दिसम्बर 3, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

व्याधींमध्येही भीतीमुक्त

कॅथरीन बटलर

एक वर्षापूर्वी मी आणि माझ्या मुलांनी आमच्या एका मित्राला दवाखान्यात भेट दिली. त्याला एम्फिसिमाचा (फुप्फुसाचा एक आजार) पुन्हा एक अटक आला होता. हे त्याचे दुखणे बराच काळाचे होते. अनेक उपचारांचे कोर्सेस, कित्येक दिवस दवाखान्यात तर काही दिवस पुनर्वसन केंद्रात. प्रकृती स्थिर होत नसल्याने घरी पण येऊ शकत नव्हता. आता तर ऑक्सिजन सिलिंडर त्याला कायमची सोबत देत होता. ज्या ख्रिस्ती गाण्यांनी संकटाच्या काळात त्याला उभारी दिली होती ती गाणी आता तो कधीच गाऊ शकणार नव्हता.

माझ्या मुलांना अशा भेटी देण्याची सवय होती. आम्ही बोलत असताना ते धडपडत त्याच्या शेजारी बिछान्यावर चढले आणि त्यांच्या चित्राचे पुस्तक रंगवू लागले. आज ते त्याच्या इतक्या जवळ असतानाही त्याने त्यांना जवळ घेतले नाही की गोंजारले नाही. “काय विचार करतो आहेस?” मी विचारलं. अस्वस्थ होऊन त्याने मला नजर देणे  टाळले. अखेरीस तो म्हणाला; “देव काय करत आहे मला समजत नाही.” त्याचा निर्देश त्याच्या खालावलेल्या प्रकृतीसबंधी होता. मग थरथरत्या आवाजात तो म्हणाला “ मला भीती वाटतेय.”

भीतीचे केंद्रस्थान

माझ्या मित्राचा अनुभव काही असामान्य नव्हता. जे जे दवाखान्याच्या दरवाजातून आत पाउल टाकतात त्या सर्वांच्याच मनावर व ह्रदयावर भीती घाला घालते. आपल्यातील काहींना स्ट्रेचरवर नेले जात असताना, नर्सेस रक्त काढून घेत आणि आपले ह्रदयाचे ठोके तपासत असताना आपल्या जीवनाबद्दल आपल्याला भीती वाटू लागते. इतर काही वेळा आपल्या बायोप्सीचा किंवा सर्जरीचा रिपोर्ट येण्याची वाट पाहत असताना आपले ह्रदयाचे ठोके वाढू लागतात, स्वस्थ बसणे आपल्याला मुश्कील होते. आणखी काही जण आपल्याशी जवळकीचे नाते असलेली व्यक्ती आता आपण गमावणार या भीतीने हात चोळत बसलेले असतात.

काहीही परिस्थिती असो, आपण कधी न अनुभवलेली भीती आजारामुळे ढवळून आली जाते. जरी औषधाने वेदना शमवली जाते आणि उपचारांनी कॅन्सरचा फैलाव कमी होतो तरी कोणत्याही ठराविक उत्तरांनी आपली भीती शोषून घेतली जात नाही. अॅनस्थेशियातून बाहेर आले की समजते की हे भयावह स्वप्न अजून खूप काळ राहणार आहे आणि जखम खूप खोल आहे.
आणि तरीही दवाखान्यातही आपल्याला आशा असते.

प्रत्येक टोचलेली सुई आणि लॅब मधून येणारा प्रत्येक रिपोर्ट, चुकीचे अंदाज आणि गणितं, या सर्वांवर देवाचा सार्वभौम अधिकार आहे. त्याची प्रीती आणि विश्वासूपणा ही सार्वकालिक आहेत, न बदलणारी आहेत आणि आपल्या मेडिकल फाईलमध्ये काहीही लिहिले असले तरीही  त्याच्यावर आपण पूर्णपणे अवलंबून राहू शकतो. ख्रिस्त हा आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा आहे (इब्री १२:२). ज्याने काळाकभिन्न भीतीतून आपल्याला सोडवण्यासाठी स्वत:चा प्राण दिला. जेव्हा दवाखान्यामध्ये घोर आणि चिंता आपल्याला व्यापून टाकते तेव्हा या सत्याला आपण कसे धरून राहू शकतो? जो स्वत: आजाऱ्यांच्या बरोबर मित्र आणि रोगनिवारक असा चालला त्याच्या संबंधीच्या तीन सत्यांवर आपण विचार करू या.

प्रत्येक क्षणासाठी शांती

प्रथम आपण आपली भीती प्रभूला देऊन टाकू शकतो. जेव्हा आपल्या पोटात भीतीने गोळा उठतो तेव्हा त्यामुळे देवाकडे प्रार्थना करण्याची प्रेरणा आपल्याला मिळायला हवी. बायबल आपल्याला त्रासापासून सुटकेची हमी देत नाही, पण जेव्हा आपण त्याच्याकडे प्रार्थना करू तेव्हा तो ऐकेल असे अभिवचन देते (लूक ११:११-१३). दावीद गातो: “मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडवले” (स्तोत्र ३४:४). पौल आपल्याला मार्गदर्शन करतो की, सर्वदा आनंदित असा; निरंतर प्रार्थना करा; सर्व स्थितीत उपकारस्तुती करा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे (१ थेस्स. ५:१६-१८). आणि पेत्र आपल्याला उत्तेजन देतो, “त्याच्यावर तुम्ही ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो” (१ पेत्र ५:७).

सतत प्रार्थना करणे याचा अर्थ असा नाही की आपल्याला जे काही हवे ते देव देईल.  “कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत” (यशया ५५:८-९). आपण  दु:खसहन करत असलो (उत्पत्ति ५०:२०, रोम ८:२८: २ करिथ १२:८-९)  तरीही जेव्हा आपण प्रार्थनापूर्वक आपली भीती देवाकडे सोपवतो तेव्हा तो ख्रिस्ताची  शांती आपल्याला देतो. फिली. ४:६-७ या वचनात पौल सुंदर रीतीने आपल्याला आठवण करून देतो; “कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.”

जेव्हा दवाखान्यातील मॉनिटरच्या बीप ने तुमचा थरकाप होतो आणि त्या एकाकी रात्री तुम्ही काळजीशी लढत असता तेव्हा तुमची भीती देवाकडे द्या. तो तुम्हाला त्यातून तग धरण्यास त्याच्या शांतीने लपेटून टाकील.

सावल्यांमध्ये आपल्याबरोबर

दुसरी गोष्ट म्हणजे देव आपल्याबरोबर आहे ह्याची आपण आठवण करू शकतो. परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर (निर्गम ३४:६), ही जाणीव आपल्याला भीतीपासून सोडवते. स्तोत्रेही याचे सुंदर रीतीने वर्णन करतात:

“मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात” (स्तोत्र २३:४).

“परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू”  (स्तोत्र २७:१)?

“देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागराच्या लाटा गर्जून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले तरी आम्ही भिणार नाही” (स्तोत्र ४६:१-३).

निर्गमनाच्या वेळी देवाने लोकांना रानातून दिवस न रात्र चालवले, तो त्यांना कधीही सोडून गेला नाही (निर्गम १३:२२). तसेच देव त्याच्या पवित्र करणाऱ्या आत्म्याद्वारे आपल्याबरोबर राहतो. येशू – आपला प्रकाश, आपले तारण, आपला गढ – आपल्याला अभिवचन देतो की मी तुमच्याबरोबर असणार. फक्त बायोप्सी  आणि वेदनांमध्येच नाही तर “युगाच्या समाप्तीपर्यंत सर्वकाळ” (मत्तय २८:२०).

भीती नष्ट करणारे रक्त

शेवटी, देवाने जी काही अभिवचने आपल्याला दिलेली आहेत त्यावर आपण मनन करू शकतो. येशूने त्याच्या शिष्यांना काळजी न करण्यास सांगितले. त्याने इशारा केला की जीवन हे जगातील तपशीलांपेक्षा मोठे आहे, देव त्याच्या लोकांच्या गरजा स्वत: पुरवील आणि जे येशूच्या मागे जातात ते अतुलनीय संपत्तीचे वारस आहेत.

डोंगरावरच्या उपदेशात त्याने सांगितले,  “जे गवत रानात आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी जनहो, तो तुम्हांला किती विशेषेकरून पोशाख घालील” (लूक १२:२८). “हे लहान कळपा, भिऊ नकोस; कारण तुम्हांला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे  (लूक १२:३२).

आपला पिता त्याच्या पुत्राच्या रक्ताने आपल्याला विकत घेऊन आपल्याला राज्य देतो आणि अशा रीतीने आपली भीती नष्ट करतो. जेव्हा भयग्रस्त स्वप्ने आपल्याला हादरून सोडतात तेव्हा तो आपल्याला त्याची स्वत:ची मुले म्हणून मिठी मारतो. “आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा” (१ योहान ३:१).

आपली आशा खुद्द प्रभूच आहे (स्तोत्र १२१:१-२) आणि ख्रिस्तामध्ये कोणतीच गोष्ट आपल्याला त्याच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही (रोम ८:३८-३९).

आपला प्रकाश, आपला गढ, आपला आश्रय, आपले सामर्थ्य हे आपल्याबरोबर आहे आणि त्याने आपल्याला वाचवले  आहेच. हे सत्य हॉस्पिटलच्या कॉरीडॉरमध्ये आपल्या पछाडणाऱ्या भीतीपासून आपली सुटका करते. आपल्याकडे असे सत्य आहे की कोणतेही निदान त्याला डागाळू शकणार नाही. कोणतीही वेदना त्याचा प्रकाश कमी करू शकणार नाही. कोणताही आजार त्याचे सामर्थ्य कमी करू शकणार नाही.

Previous Article

अधीरता म्हणजे नियंत्रण करण्यासाठी युद्ध

Next Article

मी असले कृत्य करणार नाही

You might be interested in …

नम्रतेने तुमचा जीव तजेलदार करा

जॉन ब्लूम जर तुम्ही काही काळ ख्रिस्ती असाल तर खालची ही वचने नक्कीच पाठ असतील. पठणाचा प्रयत्न करून नव्हे तर अनेक वेळा ऐकून ऐकून. “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू […]

बायबलला काहीही विचारा स्कॉट हबर्ड

जर बायबलबद्दल तुमचा विश्वास काय आहे याची माहिती हवी असेल तर तुम्ही त्यासाठी काय प्रश्न विचारता याकडे लक्ष द्या. आपल्यातील काही असे प्रश्न विचारत नाहीत कारण प्रश्न विचारण्याची वृत्ती अनादर करणारी आहे असे ते समजतात. […]