जॉन ब्लूम
जे दु:खात असतात ते दु:खद गोष्टी बोलत असतात. भारी दु:ख – मग ते मानसिक असो व शारीरिक, तो कधीच समतोल साधू शकणारा अनुभव नसतो. तो सर्व जीवनावर वर्चस्व करणारा अनुभव असतो. असे दु:ख आपल्याला प्रमुख असणाऱ्या बाबींमध्ये शिरकाव करून आपला दृष्टिकोन नेहमीच बदलून टाकते. जेव्हा ते शिगेला पोचते तेव्हा ज्या गोष्टी आपण कधी बोलणार नाही अशा गोष्टी आपण बोलतो.
अशा वेळी सांत्वन देणाऱ्या व्यक्तीने किंवा समुपदेशकाने समजून घेण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रागाचे, वैतागाचे अथवा निराशेचे शब्द दुखावलेल्या व्यक्तीच्या अंतरंगातून (जीवनाच्या खोलवरच्या विश्वासातून) येतात की दुखावलेल्या अंत:करणातून ( दु:खाची परिसीमा झाल्याने विचलित दृष्टिकोनातून) येतात. यामध्ये खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे.
जिवाची दु:खे
आत्यंतिक दु:ख हे कसे असते व ते आपला दृष्टिकोन कसा बदलून टाकते याचे ईयोबाचे पुस्तक हे एक उदाहरण आहे. ईयोबाने केलेल्या दु:खाच्या आरोळ्या खऱ्या आणि नुकत्याच झालेल्या दु:खाच्या आहेत. त्या आपल्याला अस्थिर करतात. जेव्हा ईयोबाचे मित्र एलीफाज, बिल्दद आणि सोफर त्याला सहानुभूती दाखवून त्याचे सांत्वन करायला आले (ईयोब २:११), तेव्हा प्राचीन जगाच्या पूर्व विभागातील सर्वात धार्मिक, सुज्ञ पुरुष (ईयोब १:३) त्याच्या विध्वंसाबद्दल काय बोलतो ते ऐका:
“मी जन्मलो तो दिवस जळो! ‘पुरुषगर्भ राहिला’ असे जी रात्र म्हणाली ती जळो!” (ईयोब३:३).
“मी गर्भाशयातच का नाही मेलो? गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला” (ईयोब३:११)?
“अकाली पतन पावलेल्या गुप्त गर्भासारखा, प्रकाश कधी न पाहिलेल्या अर्भकासारखा मी असतो” (३:१६).
“विपन्नाला प्रकाश का मिळतो? जे मनाचे दुःखी त्यांना जीवन का प्राप्त होते? ते मृत्यूची उत्कट अपेक्षा करतात, पण तो येत नाही; गुप्त निधीसाठी खणणार्यांपेक्षा ते मृत्यूच्या प्राप्तीसाठी अधिक खटाटोप करतात” (३:२०,२१).
माझ्यापेक्षा मृत जन बरे आहेत आणि मी जन्मालाच आलो नसतो तर ते किती बरे झाले असते! अशा दृष्टिकोनात फारशी सुवार्ता नाही. त्यामध्ये पूर्वीच्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता नाही, किंवा देवाचे यामध्ये काही गुप्त, महान हेतू असतील, कोणी तुमचे भले करण्याचे प्रयत्न करील अशी आशा नाही. फक्त भीती !
हे शब्द ईयोबाचा खोलवर असलेला विश्वास दाखवतात का? नाही. स्तोत्र २२ :१ मधील दाविदाचे आणि स्तोत्र ८८:१४ मधले हर्मोनाचे व ईयोबाचे शब्द हे दु:खाच्या आरोळ्या आहेत. ईयोबाच्या फोडांच्या मधून जसा पू वाहत होता तसे त्याच्या जिवाच्या दु:खातून उदासीनतेचे शब्द पाझरत होते.
भिकार सांत्वनदाते कसे होऊ नये
ईयोबाचे पुस्तक हे समुपदेशन (कौन्सिलिंग) कसे करू नये याचे एक उदाहरण आहे. हे तिघे सांत्वनदाते त्यांच्या चुकीच्या ईश्वरज्ञानासाठी (४२:७) आणि जिवाचा वैद्य म्हणून केलेल्या निष्काळजी उपचारासाठी (१६:२) प्रसिद्ध ठरले आहेत. दुष्टाईबद्दलचे त्यांचे स्पष्टीकरण अगदीच साधे होते: देव धार्मिकाला संपन्न करून आशीर्वाद देतो आणि दुष्टाईचा नाश करतो. यामुळे इयोबाच्या आध्यात्मिक स्थितीचे त्यांनी चुकीचे निदान केले. “चल ईयोबा, आता तुझे पाप कबूल कर.”
ईयोबाने त्यांचे केलेले मूल्यमापन प्रभावी होते “तुम्ही सगळे भिकार सांत्वनकर्ते आहात.” अनेक गोष्टींमुळे ते भिकार सांत्वनदाते झाले पण आपण त्यांच्या दोन चुकांकडे पाहू या; ज्या करण्याकडे आपलीही प्रवृत्ती असू शकते. सत्याचा चुकीच्या ठिकाणी वापर करणे आणि चुकीच्या वेळी निषेध करणे.
सत्याचा चुकीच्या वेळी वापर
ह्या लोकांनी म्हटलेल्या काही बाबी ईश्वरज्ञानाचे अगदी अचूक सिद्धांत आहेत. एलीफाज याचे उत्तम उदाहरण आहे. याचा उपयोग पौलाने करिंथकरांस पत्र लिहिताना केला (इयोब ५:१३; १ करिंथ ३:१९). ईयोबाचे सांत्वन करणारा तो पहिला होता. आणि त्याने म्हटलेल्या गोष्टींपैकी काही अशा:
“ पाहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य! म्हणून सर्वसमर्थाचे शासन तुच्छ मानू नकोस; कारण दुखापत तो करतो आणि पट्टीही तोच बांधतो; घाय तो करतो आणि त्याचाच हात तो बरा करतो.” (ईयोब ५:१७-१८).
आता एक विधान म्हणून हे स्पष्टपणे सत्य आहे. कारण हेच स्तोत्रे, नीतिसूत्रे , होशेय आणि इब्री लोकांस पत्र याची खात्री करून देतात.
“हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस तो धन्य” (स्तोत्र ९४:१२).
“माझ्या मुला, परमेश्वराचे शिक्षण तुच्छ मानू नकोस आणि त्याच्या शासनाला कंटाळू नकोस; कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला, तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो” (नीती३:११,१२; इब्री १२:५,६).
“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील” (होशेय ६:१).
पण ही विधाने जरी सत्य होती तरी त्यामुळे काही ठीक झाले नाही. इयोब ३ आणि ४ अध्यायांतून स्पष्ट दिसते की एलीफाजने अनुमान काढले की इयोबावर आलेली ही आपत्ती त्याने काही गुप्तपणे केलेल्या पापामुळे देवाने त्याच्यावर दयेने केलेला निषेध आहे व त्यासाठी त्याने पश्चात्ताप करण्याची गरज आहे (४:७-८). पण एलीफाजचे अनुमान चुकीचे होते. देवाची सुधारणा करणारी शिक्षा ही सोडवणूक करणारी आहे हे खरे आहे. पण ईयोबाचे दु:खसहन हे सुधारणा होण्यासाठी केलेले शासन नव्हते (इयोब १:६-१२). एलीफाजने हे सत्य चुकीने वापरले आणि त्यामुळे ईयोबाला इजा केली. आपण याची खूप काळजी घ्यायला हवी. आपल्या कलाने, आपल्या अनुभवातून काढलेल्या अनुमानामुळे समस्येचे चुकीचे निदान केले जाते व बायबलचे सत्य चूक वापरले जाते. आणि हे दुखापतीत मानहानीची भर टाकते.
चुकीच्या वेळी निषेध
ही दुसरी चूक खुद्द ईयोबानेच दाखवून दिली:
“तुम्ही शब्दाशब्दाला धरायला पाहता काय? निराश मनुष्याचे उद्गार केवळ वायफळ आहेत” (ईयोब ६:२६).
ईयोबाच्या सांत्वन कर्त्यांनी हे उदास, असमतोल, निराश, गोंधळात पाडणारे उद्गार ऐकले आणि विचार केला की यावेळी याला सुधारण्यासाठी एक चांगला डोस पाजण्याची गरज आहे.
जिवाच्या अंतरंगासाठी बोध करणे ही एक दया करणारी बाब आहे (२ तीम. ४:२), कारण चुकीचा विश्वास जीवन विस्कळीत करतो. निषेध हा जिवाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे आहे. कारण दु:खसहन करणाऱ्याचे शब्द हे सुटकेसाठी केलेला आक्रोश असतो – विश्वासाची विधाने नसतात – याला ईयोब “वायफळ उद्गार” म्हणतो.
ईयोबाच्या सांत्वनदात्यांवर टीका करणे सोपे आहे. कारण त्यांनी जे पाहिले नाही ते मोठे चित्र आता आपण पाहू शकतो. पण आपल्या जीवनाच्या खऱ्या परिस्थितीत आपण कितीदा ह्याच चुका केलेल्या आहेत आणि चुकीच्या वेळी निषेध केला आहे?
मला वाटतं ही चूक मी माझ्या मुलांच्या बाबतीत नेहमी करतो. अनेकदा मी मुलाच्या रागाच्या, दोष देणाऱ्या, बचावात्मक शब्दांचा ताबडतोब निषेध केला आहे कारण ते आतील बंडखोर वृत्तीतून आले आहेत असे मला वाटले. पण नंतर मला समजून आले की मन दुखावल्यामुळे त्याचे शब्द उसळून वर आले होते. जेव्हा मी काळजीपूर्वक अधिक चौकशी करायला हवी होती आणि धीराची, दयेची, प्रेमळ, सहनशीलतेची, सेवकाच्या ह्रदयाने, ऐकायला शीघ्र पण बोलण्यास मंद अशा रीतीने मलमपट्टी करणे जरुरीचे होते.
कुशल सांत्वनदाते फार थोडे आहेत
मनाच्या अंतरंगातून आलेले शब्द व मनाच्या दु:खातून आलेल्या शब्दातील फरक समजून घेणे सोपे नाही. मानवी मन हे गुंतागुंतीचे असते आणि जखमा ह्या चिघळतात. कुशल डॉक्टर्स घाई करत नाहीत; तसेच जिवाचे कुशल वैद्यही घाई करत नाहीत. ते काळजीपूर्वक ऐकण्यास शीघ्र आणि सावकाश काळजीपूर्वक निदान करतात (याकोब १:१९). ते विचार करून उत्तर देतात (नीति. १५:२८).
आणि कुशल सांत्वनदाते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचे शब्द योग्य (नीति. २५:११), जीवनदायी (नीति. १०:११), पोषण करणारे ( नीति. १०;२१), ज्ञानाचे (नीति. १०:३१) आणि मितभाषी (नीति. १५:२८) असतात.
कुशल सांत्वनदाते बनण्यास वेळ लागतो. पण जर आपण सहनशीलतेने आणि धीर धरून प्रीती करण्यास तयार असलो (१ करिंथ १३:४,७) आणि आपल्याच बुद्धीवर अवलंबून न राहता अनुमान काढले नाही (नीति. ३:५ ) तर आपण ईयोबाच्या सांत्वनदात्यांनी केलेल्या दीनवाण्या चुका करणे टाळू शकू.
जॉन पायपर म्हणतात, “दु:खी जिवाला निषेध करणे नाही, तर जीवाला स्थिर करणे हे आपल्या प्रीतीचे ध्येय आहे.
Social