जनवरी 22, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

पवित्र शास्त्राचं कार्य

लेखांक ६ वा                             

थोडी उजळणी करू. तारणाच्या योजनेत तारणाचे मूळ केंद्रस्थान कुटुंब. तारणाचं साधन म्हणजे कुटुंबातील उपासना. त्या उपासनेचा जीव म्हणजे पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्राचं शिक्षण उपासनेमध्ये प्राप्त होतं. त्या शिक्षणात कायम टिकायचं असतं. अशानं पवित्र शास्त्र तारण करतं. तारण करायला ते समर्थ आहे. ख्रिस्त येशूच्या कायमस्वरूपी स्थिर

असलेल्या, ख्रिस्त येशूच्या समक्षतेनं सर्वांगी संरक्षण केले गेलेल्या, विश्वासाच्या मनानं आपलं तारण होतं. केवळ शास्त्राचं ज्ञान देणं हे शास्त्राचं मुख्य काम नव्हे. ते सामर्थ्य आहे. व्यवहारोपयोगी आहे. स्वत:च्या उपयोगी पडतं. इतरांच्या तारणासाठी आपणाला व्यवहारोपयोगी चतुरपणानं भरून टाकतं. हे महान कार्य करण्याकरता देवानं त्यातल्या अक्षराअक्षरात आपल्या प्राणाची फुंकर घालून ते जिवंत केलं आहे. म्हणजे —
(१) पवित्र शास्त्र समर्थ आहे, कारण (२) देवाच्या पवित्र आत्म्याची फुंकर त्यातील शब्दाशब्दामध्ये आहे. (३) त्यासाठी ते उपयोगी पण आहे. ख्रिस्ती धर्मातील प्रत्येक गोष्ट उपयोगी, कार्यक्षम, व्यवहार्य असते. ही तिची अखेरची कसोटी आहे. किती गोष्टीत उपयोगी आहे?

(१) धर्मसिद्धांत शिक्षण (२) कसोटी (निर्भत्सना) (३) सुधारणूक (पडलेल्याला पुन्हा उठवून देवाच्या इयत्तेवर पुन्हा बसवणं) (४) नीतिचं बालशिक्षण (५) प्रत्येक मंगल कार्यासाठी तयारी.

पवित्र शास्त्रात धर्मशिक्षण आहे. सिद्धांतशिक्षण आहे. जिव्हाळ्याच्या गोष्टींचं शिक्षण आहे. त्याचं शिक्षण पहिल्यानं शास्त्रामध्ये मिळतं. आमची इयत्ता, जिण्याची ध्येये, याचं ज्ञान तिथं होतं. ते झाल्यावर पडलेल्याची कसोटीही तिथंच असते. त्या इयत्तेप्रमाणं आपण आहोत की नाही याची कसोटी असते. आणि तसं आपण नसल्यास मग कानउघाडणी होते. म्हणून पडलेल्याला परत उठवून, सावरून त्याला देवाच्या इयत्तेवर परत नेऊन ठेवणं हे महत्त्वाचं काम. अशा तऱ्हेने आपण पडलो, चुकलो, पाप केलं, असं वाटल्यावर त्याची बोचणी लागल्यावर, पश्चाताप झाल्यावर, मग विधायक काम. पश्चात्तापानं परत देवाच्या इत्तेवर बसल्यावर मग नीतीच्या बालशिक्षणासाठी पातकी तयार होतो. नीतिमत्ता आमची नव्हे, त्याची. ख्रिस्ताची. ती आम्ही बाळ बनल्यास मिळते. तितक्या बालकासारख्या सोपेपणानं, सहज मिळते.

ह्या सर्व कामासाठी ! या प्रकारे पूर्णत: सज्ज झालेला, तयार, घडलेला, देवाचा मनुष्य आता तारणाच्या कामाकरता उद्युक्त, तयार, सज्ज, पूर्ण होतो. इतकं सगळं शिक्षण पवित्र शास्त्र देते. आता वाचाच बरं…

एक कवयित्री आणि तिचं पवित्र शास्त्र

( ही चिली देशाची कवयित्री आहे. तिला काव्याबद्दल नोबेल प्राइझ मिळालं आहे. १९१९ मध्ये सॅन्टिएगो येथील हायस्कूलला तिनं एक बायबल बक्षीस दिलं होतं. त्याच्या पहिल्या व अखेरच्या पृष्ठावर तिने खालील शब्द लिहिले आहेत.)

“ माझ्या पुस्तका, प्रत्येक चालत्या घडीच्या अन् सर्वकाळच्या पुस्तका, भल्या मित्रा, अन माझ्या दिलाच्या खंद्या दोस्ता! सौंदर्यातलं सामर्थ्य, स्फटीकवत स्पष्टवक्तेपणा, साधेपणा, तसाच भयानकपणा मला तुझ्याच त्रोटक वचनांनी शिकवला. माझे निवडक जिगरदोस्त माझ्या काळातले नव्हते. ते म्हणजे तू मला दिलेले स्त्री पुरूष! दावीद, रूथ, ईयोब, राहेल, अन् मरीया…माझं कुटुंब! ह्यांच्याबरोबर माझं मित्रमंडळ म्हणजे हीच माणसं. माझ्या प्रार्थनेच्या वेळी त्यांच्या माझ्या भेटीगाठी होतात. जसे तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांना, शौर्याने दु:खसहन करणाऱ्यांना तसे ते मलाही भेटतात. भूतकाळाच्या पंखांनी उडत उडत तू माझ्याकडे आला आहेस. काळाचं बंधन तोडत परत परत मी त्यांच्या सहवासात जाते. दुसऱ्याच एका काळात आयुष्य कंठणारे जे तुझे आहेत, तशीच मीही तुझी आहे.

माझं तू कितीदा बरं समाधान केलंस! जोडलेले माझे हात जितकेदा धुळीत माखले आहेत तितकेदा, हे माणसाच्या पुस्तका, माणसाच्या केवळ एकच सच्चा पुस्तका, तुझा मी शोध केलाय अन् तो वाया गेलाय असं कधी बरं झालंय? माणसाच्या कडुपणाला झोपवणाऱ्या, पवित्र संगीताच्या सुरांवर झुलायची गोडी मला दाविदामुळं लागली. ह्या जिण्याच्या व्यर्थतेचा पडसाद मला उपदेशाच्या पुस्तकात ऐकू आला. आता असं झालंय, तुझे बोल माझ्या बोलात गुंतून गेलेत. तेव्हा आता मी माझ्या बोलात माझा दु:खातिरेक ओतला आहे, की दु:खानं नि पश्चात्तापानं भग्न झालेल्या तुझ्यामधील जिवाच्या बोलांची  मी पुनरावृत्ती करत आहे, हेच मला समजत नाही.

मानवी काव्याप्रमाणं तुझा कधी वीट येत नाही. तू हजरवक्त असून पावसाळ्यातील हिरवळीप्रमाणं लुसलुशीत असतोस. तुझा प्रामाणिकपणा अद्वितीय आहे. त्यामध्ये फसवेपणाचा लवलेश नाही. तुझ्या उघड्यावागड्या खड्या बोलांनी ढोंग्यांना कापरं भरतं. बदफैल्यांना तुझी सुज्ञता ढकलून देते. पण मला मात्र तू सर्वच्या सर्व आवडता आहेस. दाखल्यातील नाजूक अर्थ असो की गणनेच्या पुस्तकातील विशेषणं असोत, दोन्हीही मला प्यारीच आहेत. प्रथमत: तुझं पृथक्करण करायला म्हणून तज्ज्ञ विद्वान आपली तर्कशास्त्राची हत्यारं वापरतात. पण नंतर ते तुझा इन्कार करतात. मी मात्र तुझ्याजवळ येऊन बसते, ती तुझ्यावर अनंतकाळ प्रीती करण्यासाठी. दिवसाचा प्रकाश पाहायला माझा प्रभू मला जेवढा काळ बहाल करील तेवढा सर्व काळ मी तुझ्या सत्यानं माझा जीव भरवीन.

धंदेवाईक शिक्षक तुझं पृथक्करण करतात, तुझी तुलना करतात, तुझ्या पृष्ठांवर रेघोट्या ओढतात. पण मी मात्र तू आहेस तसाच तुझ्यावर प्रीती करण्यात तृप्त आहे. तुझ्या सावलीखाली माझं ऱ्हदय स्पुंदू लागतं. एवढं मला पुरं आहे. तुझे पुरुष मला आनंद देण्याकरता परत परत येतात एवढं मला पुरं होतं. वाटाड्यांवाचून मी प्रथमत: तुझी सौंदर्यप्रभा पाहिली. नि ते दैदिप्यमान दृश्य कधी फिकं पडलं नाही. या जगाच्या बुद्धिवंतांकडून मी शिकले. पण त्यातल्या एका गोष्टीनंही तुला टाकून द्यावं असं मला वाटलं नाही. तुझा धिक्कार करावा असं वाटलं नाही. ईयोबाच्या पुस्तकावरही ताण करणारा जर एखादा आवाज असेल तर तो मात्र माझं सारं कौतुक काबीज करील. पण त्यातले सूर दुसरीकडं कुठं ऐकू येतील?
नीतिसुत्रांमधील सद्गुणी स्त्रीमध्ये ज्या शिक्षणतज्ज्ञाला एखादा दोष दिसेल, त्यानं मात्र खुशाल माझ्या निष्ठेवर हक्क सांगावा. पण यापेक्षा उच्च स्त्रीत्व कोणी सुचवलं आहे? धन्यवादांमध्ये असलेल्या माधुरीहून अधिक गोडीनं जो माझ्यावर पगडा बसवील, त्यानं माझ्या ऱ्हदयावर कायमची हुकमत चालवावी. पण माझं अर्ध आयुष्य गेलं तरी तसल्या कुणाशी माझी गाठ पडली नाही. सर्व मानवजातीच्या अंगाईगीता! त्रस्त मानवाच्या अनंतकालीन सेविके! तुझं शहाणपण मुलांकरता लिहिलेल्या गीताप्रमाणं हेलकावे खातं. घटकेघटकेला मला तुझी गरज लागते. मला सोडू नको. मला टाकू नको. माझ्यामधलं सदाचं बालपण तुझ्या पृष्ठापृष्ठातलं अविरत आश्चर्य जतन करून ठेवील. काठोकाठ भरलेल्या या तुझ्या प्याल्यानं देवाबद्दल माझी तहान भागलेली अशीच मी जीवन जगेन.

Previous Article

पवित्र शास्त्रातील पवित्र आत्म्याचे सामर्थ्य

Next Article

प. शास्त्राचा उपयोग: चांगल्या कामासाठी तयारी

You might be interested in …

देव सर्वाचा  उपयोग करतो

वनिथा रिस्नर काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने विचार न करता असे काही उद्गार काढले की त्यांमुळे मी दुखावली गेले. माझा पहिला प्रतिसाद म्हणजे मी  अस्वस्थ झाले.  नंतर मी मनामध्ये तिच्याबद्दलच्या तक्रारींचा मनातला मनात पाढा वाचू […]

मोठी मिळकत मिळावी म्हणून प्रार्थना करणे चुकीचे आहे का?

जॉन पायपर जेनेसिसचा प्रश्नपास्टर जॉन, मला आरामशीर जीवन जगता यावे म्हणून अधिक पैसे दे असे देवाला मागणे पाप आहे का? की आपण ख्रिस्ती लोकांनी फक्त हानी आणि दु:ख सोसायचे आहे? अधिक भौतिक सुख शोधायला आपल्याला […]

संपादकीय

नुकतेच कोणीतरी मला म्हणाले, “त्याची तत्वे अगदी आपल्या तत्वांसारखी आहेत.” त्याला म्हणायचे होते की त्याची तत्वे बरोबर आहेत. या विधानावर मी विचार केला आणि ठरवले की असे विधान एक गर्वाचेच  विधान ठरत नाही पण नकळत […]