नवम्बर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आशीर्वाद शाप बनू शकतात

मार्शल सीगल


आशीर्वाद मिळत असतानाच अगदी न टाळता येणारे, गडद मोह येतात. जीवनात, कामामध्ये अथवा सेवेमध्ये आपल्यालामिळालेला पुरवठा, किंवा उघडलेले दार, किंवा विजय यांचा आनंद घेत असताना आपले आध्यात्मिक संरक्षण आपण बहुधा बाजूला सारतो. येशूवर अवलंबून असण्यास मदत करणारी शिस्त, नाती याकडे आपण दुर्लक्ष करू लागतो.

या तुलनेने दु:खसहनाचा याविरुद्ध परिणाम होतो. दु:खसहनाच्या वेळी आपले संरक्षण जागृत असते आणि आपल्याला ते नम्रतेने गुडघ्यावर आणते. दु:खसहन आपल्याला स्वत:वर अवलंबू राहू देत नाही. जगिक सुखे आणि विलास यांची चकाकी ते बाजूला करते. दु:खसहन बहुधा आध्यात्मिक आणि अनंतकालिक सत्ये अधिक स्पष्ट व निश्चित करते आणि जगातील जीवन योग्य दृष्टिकोनात दाखवते.

पण आशीर्वाद आपले आध्यात्मिक निर्णय आणि जाणीवा बोथट करतात. आणि ते आपल्याला नव्या आणि चतुर मोहांमध्ये घालतात.  शास्त्रलेखातले इतिहास सांगतात की समर्थ पुरुष अशा सापळ्यात अडकले गेले. देवाच्या मनासारखा दावीद राजा ज्याने ‘लाखो वधले’ तो जेव्हा आपल्या विजयाच्या लुटीमध्ये विलासात होता तेव्हा दुसर्‍या पुरुषाच्या पत्नीसमोर विरघळला. गुहांमधील संकटे व खडतर जीवन यामुळे त्याच्यामधले उत्तम ते बाहेर आले पण त्याच्या राजवाड्याच्या विलासामुळे त्याच्यातले अत्यंत वाईट ते उघडे पडले.

आणखी एका राजाचे आशीर्वादामध्ये झालेले पतन आपल्याला धोका दाखवते.

समर्थपणाचा आभास

दानिएलाचा चवथा अध्याय सुरू होताच आपला आध्यात्मिक गजर जोरात वाजायला हवा.

“मी नबुखद्नेस्सर आपल्या गृहात चैनीत होतो, आपल्या मंदिरात समृद्ध होतो” (दानीएल ४:४). नबुखद्नेस्सर राजाने तीन पुरुषांना धगधगत्या अग्नितून देवाने वाचवल्याचा अनुभव घेतला होता. त्यामुळे त्या गर्विष्ठ राजाने नम्र होऊन देवाची भक्ती केली होती (दानीएल ३: २८-२९). अशा अनुभवामुळे आणि त्याच्या पूर्वीच्या गर्वापुढे एक दक्षता आणि कायमची दहशत निर्माण व्हायला हवी होती. पण त्याऐवजी आपण पाहतो की राजा आत्मसंतुष्ट आहे. आपल्या राज्याच्या विलासाचा अनुभव घेत गर्वाला खाद्य देऊन कुरवाळत आहे. म्हणून देव त्याच्या जिवाला हादरून टाकण्यासाठी त्याला स्वप्न पाडतो (दानीएल ४:५).

या भयंकर स्वप्नाचा अर्थ कोणीही जादुगार वा ज्योतिषी सांगू शकले नाहीत – एक सुंदर अवाढव्य आणि फळांनी लादलेले झाड अचानक कापून टाकले जाते. आणि म्हणून नबुखद्नेस्सर आता दानिएलाला बोलावतो, ज्याने त्याच्या पूर्वीच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला होता (दानीएल २:३०). हे नवे स्वप्न दानिएलासाठी पण तणावाचे आणि गोंधळून टाकणारे होते (४:१९). तो राजाला धोका दाखवतो; “महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे” (४:२२). तुला कापून खाली ओढण्यात येईल. तुझ्या सिंहासनापासून व घरातून हाकलून टाकले जाईल. तुझा विवेक तू गमावून बसशील आणि जनावराप्रमाणे वाकून गवत खाशील (४:१६,२५)… आणि हा नाशकारी वेडेपणा तुला कित्येक वर्षे ग्रासून टाकील.

नबुखद्नेस्सर राजाला त्यावेळच्या जगात कोणाला नाही इतकी संपत्ती, आशीर्वाद आणि सामर्थ्य मिळाले होते. आणि तरीही आशीर्वाद हा त्याच्यासाठी शाप बनला होता.

दानीएल विनंती करतो, “ म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील” (दानीएल ४:२७).

आशीर्वादांना कसा प्रतिसाद देऊ नये?

नबुखद्नेस्सर राजा यापूर्वी दोनदा नम्र झाला होता आणि त्याने दानिएलाला कबूल केले होते की,  “तुमचा देव खरोखर देवाधिदेव व राजराजेश्वर आहे” (दानीएल २:४७). आता त्याच्या घरात आरामात पहुडला असताना तो या नव्या आणि मोठ्या धोक्याच्या सूचनेला कसा प्रतिसाद देणार होता? काही महिन्यांनी बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर तो फिरत होता. त्या वेळी राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!” (दानीएल ४:३०).

जर आशीर्वाद व यश यांना कसा प्रतिसाद देऊ नये याची पाकक्रिया तुम्हाला हवी असेल तर या अंध आणि मूर्ख माणसाच्या गर्वाकडे पाहा. त्यातील घटक आपल्या प्रत्येकाला धोका दाखवतात.

गर्व

“हे थोर बाबेल नगर… मी बांधले आहे ना!”

गर्व हा देवाचे आशीर्वाद आपण स्वत: कमावले आहेत व आपण त्यासाठी लायक आहोत असे स्वीकारतो. नबुखद्नेस्सर प्रमाणे तो आपल्या कुटुंबाकडे, आपल्या सेवेकडे पाहतो आणि म्हणतो, “पहा मी काय उभारलंय!” गर्व हा उद्दामपणा वाढवतो आणि असुरक्षितपणाला कुरवाळतो. “अर्थातच देव तुला हे सर्व देऊ शकतो. का नाही? बघ तू किती धोरणी, वक्तृत्ववान, कष्टाळू, आकर्षक  आहेस.”

नम्रता ही कोणताही विकास, तरतूद, यश, नैपुण्य हे “दान” असेच पाहते. “मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही”  बाप्तिस्मा करणारा योहान म्हणाला (योहान ३:२७; याकोब १:१७). तुम्हाला जे काही चांगले आहे किंवा जे काही चांगले तुम्ही करता याचे श्रेय केवळ देवालाच जाते.

स्वावलंबन

हे थोर बाबेल नगर माझ्याच पराक्रमाने … मी बांधले आहे ना!”

स्वावलंबन हा  देवाचा  आशीर्वाद आपल्या स्वत:च्या पात्रतेचा व सामर्थ्याचा पुरावा म्हणून स्वीकारते. ही पापी वृत्ती गर्वाचाच एक भाग आहे. राजाच्या तोंडातून हे शब्द कसे बाहेर पडतात ते पाहा: “फक्त माझ्या सामर्थ्याने नव्हे तर माझ्याच पराक्रमाने.” त्याने स्वत:च्या डोळ्यांनी देवाला पाहिले होते, तीन जणांना धगधगत्या अग्नीतून वाचवलेले पहिले होते आणि तरीही तो जे काही छोटेसे करू शकत होता त्याची तो शेखी मिरवतो.

ज्यांनी प्रभू येशूच्या कृपेचा अनुभव घेतला आहे त्यांना फुशारकीचे वावडे वाटू लागते. जेव्हा आशीर्वाद मिळतात तेव्हा ते पौलासोबत म्हणतात, “तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेने केले” (१ करिंथ १५:१०).  ते कठोर परिश्रम करतात पण त्याचे श्रेय देवाला देतात.  “तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?” ( १ करिंथ ४:७; १ इतिहास २९:१४).

आत्मभोगीपणा

 “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”

 हे देवाचे आशीर्वाद स्वार्थीपणाची हमी म्हणून स्वीकारतात. जेव्हा नबुखद्नेस्सर बाबेलकडे पाहतो तेव्हा त्याला स्वत:चा राजवाडा दिसतो. – राजासाठी- स्वत:साठी असलेले सुखसोयीचे, समाधानाचे ठिकाण. सर्व जग त्याला स्वत:ची लालसा पुरवणारे साधन वाटते. अशा प्रकारच्या  मनोवृत्तीने कित्येक सेवाकार्ये नष्ट झालेली आपणही पहिली आहेत ना? याउलट कृपा ही आशीर्वाद म्हणजे प्रीती करण्याची संधी असे पाहते. “प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभार्‍यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा” (१ पेत्र ४:१०). पौल सुद्धा लिहितो, “बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले; तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा” (गलती ५:१३). ज्या येशूने आपले सामर्थ्य आणि अधिकार इतरांना उभारण्यासाठी वापरला – त्यासाठी त्याने स्वत:ला अगदी वधस्तंभावर मरण्यापर्यंत लीन केले – त्या येशूच्या मागे नम्र लोक जातात (फिली. २:८). येशूमध्ये देव आपल्याला आशीर्वाद देतो यासाठी की आपण सुसज्ज होऊन दुसऱ्यांना आशीर्वाद देण्यास प्रवृत्त व्हावे (२ करिंथ १:३-४).

दिमाख

“हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”

दिमाख हा देवाचे आशीर्वाद मिळवतो आणि स्वत:ची भक्ती करण्यासाठी खाली वाकतो. नबुखद्नेस्सर देवाने जे दिले त्याकडे पाहतो आणि ते स्वत:च्या गौरवासाठी घेतो. सुद्न्य लोक  “आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते” ( स्तोत्र १९:१) हे गात असताना राजा थांबतो आणि  चकित होऊन म्हणतो; “पाहा मी किती गौरवशाली आहे.”

जर आपल्यालाही असा मोह कुटुंबात, सेवेत, कामात आला नसता तर  नबुखद्नेस्सर राजाचे विचार किती  दु:खद आणि विचित्र विसंगतीचे आहेत असा विचार आपण करू शकलो असतो. आपले चांगले काम, आपली कामगिरी, आपले सुद्न्य शब्द यांच्याबद्दल आपण किती तोरा मिरवतो. आपल्या खोट्या महिम्याचा आपण अभिमान मिरवतो.

कृपा ही भक्ती करते पण स्वत:ची नाही. तिला स्वत:च्या महिम्याचा भ्रम नसतो. कृपा आनंदाने म्हणते, “हे परमेश्वरा, आमचे नको, आमचे नको, तर आपल्या नावाचा गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस” (स्तोत्र ११५:१). देवभीरू लोक सेवा करतात, श्रम करतात आणि प्रीती करतात.  “सेवा करणार्‍याने, ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठी की, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा” (१ पेत्र ४:११).  “म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा” (१ करिंथ १०:३१). 

नबुखद्नेस्सर राजाला जो मूर्ख मोह पडला तो झटकून टाका. आणि जे काही आपल्याला आहे, जे काही आपण करतो ते देवापासून आहे, देवामधून आहे आणि देवासाठी आहे हे जाणून घेऊन त्याच्या समाधानाचा, परिपूर्तीचा व  प्रतिफळाचा आनंद घ्या.

Previous Article

दररोजच्या निर्णयांमध्ये देव कसे चालवतो?

Next Article

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

You might be interested in …

नव्या वर्षासाठी आठ प्रश्न

डॉन व्हिटनी देवाशी अगदी विश्वासू असलेल्या लोकांनाही  थांबून आपल्या जीवनाची दिशा काय आहे याचा आढावा घ्यावा लागतो. खरं तर न थाबता, एका व्यस्त आठवड्यातून दुसऱ्या आठवड्यात जाणे आणि आपण कुठे चाललोत याचा विचार न करणे […]

धडा १७.     १ योहान ३: ११- १५ स्टीफन विल्यम्स

  प्रीती की द्वेष; काईन की खिस्त काही वेळा एखादी व्यक्ती कशाचे तरी  चिन्ह बनते. उदाहरणार्थ, अहिंसा म्हटले की गांधीजींचे नाव समोर येते. किंवा समाजसेवा  म्हटले  की मदर टेरेसा, तर अॅडॉल्फ हिटलर म्हटले की अत्यंत […]

येशू मेलेल्यातून उठला याची आठ कारणे जॉन पायपर

१.  येशूने स्वत: आपल्या येणाऱ्या पुनरुत्थानाची साक्ष दिली. आपल्यासंबंधी पुढे काय होणार हे येशूने उघडपणे सांगितले. प्रथम वधस्तंभावर खिळले जाणे आणि नंतर मेलेल्यांतून पुन्हा उठणे. “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री […]