नवम्बर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

ख्रिस्ताचे वधस्तंभावरील सात उद्गार

प्रस्तावना – दोनच ख्रिस्ती सणांतील हा ख्रिस्ताच्या दु:खसहनाच्या स्मरणाचा सण आहे. जयंत्या, पुण्यतिथ्या जगात पाळल्या जातात. पण दु:खसहनाचा सण? ही तर ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानाची गोड जोडगोष्ट आहे. त्या दु: खाला महान मोल व ध्येय आहे. त्यात निर्माणसामर्थ्य आहे. ते सामर्थ्य माणसाचं शील बदलतं. त्या दु:खसहनासाठी त्याचा जन्म होणे, त्याच्या पुनरुत्थानासाठी त्याचं दु:खसहनाचं मरण होणे, आणि त्याच्या स्वर्गारोहण होण्यासाठी त्याचं पुनरुत्थान आणि त्याच्या चर्चच्या जडणघडणीसाठी पवित्र आत्म्याचे आगमन होण्याकरता त्याचे स्वर्गारोहण होणे अगत्याचे आहे. या सर्वाचा परिपाक पाप्याला सार्वकालिक जीवन मिळण्यात आहे. म्हणूनच म्हणतो, हा विलक्षण देव, त्याचा विलक्षण धर्मविश्वास, त्याचे विलक्षण लोक यांचा हा विलक्षण संगम आहे. आणि हा सण विलक्षण आनंद करण्याचा सण आहे. कशासाठी? दु:खसहनासाठी. हा विलक्षण आनंद आहे. कारण हा विलक्षण देव, स्वत: आनंदानं कमालीचं दु:खसहन करून त्यातून इतरांसाठी विलक्षण आनंद निर्माण करतो. देवासमक्ष तो आत्मयज्ञ करतो, त्यालाही तो आनंद देतो. अशी आनंद व दु:खाची ही विलक्षण सरमिसळ आहे. या सणाबद्दल सेवकांची जबाबदारी, तशीच ऐकणाऱ्यांची जबाबदारी. मग त्या उलगड्यानंतर ज्यांना सुवार्ता सांगू, त्यांच्याबद्दलची जबाबदारीही आहे. आम्हा तारण झालेल्यांनी पुण्यप्राप्तीच्या अपेक्षेने सुतकी चेहऱ्यानं हा सण साजरा करायचा नसून आनंद करायचा आहे. तारण न पावलेल्यांनी या तारणाच्या संदेशातून तारण प्राप्त करून घ्यायचं आहे. नाहीतर उत्तम शुक्रवारच्या तीन तासात “सुगी संपली, हंगाम सरला, पण आमचं तारण झालं नाही” असं होईल. (यिर्मया ८:२०).

वधस्तंभावर येशूने सात उद्गार काढले. सात हा आकडा पवित्र शास्त्रात पूर्णतेचे दर्शक आहे. वधस्तंभावर बदलीच्या मरणाचा त्याचा महान आत्मयज्ञ चालू होता. त्या आत्मयज्ञाची महान कामगिरी पूर्ण होण्याचे काम तेथे चालू होते. पूर्ण देव व पूर्ण निष्पाप असा हा देवमानव पापी जगाच्या पापांचं पूर्ण निर्मूलन करत होता. मानवाच्या पापामुळे क्रोधविष्ट झालेल्या देवाशी त्याचा समेट घडवून आणण्याचे काम पूर्ण करत होता.

वधस्तंभावरील येशूच्या सातही उद्गारांचा तारणाच्या संकल्पनेशी सुसंगत संबंध आहे.

पहिला शब्द – “हे बाप्पा ह्यांना क्षमा कर…”  सर्व पातक्यांना मिळवून दिलेल्या पापक्षमेविषयी.
दुसरा शब्द – “आज तू मजबरोबर…” त्याच दिवशी वैयक्तिक तारण प्राप्त होण्याविषयी आहे.
तिसरा शब्द – “बाई, हा तुझा…” तारलेल्यांचे परस्परांशी नवीन परस्पर आध्यात्मिक नाते.
चौथा शब्द – “माझ्या देवा…” पातक्याला देवाशी जडवून द्यायला ताटातूट, तरी देवाशी अजोड.
पाचवा शब्द – “ मला तहान…”  तहान तृप्त झाली नाही तरी देह अमर राहिला.
सहावा शब्द – “मी माझा आत्मा…” मरण मेलं, पुत्र देवच राहिला. देह ठेवला,आत्मा बापाहाती.
सातवा शब्द – “ पूर्ण झाले” तारणाचं सर्व काम पूर्ण झालं.

हे आशीर्वाददायी शब्द आहेत. ज्याला पाप ठाऊक नव्हते तो आपल्यासाठी पाप, शापग्रस्त झाला आणि आपल्याला होणाऱ्या शिक्षांमधून सोडवलं (२ करिं ५:२१). ते देहधारी झालेल्या देवाच्या शब्दाचे शब्द आहेत. ओघळणाऱ्या रक्ताचे ते बोल असून त्याचे बोलणे हाबेलाच्या रक्तापेक्षा उत्तम आहे ( इब्री १२:२४).

पहिला शब्द – “ हे बाप्पा, ह्यांना क्षमा कर कारण हे काय करतात ते ह्यांना समजत नाही” (लूक २३: ३९-४३).

विल्यम बार्कलेंच्या कॅामेंट्रीत म्हटलं आहे, तो असं सतत म्हणत राहिला. म्हणजे प्रत्येक प्रकारे कुचेष्टा, थट्टा, निंदा, मारहाण, थुंकणं, खिळे ठोकणं…करताना तो म्हणाला. काय नम्र वृत्ती ही ! बापानेच त्याला वधस्तंभी लटकू दिलं होतं, तरी तो बापच !आणि हा आज्ञाधारक पुत्रच. ते शिपाई आपलं हे असलं कर्तव्य पार पाडत होते, तरी त्यांची क्षमा ? पिलात स्वत:च्या मुखानं त्याच्या ठायी मला काही दोष दिसत नसल्याची जाहीर ग्वाही देतो. तरी त्याला बेकायदेशीरपणे, गुन्हा शाबीत न होताच त्यांच्या स्वाधीन करतो. त्याची क्षमा? चुकीचे आरोप लादणाऱ्या सन्हेद्रीन सभेची क्षमा? स्वकीयांची, विदेश्यांची, मंडळीची, संपूर्ण जगाची, वधस्तभी खिळणाऱ्यांची, ते हजर असलेल्या नसलेल्या सर्वांची, अद्याप जन्माला न आलेल्या पण पुढे जन्माला येणाऱ्या अखेरच्या जिवापर्यंतच्या सर्वांची क्षमा ! यशया ५३ :१२ नुसार सर्वांसाठी “आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यांत गणू दिले, त्याने प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या अशा बहुतांचे पाप आपणावर घेतले आणि अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.” याजक म्हणून अर्पण करणारा तोच! आणि अर्पणाचा कोकराही तोच!

कारण मनुष्य पापी आहे, त्यामुळं देवाशी त्याची ताटातूट होऊन तो देवाच्या जीवनापासून दूर, विभक्त झाला आहे. त्याच्या सौख्यसमाधानास कायमचा मुकला आहे. कायम असंच जीवन जगण्याच्या मार्गाला लागला आहे. अनंतकाळची शिक्षा, अग्नी, अंधार, एकटेपण, अनंत पीडा, शोक, कष्ट यांचा भागीदार ठरला आहे. यातून त्याला सोडवून देवाचं जीवन, तो स्वत: जगत असलेलं न संपणारं पवित्र जीवन त्याला बहाल करायला त्याचं सुख, समाधान, तृप्ती त्याला अनंतकाळ द्यायला तो वधस्तंभावर येथे तारण, सार्वकालिक जीवन आपल्या या कृतीनं प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्यासाठी सिद्ध करत होता. मग संपूर्ण जगानंही विश्वास ठेवला तर ते त्याला हवंच आहे. कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. त्यासाठी प्रत्येकाच्या पापासाठी त्याच्या बदली तो दु:खसहन करीत आहे, ते करताना त्याच्या पवित्र ओठांतून निघालेले हे स्पष्टीकरण तो करत आहे, की त्याच्या रदबदलीच्या या कृतीनं त्याला पत्करणाऱ्या पातक्याला ही क्षमा प्राप्त होणार आहे.

दुसरा शब्द – मी तुला खचित खचित सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील” (लूक २३: ४३)  

स्वत: अट्टल गुन्हेगार असून हे दोघेही चोर आधी त्याची निंदा करत होते ( मत्तय २६: ४४). आता त्यातील एकाला आपल्या पापांची जाणीव होत आहे. तो आपल्या पापांची जाहीर कबुली देत दुसऱ्या चोराच्याही निदर्शनास आणून देतो की आपण भोगत असलेली शिक्षा योग्य आहे, पण येशू निर्दोष, पवित्र, निर्दोष देव आहे. तो बदलीचं मरण मरणारा मशीहा आहे ही खात्री येशूच्या नजरेला नजर भिडवताना होऊन त्याचं पश्चातप्त अंत:करण त्याला तारणारा, मशीहा, म्हणून मान्य केल्याची पावती म्हणून तो विनंती करतो. तेव्हा आता हा मरणारा देवाचा कोकरा भावी काळी राजाधिकाराने येणार असल्याची आठवण होऊन तो आदरभावाने आरोळी करतो, “अहो येशू, आपण राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” सर्वज्ञ येशूने त्याचे अंत:करण केव्हाच ओळखले आहे. त्याने कबूल केलेली पापे आपल्या शिरावर केव्हाच घेतली आहेत. त्यांची क्षमा झाल्याची व तो सार्वकालिक मरणातून सार्वकालिक जीवनात गेल्याची हमी देत लागलीच त्याला म्हणतो, “मी तुला खचित खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” आत्मा व जीव तारण पावून त्याची सार्वकालिक जीवनाची आध्यात्मिक वाटचाल सुरूही झाली. दुसरा चोर मात्र आपली पापे आपल्याच शिरावर घेऊन सार्वकालिक शिक्षेला चालला आहे. येथे देवाने सिद्ध केलेल्या तारणाचा वैयक्तिक स्वीकार व वैयक्तिक धिक्कार करणाऱ्या विश्वासी व अविश्वासी यांचे असे दोन भिन्न गट तयार झालेले पाहातो. येशूचे तारणाचे कार्य वधस्तंभावर असतानाच सुरू झाले आहे.

तिसरा शब्द – “बाई, पाहा हा तुझा पुत्र, मुला ही पाहा तुझी आई.” ( योहान १९:२६-२७).

दुसऱ्या शब्दात एकेका पश्चातप्त पातक्यासाठी तो स्वर्ग खुला करतो हे सत्य प्रगट केलं आहे, तर या वाक्यात पातक्याला देवाच्या घरात, त्याच्या कुटुंबात प्रवेश दिला आहे. असा तारणाच्या त्या महान कृतीवर कळस चढवला आहे. पहिल्या उद्गारात विनंती आहे. दुसऱ्या उद्गारात भावी आश्वासन आहे.

(अ) तर तिसऱ्या उद्गारात ते उद्धारकार्य पूर्ण झाल्याची खात्री आहे. “पाहा” हा शब्द दृष्टीस पडलेलं, नवीन भावी दुनियेचं, असं चित्र आहे की देवाच्या सनातन कुटुंबात तारण पावलेल्या पाप्याची भर पडून ती दोन घराणी एकरूप झाली आहेत. प्रत्यक्षात हे भावी काळी पूर्ण होणार आहे, पण विश्वासीयांच्या समुदायात मंडळी त्याची येथे जगात चव घेण्याविषयीचे ते सत्य आहे. त्यावर शिक्कामोर्तब करून येशू ह्या नात्याची खात्री देत आहे.

(ब) यातून मरीयाही तारण पावून मंडळीचा घटक झाल्याचे पर्यायाने लक्षात येते. म्हणून ती पुढे प्रेषितांसोबत दिसते.

(क) आपल्या आईबापांची अखेरपर्यंत देखभाल करण्याचा, व्यवस्था लावण्याचा आदर्श तो घालून देतो.

(ड) ‘बाई’ ही आदरभावाची हाक मारून आपलं मानवी नात्याच्या जन्मातून आलेलं मातापुत्राचं नातं नसल्याचं तो स्पष्ट दाखवून देतो. कारण तो तर युगादिकालापासून देवपित्याच्या उराशी असलेला पूर्णत्वानं देवच आहे, हे स्पष्ट करून

(इ) मानवधारी होण्यापुरतं तिचं उदर वापरून त्याला जगात एक कुटुंब दिल्याचं, व त्यात आपली जबाबदारी पूर्ण केल्याचा आदर्श तो घालून देत आहे.

(फ) योहानानं तिला “ घरात घेतलं” असं मूळ भाषेत नाही, तर तिला आपल्या स्वकीयांत, घरच्या माणसांत सामावून घेतलं व ती त्याच्या घरची झाली, असं आहे. त्या उत्तम शुक्रवारी, दु:खाच्या धसक्याने धसधसणाऱ्या धरणीवर जीवनाचे बोल झरले. आणि देवाची जिवाला जीव जडलेली खरी मंडळी या नव्या कुटुंबाद्वारे जन्माला आली. जरी सैतानी शत्रूंनी घेरलेली असली, गावातले बघेही मंडळीतलेच कट्टर शत्रू. तरी प्रभूच्या “वधस्तंभाजवळ उभे असलेले” त्याच्या दु:खात वाटेकरी असलेले भक्तिभावानं सहानुभूतीनं भरलेले लोक प्रभूला दिसत आहेत. त्यांची अशा प्रकारे नव्या नात्याची प्रभूची मंडळी इथे जन्माला आली आहे. हा पृथ्वीचा पाया घालणाऱ्या त्र्येक देवाच्या कुटुंबाचाच हा नमुना आहे.

अवशिष्टांची ही मंडळी धीर, शांती व प्रीतीनं भरलेली आहे. या कुटुंबाचा मालक देवपिता, मुख्य कार्यकर्ता देवपुत्र, त्यांना प्रीतीनं बांधणारा पवित्र आत्मा आहे. आणि हे लोक एकमेकांवर प्रीती करतात.

मध्यंतर – आता भर दुपारी ३ तास अंधार पडतो. भयानक भीतीचं वातावरण पसरतं. त्यात जे घडतं ते मानवाच्या दृष्टीपासून अलिप्त ठेवलं जातं. खरं तर तेव्हा कोकरं कापण्याची गडबड सुरू असते. पण ते काही सुकर होते असे दिसत नाही. मात्र यशया ५३: १० नुसार त्या अंधारामागे पिता त्याला पाप म्हणून ठेचत आहे. त्या पापाच्या सर्व यातना, शिक्षा, नरकयातना देत आहे…तीन तास. मग अचानक परत सूर्य प्रकाशतो. पिता समाधान पावून पाठ फिरवून निघून जातो. आणि आता पुढील सर्व उद्गार येशू स्वत: विषयी बोलतो.

पुढे चालू

Previous Article

ख्रिस्ताचं मन: फिलिपै २:५ (॥)

Next Article

 वधस्तंभावरील सात उद्गार (॥)

You might be interested in …

विश्वाचे सर्वात मोठे दोन प्रश्न

जॉन पायपर १ पेत्र २:११-१२ या दोन वचनांमध्ये या विश्वामध्ये तोंड द्यावे लागणाऱ्या सर्वांत मोठ्या दोन प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पेत्र लिहितो: “प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, […]