दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

हेन्री मार्टिन

  (१७८१-१८१२)

लेखांक १६                                        
                                                       

हेन्रीने विविध प्रकारची सेवा केली. ही भूमिका साकारण्याचे काम त्याच्याखेरीज कोणालाच जमले नसते. तुम्ही त्याला कदाचित मिशनरी संबोधणार नाही, कारण तो आपल्या देशबांधवांचा चॅप्लेन म्हणून आला होता. पण त्याला मिशनरी कार्याची प्रचंड तळमळ होती. तो म्हणतो: “माझ्याकडून पाचपेक्षा जास्त लोक ख्रिस्ती झाले नसतील.” पण आज त्याच्या कामगिरीला भरघोस फळ आल्याचे आपण पाहतो. त्याची कारकीर्द जेमतेम ६ वर्षांची असूनही ख्रिस्ताच्या मंडळीत त्याने चिरस्मरणीय काम केले. त्याच्या आयुष्याची पहिली २४ वर्षे त्याच्या कार्याच्या पूर्वतयारीत गेली.

त्याचा जन्म १७ फेब्रुवारी १७८१ मध्ये झाला. १ ॲागस्ट १८०५ पर्यंतचा काळ त्याचा पूर्वतयारीचा होता. कार्नवॅालच्या ट्रुरो गावी त्याचा जन्म झाला. त्याच्या कुटुंबात चार मुले होती. सर्वांची प्रकृती नाजुकच. त्यांच्यात सर्वात शेवटी मृत्यू पावला तो हाच. त्याचे वडील जॅान मार्टिन यांचा खाणकाम करणाऱ्या कुटुंबात जन्म झाला होता. तोही मोठा चारित्र्यवान, कर्तबगार पुरूष होता. एका व्यापाऱ्याकडे तो मॅनेजर झाला. त्याच्या दृष्टीने शिक्षणाला फार महत्त्व होते. तो देवभीरू होता. त्याने आपल्या मुलांच्या अंगी सद्गुण जोपासले. हेन्री हा त्याचा स्वच्छंदी व तापट मुलगा होता. तरी प्रेमाने व गोडीगुलाबीने त्याने त्याला वळण लावले. ट्रुरो येथील ग्रामशालेत त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. १६वर्षांचा असता त्याने केंब्रिजच्या सेंट जॅान्स कॅालेजात प्रवेश घेतला. तोवर तरी तो मिशनरी होण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. त्याची बहीण त्याच्यासाठी खूप प्रार्थना करायची. वडील सतत बोध करायचे. पण देवाधर्माचे त्याला कधीच महत्त्व वाटले नाही. पण केंब्रिजमध्ये त्याच्यावर छाप पाडणाऱ्या अनेक बाबी व व्यक्ती होत्या. त्यांचा त्याच्यावर नकळत परिणाम होऊन त्याच्या भावी जीवनाची तेथे तयारी होऊ लागली. अभ्यासामुळे त्याला शिस्त लागली. मिशनकार्याला आवश्यक ज्ञान मिळवण्याची त्याला आवड लागली. त्याची बुद्धिमत्ता परिपक्व झाली. त्याचीच बहुमोल फळे पुढे त्याच्या जीवनात दिसतात. पण आध्यात्मिक वृद्धी न होताच महाविद्यालयातील दोन वर्षे निघून गेली. तो फार आत्मसंतुष्ट व्यक्ती होता. जानेवारी १८०० मध्ये त्याचे वडील अचानक वारले. त्याला मोठा धक्का बसला. आणि त्याच्या जीवनातील घडामोडींना प्रारंभ झाला. त्याविषयी तो लिहितो, “वडिलांच्या निधनाने मी उदास बनलो. मलाही एक दिवस त्या मार्गानेच जायचे होते. मी विचार करू लागलो. पण विचारांची दिशा ठरवली नाही. अभ्यासात लक्ष लागत नसल्याने मी बायबल हाती घेतले. मनोरंजन म्हणून प्रेषितांची कृत्ये वाचू लागलो. त्यात मी रमून गेलो. पण त्यासोबतच प्रेषितांच्या सिद्धांतांवर मी बारकाईने विचार करू लागलो. त्या रात्री नेहमीची प्रार्थना केली. ख्रिस्ताला जगात पाठवल्याबद्दल देवाचे आभार मानले. क्षमायाचना केली. पण पापांची फारशी जाणीव नव्हती. त्यामुळे स्वत:ला फार धार्मिक समजू लागलो.”

तेथील एक वर्षाचे शिक्षण पूर्ण झाले. परीक्षेत उत्तम यश मिळाले. गणितात मानाचे पारितोषिक मिळाले. तो सिनियर रॅंगलर झाला. त्याच्यावर सन्मानाचा वर्षाव होत होता. पण यात त्याला कसलेच भूषण किंवा अभिमान अथवा समाधानही वाटेना. आपल्या पदरातील यश क्षणभंगुर, कवडीमोल असल्याचे जाणवू लागले. १८०२ मध्ये फेलो म्हणून कॅालेजात त्याची नेमणूक झाली. लॅटिनमधील त्याच्या निबंधाला पारितोषिक मिळाले. १८०३ मध्ये त्याला भाषांचा परीक्षक म्हणून नेमले. १८०४ मध्ये तो तत्त्वज्ञानाचा परीक्षक झाला. सन्मानाच्या पदव्या मिळवत तो पुढे कॅालेजचा डीन झाला. हा मनुष्य विद्याव्यासंगातच आयुष्य घालवील असेच कोणीही म्हटले असते. पण याच काळात त्याला श्रेष्ठ व उच्च प्रतीची सेवा करण्याचे वळण लागले. सिमियन नावाचा ट्रिनिटी चर्चचा कोणीएक प्रभावी पाळक होता. त्याच्या उपदेशांचे व स्नेहाचे भाग्य त्याला लाभले. त्या पाळकाकडे आकर्षित होऊन पुष्कळ मुले चर्चला जाऊ लागली होती. त्यातलाच एक हेन्री मार्टिनही होता. त्याला या पाळकानेच ख्रिस्ताकडे आणले व मिशन कार्याचा मार्ग दाखवला. तेव्हा पुढे चर्च मिशनरी सोसायटी नावाची संस्था स्थापन झाली. हा पाळक केरीच्या त्रिकुटाविषयी नेहमी बोलत असे व त्यांच्या कार्याची प्रशंसा करत असे. मिशनरींची चरित्रे सांगत असे. त्यामुळे ब्रेनर्ड सारख्या मिशनरीविषयी आस्था व केरीप्रमाणे काम करण्याची कळकळ हेन्रीच्या मनात जागृत झाली. ‘मला मिशनरी म्हणून पाठवा’ अशी त्याने सोसायटीला विनंती केली पण तो केवळ २१ वर्षांचा होता. पाळकीय दीक्षा घेण्याइतका प्रौढ नव्हता. म्हणून सिमियनच्या हाताखाली पूर्ण तयारी करूनच तो पुढील प्रतिक्षा करू लागला. याच काळात त्याच्या जीवनाला कलाटणी देणारे प्रसंग घडले.

लिडिया ग्रेनफेल नावाच्या तरुणीवर त्याचे प्रेम जडले. पण त्यांच्या विवाहाचा योग नव्हता. हेन्रीच्या मनातील प्रेमज्योत तेवत राहिली. पण तिचे प्रेम उत्कट नव्हते. पुढे ते वृद्धिंगत होत गेले. तरी ती त्याच्याशी विवाहास तयार होईना. “माझ्यासोबत भारतात चल,” ही विनंतीही त्याने करून पाहिली. पण व्यर्थ. भारतात आल्यावरही तो तिला लग्नासाठी विनंतीची पत्रे लिहायचा. पण निष्फळ. हेन्रीच्या जीवनातील ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. ती त्याच्याशी फारच कठोरपणे वागली. त्याला कारणेही तशीच होती. तिने भारताला जावे अशी तिच्या पालकांचीही इच्छा नव्हती. दुसरे असे की आपण मानवी प्रेमाच्या आहारी गेलो तर आपली देवावरील सर्वोच्च भक्ती कमी होईल अशी तिची धारणा होती. मार्टिनच्याही मनात असे विचार येत होते. हे सर्व पाहाता त्या दोघांनीही विनाकारण ताटातूट करून घेऊन जिवाचे हाल करून घेतले असे वाटते. जे काही करायचे ते जिवाचे रान करून करायचे हा तर हेन्रीचा स्वभावच होता. मग तर आपल्या नित्याच्या शारीरिक गरजांकडेही तो दुर्लक्ष करायचा. अशा माणसाला भारतात एकाकीपणे सेवा करावी लागली हे दुर्दैवच म्हणावे.
आणखी असे झाले की हेन्रीचा मेहुणा मरण पावला. त्यामुळे बहिणीच्या चरितार्थाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. मग मिशनरी म्हणून गेल्यावर तिचा चरितार्थ चालवणे कसे पेलणार? त्यात सोसायटी त्याला मिशनरी म्हणून पाठवायला तयार नव्हती. पाळक सिमियनच्या मदतीने त्यावर तोडगा निघाला. त्याला चॅप्लेन म्हणून भारतात नोकरी उपलब्ध झाली. त्यामुळे त्याला मिशनकार्याची संधी मिळणार होती. आणि चॅप्लेन म्हणून भरपूर पगार असल्याने बहिणीचीही काळजी नव्हती. पैशांकडे पाहून नव्हे तर कामाचे आकर्षण वाटून त्याने हे काम स्वीकारले.

३१ ॲागस्ट १८०५ रोजी युनियन जहाजाने तो भारताच्या प्रवासाला निघाला. ९ महिन्यांनी कलकत्याला उतरला. पण प्रवासातच त्याला चॅप्लेनच्या कामाचा प्रत्यय आला. जहाजावर सरकारची ५९ वी पलटण होती. भारतात आल्यावर आपल्या देशबांधवांच्या कोणत्या बेपर्वाईशी आपला सामना होणार हे त्याच्या तेव्हाच लक्षात आले. जहाजाचा कप्तान व सैनिकांना हेन्री एक पीडाच वाटू लागला होता. आठवड्यातून एकदा त्याला जहाजावर उपासना घेण्याची संधी मिळाली. त्याच्याविषयी व त्याच्या कार्याविषयी नावड दर्शवण्यासाठी उपासनेला हजर न राहता हे अधिकारी जवळच विड्या ओढत, दारू पीत, हसत खिदळत गप्पा मारीत बसायचे. तेव्हा या सात्विक तरुणाचे मन फाटून भडभडून यायचे. पण न कचरता त्याने धीर धरला. तो त्यांना आस्था दाखवी. गरजेच्या वेळी त्यांच्या मदतीला धावून जाई. आपला आदर्श दाखवीत कळकळीने उपदेश करी. हळूहळू उघड विरोध बंद झाला. पूर्वी रोमने पाठवलेले दोन मिशनरी सेंट झेवियर व फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या तोडीचा तो चॅप्लेन झाला. रोज बंगाली, हिंदी व पोर्तुगीज भाषांचा नित्यनेमाने तो अभ्यास करी. जहाजावरील कामगारांशी बोलण्याची एकही संधी तो सोडीत नसे. या जहाज प्रवासात जेव्हा ते केपटाऊनला आले, तेव्हा येथे डचांशी युद्ध जुंपल्याने जहाजावरील सैन्याची तेथे कुमक पाठवावी लागली. तेव्हा हेन्रीला त्यांच्यासोबत जावे लागले. तेथे तो जखमींची शुश्रुषा करी. मरणोन्मुख लोकांशी सांत्वनपर बोले. लढाईत धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची उत्तरक्रिया करी. इंग्रजांच्या विजयाबद्दल आनंद करण्यापेक्षा मारले गेलेल्यांच्या आप्तांच्या दु:खात सहभागी होण्याच्या संधीची तो वाट पाही. प्रार्थनेत वेळ घालवी. तो प्रदेश ख्रिस्ताच्या राज्यासाठी हस्तगत करता यावा असे त्याला वाटे. इंग्लंडने दूरवर तोफखाना पुरवून विजयाने उन्मत्त होण्याऐवजी सुवार्ताप्रसारासाठी मिशनरी पाठवून आपली थोरवी वाढवावी असे त्याला वाटे.

२२ एप्रिल १८०६ रोजी जहाज मद्रासला लागले. तेव्हा हेन्रीला भारताचे दर्शन घडले. सेंट जॅार्ज फोर्टमधील सेंट मेरीज चर्चमध्ये त्याने पहिला संदेश दिला. पौलाप्रमाणे तेथे परखडपणे त्याने आपले मुद्दे मांडले. त्यावेळी खूप लोकांचे धाबे दणाणले. तर काहींनी तो संदेश हसण्यावारी नेला. या देशात मुंग्यांसारखी माणसे असून त्यांना मंडळीत आणण्याचे काम किती अफाट आहे याची त्याला कल्पना आली. तो म्हणतो, “इंग्लंडमध्ये असताना मला वाटे की आपण विधर्मियांचे चुटकीसरशी परिवर्तन करू शकू. पण भारतात आल्यावर त्याची अशक्यता जाणवली. यासाठी आपला विश्वास व उत्साह दृढ राखणे महत्त्वाचे आहे, हे त्याला समजले. आज मंडळीने देवावरील सर्वोच्च प्रीती हेन्रीकडून शिकायला हवी. आणि त्याच्याकडून स्वार्थत्यागाचे धडे घ्यायला हवेत. आपल्याला हा प्रश्न सतावायला हवा की, मार्टिनला माझ्या मूर्तिपूजक भारतासाठी असलेली तळमळ मला कितपत आहे?

१६ मे १८०६ रोजी कलकत्यात उतरला व त्याच्या अल्प सेवेला सुरुवात झाली. कलकत्यात उतरल्यापासून आशिया मायनरमधील तोकात येथे त्याचे देहावसान होईपर्यंतचा काळ साडेसहा वर्षांचा आहे. त्यातील साडे चार वर्षे त्याने भारतात घालवली. १८०९ च्या मे महिन्यात त्याची कानपूरला बदली झाली. तेथे अडीच वर्षे त्याने अविरत श्रम केले. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली म्हणून १८१० मध्ये मोठी रजा घेऊन त्याने जलप्रवास केला नाही तर तो फार काळचा सोबती राहणार नाही अशी चिन्हे दिसू लागली. अरबस्तान व इराणमध्ये काही दिवस घालवून इंग्लंडला जावे असे त्याने ठरवले. जानेवारी १८११ मध्ये त्याचा प्रवास सुरू झाला. २१ मे १८११ रोजी तो इराणला उतरला. त्या परिसरातच त्याचे दीड वर्षाने देहावसान होणार होते. इतक्या अल्पायुषात त्याने जीव एकवटून प्राण पणाला लावून दूरगामी परिणाम होईल असे काम केले. त्यामुळेच त्याचा इतिहासात कायमचा ठसा उमटला. त्याने केंब्रिज विश्वविद्यालयात कधी एक क्षणही वाया घालवला नव्हता. ती त्याची ख्यातीच होती. भारतासाठी तर ख्रिस्ताकरता त्याने काकणभर जास्तच शरीर झिजवले होते. “माझा देह प्रभूसाठीच झिजून कारणी लागू दे” अशी तो सतत प्रार्थना करीत असे. त्याच्या नाजूक कुडीद्वारे आत्म्याने जे काम केले ते तिघांनी करावे एवढे होते. चॅप्लेन, मिशनरी, सुवार्ताप्रसारक, विद्वान, धर्मविश्वासाचा कैवारी, पुरस्कर्ता व साधू अशा विविध पैलूंचा त्याच्याजीवनात मिलाफ दिसतो. त्याविषयी स्वतंत्रपणे आपण पाहू.

चॅप्लेनची सेवा भारतात ख्रिस्ती विश्वासाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यामुळे ब्रिटिशांमध्ये सभ्यता व धार्मिक वृत्ती टिकवता आली. भारतीयांसमोर पूर्वीप्रमाणे ब्रिटिश लोक राजरोसपणे भ्रष्ट व नास्तिक आचरण करीनासे झाले. ही फार महत्त्वाची सेवा झाली.

चॅप्लेन सेवेच्या जोडीनेच त्याने अनेक लहान लहान शाळा काढण्याचे काम केले. ख्रिस्ती धर्म विश्वासाविषयी चिकित्सेने विचारपूस करणाऱ्यांना खरा मार्ग दाखवण्यात साह्य केले. आपल्या मायदेशी पत्रे लिहून भारताच्या गरजा त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम केले. त्यामुळे इंग्लंडमधील चॅप्लेन लोकांनी मिशनकार्याची तळमळ तेथे जागृत ठेवली. त्यांच्यामुळे अनेकांनी स्फूर्ती घेऊन आजही भारतात मिशनकार्य चालू ठेवले आहे.

हेन्री मार्टिनच्या काळी सेरामपूरमध्ये डॅनिश वसाहतीत काम करणारे त्रिकुट – विल्यम केरी, मिशमन व वॅार्ड हे होते. बरीच वर्षे चॅप्लेनची सेवा फारच कमी होती. १८ व्या शतकात ही परिस्थिती सुधारायला लॅार्ड वेल्स्ली, सर जॅान शोअर, यांच्यासारखे उच्च धेयाने पेटलेले अधिकारी, ग्रॅन्ट व चेम्बर्ससारखे कंपनीचे नोकर, क्लॅाडियस बकॅनन, आणि केम्ब्रिज मधील चार्लस सिमियन यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी धार्मिक वृत्तीचे चॅप्लेन पाठवले. त्यामुळे ॲंग्लो इंडियनांचे पुनरुज्जीवन होऊ लागले. त्यात सर्वप्रथम आलेल्या डेविड ब्राऊनची गणना होते. तो १७८६ मध्ये कलकत्यात आला. मार्टिनच्या आधी २० वर्षे तो भारतात परिश्रम करीत होता. त्याने भारतीयांचे प्रेम व विश्वास संपादन केला. तो फार लोकप्रिय होता. त्याने कलकत्यात धार्मिक क्रांतीच घडवली. अनेक स्वदेशबांधवांना सन्मार्गावर आणले. हेन्री मार्टिन डेविड ब्राऊनच्या घरी आरंभीचे ६ महिने पाहुणा म्हणून राहिला होता. त्याच्या सहवासाचा हेन्रीला खूप फायदा झाला.

हेन्री मार्टिनच्या एकूण कार्यात काही दोष आढळले तरी त्याचे सद्गुणच उठून दिसतात.

कलकत्यातील पहिल्या उपदेशात जणु पुलपीटवर बाप्तिस्मा करणारा योहानच उभा असल्याचा भास होतो. तेथे त्याने खडसून, बजावून, सावधानतेचा इशारा देतच उपदेश केला. ख्रिस्ताचे अनुकरण न करणाऱ्यांचा कसा नाश होऊ शकतो, भयंकर यातनांना कसे सामोरे जावे लागते, हा धोका त्याने निदर्शनास आणून दिला. पण देव दयाळू आहे. त्याचा शांतीदूत म्हणून वधस्तंभी खिळलेला ख्रिस्त गाजवण्याची तळमळही त्याने व्यक्त केली. २५ वर्षे वयाच्या मुलाचा हा अधिकारवाणीने दिलेला संदेश लोकांच्या किती पचनी पडला, माहीत नाही. पण तो पश्चात्ताप करा हा आक्रोश करताना आढळून आला. प्रत्येक संदेश झाल्यावर आपल्या खोलीत गुडघे टेकून ऐकणाऱ्यांसाठी हा उपदेशक तळमळून प्रार्थना करीत असे.
ॲंग्लोइंडियन समाजाला पापाची जाणीव करून देण्यास, कानउघाडणी करून पश्चात्तापास भाग पाडणे आवश्यक होते. या कामी त्याचा प्रेमळ गोड स्वभाव नजरेत भरत असे. त्यामुळे तो लोकप्रिय झाला.

चॅप्लेन म्हणून हेन्री १८०६ च्या अखेरीस दिनापूरला गेला. १७०० सैनिक, ८० अधिकारी आणि कंपनीचे नोकर एवढ्यांची त्याच्यावर जबाबदारी येऊन पडली. हे काम फार महान होते. कडक बोलण्याने त्याची येथे कसोटी लागणार होती. कलकत्यासारख्या नंदनवनात असताना डेविड ब्राऊन व केंब्रिजहून आलेला मित्र डॅनिएल कोरी, चॅप्लेन म्हणून होते. सेरामपूरलाही त्रिकुट होते. पण दिनापूरला तो एकटाच होता. त्याला बेफिकिरी, उदासीनता व विरोधाला तोंड द्यावे लागले. तेथे मंदिरही नसल्याने पारावर, उघड्यावर प्रार्थना करावी लागे. सैनिकांना बसायला खुर्च्या नव्हत्या. उभे राहून ते कंटाळून जात. यामुळे लोकांच्या विनंतीवरून संदेशात कपात करावी लागे. तेव्हा मृत्युपथावरील लोकांसाठी तळमळणारा हा संत थिजून जाई. उपमर्द करणारे, हिंमत खचवणारे, निराश करणारे खूप अनुभव त्याला आले. “यापेक्षा दुष्ट लोक मी कधीच पाहिले नाही” असे तो एकदा केरींना म्हणाला होता. दवाखान्यात हा रोग्यांच्या समाचाराला गेला तर रोगी मरणारच, अशी समजूत करून दिल्याने तो लोकांच्या निंदेचा विषय झाला होता. तरीही रविवारच्या उपासनेला लोकांची गर्दी वाढत होती. मूठभर तरी लोकांवर वचनाची छाप पडत असल्याचे दिसू लागले. जवळच कोरीची चॅप्लेन म्हणून नेमणूक झाल्याने दोघांची परस्परांना सहभागिता लाभू लागली. 

कानपूरला जाणाऱ्या पलटणीचा दिनापूरमध्ये मुक्काम पडला असता शेरवुड नामक खऱ्या, देवभीरू, मनोभावे सेवा करणाऱ्या दांपत्याशी त्याचा निकटचा संबंध आला. मिसेस शेरवुडची निरीक्षण शक्ती दांडगी होती. तिला लेखनकलाही अवगत होती. तिच्यामुळे हेन्रीचे सुस्पष्ट चित्र आपल्याला प्राप्त झाले आहे. ती लिहिते: “हा साधा, फिक्कट वर्णाचा, भव्य कपाळाचा, फिक्कट तपकिरी केसांचा, शिष्टाचारी सत्पुरुष पांढऱ्या पोशाखात प्रथमच आमच्या घरी आल्याचे मला आठवते. त्याच्या चेहऱ्यावरील बुद्धिमत्ता व प्रीतीचे तेज माझ्या डोळ्यात भरले. गंभीर विचारांकडे त्याचा कल होता. तो जगातील योग्य गोष्टीचा आनंद घेणारा होता. दमल्यास बालकाशी खेळण्यात तो रमायचा. तो अविश्रांत कष्ट करायचा.” 

भारतातील हवामानाचा शरीरावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून काहीच काळजी न घेतल्याने त्याची प्रकृती ढासळली. वंशपरंपरेने त्याच्यात असलेल्या क्षयरोगाचे चिन्ह त्याच्यामध्ये दिसू लागले. त्यात १८०९ च्या भर उन्हाळ्यात त्याची कानपूरला बदली झाली. मरता मरता तो इच्छित स्थळी पोहंचला. तेव्हा मिसेस शेरवुड व त्याच्या मित्रांना तो बेशुद्धावस्थेत अर्धमेला आढळला. शेरवुड जोडप्याने त्याला आपल्या घरी ठेवून त्याची शुश्रुषा केली. तेव्हा निकडीची कामे करण्यास त्याला शक्ती आली. येथेही त्याला दिनापुरचाच अनुभव आला. विरोध व बेपर्वाईला त्याने निष्ठेने व धैर्याने तोंड दिले. पण खंगत चाललेल्या त्याच्या प्रकृतीवर खूप ताण पडला. उपासना चालवताना त्याचा आवाज बसायचा. छातीत कळ यायची. त्यामुळे उघड्यावरील उपासना त्याला आवरती घ्यावी लागे. येथेही मंदिर नव्हते. दोन वर्षे त्याने अविश्रांत श्रम केले. पण प्रकृती ढासळल्यामुळे त्याला रजा काढावी लागली. १ ॲाक्टोबर १८१० रोजी आपला मित्र डॅनिएल कोरी याच्या हाती त्याने आपल्या कामाची सर्व सूत्रे दिली.

मंदिर बांधण्याच्या कामी त्याला यश आले होते. तेही त्याच्या हाती सोपवले. तेथून समुद्रमार्गाने मुंबईहून इराणला जायचा त्याचा बेत होता. मिसेस शेरवुड लिहितात:
“त्या दिवशी प्रथमच मंदिराच्या घंटेचा आवाज कानी पडला. खूप गर्दी झाली होती. कंपनीच्या बॅंडवर खूप गाणी गाण्यात आली. मार्टिनने उपदेश केला. कोरीने प्रार्थना केली. तो अविस्मरणीय दिवस होता. सार्वजनिक उपासना न मिळाल्याचे दुष्परिणाम अनुभवलेल्या लोकांनाच या प्रसंगाचे महत्त्व कळेल. मंदिराचे काम सफळ झाल्याचे हेन्रीने पाहिले व उपदेशही केला ही विशेष गोष्ट होती. त्यानंतर कानपूर सोडण्याची देवाने त्याला आज्ञा दिली. १८५७ चा दंगा होईपर्यंत कानपूरच्या पलटणीचे हेच मंदिर होते. कानपूर सोडताच हेन्रीचे चॅप्लेनचे कामही संपले. ॲंग्लो इंडियनांमध्ये छाप पाडण्याचे महान कार्य त्याच्या हातून झाले. भारतात निराळेच क्षेत्र लाभून त्याला व्यापक सेवा करता आली. ‘मिशनरी वृत्तीचा चॅप्लेन’ असे त्याचे वर्णन करता येईल. 

त्याला भारतात पाठवण्यात देवाचा हात होता हे निश्चित. त्या काळी ब्रिटिश मिशनरी भारतात आलेले ईस्ट इंडिया कंपनीला खपत नसे. भारतात पाऊल टाकल्यापासून भारतीयांसाठी त्याचा जीव तीळतीळ तुटत होता. भारताचा विस्तार पाहून त्याचा जीव दडपून गेला होता. मूर्तिपूजा पाहून त्याच्या छातीत धस्स झाले होते. अंत:करण फाटून गेले होते. त्याच्या घरात रोज दर तासाला भारतासाठी प्रार्थना व्हायची. ब्राऊनच्या घरी काही दिवस राहिल्यावर त्याच्या आवारातील एक पडिक हिंदू देऊळ खरेदी करून त्याची डागडुजी करून तो तेथे राहू लागला. जेथे मूर्तिपूजा होई तेथे ख्रिस्ताचे गुणगान होऊ लागले. तेथे मोठ्याने गायन, प्रार्थना करताना गाभाऱ्यात पडसाद उमटून गाभारा दुमदुमून जायचा. हिंदू धर्माचे स्वरूप पाहून त्याच्या मनात कालवाकालव होत असे. एकदा तर विद्रूप मूर्तीला वंदन करणारे लोक पाहून आपले अंत:करण फाटते की काय असे त्याला वाटू लागले. त्यांची मला भाषा येत असती तर तेथेच मी उपदेश केला असता असे तो म्हणतो.

त्याच्या राहत्या देवळापासून १५० हातांवर चिता पेटलेली पाहून तो तेथे धावत गेला. पण तो तेथे पोहंचण्यापूर्वीच त्या स्त्रीने चितेत उडी घेतल्याचे त्याने पाहिले. भाषा येत नसल्याने त्याला दातखिळी बसल्यासारखे झाले. कारण त्यामुळे तो देवाचा संदेश देऊ शकत नव्हता. आजच्या काळातील भारताच्या गरजा व समस्या पाहून आपले मन किती द्रवते? अस्वस्थ होते? त्यांच्या तारणासाठी तडफडते? यावर आपण आत्मपरीक्षण करू या. वाढते ज्ञान, माहिती तंत्रज्ञान, यामुळे आजची परिस्थिती अधिकच कठीण आहे. मग त्या प्रमाणात प्रार्थना? आपले त्यांच्यापुढे साक्षीचे जीवन कसे आहे? हे पाहू गेल्यास या तरुणाचे जीवन पाहून आपली देशबांधवांविषयीची बेपर्वा वृत्ती समोर येऊन शरमेने मान खाली जाते.

मिशनरीचे काम केल्याशिवाय हेन्री मार्टिनला राहावत नव्हते. ते काम न करता जगणे त्याला कठीण जात होते. सेरामपुरचे त्रिकुट डॅा. विल्यम केरी, मार्शमन व वॅार्ड यांच्यामुळे त्याला या कामाची दिशा समजली होती. आरंभीच त्यांच्याशी त्याची गाठ पडली होती. आतापर्यंत केरीला फार आदराचे स्थान प्राप्त झाले होते. फोर्ट विल्यमच्या कॅालेजात केरी भाषांचा प्राध्यापक होता. सर्वच प्रकारच्या लोकांमध्ये त्याचे वजन होते. डॅा. केरीशी समविचारी झाल्याने या त्रिकुटाने हेन्रीला आपल्यात सामावून घेतले होते. सुवार्ता सांगणे तर हेन्रीचा स्वभावच होता. ज्ञानार्जनाचा व्यासंग, परभाषा शिकण्याची अफाट बुद्धीमत्ता, आध्यात्मिक दृष्टी यामुळे भाषांतरासाठी केरीने त्याची निवड केली. कलकत्याहून तो दिनापूरला निघाला तोवर हिंदी, फारसी व अरबीत भाषांतर करण्याची पात्रता अंगी यायला हवी ही योजना ठरली होती. हे अवाढव्य काम आपली या भूतलावरील अल्पशी जीवन यात्रा संपेपर्यंत हेन्रीने पूर्ण केले होते. प्रथम इंग्लंड चर्चच्या उपासना पद्धतीचे त्याने हिंदीत भाषांतर केले.

Previous Article

विल्यम केरी

Next Article

हेन्री मार्टिन

You might be interested in …

सामान्य भक्तीचे शांत सामर्थ्य

स्कॉट हबर्ड ख्रिस्ती या नात्याने आपल्याला फक्त बायबल वाचण्यातच रस नसतो. जे वाचतो ते आपल्याला भावले जावे, त्याने आपल्याला प्रेरणा द्यावी व आपल्याला बदलून टाकावे अशी आपली इच्छा असते. आपण लवकर उठून शास्त्रलेखांच्या पानावरून केवळ […]

ख्रिस्तजन्माच्या वेळचे शिष्य

डॉ. राल्फ विल्सन देवाने ख्रिस्तजन्माच्या वेळी, तसेच त्या घटना घडण्याच्या सुमारास त्याचे शिष्य कसे तयार केले होते हे पाहून मी चकित होतो. उदा. त्याच्या जन्मापूर्वी जखऱ्या, अलीशिबा, मरिया योसेफ. इ. आता आपण त्याच्या जन्मानंतरच्या दोन […]