दिसम्बर 26, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

डॅा. ॲलेक्झांडर डफ

(१८०६ -१८७८)

लेखांक १९

१८४३ च्या सुमारास स्कॅाटलंडच्या स्कॅाटिश मंडळीत एक शोचनीय घटना घडली. मिशनकार्याला सहकार्य करणारे धार्मिक वृत्तीचे अनेक पाळक, सुवार्तिक व थोर लोक आपली स्कॅाटिश मंडळी सोडून फ्री चर्चला जाऊन मिळाले. ही बातमी भारतात आली. भारतातील मिशनरींनीही एकमताने फ्री चर्चला धरून राहायचे ठरवून स्कॅाटिश मंडळीशी संबंध तोडून टाकला. याचा स्कॅाटिश चर्चला मोठा खेद झाला तर फ्री चर्चला अत्यानंद झाला. पण भारतातील स्कॅाटिश चर्चवर याचा मोठा आघात झाला. भारतीय मिशनरी कार्य त्यांना पुन्हा पायापासून उभारणे भाग पडले. हळूहळू ते काम पूर्ण झाले. पण १८४६ इतकी प्रगती होण्यास बराच कालावधी लागला. फ्री चर्चचे डफ वगैरेंवरील परिणाम पाहणेही अगत्याचे आहे.

डफने मायदेशातील फ्री चर्चवर बोजा पडणार हे जाणले. तो भार हलका करावा म्हणून भारतातील फ्री चर्चला मिळालेल्या या मिशनरींनी स्वत:च्या पगारात कपात केली. योग्य तेच करायचे धोरण ठरवून डफ व त्याच्या सहकाऱ्यांनी पावले टाकली. त्यांना पूर्वीची स्कॅाटलंड चर्चच्या मालकीची इमारत सोडावी लागली. काही दिवस शहरात जागा मिळणेही मुष्कील झाले. पण थोड्याच दिवसात अडचण दूर झाली. यावेळी मिशनरींनी डोळ्यात भरण्याजोगा स्वार्थत्याग केला. तो पाहून युरोपीय मंडळीचे अंत:करण किती द्रवले हे पाहून आश्चर्य वाटेल. डफने तर आपल्या व्याख्यानांनी स्कॅाटिश चर्चचे निम्म्याहून अधिक लोक फ्री चर्चकडे वळवले. त्यांनी आपली निराळी मंडळी स्थापन केली. त्यांचे पाळकत्व एका मिशनरीने केले. या मंडळीच्या सधन सभासदांनी सढळ हस्ते साह्य केले. इतर पंथांच्या लोकांच्या मनावरही याचा परिणाम झाला. त्यांनाही साह्य करण्याची बुद्धी झाली. भारतातल्या व स्कॅाटलंडमधल्या मंडळ्यांनी पहिल्याच वर्षी ३४०० पौंड वर्गणी जमवली.

त्यामुळे दारिद्र्य व आर्थिक तंगीचा ताण पडला नाही. या मिशनरींनी एक इमारत भाड्याने घेतली. व १८४४ मध्ये सर्व हजारचे हजार विद्यार्थी या नव्या संस्थेत दाखल झाले. तिकडे मनुष्यबळ कमी पडल्याने डॅा.ॲागिल्व्ही नावाच्या मिशनरीला स्कॅाटिश चर्चने पाठवले. तो गरीब, आस्थेवाईक व विद्वान मिशनरी होता. जुन्या संस्थेतही ७०० विद्यार्थी दाखल झाले. पण जुन्या मंडळीचे व फ्री चर्चचे परस्परसंबंध प्रेमाचे होते. १८७१ मध्ये ॲागिल्व्हीचे देहावसान होईपर्यंत डफचे व त्याचे एकमेकांकडे स्नेहभावाने जाणे येणे होते. पण या शोचनीय फुटीचा मुंबई मद्रासच्या कार्यावर चांगलाच परिणाम झाला. कालांतराने दुप्पट स्कॅाटिश संस्था भारतात कार्यरत झाल्या.

फ्री चर्च संस्थेला डफने आपले तन मन धन वाहून दिले. लोकांची मंडळीत भर पडत होतीच. पण अजून स्थानिक प्रेस्बिटेरीयन ख्रिस्तीतरांची उच्चस्तरीय मंडळी स्थापन झाली नव्हती. डफच्या ट्रेनिंग कॅालेजच्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांची सर्व संस्थांमध्ये कार्यरत होण्यास फार मदत झाली. त्यामुळे स्थानिक प्रेस्बिटिरीयन चर्च स्थापन झाले. ते आपापल्या क्षेत्रातील मंडळीच्या गरजा भागवू लागले. मंडळी रोपणात डफने खूप लक्ष घातले. त्यातूनही त्याचे लक्ष सुशिक्षित ख्रिस्तीतरांच्या व्यापक क्षेत्रावर असे. जी संस्था या दिशेने वाटचाल करी, त्या संस्थेकडे तो विशेष लक्ष घालत असे. ‘ कलकत्ता रिव्ह्यू’ नावाचे मासिक त्याने सुरू केले. लोकांची नैतिक व सात्विक पातळी उंचावण्यास तो व्याख्याने देई. त्यांनी चुकीचे मार्ग सोडून देण्याविषयीच्या सरकारी उपक्रमांसही तो सक्रिय पाठिंबा देत असे. भारताच्या कल्याणासाठी झटण्यात दहा वर्षे झटकन निघून गेली. १८४७ मध्ये डफला स्कॅाटलंडला पाचारण करण्यात आले.

डफचा स्कॅाटलंडमधला दुसरा कालखंड

कारण असे झाले की फ्री चर्चचा पुढारी डॅा. चार्मसचे निधन झाले. त्यांची सार्वजनिक कार्ये भरपूर होती. शिवाय एडिंबरोच्या नव्या कॅालेजचे ते प्राध्यापक व प्रिन्सिपलही होते. तरुण पाळकांना शिकवून त्यांना स्फूर्ती देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांचे हे सर्व काम पुढे नेण्यास डॅा. डफच लायक व्यक्ती असल्याने त्यांना पाचारण केले होते.

ही विनंती डॅा. डफने ठामपणे अमान्य केली. आपले काम सोडून एडिंबरोतील हे हलके काम करणे त्यांना नको होते. पण काही वर्षांकरता मदत करण्याची याचना करून पुन्हा पाचारण केल्यावर होकार देणे भाग पडल्याने तो तयार झाला व १८५० साली परत स्कॅाटलंडला गेला.

स्वदेशात पूर्वीचेच काम त्याची वाट पाहात होते. मिशन कार्याचा आवेश जागृत करून या कामी त्यांना संघटित करण्याचे काम त्याने यशस्वीपणे पार पाडले. त्याच्यापुढे आता अधिक मृदू अंत:करणाचे फ्री चर्चचे लोक होते हे लक्षात घ्या. त्यांचे मन लवकर द्रवून ते कार्यप्रवृत्त झाले. डॅा. डफला लोकांनी मॅाडरेटर बनवले. लोकांना हेलावून टाकणारी मिशन कार्यासाठी त्याने विनंती केली. त्यापुढे लोकांच्या अडचणी, शंकाकुशंका राहिल्याच नाहीत.

परदेशातल्या कामगिरीला शोभेसे स्वदेशात केंद्र बनवण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवण्यात आली. त्यात ३ वर्षे खर्ची पडली. जुन्या संस्थांमध्ये त्याने जोम निर्माण केला व नव्या संस्था स्थापन केल्या. फ्री चर्चच्या प्रत्येक मंडळीत मिशन कार्याची स्वतंत्र संस्था स्थापन केली. परदेशातील मिशनकार्यासाठी प्रार्थना करणे, लोकांना त्या कामांची माहिती देणे, दर तीन महिन्यांनी मिशनकार्यासाठी निधी गोळा करणेही कामे त्या करीत व नित्यनेमाने अहवाल सादर करीत. भारतात मिळालेल्या यशाला शोभेसेच त्याला हे स्वदेशात मिळालेले यश होते.

स्वदेशात त्याच्यावर आणखी एक कामगिरी त्याच्यावर पडली. पण ती एक चालून आलेली उत्तम संधीच ठरली. १८५३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेची मुदत संपत होती. नवीन सनदेत काही दुरुस्त्या करायच्या होत्या. त्यासाठी नेमलेल्या कमिटीने काही शिफारसी गोळा करायच्या होत्या. त्यात भारताच्या हिताच्या दृष्टीने डफने फेरफार करण्यासाठी कसून प्रयत्न केले. सरकारने शैक्षणिक उपक्रमात वाढ करावी, त्यासाठी योग्य अनुदान द्यावे, इंग्लंडच्या तरुणांना सिव्हिल सर्व्हिसमध्ये प्रवेश द्यावा, अशा महत्त्वाच्या तरतुदी त्याने करून घेतल्या.

डफच्या या प्रयत्नांमुळे पुढे जास्तीत जास्त प्रगती झाली. १८५४ सालच्या चार्लस वुडच्या खलित्यात डफची छाप स्पष्ट दिसते. त्यामुळे भारतात कॅालेजे अस्तित्वात आली. खाजगी शिक्षणसंस्थांना सरकारकडून अनुदान मिळू लागले. मात्र त्यात पवित्र शास्त्राचे शिक्षण द्यावे ही अट नव्हती. पण मिशन संस्थांनी या धार्मिक शिक्षणाला प्राधान्य दिले. मिशनकडून चालवल्या जाणाऱ्या शाळा व कॅालेजकडून मिशनकार्य साध्य करण्याचा डफचा प्रमुख हेतू होता. पवित्र शास्त्र शिकवण्यास खास शिक्षक नेमण्याचीही त्याची सूचना होती. डफच्या म्हणण्याप्रमाणे अनुदानित सर्व शाळा- कॅालेजमधून पवित्रशास्त्र शिक्षण दिले गेले असते तर त्याचा मूळ उद्देश साध्य झाला असता. यासाठी डफने खूप धडपड केली. पण हे शिक्षण सक्तीचे नव्हे तर ऐच्छिक ठेवण्यात आले. हीच घोडचूक ठरली. डॅा. डफने भाकित करून

त्यावरील आपले विचार तपशीलवार मांडले. भारतात ख्रिस्ती मतप्रणालीचा विस्तार करण्याचा मार्ग अजून पुष्कळांना सापडला नसल्याचे त्याने स्पष्ट केले. मिशनरींकडून मिळणारे प्रत्यक्ष शिक्षण, अनेक प्रकारचे ग्रंथ, नियतकालिके, तज्ज्ञांची भाषणे ही ज्ञानदानाची साधने असू शकतील. त्याद्वारे लोक नकळत ख्रिस्ती धर्माचे सार आत्मसात करू शकतील. याचे त्याने तपशीलवार स्पष्टीकरण केले. १८५४ मध्ये अमेरिकेला धावती भेट देऊन डॅा. डफने भारताची वाट धरली.

डॅा. डफचा भारतातील तिसरा ८ वर्षांचा कालखंड

ही वर्षे धामधुमीत गेली. या काळात १८५७ चे बंड झाले. तरीही मिशनच्या दृष्टीने हा काळ भरभराटीचा व उत्कर्षाचा ठरला. ख्रिस्ती लोकांची संख्या खूपच वाढली. १८५७ चे बंड, त्या बंडाचा मोड व त्यापासून घ्यायचा बोध यात डॅा. डफने आस्थेने लक्ष घातले. भारतातील घडामोडींची इत्थंभूत हकीगत तो स्वदेशी कळवीत असे. कलकत्याच्या खवळलेल्या व धाबे दणाणलेल्या लोकांना शांत करण्याची प्रभावी, शक्तिशाली व्यक्ती डफच होता. त्याचे मिशन ठाणे शहराच्या मध्यभागी होते. युरोपियन वस्तीपासून दूर असल्याने त्याला कसलेच संरक्षण नसून तेथे तो बेडरपणे राहत होता. शिवाय खेडोपाडी त्याचे कामही नित्य नेमाने चालू होते. ही जागा सोडण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवला नव्हता. बंड मिटले. पण ब्रिटिशांनी त्यावरून चिडून लोकांना कडक वागवू नये अशी तळमळून विनंती  करणारा डॅा डफ होता. त्याने म्हटले, “दिशाभूल झालेल्या शिपायांनी केलेली अघोर कृत्ये पाहून अंगावर शहारे येतात. अशा वेळी ख्रिस्ती या नात्याने आपण आपली वृत्ती काबूत ठेवायला हवी. सूड उफाळू देऊ नये. अंत:करण मृदू  करणाऱ्या, शुभवर्तमानाच्या कृपेची व तारणाची छाप पाडणाऱ्या परिस्थितीत ते लोक वाढलेले नाहीत, हे आपण लक्षात घ्यावे, नाहीतर आजवर परिश्रमपूर्वक केलेले सुवार्ताकार्य फुकट जाईल. आता आपण अधिक औदार्याने परिश्रम करायला हवेत.” ही स्थानिक ख्रिस्ती लोकांची खरी कसोटीची वेळ होती. न डगमगता, आपल्या प्राणांची पर्वा न करता ते निष्ठेने आपल्या धार्मिक वाटेला लागल्याचे पाहून डफला आनंद झाला.

जुन्या करारातील संतांची निष्ठा त्यावेळी त्यांच्यामध्ये आढळून आली. बंडाचा मोड झाला, ईस्ट इंडिया कंपनीची सभाही लयास गेली; आणि सर्व सत्ता थेट राणीच्या हाती गेली. हा संक्रमणाचा काळ होता. अनेक प्रश्न उभे राहिले. तेव्हा डॅा. डफने आपली कर्तबगारी व अनुभवाच्या जोरावर सरकारला निर्णय घेताना मोलाचे सहाय्य केले. शैक्षणिक

अनुदानाचा योग्य विनियोग करण्याच्या कामीही साह्य केले. त्याची योग्यता पाहून त्यालाच कलकत्यात जे विश्वविद्यालय स्थापण्याच्या कामी त्याने मोलाचे परिश्रम केले होते त्यावर कुलगुरू म्हणून निवड झाली. पण हा पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्याची भारतातील कारकीर्द अकस्मात संपली. कारण ३० वर्षांपूर्वीच्या अमांशाच्या विकाराने १८६३ मध्ये पुन्हा उचल खाल्ली व तो अंथरुणाला खिळला. डॅाक्टरांनी त्याला कायमचेच मायदेशी परतण्याचा सल्ला दिला. सर्व जाती, धर्म, वंशांच्या लोकांनी त्याच्यावर सन्मान व मानपत्रांचा वर्षाव केला. त्याच्याइतका सन्मान पूर्वी कोणाचा झाला नसेल. भारताचा हितकर्ता म्हणून ही त्याला पावतीच मिळाली होती. त्याच्या नावे शिष्यवृत्या सुरू झाल्या. तैलचित्रे लावली गेली. कॅालेजात त्याचा संगमरवरी अर्धपुतळा बसवण्यात आला. सिंगापूर व चीनमधल्या व्यापाऱ्यांनी राजाला शोभेल अशी त्याला १३,००० पौंडांची थैली अर्पण केली.

त्या देणगीचे फक्त व्याज घ्यायला हा मिशनरी तयार झाला. त्या व्याजावरच त्याचा उर्वरित आयुष्यात चरितार्थ चालला. मूळ रक्कम योग्य रीतीने गुंतवून येणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग सेवा करताना अधू झालेल्या मिशनरींकरता करावा असे त्याने ठरवले. त्याच्या कलागुणांचे जे कौतुक झाले; त्यावरून लोक त्याला किती थोर मानीत होते याचा प्रत्यय येतो. अखेर ख्रिस्तीतरांसाठी भाषण करून त्याने भारताचा निरोप घेतला. त्याचा सारांश असा –
“अनंतकाळचा स्वामी परात्पर पवित्र परमेश्वराच्या संकल्पानुसार मला अल्पायुष्य किंवा दीर्घायुष्य लाभो, किंवा मी वृद्धापकाळी पंगू होऊन पडो, किंवा उपकारक सेवेचा मान मला मिळो वा न मिळो. कोणत्याही परिस्थितीत माझ्या मनात भारताचेच विचार घोळत राहून त्यांचेच हित मी चिंतत राहीन. कोठेही फिरण्याची, परिश्रमांची, विश्रांती घेण्याची माझ्यावर वेळ आली तरी मनाने माझे वास्तव्य भारतातच असेल व येथेच माझा जीव घुटमळत राहील. या कुडीत प्राण असे तोवर मी भारताचे बरे करण्यासाठीच झटेन. अखेरचा श्वास सोडतानाही मी भारताला देवाने आशीर्वाद द्यावा म्हणूनच प्रार्थना करीन. माझ्या कबरेवर पुढील वाक्ये लिहावीत : ‘येथे जात्याच आचार विचाराने पापी अपराधी असलेला, पण तारणारा येशूख्रिस्त याच्या रक्तावरील सात्विक विश्वासाने कृपेच्या द्वारे तारण पावलेला अॅलेक्झांडर डफ नावाचा जीव विश्रांती घेत आहे.’ वाटलेच तर पुढील वाक्य घालावे की, “पेशाने मिशनरी आयुष्य भारतात घालवून त्यासाठी श्रम करून त्याचा कायमचा हितचिंतक व मित्र बनला.”

वास्तविक याच वेळी त्याची भारतातील कारकीर्द संपली. पण पुढे त्याला १४ वर्षे स्कॅाटलंड मध्ये आयुष्य घालवावे लागले. दोन वेळा भारतातला प्रेषित व अखेर मिशनांचा प्रेषित म्हणून जिवात जीव असेपर्यंत तो आपले काम करत राहिला.

डॅा. डफचा स्कॅाटलंडमधील अखेरचा कालखंड

स्कॅाटलंडमधील देशबांधवांना मिशनकार्याची माहिती देऊन या कार्याविययी त्यांचा उत्साह जागृत करून तो टिकवण्याचा त्याला ध्यास लागला होता. तेथे तो सुवार्ताविषयक ख्रिस्ती धर्मसिद्धांत शिकवायचे प्राध्यापकाचे काम  करू लागला. तेथे मंडळीतील तरुण पाळकांशी त्याचा संबंध येऊ लागला. या मंडळीने जगात सुप्रसिद्ध सुवार्तिक पाठवले. तो फॅारेन कमिटीची सभा भरवून त्याच्या अध्यक्षपदी काम करू लागला. त्यामुळे स्कॅाटलंडच्या सर्वच मंडळ्यांशी त्याचा संपर्क होऊ लागल्याने मिशनकार्याला वाढती मदत मिळू लागगली. ही आवडीची कामे करून तो भारताला मदत करत राहिला. त्याचा वृद्धापकाळ बराच गडबडीत गेला. वेळात वेळ काढून तो आनंदाने विसावा घेत असे. उन्हाळ्यात युरोपचा दौरा काढीत असे. त्यामुळे त्याची प्रकृती सुधारून त्याला आराम मिळत असे व पुन्हा तो जोमाने कामाला लागत असे. शेवटपर्यंत तो स्कॅाटलंडची आध्यात्मिक शक्ती म्हणून जगला. कारण त्याचे काम फक्त त्याच्या चर्चपुरते मर्यादित नव्हते. धर्मसिद्धांतांबाबत मूलभूत मतभेद नसल्यास अशा मंडळ्यांनी एकत्र येऊन एकीने सुवार्ता गाजवण्याचे ध्येय समोर ठेवून काम करावे असे त्याचे मत होते. त्यामुळे ‘ऐक्याचा प्रेषित’ म्हणूनही डफ तळमळीने काम करू लागला. म्हणूनच त्याने स्कॅाटिश चर्चच्या सर्व शाखांचे आदर, प्रेम व कौतुक संपादन केले.

१२ फेब्रुवारी १८७८ रोजी हा ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध गृहस्थ आपले प्रतिफळ भोगायला देवाघरी निघून गेला. तेव्हा सारे स्कॅाटलंड दु:खाने हळहळले. कारण त्यांचा थोर सुपुत्र हरपला होता. त्याच्या मृत्युने मंडळ्यामधला बंधुभाव अधिकच वाढला. त्या आपले मतभेद विसरल्या व आंतरिक मिशनरी ऐक्य टिकून राहिले.

मिशनरी कार्यपद्धतीचा भारतात उपक्रम सुरू होऊन २० व्या शतकापर्यंत मिशनरी असेपर्यंत काम चालूच राहिले. डॉ. डफ मुळे सुरू झालेले विश्वविद्यालयीन शिक्षण आजवर चालूच आहे. सरकारी शाळा कॅालेजांचा पसारा वाढला आहे. अनेक मिशन शाळा सरकारी अनुदानावर चालू आहेत. पण मिशन संस्थांच्या स्वत:च्या नियंत्रणाला आळा बसला आहे. सर्व शिक्षणसंस्था भारतीय शिक्षणपद्धतीच्या साच्यात बसवल्या आहेत. सर्वांचा दर्जाही कालपरत्वे वाढत गेला आहे. तो टिकवणे मात्र आव्हान बनले आहे. सर्वत्र समाधानकारक शिक्षक लाभणे हा कळीचा मुद्दा झाला आहे. मिशनच्या नियंत्रणाखालील संस्थांना आपले अस्तित्व टिकवणे आव्हान बनले आहे. मिशनरींच्या हाती शिक्षणसंस्था असताना धर्मशिक्षणाला जसे महत्त्व देता येत होते तसे आता देता येणे शक्य होत नाही. २१ व्या शतकात तर सर्व मिशनऱ्यांना भारत सोडावा लागला आणि स्थानिकांच्या हाती ते पुढारपण आले. या संक्रमणातून जाताना मंडळीचा इतिहास अनेक वळणे घेताना दिसतो.

‘ॲलेक्झांडर डफच्या स्मृती’ हा रोचक ग्रंथ लाल बिहारी डे यांनी लिहिला आहे. त्यांनी या सर्व मुद्यांवर उहापोह केला आहे. त्याद्वारे डफच्या शिक्षणक्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून दिले आहे. डॅा. डफनंतर आलेल्या मिशनरींनीही या कामी खूप परिश्रम केले. ख्रिस्तीतर आर्यसमाज व ब्राम्होसमाजाच्या तत्त्वावरच समाधान मानतात ही गोष्ट डफच्या लक्षात तेव्हाच आली होती. पण तो डगमगला नव्हता पण ही आशावादी वृत्ती नंतरच्या लोकांमध्ये राहिली नाही.

पुढे १९१० साली अखिल जागतिक मिशनरी परिषद भरली. त्यात बिशप गोरेंनी म्हटले :
“चर्चचे सभासद सोडून इतरांवर ख्रिस्ती विचारसरणी व ध्येयांचा प्रसार होण्यास ख्रिस्ती शिक्षक कारण झाले आहेत. दलितांचा वाढलेला दर्जा पाहून ख्रिस्ती विचारप्रणालीचे विरोधक अचंबित होतात. जेव्हा पोपटपंची करून बुद्धीत ज्ञान भरून पात्रता आणण्याचे काम चालले होते तेव्हा ख्रिस्ती शिक्षकांनी शीलसंवर्धन, चारित्र्य घडवणे, मुलांना वळण लावणे, त्यांचा व्यक्तिमत्व विकास करणे हे ध्येय लोकांसमोर ठेवण्याचे काम केले. पाश्चात्य व पौर्वात्य लोकांमधील अंतर कमी करणारा सेतू बांधण्याच्या कामी अपयश आलेल्या एखाद्या खचलेल्या मुत्सद्यास विचारणा केल्यास त्याला सहानुभूतीचा ओलावा मिशनऱ्यांकडूनच मिळाला असे म्हणत ते त्यांच्याकडे इशारा करतात. पौर्वात्य, पाश्चात्य, युरोपियन व आशियाई लोकांत परस्परांमध्ये सहानुभूतीचे अध्यात्मिक बंधन उत्पन्न करण्यात ख्रिस्ती शिक्षकच बऱ्याच अंशी यशस्वी झाले आहेत अशी माझी खात्री आहे. डॅा. डफ व त्यांच्या सहकाऱ्यांना यापेक्षा निराळे शिफारसपत्र नको.’

१९१२मध्ये दुसरी मिशनरी परिषद भरली. त्यामध्ये वरील प्रशंसेला दुजोरा देण्यात आला. त्या काळात आजच्या पेक्षाही मिशनरी शाळा व कॅालेजांची आवश्यकता होती असे नमूद केले. उच्च शिक्षणाचा दर्जा डोलारा भरेल असा वाढून तेव्हाचे शिक्षण खर्चिक बनले होते. म्हणून तेव्हाच मिशन संस्थांमधील शिक्षण व धर्मशिक्षणाचा दर्जा व कार्यक्षमता टिकवण्यासाठी अटोकाट परिश्रम करण्याची गरज प्रकर्षाने मांडण्यात आली. विसाव्या शतकात डफच्या मिशनरी कार्यपद्धतीच्या तपशीलात बारीकसारीक फेरफार करण्याची गरज वाटली, तरी त्याची पद्धतच अत्यंत उत्कृष्ट व प्रभावी ठरली. २० व्या शतकातील सर्वात मोठी घटना म्हणजे बोद्धिक व नैतिक बाबतीत झालेली उलथापालथ होय. आधुनिक भारताची आध्यात्मिक व बौद्धिक पातळी उंचावण्यास डफचेच काम कारणीभूत झाल्याचे आढळले. सत्याचे उदार मनाने स्वागत करण्याची भावना जर कोठे दिसली असेल तर त्याचे श्रेय डफलाच जाते. भारतीयांची अंत:करणे व बुद्धी ख्रिस्ताला वश व्हावी हे ध्येय या शतकातही राहिले पाहिजे. त्यानेच भारताला ज्ञानभांडार खुले करून देऊन प्रगतीचा मार्ग दाखवला. त्याला ‘आधुनिक भारताचा जनक’ म्हणणे सार्थ ठरेल. अशा कुठल्या किताबांची त्याला मात्र इच्छा कधीच नव्हती. हे त्याच्या कबरेवरील शिलालेखावरून आढळते. पेशाने मिशनरी असलेला डफ भारतासाठी खरा हितचिंतक व मित्र बनला.

केरीच्या आगमनापूर्वी मिशनरींची संख्या १० च्या वर नव्हती. डफ जाण्याच्या सुमारास ती ५५० च्या घरात गेली होती. २० व्या शतकात ती ५७०० च्या आसपास होती. त्यात उच्चशिक्षित, विविध क्षेत्रांच्या माध्यमातून डॅाक्टर, नर्सेस, सुवार्तिक, साहित्य प्रकाशक, रेडिओ मिनिस्ट्रीचे सेवक, पाळक असे मिशनरी कार्यरत होते. भारतातील प्रेषितांच्या मालिकेतील पहिल्या शतकातील पहिले पुष्प संत थोमा होता तर शेवटचे पुष्प १९ व्या शतकातील डॅा डफ म्हणता येईल.

तेथून पुढे परदेशातील मिशनरींची मालिका गुंफता येणार नाही कारण त्यात भारतातील थोर स्थानिक संतांची मंडळी आहे.बाबा पदमजी, पंडिता रमाबाई, ना. वा. टिळक व लक्ष्मीबाई टिळक, सुंदरबाई पवार, साधु सुंदरसिंग, ब्रदर भक्तसिंग, रेव्ह. विश्वास आनंद सत्राळकर ….अशा पुष्कळ विभुतींची नावे त्यात घ्यावी लागतील. १९ व्या मिशनरींच्या ध्येयांमध्ये एकवाक्यता व प्रभूची इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार आढळतो. जे काही करायचे ते ख्रिस्तासाठी, आणि ते करताना प्राणांची आहुती द्यावी लागली तरी त्यासाठी त्यांची तयारी होती या वृत्तीला नक्कीच सलाम करावासा वाटतो.

Previous Article

डॅा. ॲलेक्झांडर डफ

Next Article

तुम्हाला निर्माण केल्याचा देवाला पस्तावा होतो का?

You might be interested in …

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण ११ (मार्क ३) मला […]

दिवसातले व्यत्यय काबीज करा

स्कॉट हबर्ड “जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर” हे कोणाही ख्रिस्ती व्यक्तीला एक महान आणि सन्मान्य पाचारण वाटते. येशूचे हे शब्द आपल्या त्याग करण्याच्या ध्येयाला, चांगली कृत्ये करण्याच्या धाडसाला  प्रेरणा देतात. आपण प्रीती करण्याच्या […]