नवम्बर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

ख्रिस्ताचं मन : फिलिपै २:५ (।)

 “ असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्येही असो.” फिलिपै २:५

वर्षातून एकदा येणाऱ्या दु:खसहनाच्या सणात वधस्तंभाच्या आठवणींची शांत सावली पडलेली असून मन:शुद्धी व मन:शांती प्राप्त करण्याची जणू वर्षातून एकदा देव ही विशेष संधी देतो असल्याच्या वृत्तीने आपण ह्या समयाकडे पाहू या. या सणाचं रहस्य ख्रिस्ताला ज्या मनोवत्तीनं वधस्तंभी जाण्यास भाग पाडलं, त्या मनोवृत्तीत दडलं आहे. म्हणून त्या मनोवृत्तीनं काय केलं व त्याचे काय परिणाम झाले ते आपण पाहू या.
म्हणून खास या काळात तरी निदान सर्व संसारी विचारांनी भरलेले सर्व व्यवहार, मनोविकार बाजूला ठेऊन एकांतात देवाच्या सहवासात जाण्याची संधी घेऊन वरील वचनावर विचार करू या.

१. हे वचन पितापुत्राच्या नात्याने बापाने रोमच्या तुरुंगातून लिहिलेल्या, प्रीतीने भरलेल्या फिलिपैकरांस पत्रातील आहे. ते सुवार्तेनं भरलेलं चिरस्मरणीय आहे. फिलिपैत खोड्यात अडकवलेला असताना मध्यरात्रीच्या काळोखात कैदखान्यात गाणारा पौल, आता रोमच्या तुरुंगात हे प्रीतीनं भरलेलं गीत गात आहे. या प्रीतीगीतात तो ‘चित्तवृत्ती’ हा शब्द अनेकदा वापरत आहे. त्याचा मूळ भाषेतील अर्थ ‘कुंपण घालणं’ असा आहे. जो रूढ अर्थानं बरगड्या व कणा यांच्या सांगाड्यानं सुरक्षित झालेल्या छाती व पोटाशी संबंधित आहे. त्यामुळं मन, चित्त म्हणजे डोकं किंवा ऱ्हदय नव्हे तर ‘मायपोट’ या अर्थानं तो वापरला आहे. प्रीतीनं आपली आतडी तुटतात, कळवळतात, भीतीनं पोटात धस्स होतं, दु:खानं पोटात कालवतं. पौल म्हणत आहे, ख्रिस्त जसा कळकळीनं, कळवळ्यानं, मायेनं, ममतेनं, सहानुभूतीनं व प्रीतीनं भरलेला होता तसे तुम्हीही असा.

२. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या देवाच्या या कळवळ्याचं उद्दिष्ट इतरांचं तारण करणं हे आहे. ‘येशू’ म्हणजे ‘तारण करणारा.’ हे नाव स्वर्गातून त्याच्या जन्माअगोदर सांगितलं होतं व जन्मत:च देण्यात आलं होतं. तारणारा. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त. तारणाचं काम करायला त्याला अभिषेक केलेला होता. त्यामुळं ही चित्तवृत्ती, ममता, कळवळा, कळकळ, सहानुभूती, तळमळ आपलं प्राणार्पण करून तारण सिद्ध केलेल्या ख्रिस्ताची आहे.

३. ‘ती तुमचीही असो.’ माझीही, आपलीही, आमचीही असो. ही तळमळ म्हणजे काय? ती कशी प्रगट झाली, इतिहासात कोणत्या रूपानं जाहीर झाली, ते ह्या अद्वितीय पत्रात ख्रिस्ताच्या अतुलनीय मनाचं चित्र रेखाटून सांगितलं आहे. ही कळकळ त्याच्या मनापुरतीच न राहता ती मूर्त झाली आणि तो ऐतिहासिक देव बनला. मानवी देहानं अमर झाला. शिवाय माझं त्यानं तारण केलं. त्याचा पुरावा व लक्षण हेच की मला इतरांच्या तारणाबद्दल कळकळ वाटू लागते. त्याची नजर ती माझी नजर, त्याची बोली ती माझी बोली, त्याचा स्पर्श माझा स्पर्श त्याचा कळवळा तो माझा कळवळा बनतो.

४. म्हणून या खास दिवसात त्याच्या मनाशी, कळवळ्याशी एकजीव होण्याचा त्याच्या मदतीनं प्रयत्न करू या. मगच अनेकांचं तारण होण्याचं मंडळीचं काम पूर्ण होईल. तो आहे तिथं आम्हाला नेईल, सर्व आनंदी आनंद होईल, आपण सर्वदा त्याच्यासोबत राहू. म्हणून दु:खानं काळवंडलेल्या परिस्थितीतही या पत्रातून आनंद ओसंडताना दिसतो. त्यासाठीच दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी झीज सोसणारी, दु:ख वाटून घेणारी वधस्तंभ उचलणारी ही मनोवृत्ती आहे. हे बुद्धी, विचार, डोकं, तत्त्वज्ञान नसून हा आतड्यात जाणवणारा जिव्हाळा, खराखुरा कळवळा आहे. तो बाणल्यावर कोणती कृती होते व त्याचे काय परिणाम होतात, ते पाहू.

५. ख्रिस्ताचं मन म्हणजे त्याचं अस्तित्व होय. देवाच्या रूपामध्ये असून देवाच्या बरोबरीचं असणं होय.

(१) त्याचं अस्तित्व म्हणजे देवाचं बाह्यरूप होय .
(२) देवाच्या हक्कानं, अधिकारानं त्याच्या बरोबरीचा होय. ही देवाशी असलेली बरोबरी, त्याचं रूप सोडून, म्हणजे बाजूला ठेवून त्यानं स्वत:ला रिकामं केलं. स्वत:ला नीच केलं.
(३) गुलामाचं रूप घेतलं.
(४) मनुष्यासारखा झाला.
(५) माणसाच्या रूपात आढळला व वावरला.
(६) मरणापर्यंत आज्ञापालन केलं.
(७) वधस्तंभावरील मरण सोसलं. हे चित्र पौलानं रेखाटलंय.

६. हे मन समजून घेण्याचा प्रयत्न करू.
तो कोण होता? बाह्यरूपानं सदैव दिसणारा देवाचा देह. अधिकारानं देवाचा, देवाच्या बरोबरीचा होता. देवाचा हक्क व अधिकार, तोच त्याचा हक्क व अधिकार होता. मग तो कोण झाला? त्यासाठी त्यानं काय केलं? स्वत:ला रिकामं केलं. म्हणजे काय केलं, रूप होतं देवाचं, तर रूप घेतलं गुलामाचं.
अधिकार व हक्क होता देवाचा, तर मनुष्यासारखा झाला. गुलाम म्हणजे दुसऱ्यानं विकत घेतलेलं, दुसऱ्याच्या मालकीची मालमत्ता, जीवन दुसऱ्याच्या मालकीचं. पातक्यांचा गुलाम झाला. पातकी धनी आणि हा गुलाम झाला. पातक्यानं सांगावं अन् ह्यानं ऐकावं. पातक्याची अडचण ती ह्याची अडचण. पातक्याचं ओझं ते ह्याचं ओझं, पातक्याची गरज ती ह्याची गरज. अधिकारानं होता देव पण आता माणसासारखा, अधिकार बाजूला ठेवून चार चौघांसारखा, गरीब मनुष्यासारखा रिकामाच झाला. रिकामं होण्यानं भागलं का ?
रिकामं होण्याबरोबरच वरील सात पायऱ्या उतरल्याच पाहिजेत. पूर्ण रिकामं व नीच केलंच पाहिजे.

७. वधस्तंभ उचलणारी वृत्ती – पातक्यांच्या तारणासाठी सहानुभूतीनं, कमालीच्या दु:खसहनाचा खांब कवटाळणारा कळवळा. त्याचं रूप देवाचं, सर्व मांगल्यानं मोहक, सर्व सौंदर्याचं, सर्व प्रीतीनं पाझरणारं, सर्व गोडपणाचं, सर्व उपकारिकतेचं, तेजानं पेटलेलं होतं. पण या दु:खानं भरलेल्या दुनियेत वावरताना माणसाच्या रूपातच तो आढळला. यरुशलेम, नाईन, कफर्णहूम इत्यादी शहरांच्या, खेड्यापाड्यांतील गल्लीबोळातून तो फिरला. सर्वदा भोवती लोकांची गर्दी. पण हा देव, देवाचं रूप म्हणून कोणी कोणी त्याला ओळखलं नाही. कारण त्यानं ती वस्त्रं काढून ठेवली होती. कमरेला केवळ रुमाल. गंगाळात पाणी घेऊन शिष्यांचे, गडबड्या पेत्राचे, गुरूवर टाच उचलणाऱ्या यहुदाचेही पाय धुणारा हा गुलाम !

अशा गलामाचं रूप घेतलं होतं त्यानं. अधिकार, हक्क, देवाचा असून सारं बाजूला ठेवून मनुष्यासारखा झाला. स्वत: देव, मालक, शिक्षा देणारा, आज्ञा करणारा – आता आज्ञा पाळणारा, ताबेदार गुलाम झाला. शेवटी कळस म्हणजे वधस्तंभाचं नीचतम , अपमानाचं , एकटेपणाचं मरण सोसलं, हेच ख्रिस्ताचं मन!!!

Previous Article

 ख्रिस्तजन्माचा सण: यशया ५३:२

Next Article

ख्रिस्ताचं मन: फिलिपै २:५ (॥)

You might be interested in …

धडा १५.   १ योहान ३:४-६ स्टीफन विल्यम्स

  पाप म्हणजे स्वैराचार ख्रिस्ती लोक ढोगी आहेत अशी लोक टीका करतात हे तुम्हाला माहीत आहे का?  हा मोठा मनोरंजक आरोप आहे; कारण ख्रिस्ती लोक चांगले असलेच पाहिजेत असे गृहीत धरून  त्यावर आधारित केलेला हा […]

देवाचे गौरव येशू

जॉन मकआर्थर “परमेश्वराचे गौरव प्रकट होईल” (यशया ४०:५), हा ख्रिस्तजन्माचा संदेश आहे. येशूचा जन्म हा यशयाच्या अभिवचनानुसार देवाच्या गौरवाचे प्रकटीकरण आहे. ख्रिस्तजन्माच्या देखाव्याचा आशय देवाचे गौरव आहे. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव हे गाणे देवदूतांनी गायले, प्रभूचे […]

लोकांतरण व द्वितीयागमन – १ व २थेस्सलनी

२ रे थेस्सलनी – मजकूर अध्याय १ ला: दुसऱ्या द्वितीयागमनाच्या प्रकाशात भक्त नि शत्रू. (अ) भक्त१ ल्या पत्रातील दैनंदिन अनुभूतीचे घटक तेच आहेत. या दोन पत्रांतील काळाचे अंतर फार तर दीड वर्षापेक्षा अधिक नाही ( […]