सितम्बर 19, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

गेथशेमाने बाग

लेखांक ५   

  आपण पाहिलं की तिघे शिष्य आत्मा उत्सुक असूनही, देह अशक्त असल्याने आपल्याला जागे राहून साथ देऊ शकत नाहीत हे सर्वज्ञ येशू ओळखतो व एकटाच प्रार्थनेच्या जागी येतो. तेव्हा स्वर्गीय दूत त्याच्या दृष्टीस पडतो. येथे आपण थांबलो होतो. लूक २२:४३-४४ या वचनांवर आपण अभ्यास करू या.

हा वृत्तांत प्रेषितीय असून मूळ हस्तलिखितांमध्ये असल्याने खरा, विश्वसनीय, अस्सल आहे यात शंकाच नाही. माणसाच्या सोबतीची प्रभूला इच्छा होण्यानं जर त्याच्या देवपणाला धक्का बसत नाही, तर स्वर्गीय देवदुताच्या सोबतीनं तरी का धक्का बसावा?
महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अखेरचा निर्णय जो प्रभूनं घ्यायचा होता, तो त्यानं कसा घेतला? एकट्यानं की कोणा दुसऱ्याच्या मदतीनं? त्यानं तो दुसऱ्याच्या मदतीनं नव्हे तर स्वत:च घेतला की झाले. नि मुळात ते तसंच आहे. “त्याला बळ देताना देवदूत दृष्टीस पडला” हे खरं आहे. ‘देवदूत हे परिचारक आत्मे आहेतच’ ( इब्री १:१४).
त्याबद्दल शंकाच नाही. निकडीची गरज पाहून बापानं त्याला पाठवलं हेही तितकंच खरं.

पण त्यामुळे त्याला काही मदत झाली का? निर्णय घ्यायला त्याला दुताचा काही फायदा झाला का? नाही. मुळीच नाही. कारण ज्या लुकानं ‘नीट बारकाईनं शोध करून हा ग्रंथ काळजीपूर्वक लिहिला’ ( लूक १:३); तोच पुढच्याच वचनात हे स्पष्ट करतो. त्या देवदुताच्या मदतीनं प्रश्न सुटलाच नाही. त्यानं परत आपली प्रार्थना सुरू केली. आणि प्रार्थनेची ही दुसरी पायरी पहिलीपेक्षा देवाच्या इच्छेशी अधिक संमत आहे असे, “हे प्याल्यावाचून टळून जात नसेल तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” या वाक्यावरून अगदी स्पष्ट होतं.

पहिली प्रार्थना व दुसरी प्रार्थना यात कोणता फरक आहे, ते काळजीपूर्वक पाहू या.
पहिली दोन संयुक्त वाक्ये आहेत. “हा प्याला… ही घटका… टळून जावो” ( मत्तय २६: ३९-४०; मार्क १४:३५-३६). हे पहिलं वाक्य. स्पष्ट स्पष्ट प्रभूची इच्छा. तरी प्रमुख वाक्य आहे की “माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” अखेरचं असल्यानं हे वाक्य महत्त्वाचं आहे. त्याच्याविरुद्ध पहिलं वाक्य आहे. म्हणजे आपल्या बापाची इच्छा माहीत नसता त्याच्याविरुद्ध आपली इच्छा त्याने प्रगट केलीच. याचा अर्थ; “तुझी तशी इच्छा असली तर .. आणि मला तर तुझी इच्छा कळत नाही … ही घटका …हा प्याला माझ्यावरून टळून जावो.”

आता दुसरी प्रार्थना पाहा. “जर हे प्याल्यावाचून टळणार नसेलच तर.. तुझ्या इच्छेप्रमाणं होवो.”  हे मिश्र वाक्य आहे. यात प्रमुख वाक्य एकच आहे. दुसरं त्याच्यावर अवलंबून वाक्य आहे. प्रमुख वाक्य कोणतं? तर “ तुझ्या इच्छेप्रमाणं होवो. माझ्या इच्छेप्रमाणं नको.” म्हणजे प्रभूनं इथंच दुसऱ्या वेळेस जय मिळवला ! नि स्वत:च्या इच्छेनंच जय मिळवला ! तथापि अजूनही मरण का नाही येत? माझं काही चुकलं की काय? देहधारी प्रभू, मानवी अशक्तपणानं ही परीक्षा देत आहे हे दिसलं का तुम्हाला? त्याच्या मनावर पडलेला ताण, त्याला घेरून टाकणारी अनिश्चितता, त्यामुळं आपण आपल्या बापाविरुद्ध गेलो की काय ही प्राणांतिक तळमळ प्रभूला कासावीस करून सोडतेय हे दिसतं का तुम्हाला?

तो परत एकदा शिष्यांकडं जातो. त्यांच्याकडूनच्या समाधानासाठी, सोबतीसाठी धाव घेतो. पण तिथं पूर्वीपेक्षाही अंधार आहे. ते गाढ झोपल्याचं तो पाहातो. त्यांचे डोळे दु:खानं भारावले होते. त्या दु:खाची झापड पडल्यानं त्यांना काळझोप लागली होती. त्यांना जागं करण्याचा त्यानं प्रयत्न केला, पण त्यांची झापड उघडेना. अर्धवट जागेपणानं काय उत्तर द्यावं तेही त्यांना कळेना. काही उत्तर न देताच ते डाराडूर झोपी गेले.

स्वर्ग अद्याप स्तब्ध. बाप आतापर्यंत पूर्वी तीनदा धावून आला होता. जिवंत वाणीनं त्यानं धीर दिला होता. पण यावेळी मानवधारी प्रभू येशूला आकाश पितळेचं, अन् जमीन लोखंडाची झाली होती. बापानं उत्तर तरी काय द्यायचं? हा प्याला सैतानानं मरणानं भरला होता. ही घटका आणण्याची त्यानं शिकस्त केली होती.

प्रभू अशावेळी, अज्ञानात, अनिश्चिततेमध्ये, अखेरच्या घटकेस काय करतो हा प्रश्न होता. सैतानानं सुचवलेल्या मरणाचा पवित्र पुत्राला स्पर्शही होणार नव्हता. बापाच्या ऱ्हदयाला लाख वेदना झाल्या. पण मुलाच्या मदतीला त्याला धावून येता येत नव्हतं. बोलताही येत नव्हतं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. पण तो सोसण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. प्रभूनं आपल्या इच्छेनंच काय ते ठरवायचं होतं. त्याचा जीव ‘अति विव्हळ झाला होता.’ नि त्याचा परिणाम एकच झाला. प्रभूनं तेच शब्द बोलून तीच प्रार्थना केली. तो मरणास तयार झाला. “ त्याचा घाम रक्ताच्या मोठमोठ्या थेंबांसारखा जमिनीवर पडू लागला !”

पण त्यानं जिंकलं ! त्याला वाटलं त्या मरणाला आपण तयार झालो. ते येईल आता. पण मरण कसचं येतंय? ते सैतानानं सुचवलं होतं ! बापानं मुलाची विनंती ऐकली होती ! तो सैतानाचा, अवकाळी मरणाचा प्याला त्यानं दूर केला होता. प्रभू विजयी झाला होता !

“तुझ्या इच्छेप्रमाणं होवो” असं प्रभू म्हणाला होता. बापानं आपल्या इच्छेप्रमाणं केलं होतं! इब्री ५:७ मध्ये म्हटलं आहे, “त्यानं ( म्हणजे युगानुयुगाचा याजक जो येशू ख्रिस्त यानं) आपल्या देहावस्थेच्या दिवसांमध्ये, स्वत:ला मरणापासून तारावयास जो शक्तिमान, त्याच्याजवळ मोठ्या आक्रोशानं व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली. आणि ती त्याच्या (सुभक्तीमुळे, सद्भयामुळे) -मूळ ग्रीक शब्दात उपासनेमुळे- ऐकण्यात आली.”

हे वचन गेथशेमाने बागेतील या परीक्षेच्या घटनेविषयीच आहे यात शंकाच नाही. आता तो विजयानं प्रार्थना करूनच  उठला. अन् आपल्या शिष्यांजवळ आला. शांत सामर्थ्यानं तो आपल्या अद्यापही झोपी गेलेल्या शिष्यांना म्हणतो,  “आता झोप व विसावा घ्या.” जिंकलं मी! सदासर्वकाळासाठी जिंकलं मी! तुमच्याकरता जिंकलं मी!
जिवाची नि जिवंतांची ताटतूट करणारी मरणाची काळझोप आतापासून नाहीशी झाली. आता झोप राहणार, ती ज्याकरता निर्माण झाली त्यासाठीच राहणार. विसाव्याकरताच झोप उपयोगी पडणार. झोपा, आता छान निर्धास्त मनानं विसावा घ्या. देवश्रेष्ठाचा ठरलेला खून नजीक येऊन ठेपला आहे. पण गेथशेमानेच्या विजयानंतर आता कशाचंच वर्चस्व राहिलेलं नाही. घ्या झोप. विसावा “पुरे झालं” ( मार्क १४:४१).

काय पुरे झालं? मध्येच असं निरर्थक दिसण्याजोगं प्रभू काय बोलत आहे बरं? प्रभू कधी निरर्थक बोलेल का? मुळीच नाही. मग याचा अर्थ काय? ग्रीकमध्ये यासाठी एकच शब्द आहे. त्याचा उपयोग पावती देण्यासाठी करतात. त्याचा अर्थ , ‘मी पावती लिहून देतो की अमुक गोष्ट मी भरून पावलो.’ म्हणजे मला जे मिळायचं होतं ते अपेक्षेनुसार पुरेपूर मिळालं. मग इथं त्याचा अर्थ काय? कोणत्या गोष्टीची अपेक्षा प्रभू करत होता? शिष्यांपासून काय प्राप्त करण्याची त्याला उत्कंठा लागली होती? नि त्याला काय भरपूर प्राप्त झालं? प्रिय प्रभूला काय हवंय ते पाहा, मग या शब्दाचं सौंदर्य तुम्हाला कळून येईल. ‘घटकाभर माझ्याबरोबर जागण्याची शक्ती तुम्हाला नाही काय?’ ‘माझ्याबरोबर’ हा शब्द त्याला सोबतीची गरज होती हे सुचवतो. आपल्या कडेलोटाच्या दु:खसहनामध्ये कुणीतरी सहमनस्क आपली साथ करीत आहे. हा आधार व याचं समाधान प्रभूला हवं होतं. ही एक गोष्ट. आणि दुसरी म्हणजे “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागं राहा आणि प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.”

मार्क म्हणतो की तो हे शब्द पेत्राला उद्देशून बोलला. पेत्रा, तू काय म्हणाला होतास, आठवतं का तुला? ‘सर्व तुझ्याविषयी अडखळले तरी मी अडखळणार नाही. तुझ्याबरोबर मला मरावं लागलं तरी मी तुला नाकारणार नाही.’ तुझ्याबरोबर सर्वच आता काही वेळापूर्वी हे बोलले होते ( मत्तय २६:३५). अशा प्रकारे झोपून तुम्ही त्याची
पूर्तता करता का? एक तासभर माझ्याबरोबर जागून तुमच्यासंबंधी माझी अपेक्षा तुम्हाला पूर्ण करता येत नाही का ? झोप काढून ती पूर्ण होणार आहे का? मी तुम्हाला सांगितलंय की पुढं खूप अडखळण्याच्या परीक्षा तुमच्यावर गुदरणार आहेत. त्यात तुम्ही हार खाऊ नये म्हणून उठा. उठून बसा ( लूक २२ : ४५). बसून प्रार्थना करा, पडल्या पडल्या प्रार्थना केल्यास तुम्ही झोपून जाल. आपल्याबरोबर जागं राहून आपली सोबत करावी, स्वत:च्या बचावासाठीही प्रार्थना करावी अशी प्रभूची त्यांच्याकडून अपेक्षा होती. ती सपशेल जमीनदोस्त झाली होती.

तरी देखील तो म्हणत आहे, तुमच्यापासून केलेल्या अपेक्षा पूर्णपणाने मला तुमच्यापासून प्राप्त झाल्या आहेत. ही माझी पावती घ्या. झोपले असतानाच? केव्हा? कशा मिळाल्या त्या गोष्टी प्रभूला? त्यांचा आतला आत्मा त्या गोष्टी करायला उत्सुक, तयार होता. त्यांचा देह अशक्त होता, हे खरं. नाही झेपलं त्यांना. काळझोपेनं व दु:खानं जड झाले होते त्यांचे डोळे. उघडेही ठेवता येत नव्हते , गपगप आपोआप झाकत होते डोळे. पण एवढ्या दुर्बलतेतही त्यांचा आत्मा आतमध्ये प्रभूची सोबत करायला, स्वत:साठी प्रार्थना करायला उत्सुक, तयार होता. एवढंच खरंखुरं असल्यानं प्रभूनं मान्य केलं. भरभरून पावला तो. त्याच्या दिव्य दृष्टीनं त्या दुर्बळ देहांचा भेद घेऊन आतली उत्सुकता पाहिली. आणि तृप्त, मोकळ्या, मनानं मान्य केली.

आतापासून कृत्रिमपणे केलेल्या प्रार्थनांची गरज काय? प्रार्थना करण्याचं लाख मनात असून नैसर्गिक दमण्यामुळं असो, की दु:ख संकटांनी भारावलेल्या देहामुळं असो. आमच्या हातून प्रार्थना होत नाही तेव्हा दु:ख करण्याचं कारण नाही. प्रभूच्या दिव्य दृष्टीला आतली उत्सुकता, कळकळ, जिव्हाळा, दिसतात. तेवढं पुरे. देहाच्या पडद्याआड चाललेलं सर्व पाहणाऱ्या दिव्य दृष्टीच्या सर्वज्ञ, दयाळू  देवा, तुझी कमालीची भीती तर वाटतेच पण धन्य आम्ही. आमची आतली निष्ठा निरखणाऱ्या, मान्य करणाऱ्या देवबापा, खरोखरीच धन्य आम्ही. तुझ्या उपकारक आशीर्वादानं आशीर्वादित झालो आम्ही.. भरून गेलो…
“पुरे झालं!! “

(पुढे चालू)

 

                               
                             









Previous Article

गेथशेमाने बाग

Next Article

गेथशेमाने बाग

You might be interested in …

तो पुन्हा उठला – जगाला धोक्याची सूचना देण्यासाठी

जेसन मायर “मी परमेश्वराचा निर्णय कळवतो; तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे” ( स्तोत्र २:७) बीप…बीप… बीप टायमर सुरू होतो.  सावकाश. पण मग  तो वेगाने आणि अधिक वेगाने […]

लेखांक ४: माझ्या प्रिय पत्नीच्या देवाघरी जाण्यामुळे माझ्या जीवनामध्ये आलेला अर्थ

(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला समोरे जाणारी जीवनकथा ) (२) (अ) या घटनेव्दारे माझा देवावरचा विश्रास अजून बळकट होण्यास मदत झाली की देव माझा “स्थिर पाया”आहेव “त्याचे लोक”कोण आहेत हे […]

धडा १    पाहणे आणि विश्वास ठेवणे   योहान १:१   – स्टीफन विल्यम्स

  आपण देवाविषयी का शंका घेतो? (चर्चा करा) ▫   पाप, औदासीन्य, सहभागितेचा अभाव (इब्री ३:१२-१४). ▫   देवाच्या वचनाशी निगडित न राहणे. ▫   बायबलमधील संदर्भ न घेता अगदी निराळाच भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध लावणे. ▫   […]