Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जून 21, 2022 in जीवन प्रकाश

काहीही न करण्याचे पाप

काहीही न करण्याचे पाप

ग्रेग मोर्स

या जगात माझ्या जीवनावर प्रेम करण्याचा मोह मी बहुधा ओळखूही शकत नाही. मग त्यासाठी प्रतिकार करण्याचे बाजूलाच. त्यामुळे चांगले न करण्याचे पाप माझ्याकडून घडते. चार्ल्स स्पर्जन म्हणतात त्याप्रमाणे “ काहीही न करण्याचे पाप” करण्याचा मी दोषी ठरतो.

पाप म्हणजे फक्त वाईट करणे नव्हे तर चांगले न करणे (टाळणे) हे ही पाप आहे. देवाच्या नैतिक नियमांच्या संस्कृतीखाली आपण जे काही करतो त्यानुसार आपण आपला न्याय करतो. पण जे केले नाही त्याचा न्याय आपण करत नाही. पण युद्धे ही फक्त प्रतिकार करून जिंकली जात नाहीत.

आणि कोणत्या वैभवी युद्धरेषेपासून आपण पलायन करतो? या युद्धात सामील होणे ही आपल्याला मिळालेली सुसंधी नाही का? खुद्द देवाकडून मिळालेला आदेश, त्याच्या चिलखताने सज्ज होणे, कूच करण्यासाठी व आत्मे जिंकण्यासाठी सोबत दिलेले कुटुंब – याला आपण प्रतिकार कसा करू शकतो? विजेता, राजा, यहूदाच्या वंशाचा सिंह या घनघोर युद्धात उभा आहे. त्याला सामील होण्यासाठी तुमचे रक्त उसळून येत नाही का?

आपल्यातील जे आपण  स्थिरस्थावर झालोत आणि स्थूलता वाढतेय त्या आपल्याला रऊबेन आणि गाद यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. वचनदत्त देशाच्या अगदी जवळ येताच हे दोन वंश डगमगू लागले. येथे काहीही न करण्याचे पाप करण्याचा मोह त्यांना झाला. युद्ध संपण्यापूर्वी त्यांनी  शस्त्रे बाजूला ठेवली. त्यांचा हा नाकर्तेपणा निरुपद्रवी जरी भासत असला तरी देवाच्या दृष्टीने ते गंभीर पाप होते.

स्वस्थ बसलेले वंश

रऊबेन आणि गाद वंशातल्या लोकांनी इतर बारा वंशासोबत वचनदत्त देशाकडे मोशेमागे कूच केली. त्यावेळी लहान मुले असताना रक्ताळलेल्या दरवाजांच्या खालून ते निघाले आणि दुभागलेल्या तांबड्या समुद्रातून चालत गेले. पुढे ते वयात आले आणि रानामध्ये सिहोन आणि ओग यांच्याशी त्यांनी सामना केला. त्यांच्या पिढीने दाखवून दिले की वचनदत्त देशात जाण्यात देवाच्या मोहिमेशी ते विश्वासू आहेत.

पण आता ते एका सुखमय देशात आले जेथे त्यांच्या सर्व गरजा पुरवल्या जाणार होत्या आणि आता ह्या मोहिमेत पुढे न जाण्याचा मोह त्यांना झाला. त्यांना डोंगरावरचे शहर, दुधामधाचा प्रदेश नको होता. त्यांना कुरणांचा प्रदेश हवा होता. म्हणून त्यांनी मोशेला विचारले की त्याने त्यांना त्यांच्या कर्तव्यातून सुटका द्यावी.

“जो प्रांत परमेश्वराने इस्राएलाच्या मंडळीसमक्ष पादाक्रांत केला तो गुराढोरांसाठी चांगला आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरेढोरे आहेत.” ते पुढे म्हणाले, “तुझी कृपादृष्टी आमच्यावर असली तर हा प्रदेश तुझ्या दासांना वतन करून दे; आम्हांला यार्देनेपलीकडे नेऊ नकोस” (गणना ३२:४-५).

एक साधी विनंती. एक नम्र विचारणे. पण देवाने आणि मोशेने ते त्या दृष्टीने पाहिले नाही. आणि आता जे देवाचे लोक आपापल्या देशात स्थिरावलेले आहेत त्यांनीही हे उत्तर ऐकण्याची गरज आहे.

काहीही न करण्याचे पाप

मोशेने गाद व रऊबेन याच्या लोकांना प्रतिसाद दिला.

“गादाच्या वंशजांना व रऊबेनाच्या वंशजांना मोशे म्हणाला, “तुमचे भाऊबंद युद्धास जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार की काय? जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांना दिला आहे तेथे उतरून जाण्याबाबत त्यांचे मन तुम्ही निरुत्साही का करता? तो देश पाहायला कादेश-बर्ण्याहून तुमच्या वडिलांना मी पाठवले होते तेव्हा त्यांनीही तसेच केले. त्यांनी अष्कोल नाल्यापर्यंत जाऊन देश पाहिला तेव्हा परमेश्वराने जो देश इस्राएल लोकांना दिला होता त्यात त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांचे मन त्यांनी निरुत्साही केले” (गणना ३२:६-८; १४-१५).

“आता पाहा, इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध आणखी भडकावा म्हणून तुम्ही आपल्या वडिलांच्या जागी त्यांची पातकी पोरे निपजला आहात. तुम्ही त्याला सोडून बहकला तर तो त्यांना पुन्हा रानातच सोडून देईल आणि तुम्ही ह्या सर्व लोकांचा नाश कराल.”

येथे त्यांच्यावर केले तीन आरोप पहा:

तुमचा कार्यभाग  तुम्ही सोडून दिला आहे.

इतर १० वंश युद्धावर जात असताना गाद आणि रऊबेन फक्त बसणार होते. तुमचे भाऊबंद युद्धास जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार की काय?” ह्या योध्यांची ‘फक्त बसण्याची’ इच्छा नव्हती. याउलट ते कळपाला चरायला नेण्यात मग्न असणार होते, घरे बांधणार होते, त्यांची शहरे मजबूत करणार होते, आणि तो देश राहण्यासाठी सुकर करणार होते.

ते काही आळशी किंवा भित्रे नव्हते की, त्यांचे भाऊ युद्ध करताना फक्त बघत बसणार होते. तरीही महान आदेशापासून निवृत्ती घेऊन मेंढ्या पाळणे हे तसेच आहे असे मोशे म्हणतो. तो म्हणतो की वेळ वाया घालवून तुम्ही त्याचा दुरुपयोग करणार आहात.

जरी इतर गोष्टीत, सन्मान्य गोष्टीत ते कितीही मग्न असले तरी देवाच्या शास्त्रलेखात त्याबद्दल काहीही महत्त्वाचे न करता केवळ बसून राहणे असे चित्र रंगवले आहे.

तुम्ही तुमच्या सहसैनिकांना इजा केली आहे.

अशा चित्राने इतर वंश देवाने जे करायला सांगितले ते करण्यास नाखूष होतील. मोशे विचारतो,

“ जो देश परमेश्वराने इस्राएल लोकांना दिला आहे तेथे उतरून जाण्याबाबत त्यांचे मन तुम्ही निरुत्साही का करता?”

भाग न घेणे हा तटस्थपणा नाही. कोणताही खेळाडू, किंवा घरचा सभासद समजते की एकाने उदासीनता दाखवली तर ती सर्वांच्या निर्णयावर परिणाम करते. रऊबेन आणि गाद यांनी स्वत: पाप करण्याचा धोका दिला एवढेच नाही तर इतरांनाही आज्ञा पाळणे कठीण केले. इतक्या मोठ्या आणि स्थिर शत्रूला ते सर्व सामर्थ्यानिशी मुकाबला करण्यात कमी पडणार होते.

तुम्ही देवाविरुद्ध पाप केले आहे.

आपल्या पूर्वजांसारखे ते अविश्वासूपणा दाखवत होते. मोशेने ते लगेच दाखवून दिले.  “तो देश पाहायला कादेश-बर्ण्याहून तुमच्या वडिलांना मी पाठवले होते तेव्हा त्यांनीही तसेच केले”

त्यांचे वडील देश हेरण्यास गेले होते परंतु कालेब आणि यहोशवा शिवाय इतर सर्वजणांचा अहवाल ऐकून अब्राहामाला वचन दिलेल्या देशात जाण्यास लोकांना निराश वाटले. त्यांचे वडीलही कनान देशापर्यंत चालत गेले आणि जेव्हा देवाने त्यांना पुढे जाण्यास सांगितले तेव्हा ते मागे वळले. त्यांचे वडील खूपच भित्रे होते तर आता हे लोक खूपच आरामशीर होते.

याला प्रतिसाद देताना मोशे स्पष्टपणे बोलतो तो म्हणतो, “पाहा, इस्राएलावर परमेश्वराचा क्रोध आणखी भडकावा म्हणून तुम्ही आपल्या वडिलांच्या जागी त्यांची पातकी पोरे निपजला आहात. तुम्ही त्याला सोडून बहकला तर तो त्यांना पुन्हा रानातच सोडून देईल आणि तुम्ही ह्या सर्व लोकांचा नाश कराल.” (गणना ३२:१५). प्रत्येक वंशाला त्यांचे वतन मिळेपर्यंत प्रत्येक माणसाने आपले कार्य केलेच पाहिजे. नाकर्तेपणाच्या पापाची क्षमा मागून त्यांनी देवाच्या लोकांसोबत पुढे कूच करायलाच हवी.

नाकर्ते लोक पश्चात्ताप कसा करतात

रऊबेन आणि गाद वंशाच्या लोकांनी आपण पापीपणाने थांबल्याबद्दल पश्चात्ताप केला. मग ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले, “आम्ही आमच्या गुराढोरांसाठी येथे वाडे बांधू आणि आमच्या मुलाबाळांसाठी नगरे वसवू; तरी इस्राएल लोकांना स्वस्थानी नेऊन पोचवीपर्यंत आम्ही स्वत: हत्यारबंद होऊन त्यांच्या आघाडीस चालू; मात्र आमची मुलेबाळे ह्या देशातील लोकांच्या भीतीमुळे तटबंदी नगरात राहतील. इस्राएल लोकांना आपापले वतन मिळेपर्यंत आम्ही घरी परतणार नाही” (गणना ३२:१६-१८)

ते बांधतील, स्थिरस्थावर होतील पण पहिल्यांदा ते युद्ध करतील. “तुम्ही युद्ध करण्यासाठी परमेश्वरापुढे सशस्त्र व्हाल, परमेश्वर आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून हाकून देईपर्यंत यार्देनेपलीकडे तुमचा प्रत्येक सशस्त्र पुरुष परमेश्वरापुढे चालेल ( गणना ३२:२०-२४). “असे न कराल तर पाहा, तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हांला भोवेल हे पक्के लक्षात ठेवा” (गणना ३२:२३). जर वचन दिल्याप्रमाणे करण्यात ते अपयशी झाले तर मोशेचे शब्द हे त्यांच्या कानात घुमत राहतील.

आपण येथे स्वस्थ बसावे का?

आपल्यापैकी अनेक आधुनिक गाद आणि रऊबेनांना आपल्या पुरुषार्थाचे ह्रदय भेदणारे प्रश्न देव विचारत असेल; “तुमचे भाऊबंद युद्धास जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार की काय?”

आपल्यातील अनेकांना (मला धरून) आपापली घरे आहेत. आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि “तुझे राज्य येवो” अशी प्रार्थना आपण नेहमी करतो. आपल्याला पत्नी, मुलेबाळे, एक सुखद अस्तित्व आहे. आपण जगाला आणि सैतानाला त्रास देत नाही आणि याउलट आपल्यालाही त्रास नाही. सैतानाला आपल्याला मेंढरांसाठी देश, गरम जेवण, उबदार बिछाना देऊ देत.  आपण समाधानाने शांत बसू आणि नदी ओलांडून जाणार नाही.

पण आपल्या राजाने आपल्याला एक कार्य दिले आहे.  “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या” (मत्तय२८:१८-२०).

हे कार्य अजून संपलेले नाही. आपल्या शपथा अजून पुऱ्या झाल्या नाहीत. देवाच्या निवड्लेल्यांना अजून त्यांचे वतन मिळाले नाही. आपले युद्ध अजून संपलेले नाही. – आपण यार्देनेच्या चुकीच्या किनार्‍याला उभे आहोत. “ सैनिकांनो धैर्य धरा, युद्धी रहा स्थिर” हे शब्द आपल्याला घट्टे पडलेल्या हातांनी दिले आहेत. पण मंडळीतल्या बहुतेकांचा शांत आत्मा आपल्याला असा विचार करायला लावतो, “ सैनिकांनो शांत बसा, स्वस्थतेत स्थिर”

नाकर्तेपणाच्या पापावर विजय मिळवणे म्हणजे जगिक गोष्टींमध्ये गुंतून घेण्याचे नाकारणे. आपला राजा आणि स्वर्गीय देश यापासून लक्ष विचलित होऊ न देणे आहे. आपल्या कार्यापासून दृष्टी न वळवणे मग कितीही उचित गोष्टी आपल्याला गळ घालतील तरी. विवाह आणि कुटुंब हा त्या कार्याचा भाग आहेत तेच आपले कार्य नाही याची आठवण ठेवणे. जोपर्यंत ख्रिस्त ज्यांच्यासाठी मरण पावला ते आत्मे त्याला मिळत नाहीत तोपर्यंत आपण विसावा घेऊ शकत नाही. आपल्या पुढे पवित्रता उभी आहे. आपले पाचारण, आपली संधी आपला आनंद हा त्यामागून  जात आहे.