संकलन – लीना विल्यम्स
धर्मजागृती – लेखांक २
बालपण
जर्मनीतील इसलबेन येथे हान्स व मार्गारेटा यांना मार्टिन हे पुत्ररत्न लाभले. मार्टिनचे वडील हे एक श्रीमंत व्यावसायिक होते. लूथर लहान असतानाच हे दहा जणांचे कुटुंब मॅन्सफेल्ड येथे गेले. पाचव्या वर्षी लूथरच्या शिक्षणाला सुरवात झाली. लिहिणे वाचणे व लॅटिन हे त्यांना शिकवले गेले. १३व्या वर्षी ब्रदरेन लोकांनी चालवलेल्या एका शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. येथे वैयक्तिक धर्मिकतेवर भर दिला जात असल्याने मठवासी जीवनाची आवड लूथरच्या मनात निर्माण झाली.
मार्टिन लूथरचा मठामध्ये प्रवेश
तरुण मार्टिनसाठी हान्सच्या योजना निराळ्याच होत्या – त्याने वकील बनावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी त्याला पूर्वीच्या शाळेतून काढून इसेनाक येथील नव्या शाळेत टाकले. १५०१ मध्ये लूथरने एरफर्ट येथील तेव्हाच्या विख्यात विद्यापीठात नाव दाखल केले. गणित, खगोलशास्त्र, भूमिती, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केल्यावर १५०५ मध्ये त्याने पदव्युत्तर अभ्यासासाठी नाव नोंदवले. त्या वर्षाच्या जुलैमध्ये एका झंझावती वादळात लूथर सापडला त्यामध्ये एका विजेच्या आघातापासून तो वाचला. हे त्याने देवापासूनचे चिन्ह मानले आणि जर या वादळातून वाचलो तर मठवासी भिक्षुक होणार अशी शपथ त्याने घेतली. वादळ शमले आणि काहीही इजा न होता लूथर बाहेर आला. आपल्या वचनाला जागून लूथरने अभ्यासाकडे पाठ फिरवली आणि १७ जुलै १५०५ ला ऑगस्टेनियन मठात त्याने प्रवेश घेतला.
येथे भिक्षुकाचे साधे आणि कडक शिस्तीचे जीवन मार्टिन जगू लागला. येथे त्याचा धर्माचा अभ्यास चालूच होता. १५१२ मध्ये त्याला डॉक्टरेट मिळाली आणि तो बायबल अभ्यासाचा प्राध्यापक बनला. पुढच्या पाच वर्षात चालू ठेवलेल्या अभ्यासाने तो पुढच्या कित्येक वर्षे येणाऱ्या ख्रिस्ती लोकांवर परिणाम घडवणारा ठरला.
मार्टिन कॅथोलिक चर्चला प्रश्न करतो
१६व्या शतकाच्या आरंभी काही ईश्वरविज्ञान पंडित रोमन कॅथोलिक चर्चच्या शिक्षणाला प्रश्न करू लागले होते. त्याच वेळी मूळ ग्रंथाचे – म्हणजे बायबल व प्रारंभीच्या मंडळीचा तत्त्ववेत्ता ऑगस्टीन च्या लिखाणाचे- भाषांतर सर्वत्र मिळू लागले होते.
ऑगस्टीन (३४०-४३०)ने चर्चच्या अधिकाऱ्यांपेक्षा अंतिम अधिकार हा बायबलकडे आहे यावर जोर दिला होता. मानव हा स्वत:च्या प्रयत्नाने तारण मिळवू शकत नाही तर देव आपल्या दैवी कृपेनेच तारण देतो असा त्याचा विश्वास होता
मध्ययुगामध्ये कॅथोलिक चर्चने शिकवले की तारण हे सत्कर्माद्वारे व देवाला संतोष देणाऱ्या धार्मिक कृत्यांद्वारे शक्य होते . ऑगस्टिनच्या मुख्य दोन विश्वासाच्या तत्त्वांवर लूथरने विश्वास ठेवण्यास सुरवात केली. प्रोटेस्टंट पंथाची ही पुढे मूलभूत तत्त्वे होणार होती.
दरम्यान पापविमोचनासाठी पासेस विकून मुक्ती मिळवण्याच्या कॅथोलिक चर्चच्या प्रथेमुळे ते खूपच भ्रष्ट होऊ लागले होते. असे पासेस विकणे जर्मनीमध्ये बंदी होती तरीही ही प्रथा चालूच होती. १५१७ मध्ये जोहान टेझेल ह्या महन्ताने रोममधील सेंट पीटरची बॅसिलिका बांधण्यासाठी जर्मनीमध्ये पुन्हा पापविमोचनाचे पास विकण्यास सुरवात केली.
९५ पानांचा प्रबंध
तारण हे फक्त विश्वासाने आणि देवाच्या कृपेद्वारेच होते या तत्त्वाला पूर्ण समर्पित असल्याने लूथरने या पास विकण्याच्या भ्रष्ट प्रथेला जोरदार विरोध केला. या विश्वासाच्या आधारे त्याने “पापविमोचनाच्या पासांचे सामर्थ्य व प्रभाव यावर वादविवाद” नावाच प्रबंध लिहिला. यालाच ९५ पानांचा प्रबंध म्हणतात. यामध्ये वादविवादासाठी अनेक प्रश्न व विधानांची यादी आहे. ऑक्टोबर ३१, १५७५ या दिवशी लूथरने ९५ पानांच्या प्रबंधाची एक प्रत व्हिटेनबर्ग कासल चर्चच्या दरवाजावर खिळ्यांनी ठोकली. खरं तर आता वाटते तितके हे काही नाट्यमय नव्हते. ते फक्त वादविवादासाठी आमंत्रण होते.
पुढे प्रोटेस्टंट धर्मजागृतीचा पाया होणाऱ्या या ९५ पानांचा प्रबंध अत्यंत नम्रपणे व अभ्यासू वृत्तीने लिहिला गेला होता. त्यात आरोप करण्याची वृत्ती नव्हती. पण त्याचा एकंदरीत प्रभाव चिथावणी देणारा ठरला. पहिल्या दोन पानांमध्ये लूथरचा केंद्रभूत विश्वास म्हणजे लोकांनी पश्चात्ताप करावा अशी देवाची इच्छा आहे आणि तारण हे फक्त विश्वासानेच होते कर्मांनी नाही असे लिहिले होते. पुढच्या अनेक पानांमध्ये पापविमोचनाचे पासेस विकण्याबद्दल टीका असून पहिल्या दोन पानांचे समर्थन केले होते.
त्यामध्ये एक असाही प्रश्न होता की आज ज्या पोपची मालमत्ता सर्वात श्रीमंत धनिकाहून अधिक आहे तो सेंट पीटरची बॅसिलिका बांधण्यासाठी गरीबांचे पैसे घेण्याऐवजी स्वत:च्या पैशाने का बांधत नाही?
ह्या प्रबंधाच्या प्रती लवकरच सर्व जर्मनीत वाटल्या गेल्या आणि पुढे तो रोमला रवाना झाला. १५१८ मध्ये ऑग्सबर्ग येथे त्याला आपल्या मतांचे समर्थन करण्यास सर्व धर्मश्रेष्ठींपुढे येण्यास फर्मावले गेले. हा वादविवाद तीन दिवस चालला. कार्डीनल कॅजेटन व लूथर यांचे एकमत होवू शकले नाही. कॅजेटनने या पासेसच्या उपयोगाचे समर्थन केले तर लूथरने आपली चूक झाली असे मानण्यास नकार दिला व शेवटी तो व्हिटेनबर्ग येथे परतला.
लूथरवर पाखंडी असल्याचा आरोप
९ नोव्हेंबर १५०८ या दिवशी पोपने लूथरचे लिखाण चर्चच्या विरोधात असलेले शिक्षण असे म्हणून त्याचा धिक्कार केला. या शिक्षणाचे परीक्षण करण्यास काही आयोग नेमण्यात आले. पहिल्या आयोगाला ते पाखंडी आढळले तर दुसऱ्या आयोगाने ते धार्मिक कानांना लज्जास्पद व आक्षेपार्ह वाटतात असे म्हटले. अखेरीस १५२० जुलैला पोप दहावा लुई याने पोपचे फर्मान काढले त्यात हा निर्णय काढला की लूथरची विधाने पाखंडी आहेत. आणि त्याला आपली चूक कबूल करण्यास १२० दिवसांची मुदत देण्यात आली. लूथरने चूक मान्य करण्याचे नाकारले. शेवटी ३ जानेवारी १५२१ ला मार्टिन लूथरला पोप लिओने कॅथोलिक चर्चमधून बहिष्कृत केले.
१७ एप्रिल १५२१ ला लूथरने जर्मनीतील वोम्स मधील राजकीय सभेत उभे राहून पोपसमोर चूक कबूल करण्यास नकार दिला व शेवटी खळबळजनक विधान केले : “हा मी येथे उभा आहे, देवा मला मदत कर. या व्यतिरिक्त मी काही करू शकत नाही.” त्याच वर्षीच्या २५ मे ला रोमचा राजा पाचवा चार्ल्स याने लूथरविरुध्द काढलेल्या फतव्यावर सही केली. त्यात हुकूम दिला होता की लूथरचे सर्व लिखाण जाळण्यात यावे. पुढचे सर्व वर्ष लूथर इसेनाक या गावात लपून राहिला. या ठिकाणी त्याने त्याच्या जीवनाच्या सर्वात मोठ्या प्रकल्पास सुरुवात केली. नव्या कराराचे जर्मन भाषेत भाषांतर करणे. ते पूर्ण करण्यास त्याला दहा वर्षे लागली.
मार्टिन लूथरची नंतरची वर्षे
१५२१ मध्ये लूथर व्हिटेनबर्गला परतला. त्याने सुरू केलेली धर्मसुधारणेची चळवळ तो नसतानाही त्याच्या लिखाणाद्वारे मोठ्या प्रमाणात फैलावली होती. आता हा फक्त ईश्वरज्ञानाचा विषय नव्हता; ती राजकीय बाब बनली होती. सुधारणेला पुढे नेण्यास इतर नेते सरसावले. आणि त्याला समांतर असे एक बंड ज्याला ‘शेतकऱ्यांचे युध्द” म्हटले जाते ते सर्व जर्मनीभर फैलावू लागले.
ब्रह्मचर्याविरुध्द लूथरने पूर्वी लिहिलेलेच होते. १९२५ मध्ये त्याने पूर्वी साध्वी (नन) असलेल्या कॅथरीन वोन बोराशी विवाह केला. त्यांना पाच मुले झाली. जरी त्याच्या लिखाणाने धर्मजागृतीची ठिणगी पेटली गेली तरी पुढील वर्षांमध्ये तो त्यामध्ये विशेष गोवला गेलेला नव्हता. १८ फेब्रुवारी १५४६ मध्ये त्याचा मृत्यू झाला.
मार्टिन लूथरच्या कार्याचे महत्त्व
पाश्चिमात्य इतिहासात मार्टिन लूथर हे एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे. त्याच्या लिखाणामुळे कॅथोलिक चर्चचे तुकडे झाले व प्रोटेस्टंट धर्मजागृतीची ज्योत पेटली. त्याचे केंद्रभूत शिक्षण होते की बायबल हेच जीवनासाठी व धर्माचा एकमेव अधिकार आहे. आणि तारण हे विश्वासाद्वारेच प्राप्त होते कर्मांद्वारे नाही (इफिस २:८-९). ह्या शिक्षणाने प्रोटेस्टंट पंथाला आकार दिला. ईश्वरविज्ञानाच्या इतिहासात लूथरचे सर्वात मोठे योगदान म्हणजे बायबल हे ख्रिस्ती धर्माचा एकमेव अधिकार असल्यामुळे त्याचे भाषांतर करून ते सर्वांना उपलब्ध केले जावे . त्याच्या काळामध्ये हे फार क्रांतिकारक होते.
Social