नवम्बर 14, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

 वधस्तंभावरील सात उद्गार (॥)

आता अंधार नाहीसा होऊन उजेड पडताच येशू एकामागून एक पुढील उद्गार स्वत: विषयी काढत आहे.

चौथा उद्गार : “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास” ( मत्तय २७:४६)?

बदलीच्या मरणाची ती पापाची शिक्षा दिल्यावर आता शारीरिक मरण येणार व तो कधी नव्हे ते पित्यापासून ताटातूट होण्याचा अनुभव घेणार होता. ते त्याच्यासाठी फार वेदनादायी आहे. पण अंधारापलीकडून क्रोध ओतून त्याला ठेचून होताच पिता उत्तर न देता पाठ फिरवून निघून जातो. आज्ञाधारक पुत्राला हे मान्य करणं क्रमप्राप्त असल्यानं आपला जीव त्याच्या हाती ठेवायचाच आहे. म्हणून या वियोगामुळं मोठ्याने ही कर्णभेदी आरोळी मारतो. नखशिखांत वेदना सहन करताना ताकदीनं ही किंकाळी फोडतो !! पण त्याला विभक्त करण्यानं पापी मनुष्याला पिता जवळ करणार होता. त्या वधूसाठी हा कोकरा या ताटातुटीस सामोरा गेला. ख्रिस्ताच्या मनाला दु:ख होते का? होय. साऱ्या दुनियेच्या पापाचे ओझे, त्याचे परिणाम असंख्य रोग, दु:खे, कॅन्सर्स, रक्तपिती, फ्रॅक्चर्स…एक ना दोन…( यशया ५३) देहाचे व मनाचे सर्वच रोग एकाच वेळी तो वाहात होता, आणि स्वेच्छेने पत्करलेल्या बदलीच्या मरणाचा अनुभव तो घेत होता. त्याचा कळस म्हणजे देह व जीवनाची फारकत. पण येशूचा देह व मन निष्पाप, निष्कलंक होते. तो मेला का? त्याचा देह, जीवन विभक्त झाले का? ज्या क्षणी तो पातक झाला व जिवंतपणी मानवी देहानं सर्व शिक्षा भोगली तेव्हाच तो मनानं ते मरण मेला. तेव्हापासूनच त्याची देवाशी ताटातूट झाली. त्या खऱ्याखुऱ्या ताटातुटीच्या अनुभवानंच ही आरोळी केली. ही दृश्य आरोळी तो जिवंत असल्याची साक्ष देणारी होती. त्याचा पुरावा म्हणून त्याने पुढचे तीन शब्द लागोपाठ उच्चारले हे स्पष्ट होते. कारण तो त्याला मनाने आलेला अनुभव होता. आपल्या पापांसाठी पाप बनून मरणाच्या दु:खाची परिसीमा झाल्यानेच बापाशी ताटातूट झाल्याच्या जाणीवेने ही किंकाळी फोडून त्याने आरोळी केली होती. हे तर सत्य होतं. पण देवत्व मरत नाही, म्हणून मानवी शरीरानं प्रत्यक्ष मरण येणारच होतं. तरी त्याची देव म्हणून ताटातूट झाली नव्हती. तर मनानं त्याला त्या ताटातुटीचा अनुभव आला होता. तो पाप झाला म्हणून आपण नीतिमान ठरले जाऊ शकतो. त्यासाठी त्यानं पुनरुत्थानानं मरणाला मारलं आणि मला जीवन मिळालं. इथंच सैतान पूर्ण पराजित झाला.

पाचवा उद्गार – “ मला तहान लागली आहे” (योहान १९:२८-२९).

मत्तय २७:३४ मध्ये वधस्तंभावर खिळण्यापूर्वी त्याला पित्तमिश्रित द्राक्षारस त्याला प्यायला दिला होता. तो गुंगी आणणारा असल्याने त्याला वेदना जाणवू नयेत हा त्यामागचा उद्देश होता. पण येशूने तो पिण्यास नकार दिला कारण सर्व वेदना त्याला मानवी देहाने पूर्ण संवेदनांनी सहन करायला हव्या होत्या. त्यानंतर त्या अंधारामागे तर त्याची काय तगमग झाली ती कोणा मानवाला दिसली नाही. निष्पाप मानवी देहाने पण देवाच्या देहाला रिकामं करून भयानक अवस्था झालेला अखेरची तगमग होत असलेला हा मानवी देह आहे. त्याची ही असाध्य तहान! मानवी देह शाश्वत, अमर देह होण्यापूर्वीची ही कमालीच्या दु:खसहनाची तहान! ह्या नरकाच्या तहानेचीही शिक्षा पित्यानं त्याला देहात दिली. आधीच त्या देहाला कातड्याच्या वादीचे, टोकाला शिशाच्या गोळ्या बसवलेल्या आसुडाने ३९ फटके मारले होते. वळ उठलेले, कातडी फाटून रक्ताच्या चिळकांड्यांची आंघोळच झालेली, अर्ध्या भोजनावरून उठून नंतर पाण्याचा थेंब की अन्नाचा घासही पोटात गेलेला नाही. रात्रभर चौकशा, मारपीट, उपहास, मस्तकावर काट्यांचा मुकुट, तिथंही मस्तकात वेदना, कळा, वरून वेतांचा मस्तकावर मार, काटे अधिकच रुतून जीवघेण्या वेदना, चपराका, बांधलेले हात असता थुंकी झेलणं, ती पुसताही न येणं, अशात वधस्तंभावर श्वासासाठी झगडत असता रक्त वाहातही आहे, वाळलंही आहे, आणि घशाला शोष पडलाय, तेव्हा कोणता शास्त्रलेख पूर्ण व्हायचा राहिलाय याचा आढावा घेतल्यावर स्तोत्र ६९: २१ आठवले. मत्तयातील पेय त्याने नाकारले होते, आता सर्व पूर्ण सहन केल्यानंतर येथे दुसऱे पेय म्हणजे आंब तो घेत आहे. पाणी त्याला मिळाले नाही. देवत्वाचा अधिकार वापरून आपली तहान भागवायला त्यानं चमत्कारानं तेथे पाणी निर्मिलं नाही. पूर्ण मानवी देहाच्या वेदना त्यानं सहन केल्या. यासाठी की त्याच्यावर विश्वास ठेऊन तारण पावणाऱ्याच्या जीवनातून उफळत्या जीवनी पाण्याच्या नद्या वाहाव्यात. आजवर ही गोष्ट आपल्या जीवनात प्रत्येक विश्वासी व्यक्ती अनुभवत आहे. पण हे जीवनी पाणी देणाऱ्या व पाणी निर्माण करणाऱ्या निर्मात्याला प्यायला पाणीही पापी मानवानं दिलं नाही. पण हे जीवनी पाणी प्यायला लोकांनी यावं म्हणून तो आजही तहानेला आहे. ख्रिस्तामध्येच या जीवनी पाण्याच्या झऱ्याचा उगम आहे.

सहावा उद्गार – “ हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो” ( लूक २३ :४६).

त्याला आपला आत्मा काढून ठेवण्याचा व तो परत घेण्याचाही अधिकार आहे, त्याच अधिकारानं त्यानं आपला आत्मा मोठ्याने ओरडून बापाच्या हाती सोपून दिला. तरी परत घेण्याकरता त्याचा देह अमर आहे, कारण वधस्तंभावरच मनानं त्यानं मरणाची ताटातूट सहन करून बापाला आपल्या यज्ञानं संतुष्ट केलं होतं. अखेरपर्यंत सर्व शिक्षा भोगण्यात काही कमी केलं नव्हतं. त्यामुळं पिता पुत्राचं नातं तुटलं नाही ते कायम राहिलं. आत्मा बापाजवळ. आणि देह? तो तर अमर झाला होता. पण तो पृथ्वीच्या पोटात तीन दिवस तीन रात्री राहणे अगत्याचं होतं. पण त्याला कुजण्याचा अनुभव येणं शक्य नव्हतं. हाड तर मोडलंच नव्हतं. पण आत्मा देहापासून विभक्त करून वचनाप्रमाणं मानवी मरणाची पूर्तता त्यानं केली. आत्म्याच्या वेदना तर संपल्या. देह अमर झाला. तोही बापाच्या हाती देऊ शकत होता. पण नाही. तो पित्याचा आज्ञांकित पुत्र आहे. त्याचा निर्धार आहे, मरणाच्या सत्तेत देह तीन दिवस राहू दे. मग जाहीरपणे ती सत्ता झुगारून मरणातून जिवंत झाल्याचं, मरणावर विजय मिळाल्याचं जगाला उघड होऊ दे. या धाडसामुळं तर पिता त्याच्यावर अधिक प्रीती करतो ( योहान १०:१७-१८). तो स्वेच्छेने मरणाच्या स्वाधीन राहाण्याकरता मेला व पुरला गेला. अजूनही सैतानाला काय करायचं ते करू देण्याचं आव्हान त्यानं शौर्यानं स्वीकारलं. यासाठी की विजयाने पुनरुत्थित व्हावे. येथपर्यंतची ही केवढी नम्रता, अधीनता !

सातवा उद्गार : “पूर्ण झालेआहे.” म्हणजे “ पूर्ण होऊन चुकलं आहे” ( योहान १९:३२).

ही अखेरची विजयाची सिंहगर्जना ! यात पुनरुत्थानही नक्की होणार याचीही हमी आहे.
त्याच्याविषयीच्या भाकितांचा चिमुकलाही तपशील पूर्ण व्हायचा राहिला नाही. जगाच्या उत्पत्तीपूर्वीच तारणाची योजना तयार झाली होती. एदेनातली हरळी पहिल्या यज्ञानं पवित्र झाली होती. त्यानंतर ती अर्पण प्रक्रिया सुरूच होती. इस्राएलास राष्ट्र म्हणून उपासनापद्धत लावून देताना नियमशास्त्राद्वारे देवानं अर्पणपद्धत लिखित स्वरूपात दिली. त्याद्वारे वारंवार करायच्या रक्तसिंचनाच्या यज्ञांनी पापक्षमेचे तात्पुरते शांती समाधान मिळू लागले. पण येशूच्या निर्दोष, निष्कलंक, पवित्र बदलीच्या मरणानं एकच अखेरचा देवाला संतुष्ट करणारा यज्ञ झाला आणि माणसाला पुन्हा यज्ञ करण्याची गरजच राहिली नाही. तारण, पापक्षमा, सार्वकालिक जीवन प्राप्त होण्याच्या कृतीची पूर्तता झाल्याची या उद्गारानं ग्वाही दिली. पित्याचा विजय व सैतानाचा कायमचा पराजय झाला. म्हणजे वधस्तंभाने काय काय पूर्ण झाले? कोणाही पाप्याला क्षमा मिळू शकते हे सिद्ध झाले. वैयक्तिक विश्वास ठेवल्याने तारण पावलेल्या व्यक्तीला, त्याच क्षणी स्वर्ग खुला झाला. देवाच्या मंडळीचे पवित्र कुटुंबाचे नाते निर्माण झाले. नरकाची तहान सहन करून तारलेल्या व्यक्तीला जीवनाचे पाणी देऊन कायमची तृप्ती दिलीच, पण त्याच्याही जीवनातून जीवनी पाण्याच्या नद्या उफळू देण्याची सुविधा केली. त्यासाठी त्याचा देह अमर झाल्याची यातून हमी दिली. आम्ही देवा मला का सोडलंस? असा टाहो कदापि फोडू नये व देवानं आम्हा पाप्यांना जवळ करावं म्हणून पित्याकडून कडक बदलीची शिक्षा घेऊन त्याने मनानं पित्याशी ताटातूट सहन केली. आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवून आपण मरणावर विजय मिळवल्याचा पुरावाच दिला. सुमारे सर्व ३६५ भाकिते पूर्ण करून झाल्याच व आज्ञाधारकपणे संपूर्ण नियमशास्त्र पाळून पूर्ण केल्याची ग्वाही म्हणून पूर्ण झाल्याची आरोळी दिली. आणि आपला आत्मा पित्याच्या हाती सोपून दिला. आम्हाला पूर्ण करायला काही उणं ठेवलं नाही.

उत्तम शुक्रवारची उपसना म्हणजे दु:खसहनाची ही फक्त आठवण आहे. आठवण म्हणजे मनापासून, भावपूर्ण संवेदनशीलतेनं. बुद्धीला समजलेलं, कृतीत रूपांतर करणरं हे चित्र आहे. त्या चित्रात दु:खसहन करणारा, तारण देणारा, पवित्र देव आहे. सैतानावरचा विजय व पुनरुत्थान आहे. रोजचं तारण देव उपलब्ध करतो. त्यामुळे दृढपणे आपण तारणाची वाट चालण्यासाठी आणि रूपांतर होत राहाण्यासाठी कृतज्ञपणे प्रभूला समर्पण करू या. आपण ऐकलेल्या या संदेशानुसार कृती केली तर तारण व सार्वकालिक जीवन मिळेल. हा सुपरिणाम होईल. पण तो ऐकूनही साफ पचवला, आज्ञापालन केले नाही, देवाला काम करायला जीवनात वावच दिला नाही, देवाचा शाप येऊन नाश होईल. विलापगीत ३:६५ वाचा. त्याच्या वधस्तंभाच्या पायथ्यापाशी आपण कोठे आहोत याची परीक्षा करा.

Previous Article

ख्रिस्ताचे वधस्तंभावरील सात उद्गार

Next Article

गेथशेमाने बाग

You might be interested in …

सर्वात मोठे आध्यात्मिक युध्द              

जॉन ब्लूम ज्या नातेसंबंधामध्ये विश्वासाची सुपीक जमीन असते तिथेच प्रीती जोमदार वाढू शकते. जोपर्यंत नात्यामध्ये पुरेसा विश्वास असतो तोपर्यंत प्रीती ही निरोगी आणि संवेदनशील असू शकते. पण जेव्हा विश्वास कमी होऊ लागतो तसे प्रेम कोमेजून […]

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ (१७२६ ते १७९७)

संकलन – क्रॉसी उर्टेकर  लेखांक ४  कार्यपद्धती –  येशूने वापरलेल्या पद्धतीप्रमाणे श्वार्टझ् दोघादोघांना जोडीने सुवार्ताकार्याच्या कामगिरीवर पाठवत असे. त्या ठिकाणी सभा भरवून उपदेश केल्यावर ते सल्लामसलत करीत. तेथे त्यांचे आदराने स्वागत होऊन त्यांनी आपल्या गावी […]

ख्रिस्तजयंती तुमच्या दु:खाकडे दुर्लक्ष करत नाही

डेव्हिड मॅथीस प्रमाणिकपणे विचार केला तर सर्व सोहळा काही लख्ख आणि आनंदी नाही कारण हे जग तसे नाहीये. काहींना तर या ख्रिस्तजयंतीला मनावर ओझे असेल, दु:खी भावना असतील. सोहळ्यात आनंद करायची कल्पनाच कठीण वाटत असेल. […]