सितम्बर 19, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

  “ माझं गौरव”  IV

५- कुणासमोर गौरव ?

कोणत्या सात गौष्टींमुळं शिष्यांकडून ख्रिस्ताचं गौरव होतं ते आपण पाहिलं. त्यानंतर त्याचे शिष्य त्यात कसे समाविष्ट आहेत, हे आपण पाहिलं. हे पाहून प्रभू त्याचं गौरव झाल्यामुळं उल्हासून आपल्या बापाला हे सांगत आहे की, माझ्या शिष्यांनी देवाचे बोल मान्य करून स्वीकारले, त्याचा शब्द जतन करून ठेवला. त्यांनी ओळखलं आहे की, तारणाचा हा सारा पसारा देवापासून असून त्यानंच तो पुत्राला दिला, पुत्राचं देहधारणाही बापापासूनच झालंय, म्हणून त्यांनी विश्वास ठेवला की देवाने दिलेल्या देहानं तो बापानं पाठवल्यामुळं आला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्याचं आज्ञापालन केलं, आणि त्यानं पाठवल्याप्रमाणं आपल्या मालकाप्रमाणंच जगात गेले. त्यांच्या शब्दांवर जगातील पुष्कळांनी त्या देवपुत्रावर विश्वास ठेवला. हे जे झालं त्याचा संबंध उद्धारकार्यापूर्वीच्या “पूर्ण झाले” या उद्गाराशी आहे हे विसरू नका.

या जिव्हाळ्याच्या हितगुजात मरण पुनरुत्थानाचा नामनिर्देशही नाही. पण प्रभू एवढ्यावरच किती संतुष्ट झाला आहे पाहा. त्याच्यात आमच्यासाठी किती समाधान साठवलं आहे पाहा. पुत्राच्या देहधारणेला व संपूर्ण तारणाच्या योजनेला, तिच्या ऐतिहासिक परिपूर्तीला, पातकी मानवानं दिलेला हा सुखदायी होकार आहे. तारलेल्या अखिल मानवतेचे हे ११ शिष्य प्रतिनिधी आहेत. हे पाहून “त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.” ह्या प्रभू्च्या म्हणण्यातील उल्हास दिसून येतो. त्याचा अर्थ आपल्या मनाला स्पष्ट समजल्यानं आपल्यालाही आल्हाद वाटतो. हे सारं खरं पण हे गौरव कुणापुढं?

गौरव कोणत्याही स्वरूपात असू दे. ते पाहणारा कौतुक करणारा कोणी नसेल तर ते गौरव होणंच अशक्य व नीरस आहे. कोणी नाही पाहून अशानं जीव खट्टू होऊन जातो. म्हणून इतक्या शांतपणे येशू “माझं गौरव झालं आहे” असं शांतपणे खात्रीचं विधान करतो तेव्हा ते नक्कीच कुणासमोर तरी झालंय हे खास! अशी पाहून कौतुक करणारी दुनिया होती काय? होती तर कुठं होती? माणसांकडं पाहावं तर त्या धर्मपुढारी वर्गाच्या डोळ्यात खून चढल्यानं त्यांना काही दिसतच नव्हतं. रोमन प्रजेकडं पाहावं त्यांच्या दृष्टीनं हे गौरवच नव्हतं. ग्रीकांच्या डोळ्यांना फक्त डोळ्यात भरणारं बाह्य सौंदर्यच दिसत होतं. देवाच्या सामान्य प्रजेला तर त्यांच्या उथळ मनामुळं शेवटपर्यंत काही समजलंच नाही. मग गौरव करणारी ही दुनिया कुठली? नवलच आहे. पण १करिंथ ४:९ वचन वरवर नव्हे, लक्षपूर्वक वाचा. संत पौल येथे “जगाला” म्हणजे कुणाला म्हणत आहे? देवदुतांना आणि नंतर कुणाला? “माणसांना.” येशूचं संपूर्ण जीवनचरित्र अदृश्य, वास्तव आणि शाश्वत जगाच्या समक्षतेतून कसं व किती जात होतं ते स्पष्ट होतं. पहिल्यानं त्याला सूक्ष्म संवेदनांना अदृश्य जगाचा, देवदुतांच्या दुनियेचा अनुभव येत होता. जगात माणसं होती, पण दुय्यम, देवदुतांहून कमी. येशू काय म्हणत आहे या वाक्यात? आपल्या दु:खसंकटपूर्ण जीवनचरित्राविषयी पौल विधान करत आहे की, जगासमोर सुवार्तेमुळं छळ, निंदा, अपमानानं भरलेलं “खेळ/ तमाशा” असं जिणं आम्ही जगत आहोत. तमाशा म्हणजे वर्तुळाकार, प्रचंड, दगडी, खुल्या थिएटरमध्ये मोठ्या जमावासमोर चालणारे करमणुकीचे क्रूर खेळ. पाहाणारे देवदूत व माणसं. माणसांपुढं प्रभू म्हणतो ते गौरव होणं शक्यच नाही हे आपण पाहिलं. मग राहिले कोण? देवदूत. आपण इथं जगात काम करत असतो आणि हे अक्षय दूत आपल्या कधी न मिटणाऱ्या डोळ्यांनी सतत पाहात असतात, असा अर्थ झाला. म्हणूनच तो म्हणतो :
“त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.” म्हणजे देवदुतांसमोर माझं गौरव झालं आहे.

किती वैभवी अर्थ आहे प्रियांनो! आपण देवाचे बोल शांतपणे मान्य करून स्वीकारल्याबरोबर स्वर्गात देवदुतांसमोर आनंद होतोच. पौल आपल्या आध्यात्मिक मुलाला म्हणतो, “ मी तुला देव ख्रिस्त व निवडलेले दूत यांच्यासमोर निक्षून सांगतो…” (१ तीमथ्य ५:२१). सारं अदृश्य जग आपली कृती न् कृती लक्षपूर्वक पाहात असतं. “सांभाळा, या माझ्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका. कारण त्यांचे दूत रोज माझ्या बापाचे तोंड पाहातात” (मत्तय १८:१०). असं का? कारण सुवार्तेच्या कामाचं त्यांना विलक्षण कौतुक वाटतं!

सुवार्तेनं देहधारण करून जगात येताच प्रथम त्यांनीच अंतराळात येऊन जगात ती बातमी सांगितली होती (लूक २:८-१५). देहधारी सुवार्तेला उपास पडला (मार्क १:१३), किंवा कमाल दु:ख झालं (लूक २२:४३) तर दूत तिला मदत करतात. पुनरुत्थान झाल्याबरोबर कबरेवरची धोंड लोटतात ( मत्तय २८:२), कबरेत बसून राहातात (योहान २०:१२), ती सुवार्ता शिष्याना सांगतात (लूक २४:५-६). हे सारं काय म्हणून ? कशासाठी? ऐका तर वृद्ध संत पेत्र काय म्हणतो: “ (ख्रिस्ताला) तुम्ही पाहिलं नसता त्यावर तुम्ही प्रीती करता, तो दिसला नसता त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. त्या विश्वासाचा शेवट तारण याचा तुम्ही उपभोग घेता… अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदानं उल्हासता. त्या संदेष्ट्यांनी त्या कृपेविषयी कथन केलं. त्या तारणाविषयी बारकाईनं संशोधन केलं. ख्रिस्ताची दु:खं व गौरवाच्या गोष्टींचं कथन केलं.

सुवार्तिकांनी त्याच गोष्टींचं आता स्पष्टीकरण केलं… ते सेवा करत होते… स्वत:साठी करत नव्हते.. तुमच्यासाठी करत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहाण्याची उत्कंठा देवदुतांना आहे” (१पेत्र १:८-१२). न्याहाळून पाहाणं याचा अर्थ वाकून टक लावून पाहाणं असा आहे.
पाहिलंत ? सुवार्ता स्वीकारायची, देहधारी देवाला अंत:करणात जागा द्यायची, त्याचे बोल झेलण्याची, सुवार्ता सांगण्याची, सैतानाच्या सेवकांना त्याच्या सैतानखान्यातून खेचून काढून देवाचे संत बनवण्याची, अगर अशी कोणतीही क्षुल्लक दिसणारी का बाब असेना; तिचं वाकून, टक लावून, अदृश्य सृष्टीतून अविचलित नजरेनं बारकाईनं निरीक्षण करणाऱ्या लाखो देवदुतांच्या समक्षतेत “आमच्यामध्ये प्रभूचं गौरव होतं.”

(६) गौरवाचा परिणाम
असलं गौरव झाल्यानं काय होतं? ऐकायचंय आपल्याला? ऐका तर, तीच प्रभूची महायाजकीय प्रार्थना; अजून चाललीच आहे…काय म्हणत आहे तो? ऐका:
“आता मी तुझ्याकडे येतो… व त्यांच्यात माझा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो” (योहान १७:१३). मी गोड बोलीनं जगात बोलतो. मी आता वर तुझ्याकडं निघालो आहे. वास्तविक माझा आनंद तुझ्या घरी… वर स्वर्गात पूर्ण व्हावा… पण नाही.. तो इथंच पूर्ण होणार.. कुठं? माझ्या शिष्यांमध्ये. ही माझी प्रार्थना मी इथं, या जगात, या वरच्या माडीवर त्यांच्यासमक्ष करीत आहे. त्यांचं मन न समजणाऱ्या दु:खानं भरून, धास्तीनं धडधडत आहे… त्यांना आनंद व्हावा यासाठी मी तुझ्याशी बोलत आहे. त्यांना आनंद झाला तर माझा आनंद भरभरून परिपूर्ण होणार. त्यांना जर आनंद झाला नाही, तर माझा आनंद अपूर्णच राहाणार. मी माझ्या बापघरी निघालो हे ऐकून, वास्तविक त्याना आनंद व्हायला हवा होता ( योहान १४:२८). पण त्यांना आपलं शाश्वत जग दिसत नाही. हे दु:खानं भरलेलं जगच तेवढं दिसतं. त्यांची मनं मोडावून, निराशेनं नमून, भीतीनं भेदरून गेली आहेत. बाप्पा, त्यांचे डोळे उघड. दिसू दे त्यांना आपलं जग, माझ्या कामाची परिपूर्ती, त्यातला आनंद, व विशेष करून तुला व देवदुतांना दिसणारं त्यांच्यात झालेलं माझं गौरव!

(१) तुझे बोल झेलल्यानं, शब्दांना साठवल्यानं, (२) सुवार्ता स्वीकारल्यानं ते संपन्न झाले आहेत. (३) माझ्या देह धारणेचं देवपण दिसल्यानं (४) तुझ्यापासून जगात झालेलं माझं आगमन ओळखल्यानं, (५) तूच मला पाठवलंस हे त्यांना पटल्यानं, ते सौंदर्यान सुशोभित झाले आहेत. (६) सुवार्ता सांगण्यामुळं आणि (७) संतांना सैतानखान्यातून खेचल्यानं, आक्रमक साहसानं, ते सन्माननीय झाले आहेत.
“ त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे !”
दुतांच्या दृष्टीला ते पडलं आहे. त्यासाठी या जगात माझं मुख हे बोललं आहे. माझं मन आनंदानं मोहरून गेलं आहे.

(७) समारोप
शंकेनं निराशलेल्या बंधो, भगिनी, फेकून दे तुझा आरसा. पाहा हा सुवार्तेचा आरसा… त्यातली प्रभूची पेटलेली प्रभा… त्याचं रमणीय रूप… त्याला झालेला आनंद… त्याला गहिवरून, भरभरून टाकणारा अल्हाद… घे मन भरून ते रूप… झेलत राहा ते बोल, सदासर्वदा; “ त्यांच्यामध्ये माझं गौरव झालं आहे.”

Previous Article

“ माझं गौरव” (॥I)

Next Article

 संतापाचं भांडण : पौल व बर्णबा

You might be interested in …

सर्वात वाईट शुक्रवारला आपण उत्तम शुक्रवार का म्हणतो?

लेखक- डेविड मॅथीस जगाच्या सर्व इतिहासातला तो एकमेव भयानक, निष्ठूर असा दिवस होता. अशी दु:खद घटना कधी घडलेली नाही आणि भविष्यात अशी घटना घडणे शक्य नाही. कोणतेही दु:खसहन इतके अयोग्य ठरलेले नाही. कोणत्याही मानवाला इतके […]

एलजीबीटी लेखक: डग्लस विल्सन

(एलजीबीटी हा शब्द आता खूपच प्रसिद्ध होत आहे. इंद्रधनुष्य  हे चिन्ह आता या लोकांचे प्रतिक बनले आहे. एलजीबीटीचा अर्थ काय? एल: लिस्बीयन – स्त्रियांचा समलिंगी संभोग. जी: गे- पुरुषांचा समलिंगी संभोग. बी: बायसेक्षुअल – नैसर्गिक […]

धडा १४.           १ योहान ३:२-३ स्टीफन विल्यम्स

    त्याच्याबरोबर, त्याच्यासारखे तुमच्या हे लक्षात आले आहे का, की एकमेकांसोबत वेळ घालवणाऱ्या व्यक्ती परस्परांसारख्याच दिसू लागतात? पति- पत्नी परस्परांसारखे दिसू लागतात, जवळचे मित्र एकमेकांसारखे वागू लागतात, पाळीव प्राण्यांचे मालक  व त्यांचे पाळीव प्राणी परस्परांसमान […]