जनवरी 22, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आपल्या जीवनकाळात येशू पुन्हा येईल का?

लेखक: स्टीफन विटमर

येशूच्या काळापासून लोक दावा करत आहेत की अखेरच्या दिवसातील घटना त्यांच्या स्वत:च्या दिवसातच होणार.

१९व्या शतकात विल्यम मिलर नावाच्या एका बायबल पंडिताने येशू मार्च २१, १८४४ या दिवशी येणार असा दावा केला. तसे काही घडले नाही. वसंत ऋतू आला आणि गेला पण येशूच्या येण्याचे चिन्ह दिसेना. मिलरने ठरवले की त्याचा हिशेब चुकला होता आणि हा उशीर ही देवाची योजना होती. शेवटी त्याने ऑक्टोबर १८४४ ही तारीख ठरवली पण पुन्हा तीही चूक ठरली. त्याच्या अनुयायांची चेष्टा करण्यात आली. काही जणांना आर्थिक हानी सोसावी लागली कारण या नजीकच्या येण्याची बातमी पसरवण्याचे काम करण्यासाठी त्यांनी त्यांच्या नोकऱ्या सोडून दिल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांची कापणी सोडून दिली, तर काहींनी आपली मालमत्ता देऊन टाकली होती. मिलरच्या ह्या भविष्याच्या अपयशाला “महान निराशा” असे म्हटले गेले पण यातून सेवन्थ डे अॅडव्हेन्टिस्टचा उगम झाला.

आता १९८८कडे फास्ट फॉरवर्ड करा. एडगर वाईसनंट ह्या नासाच्या माजी रॉकेट इंजिनियरने एक पुस्तक लिहिले. त्याचे नाव होते “दुसरे येणे १९८८ मध्येच का  होईल याची ८८ कारणे.” यामध्ये त्याने येशू ११ ते १३ सप्टेंबरच्या दरम्यान येणार आणि ३ ऑक्टोबरच्या सूर्यास्ताला महान संकटाचा काळ सुरू होईल असा दावा केला. अमेरिकेतील दक्षिण भागातल्या काही लोकांनी त्यांच्या नोकऱ्या सोडून दिल्या, घरे विकली आणि ही भाकीत केलेली वेळ येण्यापूर्वी स्वत:ला प्रार्थनेसाठी पूर्णपणे वाहून दिले. सप्टेंबर महिना शांतपणे उलटून गेला. ऑक्टोबर ३ चा सूर्य मावळला व पुन्हा ४ ऑक्टोबरचा सूर्योदय झाला. महान संकटाचे काहीही चिन्ह नव्हते. वाईसनंटने पुन्हा हिशेब केला या वेळेला त्याने सप्टेंबर १९८९ मध्ये शेवट येईल असे भाकीत केले, नंतर १९९३ मध्ये, त्यानंतर १९९४ मध्ये. २००१ मध्ये खुद्द तोच मरण पावला.

हे असे होतच राहत आहे. अशा चुकलेल्या भाकितांची चेष्टा करणे सोपे आहे. पण सुवार्तावादी ख्रिस्ती लोकांमध्ये एक वाढता स्वीकारला जाणारा एक कल आहे त्याला “सूचित दिनांक पुढे करणे” असे म्हणतात. येशूच्या येण्याची कित्येक जण एक ठराविक तारीख देत नसले तरी ते दावा करतात की ते इतिहासाच्या अगदी शेवटच्या काळात राहत आहेत आणि बायबलच्या ठराविक भाकिताशी जोडून आपल्या दाव्याला ते आधार देतात. अमेरिकेतील सुवार्तावादी जनांतील एक तृतीयांश लोक ह्या जगाचा शेवट आपण पाहणार असा विश्वास ठेवतात. मला अनेक ख्रिस्ती लोकांनी सांगितले आहे की त्यांच्या या पिढीमध्ये येशू येणार अशी त्यांची श्रद्धा आहे.

तर या सूचक आणि स्पष्ट तारखा ठरवण्याला आपण कसा प्रतिसाद द्यायचा?

येशूच्या येण्याच्या तारीख समजून घेण्याचे प्रयत्न घेण्याची होकारात्मक बाब आपण प्रथम मान्य करायला पाहिजे. ती म्हणजे ते येशूच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतात व प्रचार करतात. येशूसाठी असलेली ह्या त्यांच्या अस्वस्थतेची आपण प्रशंसा करायला पाहिजे. आपल्याला ह्या प्रकारची उत्सुक भावना नाही हे आपण मान्य करायला पाहिजे. तथापि यातले बरेच प्रयत्न आत्मा म्हणत असलेल्या येशूच्या शब्दांकडे दुर्लक्ष करतात “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांना नाही, पुत्रालाही नाही” (मत्तय २४:३६). गेली दोन हजार वर्षे येशूच्या नजीक येण्याचे दाव्यानंतर दावे हे चुकीचे ठरले गेले आहेत आणि येशूचे शब्द खरे ठरले आहेत.

तारखा ठरवण्यात असलेल्या तीन समस्या

तारखा ठरवण्याचे प्रयत्न (सूचक आणि स्पष्ट दोन्ही) बायबलनुसार येशूची वाट पाहण्याच्या पद्धतीला तीन प्रकारे क्षीण करतात.

१. तारखा निश्चित करण्याने शेवटच्या काळासाठी एक प्रकारची अस्वस्थता निर्माण केली जाते यामुळे धीर धरण्यास नाउमेद केले जाते. जेव्हा नव्या कराराचे लेखक टाहो फोडतात, “ये प्रभू येशू!” तेव्हा त्यांचा नेहमी हाच दृष्टिकोन असतो की येशू तेव्हाच येईल जेव्हा देवाची तो जेव्हा यावा अशी इच्छा असेल आणि ते नक्की केव्हा हे आपल्याला माहीत नाही. येशूच्या येण्याच्या तारखेबद्दलच्या आपल्या अज्ञानामध्ये तीव्र अपेक्षा आणि नम्र धीर ही समाविष्ट हवीत. पण जेव्हा ख्रिस्ती लोक आपण हे सर्व “शोधून काढले आहे” आणि आपण त्या शेवटच्या दिवसात आहोत असा विश्वास ठेवतात तेव्हा ही नम्रता व धीर ढासळला जातो.

२. तारखा निश्चित करण्याने फलदायी जीवन जगण्यास नाउमेद केले जाते. जेव्हा हे तारखा ठरवणारे प्रभावी लोक आपल्या अनुयायांना काही निश्चित तारखा देतात तेव्हा ते त्यांना अकार्यक्षम करतात. अनुयायांनी आपली बँकेची खाती रिकामी केली आहेत, नोकऱ्या सोडून दिल्या आहेत. आपली साधने जी देवाच्या राज्यासाठी चांगल्या रीतीने वापरता आली असती ती वाया घालवली आहेत. येशूचा उद्देश अगदी याविरुद्ध होता. शेवटच्या दिवसांचे शिक्षण देणाऱ्या मार्क १३ या अध्यायाच्या शेवटी येशू उपयोगी असण्याबद्दल एक गोष्ट सांगतो. तो सांगतो एक मनुष्य प्रवासाला गेला. दासांच्या ताब्यात सर्व त्याने काही दिले आणि पहारेकऱ्याला जागे राहण्यास सांगितले. यानंतर येशूने शिष्यांना दक्ष राहण्यास सांगितले कारण तो पुन्हा केव्हा येणार हे त्यांना ठाऊक नव्हते. या संदर्भात जागे राहणे याचा अर्थ असा नाही की येशू केव्हा येणार हे शोधून काढणे; तर येशू येईल तोपर्यंतच्या काळात आपापल्या जीवनातील जबाबदाऱ्या पूर्ण करीत राहणे.

३. तारखा ठरवणे हा नियंत्रण घेण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या घटनेची वेळ ठाऊक नसताना तिची वाट पाहत राहणे हे अस्वस्थ करणारे व आव्हानात्मक असते. असे दिसते की आपण असे अस्वस्थ राहावे अशी येशूची इच्छा आहे कारण आपण त्याच्या येण्यासाठी नेहमीच तयार असावे असे त्याला वाटते. दहा कुमारींच्या दाखल्याचा समारोप असा आहे; “परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल” (मत्तय २५:१३). बर्कोवर या बायबल पंडिताने एकदा म्हटले, “येशूच्या येण्याची वेळ आपल्याला शोधून काढायची नाही तर आपल्या सध्याच्या जीवनाला फलदायी रीतीने आकार देत त्याच्याबरोबर राहायचे आहे”

येशूसाठी वाट पाहणे

सूचक अथवा स्पष्ट तारखा ठरवून त्यानुसार येशूच्या येण्याची वाट पाहणे हा त्यावर नियंत्रण मिळवण्याचा मानवी प्रयत्न आहे. तारीख निश्चित केल्याने तो केव्हा येणार हे न समजल्याने होणारा अस्वस्थपणा व बेडौल अनिश्चितपणा बाजूला सारला जातो, मग ती तारीख निश्चित अथवा अंदाजे दिलेली असो. पण आपल्याला तारखेची खात्री आहे म्हणून येशूच्या येण्याची वाट पहावी अशी देवाची इच्छा नाही तर आपण त्याच्या अभिवचनावर विश्वास ठेवतो म्हणून. प्रेषित पेत्राने आपण कोणत्या प्रकारे वाट पहावी हे सांगितले आहे: “तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते असे ‘नवे आकाश’ व ‘नवी पृथ्वी’ ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत” (२ पेत्र ३:१३).

जेव्हा आपले वाट पाहणे हे देवाच्या अभिवचनावर आधारित असते तेव्हा आपण ज्याने हे अभिवचन दिले आहे त्याच्यावर अवलंबून राहून आपला आत्मविश्वास दृढ करतो. ही ख्रिस्ती लोकांसाठी चांगली बातमी आहे. कारण हा अभिवचन देणारा देव हा इतिहासाचा सार्वभौम प्रभू आहे. आणि म्हणून आपण त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहू शकतो. आपली खात्री ही देवाच्या स्वभावातून निर्माण होते आपल्या हिशेबाच्या अचूकतेतून नव्हे. येशूचे येणे हे सोडवायला दिलेले कोडे नसून देवावर विश्वास ठेवण्याचे एक अभिवचन आहे.

देवाच्या अभिवचनावर वाट पाहण्याने नम्रता व आशा निर्माण होते. नम्रता, कारण अशा प्रकारची वाट पाहणे येशूचे परत येणे हे कोणत्या गुप्त सांकेतिक लिपीत किंवा आधुनिक घटनांशी संबंध लावण्यात देवापासून आपल्याला दूर नेत नाही. येशू परत येणार ह्याची खात्री ही फक्त देवाच्या वचनावर विसंबून राहण्यानेच येते आणि याचा अर्थ आपण देवावर अवलंबून राहतो. हे आपल्याला अशा खोल जाणीवेशी आणते की आपण हे घडवू शकत नाही आणि घडवणार नाही. हे केवळ देवावरच अवलंबून आहे. हे सत्य आपल्याला नम्र करते.

पण देवाच्या अभिवचनाच्या आधारावर वाट पाहण्याचा पाया आशाही निर्माण करतो. कारण त्याचा अर्थ आपल्या वाट पाहण्याचा पाया ही केवळ एक इच्छा नाही, हे खात्रीने देवाच्या स्वभावाशी निगडित आहे. प्रेषित १:१०-११ दोन दूतांनी येशू आकाशातून परत येण्याचे अभिवचन दिले. जसजसे आपण या अभिवचनाला धरून राहतो आणि आपले जीवन त्यावर उभारतो तसे हे अभिवचन आपल्यामध्ये महान आशा निर्माण करते. ते एक बायबलनुसार भक्कम आशा देते की शेवटच्या दिवशी आपल्याला दोषी ठरवले जाणार नाही कारण आपला वकील जो येशू हा आपल्याला देवाच्या भावी क्रोधापासून सोडवील (१ थेस. १:१०).

Previous Article

ख्रिस्त तुमचा प्रभू आहे का?

Next Article

पक्षांपासून सावध राहा

You might be interested in …

आमच्या अशक्तपणात आमच्यामध्ये कार्य करण्यास देवाला आवडते

ट्रेवीस मायर्स गेल्या मार्चमध्ये माझ्यावरचा कॅन्सरचा उपचार संपला तरीही मला खूपच अशक्त वाटत होते. पूर्ण वेळ प्रोफेसर म्हणून माझे काम तसेच माझे घरातील व मित्रांशी असलेले  नातेसंबंध  या सर्व जबाबदाऱ्या पार पडण्यास मी मर्यादित आहे […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर  

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.  अनुवाद : क्रॉसी उर्टेकर   प्रकरण ६ वे परिश्रमांचा […]

लेखांक ३: जेव्हा देव अन्यायी वाटतो

जॉनी एरिक्सन टाडा (लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या  वर्षी  पोहोण्यासाठी उडी मारताना जोनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतर नवी  कौशल्ये व अशा स्थितीमध्ये असलेल्यांना मदत […]