जिमी नीडहॅम
दोन वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने एक ब्लॉग वाचला. एक आई आपल्या मुलांसोबत दररोज बायबलचा एक अध्याय वाचत होती. छोट्या मुलांसाठीच्या बायबलमधून नाही तर बायबल मधून. ते अगदी लहान असताना तिने सुरुवात केली आणि आता सर्व ६६ पुस्तके वाचून झाली होती. आणि आता मलाही प्रेरणा मिळाली.
त्याच आठवड्यात माझ्या तीन व चार वर्षांच्या मुलींसमवेत आम्ही बसलो आणि उत्पत्तीचा पहिला अध्याय उघडला. बायबलमध्ये एकूण ११८९ अध्याय आहेत (९२९ जुन्या करारात व २६० नव्या करारात). जर रोज एक अध्याय वाचला तर संपवायला तीनहून अधिक वर्षे लागतील. हा लेख लिहीत असताना आम्ही १ले राजे १२व्या अध्यायात आहोत. आणि आश्चर्य म्हणजे आमच्या कुटुंबाला लावलेली ही एक फलदायी शिस्त ठरली आहे.
मी ‘आश्चर्य” हा शब्द वापरला कारण बायबल वाचणे, खास करून जुना करार वाचणे हे प्रौढ लोकांनाही नाउमेद करते. मग मुलांसाठी तर बाजूलाच (विशेषत: जी प्राथमिक शाळेत आहेत). आपल्यापैकी कित्येक जणांनी उत्पत्तीमधील परिचयाच्या कथेस जोरदार सुरवात केलेली असते आणि निर्गम २५मधल्या निवासमंडपाजवळ किंवा गणनेतील जनगणनेत आपण अडखळू लागतो. म्हणून आमच्या छोट्या मुलींना इतक्या मोठ्या कठीण किंवा त्यांच्याशी संबंधित नसणाऱ्या शास्त्रपाठातून नेणे हे अवास्तव किंवा फारच धाडसाचे वाटेल. चार वर्षांची मुलगी धूपवेदीच्या मापनांमधून काय शिकणार आहे?
आपल्याला वाटते त्यापेक्षा बरेच काही!
बायबल ही तुमच्या मुलांना मिळालेली एक देणगी आहे जी देवाकडून तुमच्यातर्फे त्यांना दिली जाते. संपूर्ण बायबल. निर्मितीचा वृत्तांत आणि लेवीयमधील शुद्धीकरणाचे नियम. नोहाचे तारू आणि कराराचा कोश. योहान ३:१६ आणि नहूम ३:१६. देवाने आपला श्वास संपूर्ण शास्त्रलेखांत फुंकला आहे आणि त्यातील प्रत्येक शब्द आपल्याला उपयोगी व्हावा अशी त्याची इच्छा आहे (२ तीम. ३:१६). हे खूप चांगले कारण आहे. यामुळे देवाच्या वचनातील संपूर्ण मनोदय आपल्या मुलांना सांगणे गरजेचे आहे. जेव्हा आपल्या मुलांसोबत आपण संपूर्ण बायबल वाचतो तेव्हा एक मोल्यवान देणगी आपण बहुगुणित करतो.
मार्गावरील सूचक चिन्हांची देणगी
करार. रानात दिलेला मान्ना. खडकातून पाणी. निवासमंडप. प्रायश्चित्तचा दिवस. रानात सोडून दिलेला बकरा. यज्ञ. ही सगळी सूचकचिन्हे आहेत व ती सर्व ख्रिस्ताकडे निर्देश करतात. जर आपण आपल्या मुलांना फक्त रोमांचकारी आणि सोप्या कथा सांगितल्या तर हे सर्व सहज वगळले जाईल.
उदा. काल रात्री आम्ही शलमोनाच्या पापाबद्दल व त्याच्या मृत्यूबद्दल वाचले. नुकतेच सातवे वर्ष उलटलेली माझी मुलगी उद्गारली – इस्राएलच्या बहुतेक राजांचा शेवट वाईटच होतो असं दिसतंय. मग आम्ही चर्चा केली की इस्राएलांना त्यांच्यावर राज्य करायला एकही चांगला राजा नाही हे पाहून किती वाईट वाटले असेल. त्यातूनच देवाने येशूसाठी स्पष्ट मार्ग तयार केला – देवाने एका अखेरच्या राजाचे अभिवचन दिले जो त्याच्या लोकांचे भले करणार होता व सतत देवाचा सन्मान करणार होता. आणि त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नव्हता.
या बातमीने माझ्या मुलींना खराखुरा आनंद झाला. अचानक सुवार्तेच्या हिऱ्याची एक बाजू त्यांच्यापुढे चमकू लागली. आणि तेही एका दुर्लक्षित जुन्या कराराच्या अध्यायातून.
मुलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी चार मार्ग
कदाचित संपूर्ण बायबल मुलांसाठी आहे हे तुम्हाला समजतंय पण ते त्यांना कसे वाचून दाखवायचे याची तुम्हाला धास्ती वाटतेय. तर अशा लेवीय मधल्या शुद्धीकरणाचे कठीण नियम आणि न संपणाऱ्या वंशवळ्यांमध्ये मुलांचे चित्त कसे वेधून घ्यायचे?
धीर धरा. मुलांना संपूर्ण बायबलमधून नेताना तुम्हाला बायबलचे पंडित असण्याची किंवा त्या जुन्या भाषा अवगत असण्याची मुळीच गरज नाही. देवाचे सौंदर्य, गौरव, आणि आश्चर्य त्यांना पाहता यावे यासाठी त्यांच्यासाठी तुम्ही उत्सुक असायला पाहिजे. सोबत तुमच्या बाजूने थोडी सृजनशीलता (निर्मितीक्षमता) असली तर देवाचे वचन छोट्या मंडळीसाठीही जिवंतपणे सादर केले जाऊ शकते.
बायबलच्या खोल पाण्यात मुलांनी तग धरावा म्हणून खाली काही कल्पना देत आहोत.
१. त्यांना कथेतील पात्रे बनवा
आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकातून जाताना आमच्या लक्षात आले की इतक्या व्यक्तींची आठवण ठेवणे मुश्कील होणार आहे. याकोब आणि त्याच्या बारा मुलांपर्यंत आम्ही आलो तेव्हा कोण कोण आहे हे त्यांना समजावे म्हणून मला सृजनशीलतेचा उपयोग करणे जरुरीचे होते.
एका मुलगी लेआ झाली व दुसरी राहेल. त्यांनी त्यांची सॉफ्ट खेळणी समोर मांडून ठेवली. प्रत्येक वेळी याकोबाला मुलगा झाला की त्या मुलाची आई पळत जाऊन एक खेळणे ओढून घ्यायची व स्वत:च्या ढिगात ठेवायची. अखेरीस आमच्या कोचावर मांजरी, कुत्री, टेडी, बाहुल्या यांचा ढीग झाला – उत्पत्तीमधून बारा वंशाच्या प्रमुखांची नावे अशा रीतीने त्यांनी पाठ केली.
बायबलच्या गोष्टी वाचताना तुमचा दिवाणखाना तुमच्या मुलांना नाटक करण्यासाठी एक रंगभूमी बनू देत.
२. एका चित्राची किंमत हजार शब्दांच्या बरोबरीची असते
ज्यावेळी निर्गमातील निवासमंडप तयार करण्याच्या अध्यायापर्यंत आम्ही आलो तेव्हा मी समजून चुकलो की येथे तो मंडप कसा दिसतो हे जर मी त्यांना दाखवले नाही तर मी त्यांना गमावणार. म्हणून प्रत्येक वेळी याजकाची वस्त्रे किंवा मंडपातील साधने यांचा उल्लेख आला की मी गुगल करून प्रत्येक बाबीचे चित्र काढून घेई व ते कसे दिसते हे त्यांना दाखवत असे.
मुली तर हरखून गेल्या. आम्ही सर्व एकत्र बसून विस्मियाने विचारायचो की कराराचा कोश कसा असेल, किती सोनेरी असेल! मुलींनी दयासनावर असलेले दोन करूब कसे असावेत यावर प्रश्न विचारले. त्यांना याजकांची वस्त्रे चित्तवेधक वाटली. आणि आता तो अध्याय रंग, पोत आणि खोलीने भरून गेला.
तुमच्या स्टडी बायबलमधून किंवा ऑनलाईन आकृत्या मिळवणे, किंवा स्वत: चित्रे काढणे यामुळे वाचताना मुलांच्या कल्पनाशक्तीला इंधन मिळते व पोषक ठरते.
३. वंशावळ्या आकड्यांचा खेळ करा
गणना हे पुस्तक वाचताना मला जरा भीतीच वाटत होती. त्याचे शीर्षकच प्रौढ लोकांनाही घाबरवण्यास पुरेसे आहे. आता यामध्ये मी लहानांना कसे गुंतवून ठेवणार? मग अचानक माझी ट्यूब पेटली. या वयात मुले आकडे सतत हाताळत असतात. जर मी हे पुस्तक एक मोजण्याचा पवित्र खेळ बनवले तर?
दोन्ही मुलींना त्यांचे कप दिले गेले. आम्ही एका बरणीत मणी भरून ठेवले. मी एका व्यक्तीचे नाव वाचले की बरणीतून एक मणी टाकून त्यांच्या कपात टाकण्याची त्यांना आम्ही सूचना दिली. अध्यायामागून अध्याय वाचताना त्यांचे कप भरत राहिले. पुस्तक संपत आल्यावर त्यांनी किती मणी काढले ते आम्ही मोजले. वंशावळी संपल्यावर शेकडो मणी मोजले पण त्यांचे लक्ष शेवटपर्यंत विचलित झाले नव्हते.
४. त्यांच्याकडून गोष्ट बाहेर आणा
मुलांनी कल्पनाशक्ती वापरावी म्हणून गोष्ट ही महान संधी आहे. माझ्या मुलींना चित्रे काढायला खूप आवडते. यामुळे जास्त गोष्टी असलेल्या पुस्तकात जेव्हा आम्ही असतो तेव्हा मी त्यांना एक मोठा चार्ट पेपर आणि पेन्सिली देतो. त्या जे ऐकत आहेत ते चितारायला सांगतो. आमचे १ले राजेचे अर्धे पुस्तक संपत आले आहे पण माझ्या पाच वर्षांच्या मुलीचे चार्ट पेपर एक वृध्द दावीद राजा (पांढरी दाढी व काठी), त्याचा मुलगा अदोनिया (रंगीत चेहरा), यवाब, अबीशग इ.च्या चित्रांनी भरले आहे. हा चार्ट पेपर आम्ही गोष्ट पुढे वाचताना संदर्भ म्हणून वापरला जातो म्हणजे त्यांना लोक व गोष्टी आठवणीत राहतात.
तुमच्या मुलांना असे चित्रांचे स्वत:चे बायबल तयार करू द्या. त्यामुळे तुम्ही गोष्टी एकमेकांना जोडू शकता. आणि तुम्हाला त्यातून शुभवर्तमान सांगायला संधी मिळत राहतात.
समजण्यासाठी कोणीच लहान नसते
या साधनांवर अवलंबून राहत असताना नेहमी लक्षात ठेवू या की: आपल्या मुलांचा येशू हा एकच तारणारा आहे. तारण हे देवाचे आहे. ते आपल्या पद्धती व शिस्तीवर अवलंबून नाही. पण देव आपले प्रयत्न त्यांना स्वत:कडे आकर्षून घेण्यास वापरेल हे न विसरता त्यांच्यापुढे सतत सत्य सादर करण्याचे प्रयत्न कमी लेखू नका. या पुस्तकातूनच ते येशूला पाहतील.
प्रेषित पौलाने म्हटले, “तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणार्यांवाचून ते कसे ऐकतील?… ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते” (रोम १०: १४, १७).
तुमच्या मुलांच्या जीवनात देवाच्या वचनाने चकित होण्यासाठी हे एक आमंत्रण म्हणून स्वीकारा; व तुम्हाला वाटणार नाही इतके तुमच्या मुलांना समजण्याची पात्रता आहे याने तुम्ही चकित व्हाल. अशा गोष्टींनीच देवाचे राज्य वाढले जाते.
Social