जनवरी 15, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक १२

 दानिएलाचे सत्तर सप्तकांचे भाकीत –  दानीएल ९:२४-२७.

हे भाकित बायबलच्या बहुतेक भाकितांचा कणा आहे. येशूने मत्तय २४:१५ मध्ये केलेले, २ थेस्स. २ मधील पौलाने केलेले, योहानाने प्रकटी ११-१३ अध्यायांमध्ये केलेले वर्णन याच वचनांचा संदर्भ घेते. म्हणून या भाकिताचा अर्थ समजून घेऊ या.

सत्तर सप्तके – एक वर्ष चंद्रानुसार केलेल्या कॅलेंडरप्रमाणे ३६० दिवसांचे आहे. एक सप्तक हे सात वर्षांचे आहे. दानीएल ९:२ मध्ये आपण वाचतो की इस्राएलांचा बाबेलच्या बंदिवासाचा काळ संपत आला आहे असे दानिएलाच्या लक्षात आले. यिर्मया २५:१२; २९:१० नुसार त्या बंदिवासात पडायचे कारण हे होते की, लेवीय २५ मध्ये देवाने लावून दिलेला शब्बाथवर्ष पाळण्याविषयीचा नियम ७० वेळा इस्राएलांनी पाळला नव्हता; व भूमीला दर सात वर्षानी विसावा दिला नव्हता व  देवाच्या पुरवठ्याचा त्या काळात विलक्षण अनुभव घेतला नव्हता. म्हणून देवाने बंदिवासाची ही सत्तर वर्षे भूमीच्या विसाव्यासाठी योजली होती. यामुळे दानिएलास आपण ९:३-१९मध्ये आपल्या हातून देवाविरुद्ध झालेल्या पापाबद्दल राष्ट्राच्या वतीने पश्चात्तापयुक्त होऊन पापांगिकार करताना पाहतो. तेव्हा गब्रिएल देवदूत दानिएलाला प्रगट होऊन इस्राएलांच्या भावी काळाचे वरील भाकीत वरील वचनांमध्ये सांगतो असे आपण पाहातो. ‘तुझे लोक’ व ‘तुझे पवित्र नगर’ हे शब्दप्रयोग इस्राएल लोक व यरुशलेमेस उद्देशून वापरले आहेत. यिर्मया २५:१२ मधील ‘यरुशलेम ओसाड करण्याचा काळ’ संपत आल्याचे दानिएलाच्या लक्षात ९:२ मध्ये आले. मग गब्रीएल कोणत्या सत्तर सप्तकांविषयी बोलत आहे हा अभ्यासाचा विषय आहे. एक सप्तक म्हणजे ७ वर्षे या हिशेबाने ७० गुणिले ७ = ४९० वर्षांच्या हिशेबाविषयी तो बोलत आहे. हे स्पष्ट आहे. प्रत्येक वचन आपण अभ्यासू.

या काळाचे परिणाम आधी नमूद केले आहेत.
१- आज्ञाभंगाची समाप्ती करणे.
२- पातकांचा अंत करणे.
३- अधर्माबद्दल प्रायश्चित्त.
४- सनातन धार्मिकता उदयास आणणे.
५- दृष्टान्त व संदेश मुद्रित करणे
६- परमपवित्र स्थानाला अभिषेक करणे. ( मूळ भाषांतर )

यातील पहिले तीन परिणाम इस्राएलांच्या पापांचा विध्वंस करण्यासंबंधी आहेत. तर शेवटचे तीन परिणाम राज्याच्या सकारात्मक  विकास कार्यासंबंधी आहेत. ती मशीहाच्या राज्यात धार्मिकता वसण्याविषयी आहेत. वचनातील या सर्व अभिवचनांची पूर्तता करून झाल्यावर मग यरुशलेमाच्या मंदिराला अभिषेक केला जाण्याविषयी आहेत. यापैकी पहिले तीन परिणाम येशूच्या पहिल्या आगमनसमयी त्याचे मरण व पुनरुत्थानाने घडून आले आहेत. तरी इस्राएलांना राष्ट्र म्हणून त्या परिणामांचे लागूकरण भावी काळी होणार आहे. तर उरलेल्या तीन परिणामांची पूर्तता ख्रिस्ताच्या द्वितीयागमनसमयी होणार आहे. अजून इतिहासात सार्वकालिक धार्मिकता उदयास आलेली नाहीये. वचनातील सर्व भाकितांची पूर्तता झालेली नाही. यरुशलेमातील मंदिराचा अभिषेक झालेला नाही. हे सर्व येशूच्या हजार वर्षांच्या राज्यात होणार आहे.

वचन ९:२५ नुसार या ४९०वर्षांची सुरुवात यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा दिल्यापासून झाली आहे. ही आज्ञा ख्रि.पू. ४४५ मध्ये अर्तहशस्त राजाने जाहीरनामा काढून दिली. त्यात यहुद्यांनी मायदेशी जावे व यरूशलेमेच्या जीर्णोद्धाराचे कामही करावे असे आदेश होते. नहेम्या २:१-८. हे यरुशलेमेच्या जीर्णोद्धाराचे कार्य ४९ वर्षे म्हणजे ७ सप्तके चालले. त्या काळात नहेम्याने यरुशलेमेच्या वेशी व कोट बांधून काढले. नहेम्याचा कार्यकाळ येथे संपला. येथपासून पुढे ६२ सप्तके म्हणजे ६२ गुणिले ७= ४३४ वर्षांचा काळ म्हणजे हा काळ येशूच्या यरूशलेमेतील प्रवेशाच्या घटनेपर्यंत म्हणजे इ. स.३० पाशी येऊन थांबतो. म्हणजे ही ६२ सप्तके झाल्यावर येशू ख्रिस्त या अभिषिक्ताचा वध झाला. हे ९:२६ मध्ये स्पष्ट होते. येथवर ७ सप्तके व ६२ सप्तके मिळून ६९ सप्तके होतात म्हणजे ७०-६९  =१ असे एक सप्तक उरते. म्हणजेच ४९ वर्षे व ४३४ वर्षे मिळून ४८३ वर्षे होतात. आणि ४९०-४८३= ७ अशी ७ वर्षे उरतात.

पुढचे वाक्य आहे, ‘त्याला काही उरणार नाही’. ह्या वाक्याने धक्का बसला ना? मुळात या वाक्याचा अर्थ असा आहे; मशीहा आला, वधलाही गेला. म्हणजे काहीही विशेष न घडता मरण पावला. म्हणजे या जगात त्याने राज्य स्थापले नाही, सार्वकालिक नीतिमत्ता घडून आली नाही. आणि मग वचनातील पुढची वाक्ये ६९ सप्तकानंतर जे काही घडेल त्याचे वर्णन करतात. “जो अधिपति येईल, त्याचे लोक नगर व पवित्रस्थान उद्ध्वस्त करतील. त्याचा अंत पुराने होईल. युद्ध अंतापर्यंत चालेल सर्व काही उजाड होण्याचे ठरले आहे.” हे यरुशलेमाच्या विनाशाचे वर्णन आहे. इ. स. ७० साली रोमी लोकांनी यरुशलेम व यहूदी मंदिरावर हल्ला करून ती उद्ध्वस्त केली. लूक २१:२०–२४. ९:२६ मधील ‘अधिपति,  त्याचे लोक’ हे शब्द ख्रिस्ताविरोधी व त्याच्या लोकांना उद्देशून आहेत. ख्रिस्त व त्याच्या लोकांना उद्देशून नाहीत. तो पवित्र स्थान उद्ध्वस्त करणार आहे. येशू व त्याच्या लोकांनी हे असले काही केले नाही.  हे २७ व्या वचनावरून अधिक स्पष्ट होते. तो इस्राएलांबरोबर एक सप्तकाचा म्हणजे ७ वर्षांचा करार करील. त्या उरलेल्या एक सप्तकाविषयी हे म्हटले आहे. हे भावी काळी घडणार आहे. दानीएल ७:८ मध्ये त्याला ‘लहान शिंग’ अशी उपमा दिली आहे. तर दानीएल ११:३६ मध्ये  ‘मनास येईल तसे वर्तणारा … उन्मत्त’ असेल असे त्याचे वर्णन आहे. ‘हे युद्ध अंतापर्यंत चालेल, सर्व काही उजाड होण्याचे ठरले आहे.’ हे वर्णन स्पष्ट करते की यरुशलेमाच्या विध्वंसानंतरही यरुशलेमाचे क्लेश व संकटे चालूच राहतील. ७० सालापासून ते आजही इस्राएलांसंदर्भात असे घडत आहे. लूक २१:२४ मध्ये याविषयी येशूने स्वत: भाकीत केले आहे की, यरुशलेमाच्या बंदिवासाच्या  ७० सालच्या विध्वंसानंतर विदेश्यांचा काळ सुरू झाला आहे. तो काळ संपेपर्यंत इस्राएलांना पायाखाली तुडवतील.

दानीएल ९:२७ मध्ये म्हटले आहे की ‘तो पुष्कळ लोकांबरोबर एक सप्तकाचा करार करील. हे पुष्कळ लोक म्हणजे इस्राएल लोक होय व हेच ते उरलेले एक सप्तक. किंवा ७ वर्षे. ह्याखेरीज कोणताही अर्थ लावला तर संपूर्ण ऐतिहासिक संदर्भाचा विपर्यास होईल. आजपर्यंत रोमी सत्ता व इस्राएल लोक यांच्यामध्ये असा ७ वर्षांचा पक्का करार कधीही झालेला नाही. पुढे म्हटले आहे की अर्धा म्हणजे साडे तीन वर्षांचा काळ संपताच हा पुढारी करार मोडील. ‘तो यज्ञ व अन्नबली बंद करील. ओसाडी करणारा अमंगळाच्या पंखावर आरूढ होऊन येईल’. दानीएल ९:२७; १२:११. मंदिराच्या क्षेत्रात तो अमंगळता स्थापित करील. येशू मत्तय २४:१५ मध्ये म्हणतो, ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात उभा असलेला तुम्ही पहाल.’ पुढे दानीएल ९:२७ मध्ये म्हटले आहे, ‘ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणार्‍यावर कोपाचा वर्षाव होईल.’ २थेस्स २:३ व ८ मध्ये म्हटले आहे, ‘अनीतिमान पुरुष प्रकट होईल. त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील. आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील.’

६९ वे व ७० वे सप्तक यांच्या मधला काळ

आपण पाहिले की ४८३ वर्षांचा काळ इ. स.३० मध्ये येशूच्या मरणाने संपला. मग लागलीच ७ वर्षांचा काळ संपला का? याचे सविस्तर उत्तर :
१) वरील दोन सप्तकांमध्ये काळ गेला आहे असे दिसते. येशूचे पहिले व दुसरे आगमन यात महत्त्वपूर्ण काळ गेलेला दिसतो. जखर्‍या ९:९ मधील येशूचे गाढवीच्या शिंगरावरून यरुशलेमात प्रवेश झाल्याचे भाकित पूर्ण झाले. ९:१० मधील येशूच्या राज्याच्या वर्णनाचे भाकित भावी काळी पूर्ण होणार आहे. ‘तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल, त्याचे अधिपत्य…समुद्रावर…फरात…दिगंतापर्यंत चालेल.’ हे येशूच्या यरुशलेम प्रवेशानंतर लगेच पूर्ण झाले नाही. म्हणजेच मध्ये काळ गेला आहे. तो काळ दानीएल ९:२४-२७ मध्ये विचारात घेणे अगत्याचे आहे.  
(२) दानीएल ९:२६ नुसार मशीहाचा वध होईल तो ६२ सप्तके संपल्यावर. ६२ व्या शतकाच्या आरंभी नव्हे किंवा शेवटी ही नव्हे. त्यामुळे या दोन सप्तकांमध्ये अंतर असल्याचे त्या वचनातच स्पष्ट दिसते         
(३) दानीएल ९:२६ च्या भाकितानुसार यरुशलेमाचा नाश ६९ सप्तके संपल्यावर इ .स. ७० मध्ये  झाला. जर या दोन सप्तकात अंतर नसते तर ७० वे सप्तक इ. स. ३० नंतर लगेचच संपायला हवे होते. पण मंदिर व यरुशलेम तेव्हा ३० साली नाश पावलेच नाही. तर ४० वर्षांनंतर नाश पावले. मधल्या काळात हे घटना घडली.
(४) अजून दानीएल ९:२४ मधील ६ गोष्टी इस्राएल राष्ट्राबाबत  घडलेल्या नाहीत.  येशूने केलेल्या बलिदानाचा आशीर्वाद अजून इस्राएल राष्ट्राने घेतला नाही. बरीच भाकिते पुढची पूर्ण झाली नाहीत.
(५) सप्तकाचे ९:२७ मधील वर्णन पूर्ण झालेले नाही.
(६) येशूने स्वत: मत्तय २४ व २५ मध्ये भावी काळाचे भाकित दिले आहे.
(७) सुमारे ७० साली भावी काळाचा तपशील देणारे प्रकटीकरणाचे पुस्तक येशूने खुद्द पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिखित स्वरूपात दिले. दानिएलाचे भाकीत ते तपशीलवार ६-२० अध्यायात उलगडून सांगते. तो काळ दाराशी ठेपला आहे. आपण त्या सप्तकाच्या समीप आहोत.  

                                                           
                                                         
प्रश्नावली                                                                                                 

प्रश्न १ला – विवेचनाच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.                                                          

१- कोणत्या ३ शास्त्रभागांमध्ये दानीएल ९:२४-२७ चा संदर्भ घेतला आहे?                                                  
२- इस्राएल राष्ट्र ७० वर्षांच्याच बंदिवासात पडण्याचे कारण काय?                                                         
३- ७० सप्तकांच्या काळाचे ६ परिणाम कोणते? त्यांची विभागणी कशी होते?                                         
४- पहिले ३ परिणाम केव्हा पूर्ण झाले? दुसरे ३ केव्हा पूर्ण होतील?                                                              
५- त्यातील सर्व अभिवचने पूर्ण झाल्यावर काय होणार?                                     
६- या वचनानुसार अजून इतिहासात काय घडलेले नाही? ते केव्हा होणार?                                                    
७- अर्तहशस्तच्या जाहीरनाम्यात कोणते आदेश होते?                                     
८- सात सप्तके कशी संपली?                                                                              
९- ६२ सप्तकांचा काल कोठे संपतो? तेव्हा काय झाले?                                                           
१०- १ सप्तक कसे उरते? ती सात वर्षे केव्हा येणार?                                                                                    
११- ‘ त्याला काही उरणार नाही’ या शब्दप्रयोगाचा अर्थ काय?                                                    
१२- ‘ जो अधिपति येईल —– ठरले आहे’ (दानी. ९:२६) हे कशाचे वर्णन आहे?                                                      
१३- ‘अधिपती व त्याचे लोक’ हे कोणाला उद्देशून आहे? कोणाला उद्देशून नाही? ते काय करणार आहेत?                                                                                                        
१४- विदेश्यांचा काळ केव्हापासून सुरू झाला?                                                                            
१५- एक सप्तकाचा करार कोणाशी होईल? तो केव्हा मोडला जाईल?                                                              
१६- त्याचा शेवट कसा होईल? २ थेस्स २:३-८                                                                     

प्रश्न २ रा. कंसातील व्यक्तींची नावे योग्य वर्णनापुढे लिहून सांगा बरे मी कोण?
(नहेम्या, दानीएल, गब्रीएल, येशू अर्तहशस्त, ख्रिस्तविरोधी)

१- जीर्णोद्धाराचा जाहीरनामा काढणारा ——
२- बंदिवासाचा काळ संपल्याचे ओळखणारा—-        
३- आत्म्याच्या प्रेरणेने प्रकटीकरणाचा लिखित संदेश देणारा—–
४- पवित्र स्थान उद्ध्वस्त करणारा —–
५- यरुशलेमेच्या वेशी व कोट बांधून काढणारा——
६- सत्तर सप्तकांचे भाकित सांगणारा—                                 

प्रश्न ३रा. अ – पुढील वर्णनांपुढे कंसातील योग्य संदर्भ लिहा.

( दानी ९:२४-२७, यिर्मया २९:१० व लेवीय २५; दानी. ९:३-१९, नहेम्या २:१-८)                                                                      

१- शब्बाथ वर्ष न पाळणे हे ७० वर्षांच्या बंदिवासाचे कारण—–                                                
२- जीर्णोद्धाराच्या कामाचे आदेश—-                                                          
३- बायबलच्या बहुतेक भाकितांचा कणा ——                                                   
४- दानिएलाचा पापांगिकार—–                                                                                                

ब- पुढील वर्णनांच्या जोड्या लावा- (I) गटाचे क्रमांक (II) गटाच्या योग्य वर्णनापुढे लिहा.                                
गट (I) १- लहान शिंग २- ख्रिस्ताविरोधी ३- अंतापर्यंत चालणारे युद्ध ४- पापांगिकाराची प्रार्थना करणारा
५- अभिषिक्त ६- तुझे लोक व तुझे पवित्र राष्ट्र                                                                   

 गट (II)  यरुशलेमेचे क्लेश व संकटे चालूच—-, दानीएल——, मनास येईल तसे वर्तन —–,                     
इस्राएल व यरुशलेम ——, ख्रिस्तविरोधी —-, येशूख्रिस्त——                                                                                

प्रश्न ४ था – पुढील जोड्या जुळवा.  गट अ चे क्रमांक गट ब मधील योग्य जोडीला द्या.                              

अ गट. १- ३६० दिवस, २-४८३ वर्षे, ३-४३४ वर्षे, ४-७ वर्षे, ५- ७० वर्षे बंदिवास, ६- ४९० वर्षे,                                      
७- ४९० वर्षांची सुरुवात, ८-ख्रि. पू. ४४५,  ९- शब्बाथ वर्ष                                                         

ब गट.  ७० शब्बाथ वर्षे गुणिले ७—–, यरुशलेमाचा जीर्णोद्धाराची आज्ञा दिल्यापासून सुरुवात—-,  ६९ सप्तके——, अर्तहशस्तचा  जाहीरनामा—–.दर ७ व्या वर्षी भूमीला विसावा—-, ६२ सप्तके—–, दर ७व्या वर्षी भूमीला विसावा—-, सप्तक —-, ७० वेळा शब्बाथ वर्ष मोडले—–, चंद्रावरून कॅलेंडर —-

Previous Article

विचलित, विकृत, फसवेगिरी

Next Article

असहाय गरजू असे चर्चला या

You might be interested in …

राजा होण्यास लायक असा पुत्र

स्कॉट हबर्ड बायबलचे अनेक वाचक मत्तयाच्या शुभवर्तमानाकडे जातात, अगदी उत्सुकतेने आणि निर्धाराने. पण ते पहिल्या सतरा वचनांमध्येच ठेच खातात. आम्ही एका कहाणीची अपेक्षा करत होतो. एक नाट्यमय गोष्ट, देवदूत, मागी लोक, आणि बेथलेहेमेत जन्मलेलं बाळ; […]

मोफत अश्लीलतेची महागडी किंमत

ओवेन स्ट्रेशन ( मोबाईलचे बटन दाबताच अश्लील चित्रे समोर उभी करणारा हा  काळ आहे. या व्यसनामध्ये  फक्त तरुण पिढीच नव्हे तर प्रौढ जन व लहान मुलेही अडकलेली दिसतात. ख्रिस्ती लोकही याला अपवाद नाहीत. मंडळी याची […]