योहान १७:१० – “ त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.”
३) कुणामध्ये गौरव ? – “ त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.” असं प्रभू म्हणतो. “ त्यांच्यामध्ये” म्हणजे कुणामध्ये? त्याच्या शिष्यांमध्ये. त्याच्या शिष्यांच्या ठायी. इथं थोडं थांबून पाहू या हे शिष्य कसले आहेत ते. तशा शिष्यांमध्ये जर त्याचं गौरव झालं तर आमच्यामध्ये का नाही होणार? ते पाहून आपलं समाधान होईलच होईल. पाहा बरं ते शिष्य कसे होते:
(अ) अज्ञान (ब) देहानं दुर्बल (क) आत्म्यानं दुर्बल (ड) रागीट (इ) ऐहिक (फ) त्याला सोडून जाणारे (ग) त्याला नाकारणारे.
(अ) अज्ञान – हे त्यांचं अज्ञान बौद्धिक होतं हे पहिल्यानं लक्षात येईल. ख्रिस्त, त्याची शिकवण, त्याच्या कृती, त्याचं चरित्र या गोष्टी इतक्या नवीन होत्या की त्यांना त्या काय आहेत हे समजलंच नाही. पुढं कालांतरानं त्या गोष्टी लक्षात आल्या व सरळ खरेपणानं त्यांनी त्या आमच्यासाठी नमूद करून ठेवल्या आहेत. उदाहरणार्थ, जेव्हा तो आपल्या देहाविषयी बोलत होता की, तीन दिवसात ते मी मोडून परत उभारीन. तेव्हा तिथं नोंद आहे की “तो मेलेल्यांतून उठल्यावर त्याच्या शिष्यांना त्याचे हे बोल आठवले” (योहान २:२२). हे त्यांचं अज्ञान केवळ बौद्धिक नव्हे तर आध्यात्मिकही होतं. तो आपल्या मरण सोसण्याविषयी बोलतो; तर ते उसळून म्हणतात, “हे प्रभू तुला असं न होवो.” हे बोल आपण सैतानाच्या पकडीत गेलो असून त्या सैतानाला जे म्हणायचंय तेच आपण बोलत आहोत हे त्यांना समजलंही नाही (मत्तय १६:२२). तसंच ५ हजारांना भोजन घालण्याअगोदर ही देवाची, जिवंत, स्वर्गातून उतरलेली भाकर जेव्हा त्यांना आज्ञा देत आहे की, “तुम्ही त्यांना खावयास भाकरी द्या” तेव्हा ते काय म्हणतात? “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी आहेत, जेवणारे तर ५ हजार आहेत ( मत्तय १४:१७) त्या इतक्यांना कशा पुरणार?” अरेरे… केवळ ५ भाकरी… जगातल्या, मानवाच्या मेलेल्या अन्नाच्या भाकरीच त्यांना दिसतात. स्वर्गातली देवाची, जिवंत भाकरी त्यांना दिसूनच येत नाही. आणि आज २ हजार वर्षांनंतरही आम्हाला तरी काय दिसतं? त्यांना निदान सबब तरी होती की हा मनुष्य, त्याचं बोलणं, करणं, चरित्र, काहीही त्यांना माहीत नव्हतं. पण आता? आपल्याला काहीतरी सबब आहे का? त्यांना समजलं नव्हतं. आपल्याला समजलं आहे ना? पण अद्याप विश्वास नाही.
(ब) देहाने दुर्बल – किती साधी पण अटळ बाब आहे बरं ही ! त्यावेळेस होती. आणि आज? कितीतरी पटींनी अधिक आहे. प्रभू कोणत्यातरी रहस्यमय अंधारात चालला आहे. त्याला सोबत हवी म्हणून त्यानं त्यांना बरोबर घेतलंय. सारं कळूनही वळलं नव्हतं. तीन तीनदा येऊन उठवलं, पण काळझोपेनं भारावलेले डोळे कुठलं ऐकायला? झोपेच्या झापडीनं ते कधी विसावत होते तेही कळत नव्हतं त्यांना! अन् आम्हाला? कमालीच्या संकटांनी जरी घेरलं, आणि उपास प्रार्थना करावी म्हटलं, तर प्रार्थना करता करताच कधी झोप लागते कळतं तरी का? किती वेळ जागता येतं? किती वेळ उपास झेपतो? प्रार्थनेत किती वेळ एकाग्रचित्त होतं? आपलीही तीच गत! त्यांच्याहून वाईट नक्कीच नाही… देहाची दुर्बलता.
(क) आत्म्याने दुर्बल – ही दुर्बलताही आपल्याला समाधान प्राप्त व्हावं, तारणाची खात्री व्हावी यासाठीच ही अमर चरित्र लिहिली आहेत. तुम्हाला आठवत असेल. प्रभू डोंगरावर गुंतला आहे प्रार्थनेत. त्या आवडत्या तिघांनी इथं करावी की नाही प्रार्थना ? पण मालक करत आहे ना? मग कशाला करायची सदान् कदा प्रार्थना? ते करीनात का बापडे प्रार्थना, पण आपण का करायची ?
मग तो बाप व त्याचा भूतग्रस्त मुलगा, परूशी आठवा. त्या परुशांसमोर कुठली प्रार्थना ? खरं तर नवी कामगिरी नाही… चांगली संधी चालून आलेली. भूतच तर काढायचं होतं. याआधी नव्हती का काढली? पण तो बाप प्रभूला पाहून म्हणतो, “पण त्यांना काढता येईना” (मार्क ९:१८). याचा आणखी काय अर्थ असणार? मार्क ९:१४ जरा बारकाईनं वाचा. एक जण पुढं होतो. मागच्या प्रमाणंच ते काढायला… सारी गर्दी श्वास रोखून पाहात राहाते.. “ परंतु त्याला येईना…” आता दुसरा पुढं होतो. “ परंतु त्याला येईना.” मग तिसरा … “ परंतु त्याला येईना.” – मग परूशी परूशीच…झाली वादाला सुरूवात. पण तो मुलगा तस्साच… ते भूत घट्ट तसंच धरून…तो बाप कळवळून म्हणतो, …. “पण त्यांना येईना.”
प्रियांनो, आज आपली स्थिती? त्यांना हेच नव्हतं जमत, पण त्यांनी आधी काढली तरी होती भुतं! असं काही नाही जमलं, म्हणून परूशांची हेटाळणी आहेच. पण आपलं मन तर ‘माझं तारणच नाही झालं, मी ख्रिस्तीच नाही’ असं वाटत राहून शरमून, विरमून, वैतागून जातं! विशेष काही करणं तर सोडाच ! पण लक्षात ठेवा याच शिष्यांनी पुढं साऱ्या जगाला आग लावून टाकली होती. तीनशे वर्षात सारं रोमी साम्राज्य काबीज करून टाकलं होतं. आत्माच्या दुर्बलतेचं कारण काय? “ही जात प्रार्थनेवाचून नाही जात.” कुठं आहे आपली प्रार्थना? कितीशी जिव्हाळ्याची ? आग्रहाची ?
(ड) रागीट – प्रभू नि शिष्य … शिक्षक अन् विद्यार्थी… चालती फिरती ईश्वरविज्ञानाची पाठशाळाच ती ! तिला इमारत कुठली? खाली त्याची धरणी, वरती त्याचंच निळं आकाश ! ती खेडीपाडी, फरसबंदीचे वाकडे तिकडे रस्ते; नाहीतर शहरातले राजमार्ग! निघाली ही शास्त्रशाळा गालीलातून यहुदीयात, मध्ये शोमरोन. प्रभू व बाकीचे शिष्य राहिले मागे. दोघे गेले पुढं! शोमरोनच्या एका खेड्यात आधी सोय करायला. पण शोमरोनी कसले खवचट; तुम्ही पुढं यरुशलेमला निघालात ना (लूक ९:५३)? मग? तसेच जा ना पुढं? “त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही” झालं! गर्जनेच्या पुत्रांचा राग भडकला. ते प्रभूला म्हणतात, “प्रभू, स्वर्गातून अग्नी पाडून त्यांना आम्ही भस्म करावं अशी तुझी इच्छा आहे काय?” जगाचं तारण करायला आलेल्या प्रभूकडून आपला राग त्यांच्यावर पाखडणार? प्रभू त्यांना म्हणतो, “तुम्ही कोणत्या आत्म्याचे आहात, हे तुम्हाला माहीत नाही… मी तारण करायला आलो आहे, नाश करायला नाही.
आणि आमचं काय? आम्हालाही चीड नाही येत आपला अपमान झाल्यावर? आपण कुठल्या आत्म्याचे? हे सारं कळतं आपल्याला संतांच्या सहवासात, उपासनेच्या वेळी, देवळाच्या गंभीर वातावरणात शिकताना. पण बाहेरच्या अपमानाच्या खुल्या वाऱ्यात असताना आपला तोल राहातो का? येतोच ना संताप?
(ई) ऐहिक – स्वप्न कुणाला पडत नाहीत? दिवसा उजेडीही मोठेपणाचे दृष्टांत दिसतात ना? त्या लटक्या चित्रांचा पट पाहून कोणाचं मन आल्हादून जात नाही? आपल्या बऱ्यासाठी मोठमोठ्यांशी वशिल्याकरता कोण ओळखीपाळखी करून घेण्याचा प्रयत्न नाही करत ? याकोब व योहान दोघे भाऊ, गर्जनेचे पुत्र, यरुशलेमच्या वाटेला लागल्याचं पाहून आपल्या आईच्या आडोशानं मंत्रीपदाची मागणी करायला वायफळ वशिलेबाजी करताना दिसतात. प्रभू निघालाय वधस्तंभाकडे… मनातल्या मनात हे निघाले सिंहासनाकडे! पण वधस्तंभाची वाट तुडवल्याशिवाय ते सिंहासन हाती येतच नाही; हे त्यांना बिचाऱ्यांना काय ठाऊक ? प्रियांनो, आपल्याला तरी समजलीय का वधस्तंभाची वाट? मरणाशिवाय मुगुट मिळत नाही हे २ हजार वर्षांनंतर मंगलवार्ता अभ्यासल्यानंतर तरी आपल्याला कळलंय का? आपणही ऐहिक ! ऐहिक !
( फ) सोडणं – त्याचं बोलणं, करणं, चरित्र आगळं वेगळंच, राज्य देण्याच्या छान गोष्टी त्यानं शिकवल्या. सारं सोडलं अन् लागलो त्याच्या मागं! आता मोठ्या सणाला चाललो यरुशलेमला, तर याच्या मरणाच्या अशुभ गोष्टी चालल्यात! चला जाऊच या आपणही त्याच्या बरोबर मरायला! आता करायचं तरी काय ? त्याच्यावर वेळ आली असता सोडायचं तरी कसं त्याला? आले धरायला त्याला, तर आम्ही आपली उपसली तलवार.. अन् कान तरी उतरला की नाही? पण या स्वारीनं दिला की ज्याचा त्याला कान चिकटवून!
करायचं तरी काय माणसांनी? केल्या खुणा एकमेकांना… त्याला धरून नेताच मिसळलो गर्दीत, दिलं सोडून त्याला अन् गेलो पळून!
प्रियांनो, आपल्याला वाटतं आपण त्याला कध्धी नाही सोडणार? अशी दिसते तशी पक्की खात्री नाही देता येत! जेव्हा असत्य सत्याला खाऊ टाकतं, अन्याय न्यायाची पायमल्ली करतो, जुलूम गरीबीला गांजतो, जेव्हा निरापराधता नीतिमत्तेच्या नावासाठी नाहक रडत उभी राहाते, पातकी प्रतिष्ठितपणा देवाच्या दीनांचा पाठलाग करतो, तेव्हा नकळत मनानं, अनेकदा उघडपणानंही या गरीब गालीली माणसाला, प्रतिकारशून्य परमेश्वराला, ढोंगी सज्जनांचं सहन करणाऱ्या श्रेष्ठाला, मुकाट्यानं मरायला तयार झालेल्या मालकाला आपण सोडून नाही का जात प्रियांनो? होय.
(ग) नकार – सोडलं तर खरं, पण पुढची पायरी, राहावेना … वशिल्यानं शत्रुंच्या गाभाऱ्यात शिरून… भीत भीत धास्तीनं, गारठल्या अवस्थेत बसलो शेकटीपुढं! पण तिथंही संकटं हात धुवून मागे लागलेली… भलभलत्या प्रश्नांच्या भडिमारानं त्याच्याशीच संबंध जोडू लागलेत. धिक्काराची उत्तरं देत एकापाठोपाठ जागाही बदलल्या. बाहेर गेल्यावर विचार कराला फुरसत मिळताच घोडचूक कळली.
प्रियांनो, आपल्यावर खरोखर अन्याय झाल्यावर आपण कितीतरी जण त्याचा नाकार करतो, हे अंधुकसं तरी लक्षात आलंय का आपल्या? अन्याय झाला असेल आपल्यावर, पण म्हणून शत्रुंशी संगनमत ? ते काय करणार आहेत आपल्यासाठी? ते स्वत:च अडचणीत असताना आपली काय मदत करणार? आपल्या मालकाला बांधून नेलं असेल, तो मेलाय काय ? मारतीलही, पण तो शेवट आहे काय ? आपल्या मंदिरात आपल्या मदतीसाठी परके? शेकोटीसाठी शत्रुंशी सोबत? त्याला हे नाकारणंच ! किती दु:खद देखावा! हे त्याचे शिष्य ! थांबा क्षणभर; आणि पाहा प्रभूकडे… तो गुडघ्यावर आहे… आपल्या बापाशी बोलत आहे. आपल्या आवडत्यांसाठी अखेरचं आळवत आहे. त्याला आदरानं, अभिमानानं, शांतपणे सत्यानं म्हणत आहे, “त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.”
मघाचं शिष्यांचं दु:खी चित्र पाहाताना आसवं निखळली होती ना डोळ्यांतून ? आपलंच चित्र दिसलं होतं ना त्यांच्यामध्ये तिथं? पण वल्हांडणाच्या चांदण्या रात्रीचे प्रभूचे गंभीर बोल ऐकून आनंदानं आश्चर्य नाही का वाटंत ? कुणाविषयी बोलतोय प्रिय प्रभू इतक्या आपुलकीनं? अज्ञानानं, दुर्बलतेनं, रागानं, ऐहिकतेनं, पलायनानं, धिक्कारानं भरलेल्या ज्या शिष्यांचं चित्र आपण पाहिलं, त्यांच्याविषयी त्याच्या पवित्र मुखातून निघालेले हे बोल आहेत :
“त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे .”
शरीर, मन शीतल सुखसंवेदनेनं कसं बहरून शहारून गेलं! आपण त्यांचेच भाऊ ना?
पुढे चालू
Social