ख्रिस्ताचं मन म्हणजे त्याचा कळवळा हे आपण पाहिलं व त्या मायेनं व सहानुभूतीनं त्यानं काय कृती केली तेही पाहिलं. आपण त्यातून हे शिकलो की,
(१) आपल्याजवळ जे आहे ते आपल्यासाठीच ठेवण्याची वस्तू नव्हे.
(२) इतरांसाठी ती सोडून द्यायला आपण तयार असायला हवं.
(३) त्यासाठी स्वत:ला कमालीचं नीच व्हायला आपली तयारी हवी.
“ त्यानं आपणाला नीच केलं,” या छोट्याशा वाक्यात येशूच्या या भूतलावरील जीवनाची गुरूकिल्ली आहे. ‘पातक’ याचा अर्थ अगदी याउलट आहे. आपल्याला उंच करणं, स्वत:करता जगणं, या सर्वांचं नाव पातक आहे. याउलट आपल्याजवळ देवपण जरी असलं तरी ते आपल्याकरता नव्हे तर इतरांकरता, त्यांच्या उद्धाराकरता, इतरांना देवपण देण्याकरता आहे. मग त्यासाठी देवपण, देवाचं रूप, बाह्य सौंदर्य, अधिकाराचं जीवन, संपूर्ण जगाच्या तारणासाठी ते सोडून देण्यास, कमालीच्या नीचपणापर्यंत आज्ञापालन करण्यास तयार असणं हे ख्रिस्ताच्या मनाचं रहस्य आहे. त्यासाठी वरील तीन गोष्टी लक्षात घेऊन आपण अभ्यास करू.
(१) ख्रिस्ताचं रूप, बाह्यस्वरूप देवाचं होतं. स्वर्गातलं होतं, सुंदर होतं. पण आता त्याला पातक्यांचं तारण करायचं आहे. ते तारण त्याच्यामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. म्हणून देवाचं रूप ही स्वत:साठी राखून ठेवण्याची वस्तू नसल्याच्या खात्रीनं रिकामं व्हायला तयार झालं पाहिजे या निर्धारानं ख्रिस्त रिकामा झाला. ते देवाचं रूप बाजूला ठेवलं.
(२) आणि तो माणसासारखा झाला. त्यानं माणसाचं रूप धारण केलं.
(३) इतकंच नव्हे तर गुलामाचं रूप घेण्याइतपत स्वत:ला “नीच केलं.” क्षणभर इथं थोडं थांबू या. देवाचं, अणुरेणुतून झरणाऱ्या स्वर्गीय सौंदर्यानं, तेजानं पेटलेलं, अशी ज्या शरीराची प्रमाणबद्ध घडण असणारं सौंदर्य सोडून द्यायचं अन् माणसाचं तेही गुलामाचं रूप घ्यायचं ! ज्याला रूप नाही, शोभा नाही, मन बसेल असं सौंदर्य नाही, तुच्छ मानलेला, क्लेशानी व्यापलेला, व्याधींशी परिचित असलेला, पाहून लोकांनी तुच्छतेनं उपहासानं तोंड फिरवावं, धिक्कारावं, चेहरा मनुष्यासारखाही दिसणार नाही इतकं विरूप व्हायचं ( यशया ५२: १४). असं रूप घ्यायचं म्हणजे रिकामं व्हायचं. आमच्या तारणासाठी येशूनं त्याचं तेजोमय, गुलाबाप्रमाणं कोमल, नाजूक, सुरेख वर्णाचं, सिंहासारखं बलशाली व सुडौल बांध्याचं दिलखेचक सौंदर्य सोडून दिलं व माणसासारखं गुलामाचं रूप घेऊन तो रिकामा झाला. इतका बदलला की त्या गल्लीबोळातून फिरताना त्याला देव म्हणून कोणी त्याला मान्य केलं नाही. आपलं शिक्षण, मानाची पदं प्रदर्शित करायला पदकं, चिन्हं, विशिष्ठ पोशाख, यांनी माणूस आपलं किती प्रदर्शन करू पाहतो. पण प्रभू रिकामा झाला. हे सारं झालं बाह्य रूपासंबंधी. आता आतल्या रूपाविषयी पाहू.
(४) तो देव, म्हणजे देवाच्या बरोबरीचा होता.
(५) पण माणसाप्रमाणं झाला.
(६) मरणापर्यंत आज्ञापालन केलं. त्याला आपला आतला आपलेपणा सोडून द्यायचा होता. तो देवाचा अधिकार, देवाचा हक्क, सृष्टी व विश्वावर असलेली अमर्याद सत्ता हे सारं सोडून दिलं. हुकूम सोडणारा, आज्ञांकित झाला. माणसाचा ताबेदार, माणसाच्या अधीन झाला. मग
(७) यावर कळस चढवला. सामान्य गुन्हेगाराचं, डाकूचं, वधस्तंभीचं मरण पत्करलं. बेवारस प्रेत पुरावं तसं लाजिरवाणी लाश होणारं मरण पत्करलं. सर्व मित्र, शिष्यांनी, लोकांनी टाकलेलं, प्रीतीविरहित, सांत्वनविरहित, कमालीच्या शारीरिक वेदनांचं, मानसिक दु:खाचा कडेलोट झालेलं मरण प्रभूनं पत्करलं. स्वत:ला रिकामं, रिक्त केलं.
हे ख्रिस्ताचं मन! ही त्याची मनोरचना! ती आपणामध्येही असो.
आरंभी दिलेल्या त्याच्या मनोरचनेच्या तीन घटकांकडे आपण सात पायऱ्यांनी पाहिलं. बाह्यरूपाच्या तीन, आंतरिक तीन व शेवटी कळसाची सातवी पायरी पाहिली. चार चौघांइतकं होऊन नीच होण्याची कमाल केली. जाहीरपणे बाह्य तर आंतरिक दृष्ट्या कमालीच्या दु:खाचं मरण त्यानं स्वीकारलं. या आंतरबाह्य कृतीचा परिणाम काय झाला ते पाहू. त्याची मनोरचना, देवपण दुसऱ्यांसाठी आहे ही. त्याचं रिकामं होणं, हे देवपण बाजूला सारून मनुष्य होणं होय. आणि त्याचं व स्वत:ला नीच करणं हे वधस्तंभावरचं मरण सोसण्यासाठी होतं. त्याचा परिणाम असा झाला की देवानं त्याला उंच केलं.
(१) ख्रिस्ताच्या वैभवीकरणाची पद्धत – देवामध्ये आरंभ असून गुन्हेगाराच्या मरणापर्यंत तो नीच झाला. जितका उंच तितका नीच होण्याचा परिणाम काय झाला? जितका नीच झाला तितकाच उंच केला गेला. गुलामाच्या पायरीवरून पुन्हा देवत्वाच्या शिखरापर्यंत तो चढला. “ त्यानं स्वत: ला नीच केलं…देवानं त्याला उच्च केलं.” “तो रिकामा झाला… स्वर्गातील, पृथ्वीतील, पृथ्वीखालील सर्व त्याच्यापुढे गुडघा टेकेल” त्याच्यासाठी नव्हे तर “देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिव्हेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे…”
(२) त्याच्या वैभवीकरणातले घटक – ‘देवानं त्याला अतिउंच केले’ हे वाक्य वाचताना ‘मी परात्परात्परासमान होईन’ (यशया १४:१४) ह्या सैतानाच्या गर्वाच्या बोलण्याची आठवण होते. आपण देव व्हावे या लोभाच्या भरीस पडून सर्वश्रेष्ठ दूत लुसिफर हा सैतान झाला. आपल्या प्रभूला तर पित्याने उंच केले. आपल्या स्वतंत्र इच्छेचा उपयोग त्यानं आपल्या बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी केला आणि स्वत:ला त्यानं नीच केलं हे देवानं पाहिलं, आणि त्याचं प्रतिफळ त्याला दिलं. त्याला अतिउंच केलं. म्हणजे काय केलं? त्याला सर्वश्रेष्ठ नाव देऊन तृप्त, आनंदित, आशीर्वादित केलं. ते नाव म्हणजे “प्रभू” म्हणजे यहोवा. तो होताच यहोवा. ज्या कामासाठी त्याला अभिषेक झाला, म्हणून तो अभिषिक्त, म्हणजेच ख्रिस्त, मशीहा झाला, व अखेरपर्यंत पूर्ण आज्ञापालन करून ते काम त्यानं पूर्ण केलं. आणि बापाची इच्छा पूर्ण केली. म्हणून देवानं त्याला असं आशीर्वादित केलं. आता पूर्वीचाच यहोवा तो आता पुन्हा नखशिखांत यहोवाच झाला. मूर्त देवपण, प्रत्यक्ष देव, सर्व आदर, सन्मान, भक्ती, उपासना, आराधना ही सर्व त्याची झाली ( यशया ३०:२७; अनुवाद १२:११). कारण तो देवाचं रूप बाजूला ठेवून रिकामा झाला होता; गुलामाचं रूप घेतलं होतं. त्या रूपाला पुनरुत्थानानं यहोवापण पूर्ववत प्राप्त झालं. अशा रीतीनं देवानं त्याला तृप्त केलं. आता त्या मूर्त देवपणाच्या नावामध्ये, यहोवाच्या समक्षतेत सर्व सृष्टी येशू ख्रिस्ताची उपासना करते. स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखालील सर्व सृष्ट पदार्थ, व्यक्ती, वस्तू पुत्राची उपासना करतात.
पातक्यांनी आपल्या मुखांनी त्याच्यावर थुंकून, त्याची अपमानास्पद निंदा केली होती. तीच मुखे आता यहोवा… प्रभू… या नामे स्तुतीनं भरून गेली आहेत. पातक्यांनी गुडघे टेकून हातांनी चपडाका मारून, वेतांनी झोडले असता, आता खऱ्या आदरभावाने, भक्तिभावाने उपासना करीत ते गुडघा टेकत आहेत. हे त्याचं वैभवीकरण होय. बाहेरील रूप सोडलं होतं…आता देवाचं पूर्वीचं रूप पुन्हा प्राप्त झालं ! अंतर्यामाने देवत्वाचे हक्क सोडले होते… आता मूर्त देवपण मिळालं! लाजिरवाणं मरण सोसलं… आता सार्वकालिक पूर्वीचं रूप पुन्हा मिळालं! पातक्यांचं आज्ञापालन केलं. “सुळावर झोप”- झोपला. “मूठ उघड” -उघडली, की खिळे ठोकले… एक ना दोन… पण आता दृढ विश्वासाची निष्ठा प्राप्त झाली. सर्वांनी उपहास, थट्टा केली होती…आता सर्व भक्ती करत आहेत. अशा प्रकारे त्यानं जितकं स्वत:ला नीच केलं, त्याच्या हजारो पटीनं त्याला देवानं उंच केल. या सर्व कृतींचं अंतिम ध्येय एकच! तारणाचा कळस, देवबापाचं गौरव! सर्व उपासनेचं उद्दिष्ट एकच, देवबापाचं गौरव!
आपल्याजवळ असलेलं सर्व काही आपल्याकरता नाही, दुसऱ्यांकरता आहे. त्यासाठी स्वत:ला रिक्त व्हायला हवं. स्वत:ला गुन्हेगाराच्या मरणापर्यंत नीच केलं तर देव अति उंच करतो. नवीन नाव देऊन तृप्त करतो. आशीर्वादित, आनंदित करतो. त्यातून अखेर देवाचं गौरव करून घेतो.
Social