दिसम्बर 3, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

विश्वासाची संधी फक्त इथेच

“ परंतु असली चिन्हे त्याने त्यांच्यासमक्ष केली होती तरी देखील त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही” ( योहान १२:३७).

तारण हे विश्वासानेच होते. तारणाकरता त्याची निकडीची गरज आहे. नि ज्यामुळे लोकांनी विश्वास ठेवावा असली अनेक कामे येशूने केलेली होतीच. चिन्हांच्या करवी त्याने असे सिद्ध केले होते की … देहासंबंधीच्या कोणत्याही गोष्टींची गरज लागली तर ती पुरवण्यास तो समर्थ आहे. अन्न-पाण्याची अस्ति गरज असो की रोगदुखण्याची नास्ति गरज असो, त्यांनाही तो पुरून उरण्याजोगा खासच होता… तापासारखी दैनंदिन जिण्यातली साधी गोष्ट असो की मरणासारखी अटल, अखेरची गोष्ट असो. त्या सर्व गरजा त्याने भागवल्या होत्या. तरी देखील त्यांनी त्याच्यावरती अद्याप विश्वास ठेवला नव्हता. त्याच्या कारणांची मीमांसा करून आपण काही महत्त्वाचे निष्कर्ष काढतो, ते महत्त्वाचे आहेत.

त्यातील पहिली गोष्ट अशी की विश्वास ही देवाची एक देणगीच असते. ती घेण्यासाठी मनाने मूलभूत भिकारपणच असावे लागते. ती एक वृत्ती आहे. शीलाचा एक कल आहे. पातकाचे अनेक परिणाम झालेले आहेत. त्यापैकी तो सर्वात महत्त्वाचा एक परिणाम होय. थोडासा, लक्षपूर्वक खोल विचार करा नि पाहा. पातक जगात आणणाऱ्या मूळ उत्पादकाची ती स्वार्थी वृत्ती आहे. देव नि देवाची गोष्ट त्या जातीला नकोच असतात. पातकाच्या मुरलेल्या नि कायम होऊन बसलेल्या ह्या वृत्तीचे ते गुलाम असतात. प्रभूने ते मागे स्पष्टच करून सोडलेले आहे. तो म्हणाला आहे; “जो कोणी पाप करतो , तो पापाचा गुलाम आहे” ( योहान ८:३४). नि तसे असल्यामुळे ज्याच्यामध्ये असली ही पातकी अनुवंशिक प्रवृत्ती बलवत्तर असते…त्याचे तारण होणे फार अवघड असते. ते विश्वास ठेवीत नाहीत हे त्याचे जाहीर कारण आहे. पण त्याच्यापेक्षा आतले, खोल कारण असे असते की … स्वभावत: त्यांना विश्वास ठेवता येणे जड जाते. ठेवता येतच नाही जवळजवळ! ज्यामुळे विश्वास ठेवणे सर्वसाधारणपणाने शक्य व्हावे असली कोणतीही कडेलोटाची गोष्ट जरी असली तरी देखील…त्यांच्या अंतस्थ पातकी वृत्तीच्या सामर्थ्यामुळे ….त्या जवळजवळ अटल देवविरोधी वृत्तीमुळे … तसल्या त्या गोष्टींमध्ये सुद्धा …त्यांची ती अंतस्थ पातकी वृत्ती काहीतरी खुसपट काढतेच काढते … नि त्यामुळे त्यांना विश्वास ठेवणे शक्य नाही तर नाहीच होत.

प्रभूने ही गोष्ट समीक्षित शुभवर्तमानांमध्ये फारच स्पष्ट केली आहे. तिथे तो म्हणतो: “मोशाचे नि संदेष्ट्यांचे ते ऐकत राहत नाहीत, त्यांचे आज्ञापालन करण्याचा त्यांना सरावच नाही, तर कोणी मेलेल्यांमधून उठला, तरी देखिल त्यांचे मन वळले जाणारच नाही” (लूक १६:३१).

ही मन: स्थिती किती घातक आहे, तुम्हीच पाहा. मुळामध्ये ती गोष्ट वाचण्याची आम्ही वाचकांना शिफारस करतो

( लूक १६:१९-३१). आमच्या मुद्याच्या स्पष्टीकरणासाठी तिची अतिशय गरज असल्यामुळे अगदी संक्षिपात तो प्रभूचा दाखला आम्ही सांगतोच.

एक कमालीचा श्रीमंत मनुष्य ख्याली खुशालीत मग्न असतो. त्याच्या दारामध्ये लाझारस नावाचा एक दीन भिकारी…गळवांनी भरलेला…पडलेला असतो. इतका असहाय की कुत्री त्याच्या जखमा चाटीत असत! पुढे दोघेही मरतात. दोघेही आपल्या आध्यात्मिक स्थितीमुळे आपापल्या जागी जातात. श्रीमंत नरकात जातो नि गरीब स्वर्गात जातो. श्रीमंत नरकातल्या असह्य वेदनांमुळे… त्या शांत होण्यास गार पाण्याच्या एका थेंबाची याचना स्वर्गाला करतो.
फारच प्रेमाने स्वर्ग त्याला स्पष्ट करते की… ते सुद्धा शक्य नाही! त्याचे कारण ते असे सांगते: “इकडून तिकडे व तिकडून इकडे कोणी येऊ नये म्हणून … मध्ये एक भेग स्थिर स्थापलेली आहे” ( लूक १६:२७).
तो बिचारा मग निराशेने म्हणतो, राहू दे तर तो गार पाण्याचा थेंब. आत्ता स्वर्गामध्ये सुख भोगणाऱ्या लाझारसला आमच्या घरी पाठव. पाच भाऊ आहेत मला. मेलेल्यांतून उठून तो गेल्यामुळे ते पश्चाताप करतील. त्या विनंतीला वरील उत्तर दिलेले आहे.

हा आहे एक दाखला. पण तो खुद्द प्रभूने दिला आहे. म्हणून अचूक स्वर्गीय सत्याने … प्रगटीकरणाने तो भरला आहे. त्यातल्या दोन गोष्टी अत्यंत जिव्हाळ्याच्या…कारुण्यामुळे भोसकून आरपार जाणाऱ्या आहेत. त्या ह्या:

पहिली, नरकात असलेल्या व्यक्तीचे जगात बनलेले शील, त्यातील दुष्ट तशाच चांगल्या गोष्टींनी देखील भरलेले असते. त्या दुष्ट तशाच चांगल्या गोष्टी … तेथून पुढे कायम झालेल्या स्थितीत असतात. त्या श्रीमंताच्या मनात स्वर्गाबद्दल असलेला जिव्हाळा पाहा. स्वर्ग तर कायमचेच…खुद्द नरकाबद्दल सुद्धा प्रीतीनेच भरलेले आहे. ते त्याला  “मुला” असे वात्सल्याने म्हणतेच म्हणते. त्यात नवल नाही. पण…श्रीमंत सुद्धा तितक्याच प्रेमळपणाने स्वर्गाला “बाप्पा” असे म्हणतो! नरकातला हा चांगुलपणा कसा काळीज फोडून टाकतो! पण त्याच नियमाने दुसऱ्या एक महत्त्वाच्या नि निवडीच्या बाबतीतही ते त्याचे शील तितकेच अढळ असते.

या संपूर्ण करुणापूर्ण प्रगटीकरणामध्ये स्वत:बद्दल पश्चातापाचे… नाव नाही! भावांच्याबद्दल कळकळ आहे त्याला! “ते पश्चाताप करतील” असे तो म्हणतो. पण … पण… गरीब जिवा…तुझ्या पश्चातापाची काय वाट? पश्चातापाचा एक शब्द तरी उच्चार की! तुला नरकातूनही मोकळे करायला देव आपल्या वचनाने बांधला गेलेला आहे! अरेरे.. नाही.. नाही… नाही…ती वेळ कायमचीच निघून गेलेली असते!

त्याचसाठी प्रभूच्या त्या प्रकटीकरणातली जिव्हाळ्याची दुसरी गोष्ट अशी की, या इह जगतामध्येच केवळ पश्चातापाची संधी आहे… ती शक्य आहे… त्यामुळे तारण शक्य आहे. तीच हकीगत जणू प्रभू त्याच आपल्या प्रीतीने इथे दोहरवितो आणि कळकळून विनवतो; “प्रकाश आहे तोवर त्याच्यावर विश्वास ठेवण्यास आरंभ करा… तो आरंभ परत … परत…करीत राहाच…यासाठी की तुम्ही प्रकाशाची मुले व्हावे” (योहान १२:३६).

Previous Article

देवाचं घर: पश्चात्ताप

Next Article

 स्तोत्र १३३: उपासना – (।)

You might be interested in …

त्याला दगा दिला जाणारच होता

ग्रेग मोर्स “जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे” (स्तोत्र ४१:९) ते दोघेही त्या दिवशी झाडावरच मरणार होते. एक वधस्तंभावर टांगला गेला; दुसरा झाडाच्या फांदीवर लोंबकळत. […]

राजा होण्यास लायक असा पुत्र

स्कॉट हबर्ड बायबलचे अनेक वाचक मत्तयाच्या शुभवर्तमानाकडे जातात, अगदी उत्सुकतेने आणि निर्धाराने. पण ते पहिल्या सतरा वचनांमध्येच ठेच खातात. आम्ही एका कहाणीची अपेक्षा करत होतो. एक नाट्यमय गोष्ट, देवदूत, मागी लोक, आणि बेथलेहेमेत जन्मलेलं बाळ; […]