डॉन व्हिटनी
देवाशी अगदी विश्वासू असलेल्या लोकांनाही थांबून आपल्या जीवनाची दिशा काय आहे याचा आढावा घ्यावा लागतो. खरं तर न थाबता, एका व्यस्त आठवड्यातून दुसऱ्या आठवड्यात जाणे आणि आपण कुठे चाललोत याचा विचार न करणे सोपे आहे.
एकदा देवाचे लोक त्यांच्या व देवाच्या नातेसंबंधाविषयी बेफिकीर झाले असताना, देवाने हाग्गय संदेष्ट्याद्वारे त्यांचा निषेध करून म्हटले, “सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा” (हाग्गय १:५). त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी चालू होत्या त्याकडे लक्ष देण्यास त्याने आग्रह केला आणि देवाने जे सांगितले त्याच्या प्रकाशात त्यांच्या आध्यात्मिक निष्काळजीपणाचे मूल्यमापन करण्यास सांगितले.
आठ प्रश्न
नव्या वर्षाच्या आरंभी थांबून, वर पाहून आपण नक्की कुठे आहोत हे पाहण्याची गरज आहे. आपले मार्ग तपासण्याची गरज आहे. त्यासाठी देवाच्या सान्निध्यामध्ये राहून खालील प्रश्न विचार करण्यासाठी दिले आहेत.
१. देवाबरोबरच तुमचा आनंद वाढवण्यासाठी या वर्षी कोणती एक गोष्ट तुम्ही कराल?
देवाबरोबरचा आपला आनंद प्रामुख्याने त्याने दिलेल्या कृपेद्वारेच आपल्याला मिळतो. त्याने आपल्याला अभिवचन दिले आहे की त्याच्या वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे आणि मंडळीद्वारे तो आपल्याला सतत आशीर्वाद देतो. मला एक सूचना करायला आवडेल की तुमच्या रोजच्या वाचनाबरोबरच बायबलच्या एका भागावर मनन करा. केवळ वाचन करण्यापेक्षा मनन केल्यामुळे ते आठवणीत ठेवण्यास मदत होते.
२. कोणती अशक्य प्रार्थना तुम्ही कराल?
“परंतु देव” या शब्दांनी सुरू होणारी कितीतरी विधाने बायबलमध्ये आहेत. उदा. “परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला” (रोम ५:८). जी परिस्थिती मानवाच्या दृष्टीने अशक्य होती ती “परंतु देव” यामुळे बदलून गेली. (इफिस २:१-७ वाचा.) येणाऱ्या वर्षात “परंतु देव” अशी कोणती प्रार्थना तुम्ही करणार?
३. तुमचे कौटुंबिक जीवन सुधारण्यासाठी कोणती महत्त्वाची गोष्ट तुम्ही करणार?
जर तुमच्या कुटंबात दररोज कौटुंबिक प्रार्थना होत नसेल तर ही सर्वात उत्तम सुरुवात होईल असे मी सुचवतो. दिवसातून पंधरा मिनिटे एकत्र येऊन, गाणे गाऊन, बायबल वाचून प्रार्थना करा. याला काही तयारीची गरज लागत नाही. दररोजच्या वाचनासाठी काही पुस्तकेही उपलब्ध आहेत.
४. तुमच्या जीवनात कोणत्या आध्यात्मिक शिस्तीमध्ये तुम्ही प्रगती कराल?
हे तुमच्या वैयक्तिक जीवनात करता येईल. उदा. वचनाचे पाठांतर, शास्त्रलेखाचा अभ्यास किंवा ते इतर विश्वासी व्यक्तीबरोबर असू शकेल. उदा. आठवड्यातून एकदा प्रार्थना करणे, एकत्र शास्त्राभ्यास करणे. हे नक्की ठरवल्यावर ते करण्यासाठी योग्य पावले उचला.
५. तुमच्या जीवनात तुम्ही व्यर्थ वेळ कशावर घालवता आणि हा वेळ वाचवण्यासाठी तुम्ही काय कराल?
मोबाईल? टी व्ही? व्हिडिओ गेम्स? खेळ? गप्पागोष्टी? यातील काही गोष्टी आपले मन आणि वेळ गुंतवून ठेवतात. येथे पश्चात्ताप करण्याची गरज आहे का? हे आपोआप थांबेल अशी आशा करण्यात अर्थ नाही. त्याऐवजी काहीतरी दुसरी गोष्ट करण्याने मदत होईल. “वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत” (इफिस ५:१६).
६. तुमच्या चर्चला दृढ करण्यासाठी तुम्ही कशी मदत कराल?
मंडळी ही जरी एक एक सभासदाने मिळून बनलेली आहे तरी नव्या करारात अनेकदा म्हटले आहे की, मंडळी हे ख्रिस्ताचे शरीर आहे (इफिस ५:२३). म्हणून आपला ख्रिस्ताशी वैयक्तिक संबंध यावर भर देत असतानाच, येशूची सेवा त्याच्या शरीराद्वारे करण्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. या वर्षी तुमच्यामुळे तुमची मंडळी कशी दृढ बनू शकेल” सेवा करण्याने? दान देण्याने? प्रार्थना करण्याने?
७. या वर्षी कुणाच्या तारणासाठी तुम्ही आग्रहाने आणि नेहमी प्रार्थना कराल?
कोणाच्या तरी तारणासाठी नेहमी आणि आग्रहाने प्रार्थना केल्याने आपण त्यांना सुवार्ता सांगायला जास्त उत्सुक असतो. या नव्या वर्षात निदान एका व्यक्तीच्या तारणासाठी दररोज प्रार्थना करण्यास तुम्ही स्वत:ला समर्पण कराल का?
८. या वर्षी तुमचे प्रार्थनेचे जीवन सुधारण्यासाठी कोणती एक गोष्ट कराल?
कित्येकांसाठी याचे उत्तर म्हणजे गरज भासेल तशी प्रार्थना करण्यापेक्षा प्रार्थनेसाठी खास वेळ बाजूला काढणे असे असेल. इतर काही जणांसाठी बायबलच्या वचनांच्या प्रार्थना सादर करणे असे असू शकेल.
तुमच्या नव्या वर्षावर विचार करा
नजीकच्या गोष्टी करण्यात आपले लक्ष आपण गुंतवतो. दररोजच्या दिवसाची कामे संपवत आपण व्यस्त राहतो आणि थकून जातो. पण तातडीच्या या गोष्टींचा विळखा आपल्याला महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर ठेवतो. त्या गोष्टी म्हणजे आपला जीव, आपले कुटुंब , आपले चर्च यावर पडू शकणारे दीर्घ पल्ल्याचे प्रभाव. म्हणून या वर्षभर अशा गोष्टी करा की ज्यामुळे तुम्ही असा प्रभाव पाडू शकाल.
वरील कित्येक प्रश्नाची किंमत त्यांच्या भव्यतेवर नाही. तर ते प्रश्न तुमचे समर्पण केंद्रस्थानी आणतात या सध्या सत्यावर आहे. उदा. या वर्षी मी अमुक व्यक्तीला उत्तेजन देईन असे ध्येय बाळगले तर तुम्ही त्या व्यक्तीला उत्तेजन देण्याचे लक्षात ठेवणार. हे ध्येय आखले नसते तर ते झाले नसते.
जर तुम्हाला या प्रश्नांनी मदत झाली असेल तर तुम्हाला सहज दिसेल अशा ठिकाणी ते लिहून ठेवा. उदा. तुमचा फोन, कॅलेंडर, किचनच्या लिस्टवर. तुम्ही ते करता की नाही हे तपासून घ्या. यामागचे तत्त्व लक्षात घ्या. “उद्योग्याच्या योजना समृद्धी करणाऱ्या असतात” (नीति २१:५). पण त्याच वेळी हे ही लक्षात घ्या की या सर्वासाठी आपण आपल्या राजावर अवलंबून आहोत. त्याने म्हटले, “माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही” (योहान १५:५).
Social