जनवरी 28, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

अजून अधिक साध्य करता आले असते अशी इच्छा तुम्ही करता का?

वनिथा रिस्नर

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची सुरुवात महान अभिवचनाद्वारे झाली. एका देवदुताने केलेली घोषणा. देवाकडून झालेले पाचारण. एक भरभराटीचे सेवाकार्य. तरीही त्याच्या जीवनाचा शेवट होताना कोणाला त्याची काहीच कल्पना नव्हती – एका तुरुगांच्या कोठडीत एकाकीपणात.

जेव्हा देव आपला उपयोग करतो तेव्हा आपला प्रभाव व प्रसिद्धी नाहीशी होत आहे असे दिसत असतानाही आपल्याला आनंद मिळू शकतो का?

योहानाला कोणी यशस्वी म्हणू शकणार नाही. जे लोक शून्यातून सुरुवात करतात आणि महान साध्य करतात अशा लोकांचा आपण गौरव करतो. त्याच्या उलट जर घडत असेल तर आपल्याला प्रशंसा करायला वावच नसतो. बहुधा आपण सर्वच जीवनाची सुरुवात मोठ्या अपेक्षेने करतो. आपल्याला नाव कमवायचे असते, किंवा भरभराटीचा व्यवसाय, गलेलठ्ठ पगार, आदर्श कुटुंब अशा गोष्टी हव्या असतात. मलाही ह्या भावना खूप चांगल्या समजतात.

यशाचा पाठलाग

या सर्व गोष्टीचा हव्यास धरून मीही जीवनाची  सुरुवात केली. मला माझ्या व्यवसायात नाव कमवायचे होते. एक आदर्श कुटुंब उभारायचे होते. प्रथमदर्शी हे सर्व सहजसाध्य वाटत होते.
एम बी ए ची पदवी मिळवल्यावर आपण आता यशाच्या फास्ट ट्रॅकवर आहोत असे भासले. काही वर्षांनी जेव्हा मी मुलांसाठी घरी राहण्याचे ठरवले तेव्हा माझ्या या “प्रशंसनीय” निवडीला माझे कित्येक सोबती हसले. तेव्हा मला ओशाळवाणे वाटले होते.
त्यानंतर मी सर्व शक्ती आमचे घर अगत्यशील करण्याकडे लक्ष केंद्रित केले. येथे लोकांना आपण हवे आहोत, आपली काळजी घेतली जाते असे वाटत असे. पण मला लहानपणी झालेल्या पोलिओचा परिणाम मला अशा स्थितीला घेऊन आला की मी माझे दोन्ही हात फक्त स्वत:ची काळजी घेण्यापलीकडे इतर कशासाठीही वापरू शकत नव्हते. आदरातिथ्य तर बाजूलाच राहिले पण आता मी घरी स्वयंपाक सुद्धा करू शकत नव्हते.

जरी मी शरीराने इतरांची सेवा करू शकत नव्हते तरी एक आधार देणारी पत्नी व माता होऊन दृढ कुटुंब उभारण्यासाठी मी मला वाहून घेतले होते. त्यामुळे जेव्हा माझ्या नवऱ्याने घर सोडले आणि नंतर घटस्फोट घेण्याचा दावा लावला तेव्हा मी पुरी उद्ध्वस्त झाले. फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या मुलांसाठीही. ते आता इतके दुखावले गेले होते की कित्येकदा त्यामुळे त्यांच्या रागाचा स्फोट होई. मला अधिकच दु:खी व लाजिरवाणे वाटू लागले.
मला आता संपूर्ण अपयशी वाटू लागले. माझी सर्व ध्येये मी गाठू शकत नव्हतेच पण त्यातले एकही मला पुरे करता येईना.

यशासाठी पाचारण झालेले नाही

“देवाने मला यश मिळवण्यासाठी नाही तर विश्वासू राहण्यासाठी बोलावले आहे” या एका संताच्या उद्गाराने माझ्यात जीवनच ओतले. बाप्तिस्मा करणारा योहान हेच म्हटला असता. त्याच्या येण्याने खूप लोकांच्या अपेक्षा उंचावल्या गेल्या. यशया व मलाखी दोघांनीही मशीहासाठी मार्ग तयार करणारा जो येणार त्याविषयी भविष्य केले होते (यशया४०:३; मलाखी ३:१). त्याच्या जन्मापूर्वीच गॅब्रीएल दूताने सांगितले की, “तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्राएलाच्या संतानातील अनेकांना त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडे वळवील. बापाची अंतःकरणे मुलांकडे, व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल.”
अशा घोषणेनंतर योहान कसा अपयशी होणार?

शेवटचा महान संदेष्टा

प्रथम त्याला महान यश मिळाले. अर्थातच एलियाप्रमाणेच त्याने मोठ्या सामर्थ्याने संदेश दिला. त्याच्या छोट्या सेवाकाळात लोक झुंडीने त्याच्याकडे लोटत असत, ही सेवा केवळ वर्षभराची असावी असे विद्वान सांगतात. या काळात त्याने शास्त्री व परूशांचे खूपच लक्ष वेधून घेतले कारण लोकांना तोच मशीहा आहे असे वाटत असल्याने ते धास्तावून गेले होते.

येशूसंबंधी भविष्य केलेल्या यशया, यिर्मया, यहेज्केल आणि दानीएल या जुन्या करारातील संदेष्ट्यासारखा योहान हा शेवटचा संदेष्टा होता. तो मत्तय ३:३ नुसार “परमेश्वराच्या वाटा नीट करा” असे अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी होता. पण देहधारी येशूला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणारा योहान हा एकच संदेष्टा होता. त्याने येशूला बाप्तिस्मासुद्धा दिला आणि पवित्र आत्मा त्याच्यावर उतरताना त्याने पाहिले आणि त्याच्या स्वत:च्या कानांनी देवाला बोलताना ऐकले “हा माझा प्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे.”
देव जे करत होता त्यामुळे योहान उत्तेजित झाला यात शंका नाही. दीर्घकाळ वाट पाहिलेला मशीहा आता आला होता. आणि योहानाला वाटले असेल की हा संदेश देणारा सेवक यशस्वी होऊन येशूच्या सोबत सेवा करील.

माझा ऱ्हास व्हायलाच हवा

पण येशूने त्याच्या सेवेला आरंभ करून थोडे महिने लोटले नाहीत तोच योहानाला तुरुंगात घालण्यात आले. त्याच्या सेवेची पूर्ती योहान पाहू शकला नाही. देव त्याच्या जीवनाच्या कार्याचा उपयोग करीत आहे असा त्याला फक्त भरवसा ठेवायचा होता. प्रभूच्या प्रार्थनेतील “तुझे राज्य येवो. तुझ्या इच्छेप्रमाणे होवो” (मत्तय ६:१०),  हे शब्द त्याने जगून दाखवले. योहान स्वत:च्या राज्याकडे पाहत नव्हता तर देवाच्या राज्याकडे त्याचे लक्ष केंद्रित होते. आपली सेवा किंवा प्रभाव वाढवण्याचा त्याने प्रयत्न केला नाही; देवाने जेथे त्याला बोलावले तेथे जाण्यात तो संतुष्ट होता. त्याची प्रसिद्धी लयास जात आहे म्हणून आपला अनादर होतोय असे त्याला वाटले नाही. येशूची प्रसिद्धी वाढत आहे यात त्याला आनंद होता प्रत्येक बाबतीत त्याने स्वत:ला व आपल्या योजनांना देवाच्या स्वाधीन केले.

योहानाचे जीवन फिके पडत गेले व नाहीसे होऊ लागले. एकदा येशू पुढे आल्यावर समुदाय योहानाकडे कमी आणि कमी लक्ष देऊ लागला. आंद्रियासारखे त्याचे काही शिष्य त्याला सोडून येशूच्या मागे गेले. जेव्हा त्याची आणि येशूची सेवा एकाच वेळी घडू लागली तेव्हा तेच योहानाचे शिष्य म्हणाले, “तो बाप्तिस्मा करतो, आणि सर्व लोक त्याच्याकडेच जातात.” योहानाचा प्रतिसाद होता, “माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा र्‍हास व्हावा हे अवश्य आहे” (योहान ३:२९-३०).

मरेपर्यंत विश्वासू

जगिक दृष्टिकोनातून योहान अपयशी दिसला असता. त्याची कधीच भरभराट झाली नाही आणि त्याची सेवा लवकरच संपुष्टात आली. त्याचे मरणही गौरवी नव्हते. एका मूर्ख मुलीची लहर, तिची सूडभावी आई, आणि एक दुष्ट व दुर्बला राजा यांच्यामुळे त्याला मरावे लागले.

तरीही देवाच्या दृष्टीने योहान हा महान यशस्वी होता. देवाच्या राज्यामध्ये योहानाने एक महत्त्वाच्या उद्देशासाठी सेवा केली होती. विश्वासूपणे ख्रिस्तासाठी वाट तयार केली होती. त्याच्या सेवेची फळे त्याला दिसली नाहीत, आपल्यातील कित्येक जण ती पाहू शकणार नाहीत. तरीही येशू आपल्याला प्रकटी. २:१० मध्ये बोध करतो, “तुला मरावे लागले तरी विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनी मुगुट देईन.”

योहानासाठी येशूकडे केवळ प्रशंसेचे उद्गार होते. तो म्हणाला “स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही.”  पण योहानाने कल्पना केली तसे त्याचे जीवन व सेवा बहुतेक नव्हती.

भला व विश्वासू दास

तुमचे जीवन क्षुल्लक, लहान आहे असे कधी तुम्हाला वाटते का? मोठ्या योजना आखून तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात केली आणि आता तुम्ही खूपच कमी केले आहे असे दिसते? जगाच्या यशावरून तुम्ही तुमची किंमत करता का?
जर तुमचा व्यवसाय, सेवा, पाचारण याची सुरुवात तुम्ही मोठ्या खात्रीने केली पण तुमच्या योजनेनुसार ती घडली नाही तर उभारी धरा.  तुम्ही विश्वासू राहावे अशी देवाची अपेक्षा आहे, हे तुमच्या यशस्वीपणाबद्दल नाही.
देव कशाला किंमत देतो हे आठवा. त्याचा आपल्या ह्रदयाशी संबंध आहे – त्याने आपला उपयोग करावा यासंबंधी आपली इच्छा. जेव्हा देव आपला उपयोग करतो तेव्हा आपल्याला आनंद होतो का? मग योहानासारखे आपला प्रभाव, प्रसिद्धी लयास जात असली तरी? फक्त ख्रिस्तातच आपण आपली किंमत शोधतो का? आपले पृथ्वीवरील ध्येय हेच आहे की देवाचे नाव मोठे व्हावे आणि आपले नाही अशी आठवण आपण ठेवतो काय?

लोकांच्या दृष्टीने मी यशस्वी दिसावे अशी माझी इच्छा नष्ट झाली आहे असे मला सांगता आले तर बरे, पण खरे तर मी अजूनही याच्याशी झगडत आहे. यश ही एक खूण नव्हे तर आशीर्वाद आहे हे पाहण्यास मी झगडते. माझ्यापेक्षा ज्यांनी अधिक यश संपादन केले त्यांच्याशी तुलना करून मी झगडते. सेवेत मोजता येईल असे फळ यावे या गरजेशी मी झगडते.
तरीही जेव्हा मी यशस्वी नव्हे तर विश्वासू असावे यासाठी देवाने मला बोलावले आहे याची मी आठवण करते तेव्हा माझ्या इच्छा किती चुकीच्या ठिकाणी आहेत याची जाणीव मला होते. मला इतरांशी तुलना करण्याची गरज नाही. देवाने मी जे करावे म्हणून मला बोलावले आहे त्यात मी विश्वासू असावे यावर मी लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडून मी शिकते आणि “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास… तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो” (मत्तय २५:२१). असे शब्द ऐकून मिळणाऱ्या पारितोषिकाची मी वाट पाहत आहे.

Previous Article

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

Next Article

दररोजच्या निर्णयांमध्ये देव कसे चालवतो?

You might be interested in …

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १५ प्रभूचा दिवस देवाच्या भावी प्रकटीकरणाचे ज्ञान होण्यासाठी ‘प्रभूचा’ दिवस हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे. जुन्या करारातील या शब्दाच्या वापराच्या आधारावरच नव्या करारात हा शब्द वापरला आहे. देवाच्या क्रोधात घडणार्‍या भावी […]

धडा १६. १ योहान ३:७-१० स्टीफन विल्यम्स

  तुमचे बाबा कोण आहेत? ज्यांची नावे व्यवसायावरून आहेत असे काही लोक तुम्हाला माहीत आहेत का? उदाहरणार्थ, “दारूवाला” • तुम्ही असा कधी विचार केला का की आज अशी नावे धारण करणाऱ्यांचा त्यांच्या या व्यवसायाशी किंचितही […]

बार्थोलोम्यू झिगेन्बाल्ग – अठरावे शतक

 संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १                  प्रास्ताविकरोमन कॅथॅालिक मंडळी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहंचली होती. अनेक मिशनरी पाठवून परिश्रम करत होती. पण चुकीच्या सुवार्तापद्धती वापरत होती. आणि प्रॅाटेस्टंट मंडळीनं तर अजून सुवार्ताप्रसारासाठी मिशनकार्य सुरू करण्याचा विचारही […]