ग्रेग मोर्स

न उमललेले फूल, न पिकलेले फळ, गर्भधारणा न झालले उदर, न उबवलेले अंडे: एक वाया गेलेले जीवन.
जे तुम्ही बोलला नाहीत आणि केले नाहीत ते बोलायला, करायला, फारच थोडा वेळ उरला आहे. तुम्ही जीवनाकडे
मागे वळून पाहता आणि विचार करता, “ मी काय केलं? किंवा कुठं गेलं ते? हा वाफा तुम्ही केला होता. कितीतरी पाकळ्या गळून पडल्यात. आठवणींचे ते काटेरी झाड धरून तुम्ही उभे आहात. काही वेगळं घडलं असतं तर …तुम्ही विचार करता. कधी झाला नव्हता असा आता तुम्हाला पस्तावा होतोय. ज्या जगात तुम्ही तुमचे जीवन घालवले ते तुम्हाला त्यातून काढून टाकण्याची दहशत घालत आहे.
तुम्हाला मुलं असतील तर ती आता टाळत आहेत. कदाचित मला क्षमा कर असे आईला सांगायला खूप उशीर झालाय. कदाचित ज्या चांगल्या जीवनाची तुम्ही अपेक्षा करत होता ते आलेच नाही. वाईट परिस्थिती, वाईट सोबत, वाईट निवडी, संपत आलेली संधी – हे सर्व कशासाठी होते?
कोणालाच आपलं जीवन वाया घालवायला नको असतं – पण आपण तसं केलंय अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर? वधस्तंभावर येशूच्या शेजारी खिळलेला चोर, ज्याने दोन हजार वर्षांपूर्वी एक उद्ध्वस्त आणि दयनीय जीवन घालवले तो फुटपाथच्या चिरेतून वाढलेल्या फुलासारखा उभा आहे. जीवनाच्या अगदी शेवटच्या पानावर, शेवटच्या ओळी लिहिताना तो दाखवत आहे की वाया गेलेले जीवन वाचवले जाते.
त्याचे शेवटले पान
त्या दिवशी उठताना त्याला किती भयानक जाणीव झाली असेल की आज आपला हा शेवटचा दिवस आहे. बहुतेक लोकांना मरणाची थंड बोटे आपल्याला कधी आवळतील याची जाणीव नसते, पण त्याला ठाऊक होते की मरण्यापूर्वीचे हे आपले शेवटचे तास आहेत. आपले शरीर हिरावून घेतले जाईल, ते निचेष्ट पडेल. त्याचा आवाज जिवंतांच्या जगात कधीच ऐकू येणार नाही – त्याच्यासाठी उद्या अस्तित्वात नव्हता. बंदीशाळेत येणारे कवडासे ऊब देत नव्हते.
“तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस; ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणार्या गवताप्रमाणे ते आहेत; सकाळी ते तरारून वाढते; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते.”
बालपणातले हे काव्य आपोआप त्याच्या मनातून वारंवार जात होते.
त्याच्यावरून सौम्य झुळूक जाणार नव्हती तर रोमी झंझावात. त्या दुष्टांनी त्याला सर्वात भयानक शिक्षा फर्मावली होती: वधस्तंभी खिळणे. शहराच्या बाहेर पुरुषांना नग्नावस्थेत गळाला अडकल्यासारखे तडफडताना पाहिल्याच्या आठवणीने त्याचा थरकाप झाला. रक्तबंबाळ, ओरडताहेत, रडत आहेत, कण्हत आहेत- आज तो त्यांच्यातला एक होणार होता.
तिघातला एक
फटके, साखळ्या आणि विटंबना त्या भयानक टेकडीकडे त्याच्याबरोबर चालली होती. त्याचा स्वत:चा विवेकही त्यातलाच एक छळवादी बनला. आपण आपले मार्ग अखेरीस बदलावे असे त्याला नेहमी वाटत असे. पण तो अखेर कधी आलाच नाही. आता त्या टेकडीवर दुष्ट लोकांचा थट्टेचा विषय बनून कष्टाने चढत असताना एक मंद आवाज त्याला आठवण करून देत होता की त्याच्यासाठी आता दुसरी संधी उरलेली नाही.
त्या दिवशी दुरुस्ती करणे शक्य नव्हते, चुका बरोबर करण्यास वेळ नव्हता. फांद्या काही जोडल्या जाणार नव्हत्या. मृत्यूदंड उलटणार नव्हता. त्याच्या हातातून जग छिनावून घेतले जात होते. काही तासच शिल्लक राहिले होते. ते तर त्याच्या दयनीय अस्तित्वाचे सर्वात वाईट क्षण होते. अखेरीस तो मरणाची याचना करणार होता.
रक्ताने माखलेले खिळे त्याच्या मनगटात घुसताना कधी न अनुभवलेल्या वेदनांच्या लाटा त्याच्यावरून जात राहिल्या. त्याचे मन त्या वेदनांच्या लाटांचा झटका अनुभवत असतानाचा दुसरा एक खिळा घुसल्याने तो व्याकूळ झाला. आपल्याला जमिनीवरून कधी उठवले हे त्याला आठवत नसताना हादरवून टाकणारा एक धक्का त्याच्या शरीराला झटका देऊन गेला आणि तो वधस्तंभ नीट रोवला गेला. त्याच्या शेजारी आणखी दोघांना असेच उभे करण्यात आले होते. शुद्धीवर येता येता त्याने सभोवार पाहिले व आपल्याभोवती एवढे लोक का जमलेत असा प्रश्न त्याच्या मनातून गेला.
एका वाया गेलेल्या जीवनातून त्याला पाहा
अनेक डोळे त्याला न्याहाळत होते. त्याचे दुष्ट मरण इतक्या जमावाने पाहण्याची काय गरज होती? सुदैवाने त्यांच्या थट्टेचा तो मुख्य विषय नव्हता. तो त्या क्रूरतेतून मागचे आठवू लागला. हा कोण माणूस होता की त्याचा ते एवढा तिरस्कार करत होते?
हे सर्व याच दिवशी घडायचे होते. ह्या मनुष्याने परूशी लोकांमध्ये खळबळ उडवून दिली होती. जो मशीहा असल्याचा दावा करत होता तो त्याच्या शेजारी टांगलेला होता. जमावाची नाखुशी टाळण्यासाठी तोही त्याचा उपहास करू लागला.
मग त्याने त्याच्या शत्रूंना बोलताना ऐकले, “त्याने दुसर्यांना वाचवले, जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःस वाचवावे.” (लूक २३:३५). जरा थांब. काय त्याचे शत्रू मान्य करताहेत की खरंच त्याने इतरांना वाचवले? हाच देवाचा ख्रिस्त त्याचा निवडलेला असेल का? जर त्याने इतरांना वाचवले तर तो मला वाचवेल का?
कदाचित हेच त्याने पहिले असेल. रडणाऱ्या स्त्रियांचा घोळका त्याच्यामागून गुलगुथापर्यंत चालत होता. हा स्वत:ला आता वाचवणार का हे पाहायला मोठा समुदाय जमा होत होता. त्याचे शत्रू त्याच्यावर हल्ले करीत राहायला त्याच्याभोवताली होते. “कोण आहे हा? त्याच्या डोक्यावर तीन भाषांमध्ये लेख लिहिला आहे की, हा यहूद्यांचा राजा आहे (लूक २३:३८). हा खरंच तो असेल का?
त्याच्या मरणाशी संबंधित दैवी घटना घडत आहेत. भर दुपारी सर्व देशभर अंधार पडला (मत्तय २७:४५). सूर्य असा काळा का पडला याचे स्पष्टीकरण काय असेल? हा असा आहे तरी कोण की त्याच्या मरणाच्या वेळी हा इतका मोठा प्रकाश आपले आसन सोडून निघून जात आहे?
शिवाय खुद्द येशू जे बोलला तेही त्याने ऐकले होते. लोक त्याची थट्टा करत होते, छळ करत होते, चेष्टा करत होते , हसत होते. त्यांच्या या उपहासाला त्याने प्रार्थनेने उत्तर दिले, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही” (लूक २३:३४). तो स्वत: तर जमावाला शाप देत होता. पण हा पुरुष – त्याच्या मांसात खिळे घुसलेले असताना – त्यांच्या क्षमेसाठी प्रार्थना करत होता. हा कोण माणूस आहे जो देवाला “बाप” म्हणतो? मी ह्या राजाच्या प्रार्थनेचे उत्तर होऊ शकतो का? माझ्या वाया जीवनातील अनेक पापांची मला क्षमा होऊ शकते का?
अखेरचे श्वास घेताना
त्याला समजले की आपल्या अंतरंगात सर्व काही बदलत आहे. शक्तिहीन होत असतानाही तो आता ह्या मनुष्यासाठी जगाचा शत्रू बनण्यास तयार होऊन बोलू लागतो.
वधस्तंभांवर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हांलाही वाचव” (लूक२३:३९). विचार न करताच त्याच्या जिवाने प्रतिकार केला आणि निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत; परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही” (लूक २३: ४०-४१).
तो स्वत: दोषी होता, पण हा माणूस नाही. त्याला योग्य शिक्षा मिळाली होती पण ह्या माणसाला नाही. तो मरणाला पात्र होता पण हा माणूस नाही.
आतापर्यंत जीवनात कोट्यावधी श्वास त्याने वाया घालवले होते. आता अखेरच्या काही श्वासांसाठी धापा टाकताना तो म्हणतो, “अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा” (लूक २३:४२). आणि त्या मरणाऱ्या राजाकडून या नालायक दासासाठी जे शब्द आले त्यामुळे त्याचे वाया गेलेले अस्तित्व भरून टाकले. येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील” (लूक २३:४३). त्याच्या अत्यंत दयनीय अस्तित्वाच्या शेवटी त्याला त्याच्या जीवनाचे कारण समजले: येशू ख्रिस्त.
वधस्तंभाच्या सावलीत
तुम्ही तुमचे जीवन वाया घालवलेआहे का? तुम्ही ते वाया घालवत आहात का? एकदा दुष्ट असलेल्या या माणसाच्या मागून तारणाऱ्याकडे जा. कदाचित तुम्ही ज्ञानाचा, बुद्धीचा अविचाराने दुरुपयोग केला असेल. आता त्याच्याकडे जा. अजूनही तो तुमचे स्वागत करील. तुम्ही येशूवर विश्वास ठेवता क्षणीच स्वर्गात आनंद केला जाईल (लूक १५:७)
जर तुम्ही तुमचे जीवन वाया घालवले असेल ते समजून घ्या की, दुसरे एक जीवन अजून पुढे आहे. अनेक पाने उरली आहेत. जर तुम्ही आपल्या पापांचा पश्चात्ताप करून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर, जरी गौरवात प्रवेश करताना फक्त पस्तावाच घेऊन जात असला तरी या जगातल्या राजांपेक्षा, कीर्ती मिळवलेल्या लोकांपेक्षा खूप चांगले जगला आहात. तो स्वत: जीवन आहे. आणि जे त्या पश्चातप्त चोरासारखे चांगल्या रीतीने मरतात ते वधस्तंभाच्या सावलीत शांतीमध्ये मरतात.
Social