप पृष्ठभागावर आणतात (मत्तय१५:११).
तर अधीरपणा कोठून येतो? अधीरपणा हा आपल्या जीवनामध्ये देवाच्या वेळेवर विश्वास न ठेवता त्याच्या स्वाधीन न होण्याच्या आपल्या अनिच्छेमुळे आत वाढू लागतो.
ज्यावर आपले नियंत्रण नसते
अधीरता हे आपल्या गर्वाचे व अविश्वासाचे बाळ आहे. आपल्या जीवनात काय घडते व केव्हा घडते हे आपण काबूत ठेवू शकत नाही या निराशेने आपली अधीरता वाढू लागते. याचे उदाहरण देवाच्या लोकांची गुलामी व छळातून नुकतीच सुटका झाल्यावर रानामध्ये आपण पाहतो.
“मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला; त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध बोलू लागले” (निर्गम २१:४-५).
देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर काढून तांबड्या समुद्रातून चालवले, त्यांच्या शत्रूचा त्यांच्यामागे नाश केला, आकाशातून अन्न देऊन त्यांना तृप्त केले तरी ते अधीर झाले. का? कारण देवाने त्यांना दिलेले अभिवचन, त्यांना ज्या प्रकारचे जीवन हवे होते ते त्यांना लवकर मिळेना. देवाने त्यांच्यासाठी निवडलेला मार्ग त्यांच्या अपेक्षेपेक्षा फारच लांबलचक, कठीण आणि वेदनामय होता. आपण आता काही करू शकत नाही यामुळे ते इतके चिडले की त्यांना फारोचा दुष्टपणा बरा वाटू लागला, कारण तेव्हा त्यांना जे हवे ते खाता तरी येत होते (निर्गम १६:३).
आमचा अधीरपणा त्यांच्यासारखाच असतो. आज रहदारी किती असणार हे आपण ठरवू शकत नाही. आपली मुले आपलेच नेहमीच ऐकतील असे आपण ठरवू शकत नाही. आपण कधी आजारी पडणार व आपली उपकरणे कधी बंद पडणार, किंवा कामात कितीदा व्यत्यय येणार हे आपण ठरवू शकत नाही. आपला विचार किंवा सल्ला न घेता कितीतरी निर्णय दररोज आपल्यासाठी घेतले जातात. आणि देवाच्या आपल्यासाठीच्या योजना बहुधा आपल्या योजना बाजूला सारणाऱ्या असतात.
तर जेव्हा आपले अशा बाबीवर नियंत्रण नसते, आपण योजना केलेल्या गोष्टींमध्ये जीवन अडथळा आणते, जेव्हा आपल्याला वाट पाहणे भाग पडते तेव्हा योग्य प्रतिसाद कसा द्यावा? आपला अधीरपणा नियंत्रण घेण्यासाठी देवाशी झगडू लागतो. याउलट धीर गुडघे टेकून, बाहू पसरून देव जे देतो व योजना करतो ते स्वीकारतो. उतावीळपणा कुरकुर करतो तर धीर उशीर होण्यातले दु:ख अनुभवूनही आनंद करतो.
हा धीर येतो तरी कुठून? जर अधीरता हे आपल्या गर्वाचे आणि अविश्वासाचे बाळ आहे तर धीर हा नम्रता, विश्वास व आनंदाचे फळ आहे.
नम्रता अधीरतेचा विध्वंस करते
नम्रता ही कोणत्याही व कितीही कठीण क्षणी आनंदाने कबूल करते की, आपल्याला किती कमी दिसतंय. आणि त्यामुळे ती अधीरतेचा विध्वंस करते. जॉन पायपर म्हणतात: “देव तुमच्या जीवनात नेहमी दहा हजार गोष्टी करत असतो आणि तुम्हाला त्यातील कदाचित फक्त तीन गोष्टी ठाऊक असतील.” जेव्हा आपण अधीर बनतो तेव्हा आपली परिस्थिती आजमावण्याच्या क्षमतेची किंमत आपण फार मोठी करतो आणि गैरसोयी व उशीर याद्वारे देव आपल्या जीवनात जे काही करू शकतो त्याची किंमत कमी करतो. नम्र व्यक्ती याच गैरसोयी आणि उशीर यांना अडथळे न म्हणता, “देव त्याची इच्छा व समय दाखवून देत आहे” असे म्हणते.
नम्र जण देवाशी व इतरांशी धीराने वागतात. “पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या” (इफिस ४:१-२).
नम्रतेमुळे प्रीतीला जो धीर हवा असतो त्याची वाढ होते. प्रीतीचे प्रत्येक नाते हे धीराने एकमेकांचे सहन करण्याचे उदाहरण आहे. कारण आपले पाप आपल्याला प्रीती करणे कठीण करते. “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो” (१ पेत्र ५:५).
तुम्हाला धीरामध्ये वाढायचे आहे का आणि देवाच्या पूर्ण व मोलवान कृपेचा अनुभव घ्यायचा आहे का? तर स्वत:ला नम्रतेने लपेटून घ्या.
विश्वास अधीरतेचा विध्वंस करतो
जेव्हा जीवन देवाच्या अभिवचनांना प्रश्न करते तेव्हा विश्वास त्यांना घट्ट धरून राहून अधीरतेचा विध्वंस करतो.
“अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्याला ‘पहिला व शेवटला पाऊस’ मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे” (याकोब ५: ७-८).
चांगल्या शेतीसाठी जशी वाट पहावी लागते तसेच चांगले जीवन जगण्यासाठीही. विश्वास भरवसा ठेवतो की देव सार्वभौम आणि चांगला आहे. त्याची सर्व अभिवचने ख्रिस्तामध्ये खरी आहेत. तसेच दु:खसहनाने धीर उत्पन्न होतो. येशू नक्की येईल आणि सर्व गोष्टी नवीन करील. आणि त्यामुळे आपण वाट पाहू शकतो, सहन करू शकतो, आणि धीर धरू शकतो (गलती ६:९).
आणि पुढच्या वचनात याकोब कोठे जातो? “बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका; पाहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे” (याकोब ५:९). अशा प्रकारचा विश्वास आपल्यामध्ये एकमेकासबंधी असलेल्या अधीरतेचा विध्वंस करतो. शेतकर्याचा विश्वास असतो की बी ला कोंब येईल आणि ती फळ देईल. यामुळे तो कोरडे आठवडे आणि महिने असले तरी धीराने वाट पाहतो. ख्रिस्ती व्यक्तीचा विश्वास असतो की लवकरच त्याला पूर्ण आनंद आणि सार्वकालिक आनंद लाभणार आहे आणि तो एकट्यालाच नाही तर सर्वांबरोबर. यामुळे तो इतर विश्वासीयांचे गुन्हे सहन करतो. इतरांसारखी तो तक्रार करत राहत नाही. जे येणार आहे त्यामुळे तो प्रीतीमध्ये टिकून राहतो. न्याय करण्यामध्ये तो दयाळू असतो व संघर्षामध्ये धीर धरतो.
आनंद अधीरतेचा विध्वंस करतो
हा विश्वास फक्त वचनांवर भरवसा ठेवणे नाही तर या अनुभवामध्ये मिळालेल्या भरपूर आनंदाचा अनुभव. पौल प्रार्थना करतो की, “सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हांला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे” (कलसै १:११). धीर धरणारे लोक खाजगीमध्ये कुरकुर करत नाहीत आपली चिडचिड आणि कटुता साठवत इतरांपासून लपवून ठेवत नाहीत. त्यांचा धीर देवामध्ये असलेल्या आनंदाच्या झऱ्यातून वाहतो. ते त्याच्यामध्ये इतके आनंदी आहेत की कोणतेही अडखळे, गैरसोयीचा त्यांच्यावर परिणाम होत नाही.
अशा प्रकारचा अढळ आनंद आपण कुठे पाहतो? पौल २ करिंथ ८:१-२ मध्ये म्हणतो, “बंधूंनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हांला कळवतो; ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य, ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली.”
इस्राएल लोकांनी रानात केली तशी त्यांनी कुरकुर केली नाही. ज्यावर ते नियंत्रण करू शकत नव्हते त्याबद्दल त्यांनी कुरकुर केली नाही. त्यांच्या जीवनाची उलथापालथ झाली, संकटामागून संकटे आली तरी ते उदारपणाने भरून गेले होते.
धीर धरणारी व्यक्ती गैरसोयी स्वीकारून वाट पाहू शकते कारण आज, उद्या, किंवा पुढच्या गुरुवारी जे घडेल त्यामुळे त्याच्या स्वर्गातील संपत्तीला धोका पोचत नाही आणि म्हणून त्यांचा आनंद सुरक्षित असतो. त्यांचा आनंद त्यांच्या योजनांशी बांधलेला नसतो, म्हणून त्यांच्या योजना जेव्हा फिसकटल्या तरी त्यांचा आनंद तसाच राहतो आणि तो प्रीती देतच राहतो.
अडथळे आनंदाने स्वीकारणे
असाच अद्भुत धीर आपण इब्री १०:३२-३४ मध्ये पाहतो. “पूर्वीचे दिवस आठवा; त्यांमध्ये तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली; कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला; तर कधी अशी दया झालेल्यांचे तुम्ही सहभागी झालात.”
त्यांनी त्याच्या मालमत्तेची हानी आनंदाने स्वीकारली. आपण ख्रिस्ताचे शिष्य आहोत म्हणून आपल्या मालमत्तेची नासधूस, चोरी त्यांनी फक्त स्वीकारलीच नाही तर त्याच्यासाठी दु:ख सहन करण्यात त्यांना आनंद होता. आपण जर अशाच परिस्थितीत असतो तर इतरांनी आपल्याबद्दल असे म्हटले असते का? आपण अशाच आनंदाने आपल्या मालमत्तेची घराची, आर्थिक योजनांची नासधूस स्वीकारली असती का? सध्या आपण आपल्या वेळापत्रकातले बदल, आपली भंगलेली स्वप्ने, कामातले चढउतार, मुलांच्या संगोपनातील अडचणी, जीवनातील कठीण परिस्थिती आनंदाने स्वीकारतो का?
जर त्यांच्याप्रमाणे आपल्याला ठाऊक असेल की आपल्याला कायम टिकणारी आणि अधिक चांगली मालमत्ता आहे, जर आपल्याला ठाऊक असेल की आपल्याला सर्वकालासाठी देव आहे आणि आता कोणत्याही परिस्थितीत टिकून धरण्यासाठी जे हवे ते सर्व त्याच्यामध्ये आपल्याला आहे तर आपण नक्कीच आनंदाने कोणतीही परिस्थिती स्वीकारू. हे आपल्याला हे समजत नाही.
ज्यावर आपले नियंत्रण नाही त्याला नम्रतेने कवटाळल्याने धीर वाढू लागतो. देव त्याची अभिवचने पूर्ण करीलच या खोल आणि स्थिर भरवशाने तो वाढू लागतो. आणि तो आपल्याला आहे या अमाप आनंदाने भरलेल्या ह्रदयातून तो वाहू लागतो.
Social