जनवरी 3, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

प्रत्येक आरोपाविरुद्ध

स्कॉट हबर्ड

“देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे” (रोम ८:३३-३४)

सैतान हा एक लबाड असून तो आपल्याला फसवायला पाहतो इतकेच नव्हे तर तो मोह घालून आपल्याला अडकवायला पाहतो. तो खुनी असून आपल्याला ठार करायला पाहतो. तो दोषारोप करणारा असून आपल्याला दोषी ठरवू पाहतो.

सैतान या नावाचा अर्थच आहे दोषारोप करणारा. म्हणूनच आपण प्रकटी १२:१० मध्ये वाचतो, “आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा.” त्याच्या दुर्दशेमध्ये त्याला आपल्यासोबत आणखी लोकांना ओढण्याचा त्याचा अट्टाहास असतो. दंडपात्र लोकांनी तो वेढला जाण्यासाठी तो रात्रंदिवस श्रम करतो. आणि ज्यांना तो दोषी ठरवू शकत नाही (कारण ते ख्रिस्तामध्ये आहेत ) त्यांची आध्यात्मिक शांती नष्ट करायला तो अहोरात्र श्रम करतो. या संतांना त्यांच्या पापाचा कितीही तिटकारा वाटला आणि देवाला संतोष देण्याची तीव्र इच्छा असली तरी सैतान त्यांच्यावरील देवाच्या कृपेचा प्रकाश अंधुक करायचा प्रयत्न करेल. रात्री तो त्यांना भेटेल आणि देवाच्या क्रोधाचे दर्शन दाखवेल. तो त्यांना स्वत:संबंधी खोल विचार करायला भाग पडेल आणि प्रत्येक वृत्ती व भावनेची छाननी करायला लावेल. त्यासोबत देवाची अभिवचने तो त्यांच्या कानाशी कुजबुजेल आणि म्हणेल, “तुझ्यासारख्या पाप्याला हे कसे लागू होईल?”

अशा प्रकारच्या क्षणांमध्ये आपली सुरक्षा एकच आहे ती म्हणजे आपली दृष्टी नीतिमान ठरवणारा देव त्याकडे लावणे. “ख्रिस्त जो मेला, इतकेच नाही तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे त्याची आठवण करणे” (रोम ८:३३-३४). येशू मरण पावला. येशू पुन्हा  उठला. ख्रिस्त मध्यस्थी करत आहे. ही खात्री जेव्हा विश्वासाने घट्ट धरली जाते तेव्हा दुष्टाच्या प्रत्येक आरोपाविरुद्ध ती ढाल उभारते.

येशू जो मरण पावला

जर सैतानाचे आरोप स्पष्टपणे खोटे असते तर ते दूर सारणे सोपे गेले असते. पण अडचण ही आहे की त्यांच्यामध्ये कितीतरी सत्य आहे. आपण पापी आहोत. आपण दोषी आहोत. आपण दंडाज्ञेस पात्र आहोत. त्यामुळे आपला निर्दोषीपणा सिद्ध करताना आपल्याला कधीही शांती मिळणार नाही.

त्याऐवजी सैतानाला आपण आठवण करून दिली की “ख्रिस्त मरण पावला आहे”  (रोम ८:३४), तरच आपल्याला शांती मिळेल. होय, आम्ही पापी आहोत पण “आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला”  (रोम ५:८). होय, आम्ही दोषी आहोत पण ख्रिस्ताचे रक्त आपला दोष झाकून टाकते (रोम ३:२४-२५). होय, आपण दंडाज्ञेस पात्र आहोत. पण “देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली”  (रोम ८:३).

हे सत्य कसे धरून ठेवावे हे जॉन न्यूटन आपल्या गीतात सांगतात. त्याचे शीर्षक आहे “ माझ्या जिवा, दयेच्या आसनाकडे जा” त्याचा भावार्थ असा:

वाकून गेलेला, पापभाराखाली
सैतानाच्या पुऱ्या दबावाखाली
निष्कारण युद्ध , आत भीती
मी येतो तुझ्याकडे विसाव्याला

तू माझी ढाल, माझे सुरक्षास्थळ
आश्रय घेऊन तुझ्याजवळ
तोंड देतो मी माझ्या भयाण
दोषारोप करणाऱ्याला
आणि सांगतो,
तू माझ्यासाठी मेला आहेस

ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला आहे. आणि जर तो पापांसाठी मरण पावला तर आता आपल्याला मरण्याची गरज नाही.

ख्रिस्त जो उठला

कदाचित सैतान याला उत्तर देईल, “हो, तू त्या वधस्तंभावरच्या रक्ताळलेल्या माणसावर आशा ठेवतोस हे दिसतंय मला.  तो कसा तारणारा असेल बरे? एक मृत माणूस, मृत माणसाला कसा वाचवणार?”

पण जो तारणारा आपल्यासाठी मरण पावला तो आता मेलेला नाहीये. तो “येशू ख्रिस्त … जो मेलेल्यांतून उठला आहे”  (रोम ८:३४). आणि त्याला कुणी उठवले? ज्या पित्याला आपल्या पुत्राच्या कार्याने इतके समाधान झाले, त्याच्या बलिदानाने इतका संतोष झाला की त्याने त्याचा हात मृत्यूमध्ये घातला, आपल्या प्रिय पुत्राला धरले आणि जिवंतांच्या भूमीमध्ये उठवले. उत्तम शुक्रवारी येशूने घोषणा केली की, “पूर्ण झाले आहे.” पुनरुत्थानाच्या रविवारी पित्याने त्याचे सार्वकालिक ‘आमेन’ म्हटले.

जर ख्रिस्त उठवला गेला नसता तर आपल्याला प्रश्न पडला असता की, त्याच्या मृत्यूने आपली पापे कशी दूर होतील? तो लबाड, फसवा नाही हे आपल्याला कसे समजते? देवाने त्याच्यावर फक्त प्रहार करून, त्याला पिडले होते का

(यशया ५३:४)? परंतु ख्रिस्त जो  प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला तो  आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे (रोम ४:२५).

ख्रिस्त जो मध्यस्थी करत आहे

कधी कधी येशूच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची आठवण केली तरी शंका आपल्या खात्रीवर अंधार टाकते.  दंडाज्ञेची एक अस्पष्ट जाणीव आपल्याला चिकटून राहते आणि भूतकाळात येशूने जो उद्धार केला तो आताच्या दोषी भावनेमुळे आपल्यापासून तुटलेला आहे असे वाटते.

जखऱ्या संदेष्ट्याने एकदा एक दृष्टांत पहिला. “मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे, असे त्याने मला दाखवले” (जखऱ्या ३:१). जोपर्यंत आपण या जगात आहोत आपल्याला यहोशवाप्रमाणे  वाटेल की सैतान हा नेहमी आपल्या उजव्या हाताला असून आपले गचाळ पाप देवाच्या राजासनासमोर उघडे करायला तयार आहे ( जखऱ्या ३:३). त्यापेक्षा अमर्याद रीतीने महत्त्वाचे हे  आहे की आपल्या उजव्या हाताला कोण आहे. तो म्हणजे जो देवाच्या उजव्या हाताला आहे: “जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे” (रोम ८:३४).

आपल्या उजव्या हाताला आपल्यावर दोषारोप करणारा आहे, पण देवाच्या उजव्या हाताला आपला वकील आहे. आणि आपल्याविरुद्ध करणाऱ्या प्रत्येक दाव्याला ख्रिस्त आणखी मोठ्याने आपली बाजू मांडतो. आपली पापे दूर करण्यासाठी तो मरण पावला एवढेच नव्हे आणि आपले पूर्ण झालेले कार्य हातात घेऊन तो उठला एवढेच नव्हे तर तो आता कायम जगत आहे – त्याच्या लोकांची बाजू मांडण्याकरिता.

आणि जर ख्रिस्त स्वर्गात आहे व त्याच्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे तर आपल्याला त्याच्या प्रीतीपासून काहीही विभक्त करू शकणार नाही  (रोम ८:३५). अर्थातच सैतानाचे दोषारोपही आपल्याला विभक्त करू शकणार नाहीत. ते अखेरीस मरणार आहेत. ख्रिस्ताने आपली शिक्षा घेतली आहे. त्याने आपल्याला त्याची नीतिमत्ता दिली आहे. आणि जोपर्यंत तो जिवंत आहे आणि स्वर्गात राज्य करीत आहे तोपर्यंत कोणताही दोष देणारा आपल्याला त्याच्यापासून दूर ठेवू शकणार नाही.

Previous Article

पवित्र आत्म्याविषयी अभ्यास

Next Article

रोगी असणे निरोगी असण्यापेक्षा चांगले असू शकेल का?

You might be interested in …

विचलित, विकृत, फसवेगिरी

जॉन ब्लूम पापाच्या मोहाला प्रतिकार करायचा झाला तर साचेबंद असे कोणतेही एक धोरण नाही. मोह हे अनेक प्रकारे, अनेक वेळा येतात आणि त्यावर विजय मिळवायला बायबल आपल्याला अनेक धोरणे देते. पण ह्या सर्व मोहांमध्ये एक […]

 वधस्तंभावरील सात उद्गार (॥)

आता अंधार नाहीसा होऊन उजेड पडताच येशू एकामागून एक पुढील उद्गार स्वत: विषयी काढत आहे. चौथा उद्गार : “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास” ( मत्तय २७:४६)? बदलीच्या मरणाची ती पापाची शिक्षा […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक ८ बायबलमधील करारांचा तपशीलवार अभ्यास देवाने केलेले करार त्याच्या राज्याच्या योजनेची उकलून सांगणारी साधने आहेत. करार म्हणजे दोन पक्षांनी अटी व नियमांनी मान्य केलेला, मोडता न येणारा जाहीरनामा असतो. पण […]