अक्टूबर 16, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

प्रभातसमयीचा हल्ला

डेव्हिड मॅथीस

प्रत्येक सकाळ आपल्याला एका मेजवानीसाठी बोलावते. प्रत्येक नव्या दिवशी यशया ५५ ची साद ऐकू येते, “अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या… माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो (यशया ५५:१-२).

म्हणून हातात बायबल घेऊन आपण शुष्क आणि  भुकेल्या जिवाने आपली गरज समजून त्या मेजवानीची वाट पाहतो. “माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे… मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल” (स्तोत्र ६३:१,५). ख्रिस्तामध्ये  आपण त्याच्या वचनाद्वारे  देवाकडे येतो. तहानेले असे पाण्यासाठी, पैक्याशिवाय दूध व मध घेण्यासाठी ( यशया ५५:१), भुकेले असे खऱ्या भाकरीने तृप्ती होण्यासाठी.

प्रत्येक नवी सकाळ देवाच्या दयेने येते, आपली तहान शमवण्यासाठी व जिवाची तृप्ती करण्यासाठी.

देवाच्या वचनावर मनन करताना अशीच भावना असायला हवी: भरवणे, खाणे, पिणे, तृप्त होणे. लढाई व युद्धाची भावना नव्हे तर मेजवानीची. पण लक्षात घ्या: या शापमय  जगात पापी म्हणून – असे भरले जाण्यासाठी आपल्याला एका खऱ्या शत्रूशी युद्ध करावे लागतेच.
दररोजची सामान्य भक्ती युद्धापेक्षा कमी नाही.

सैतान लवकर उठतो

“देव खरेच असे  म्हणाला का?”

अगदी पहिल्या मोहापासून शत्रूने त्याची दृष्टी देवाच्या वचनावर ठेवली आहे. जर आपण ते ऐकले असेल तर तो त्याला प्रश्न करील. पण त्याला ठाऊक आहे की याहून चांगली गोष्ट म्हणजे प्रथमच देवाचे  ऐकण्यापासून आपल्यालादूर ठेवणे.

सैतान आणि त्याच्या संघाला देवाचे वचन किती सामर्थ्यशाली आहे आणि ते आपल्या जीवनासाठी किती प्रभावी आहे हे ठाऊक आहे … निखार्यांना उष्णता देणाऱ्या विस्तवाचे सामर्थ्य त्यांना माहीत आहे आणि विश्वास देण्यासाठी पुरवठा करणारे व विश्वासात चालत राहण्यासाठी मृदू ह्रदय देणारे देवाचे सामर्थ्य त्यांना माहीत आहे. जेव्हा विश्वासी ख्रिस्ती दर सकाळी एकांत समयी भक्ती करण्यास बसतो तेव्हा त्या स्फोटक, जग बदलणाऱ्या सामर्थ्यापुढे ते थरथर कापतात.

तर हे दुरात्मे या सकाळच्या मेजवानीत व्यत्यय आणण्यासाठी काहीही करतील. ते अंधारात पहाटेच हल्ला करतात. “आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही” (२ करिंथ २:११).  सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरत असला ( १ पेत्र ५:८) तरीही शांत चित्ताने आणि दक्षतेने आपण त्याच्या मोक्याच्या जागा पाहू शकतो.

वचन घेण्यावर तीन हल्ले

आपला शत्रू आपल्या जीवनाच्या  रचनेचा फायदा कसा घेतो याचा विचार करा. तो आपली पापे आणि कमकुवतपणा घेऊन देवाच्या वचनावर पोषण करण्याच्या एकांत समयाविरुद्ध कट रचतो.

१. त्यांना रात्री जागे ठेवा

त्याच्या मोहिमेला आदल्या रात्रीच सुरुवात होते. त्यांना खूप रात्रीपर्यंत जागे ठेवा . कदाचित ते न झोपणारे बाळ असेल. तातडीची गरज असेल, कदाचित फोनवरचे संभाषण  असेल किंवा मध्यरात्रीपर्यंत चालणारा कार्यक्रम असेल. हे सर्व रात्रीचे तेल संपवण्यास प्रभावी बनते.

एकांतसमयाची आध्यात्मिक लढाई सूर्य उगवण्यापूर्वीच सुरू होते. स्वस्थ चित्ताचे आणि दक्ष असणारे लोक  ह्याचे निरीक्षण करतात आणि शहाणपणाने वागतात. ख्रिस्ती प्रीतीच्या नावाखाली ते रात्रीपर्यंत चॅट करत बसत नाहीत आणि एकानंतर  एक क्लिप पाहत बसत नाहीत. रिकाम्या रात्रींचे हे कोसळते परिणाम दिसू न शकण्यासाठी शत्रू आपले डोळे अंध करतो.


२. त्यांचे लक्ष विचलित करा

आपण जर रात्री वेळेवर विश्रांती घेतली तरी हा शत्रू हरलेला नसतो: सकाळी त्यांचे लक्ष विचलित करा. हे काम  चुटकीसरशी होऊ शकते.

एका दृष्टीने हे नेहमीच सोपे होत आले आहे. सतराव्या शतकामध्ये ब्लेझ पास्कल यांनी मन विचलित होण्याचा जगाचा कल यावर लिहिले: “मानवतेच्या सर्व समस्या माणसाला एका खोलीत एकटे बसता न येण्यामुळे उद्भवतात.” आपले लक्ष वेधण्यासाठी आपल्याला सतत बातम्या किंवा इंटरनेटची गरज नसते – आणि आता तर ते  आपल्याकडे आहे आणि आपण त्याला किती सहज बळी पडतो. स्मार्टफोन, त्याचे नोटीफिकेशन्स आणि ते सारखे तपासत बसणे हे सर्व पाश आहेत.


३. त्यांना पटकन संपवायला लावा

तिसरा कट आहे घाई. आपण सकाळीच नव्हे तर दिवसभर धांदलीने राहावे हे सैतानाला बरे वाटते. आपण जगाच्या गतीने चालावे, वचनाच्या नव्हे असा त्याचा इरादा असतो. आपण सकाळच्या एकांतसमयी खूप वाचन करावे म्हणजे आपण ते भरकन वाचू हे ही त्याला आवडेल. आपण गतिमान युगात जगत आहोत. आपण जगाच्या ह्या गतीशी तडजोड करावी असा ताण तो आपल्यावर आणते. आणि हीच धांदल आपण देवाच्या वचनाकडे येतो तेव्हाही आणतो.

पण सकाळची देवाच्या वचनाची मेजवानी ही फास्ट फूड नाही आणि तशी कल्पनाही आपण करू नये.

मोहावर तीन आघात

तर सैतानाच्या या कटाला आपण कसे तोंड द्यावे? दुरात्मे कसे हल्ला करतील याची अपेक्षा करणे एक बाब; त्या माहितीवर कृती करणे ही दुसरी बाब. तुमचे बायबल वाचन व मनन याविरुद्ध असलेले सैतानाचे सामर्थ्य उलथून टाकण्यासाठी तुम्ही काय कराल?

१. टी व्ही, फोन काळजीपूर्वक हाताळा

विचार करा जर एकांतसमयी तुम्ही तुमचा फोन बंद ठेवला आणि दूरवर किंवा दुसऱ्या खोलीत ठेवला तर तुमचे चित्त विचलित होणार नाही.

आपल्या जिवाला देवाच्या वचनाने तृप्ती होण्यासाठी आपण फक्त वेळ कसा काढायचा हेच पहायचे नाही  तर केव्हा झोपायचे, केव्हा उठायचे, सकाळच्या लक्ष वेधणाऱ्या बाबी कशा टाळायच्या हे ही पहावे. रात्री आणि सकाळी टी व्ही बंद ठेवून मन विचलित होणे टाळावे.

आपल्यातील कित्येक जण या आधुनिक जगात हे टाळू शकत नाही. आपण कम्प्युटरवर काम करतो, व्यवसायासाठी तो वापरतो. त्यावर आपण कल्पनेपलीकडे अधिक वेळ घालवतो. पण आपण सवय लावून घ्यावी की रात्री व सकाळी प्रभूला भेटण्यापूर्वी या गोष्टी वापरू नये. यामध्ये ख्रिस्ती सुज्ञता आहे.

२. दिवसाचा शिधा गोळा करा

सामान्य एकांतवासामध्ये एक गौरवी साधेपणा असतो जो आपल्या जिवाला अन्न देतो आणि जीवनभरासाठी आधार देतो. देवाचे वचन वाचून मनन करण्यासोबत आणखी इतर बरेच वाचन करणे जरी कौतुकास्पद असले तरी त्यामुळे वचनाद्वारे मिळणारे  देवाचे सान्निध्य व त्याच्याशी सहभागिता यांचा आनंद कमी होतो. दुसऱ्या शब्दांत साधेपणाने शोधा व दररोजचा शिधा गोळा करा.  रानामध्ये जसे देवाचे लोक दररोज मान्ना गोळा करत होते तसेच तुमच्या ह्रदयाची भूक व तहान त्या दिवशी भागवण्याचे ध्येय ठेवा. कालचे राहिलेले वाचन पूर्ण करण्याची गरज नाही किंवा उद्यासाठी किंवा पुढच्या आठवड्यासाठी अधिक साठा करण्याची गरज नाही. देव उद्याची काळजी घेईल. आज या, खा, प्या, आणि आज तृप्त व्हा. दुसऱ्या शब्दांत खाऊ शकत नाही एवढे घेऊ नका.

३. तुमचे अन्न सावकाश खा

अखेरीस तुमची धांदल उरलेल्या दिवसासाठी ठेवा. शक्य असेल तर वेग कमी करा. तो कसे करायचा हे शिकायला थोडा वेळ लागेल. तुमचे अन्न हळूहळू चावत खा. असे करण्याने जेव्हा तणाव व चढउतार असतात तेव्हा ते सोबत नेण्यास मदत होते. यशया ५५ व स्तोत्र ६३ मधील मननाचे चित्र हे मेजवानीचे वर्णन करते. हिब्रू मनन हे रवंथ केल्यासारखे आहे. जर तुम्ही रवंथ करणाऱ्या गायांचे निरीक्षण केले असेल तर त्यांना कसलीही घाई नसते. तुम्हीही तसेच सकाळी देवाच्या वचनावर  सावकाश चर्वण करा. सामान्यत: पुरातन पुस्तके, विशेष करून बायबल घाईघाईने वाचण्यासाठी नव्हते. सावकाश व पुन्हापुन्हा वाचा. देव, त्याचे जग, त्याचा गौरव, त्याचा पुत्र यांचा आनंद घेण्याची इच्छा बाळगा.

प्रभातेसाठी युद्धाच्या मन:स्थितीत येऊ नका. देवाच्या वचनाकडे मेजवानीसाठी या आणि तृप्त व्हा. पण हे युद्धापेक्षा कमी नाही हे समजून घ्या. सैतानाची सर्वसामान्य धोरणे समजून घ्या व मेजवानीचे रक्षण करा.

Previous Article

ख्रिस्ताला समर्पण करण्याची मला भीती वाटते

Next Article

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

You might be interested in …

मला आजच्या साठी उठव

स्कॉट हबर्ड आपल्यातले कित्येक जण गडद तपकिरी छटांच्या जगातून चालतात. कदाचित एके काळी तुमचे जीवन सुस्पष्ट होते. तुम्ही झोपी जायचा आणि कधी उठतो असं वाटायचं. तुम्हाला तुमचे काम फार प्रिय होतं, किंवा तुमचा विवाह ठरला […]

मौल्यवान क्षण तुम्हाला ओलांडून जाऊ देत लेखक : जॉर्ज मोर्स

आम्ही एकटेच बसलो होतो, कित्येक मैल दूरवर कोणीच  दिसत नव्हते. शिखराच्या टोकावरून पलीकडे ‘लेक सुपीरियर’ हे तळे दिसत होते व त्याच्या लाटा खडकांवर आदळत होत्या. एकटेपणाच्या ताज्या हवेचा श्वास आम्ही घेतला. मित्रांबरोबर इथून तिथे फिरल्याचे […]

जे केवळ दु:खच बोलू शकते वनिथा रिस्नर

दु:खाइतके दुसरे काहीही आपले लक्ष वेधून घेऊ शकत नाही. वेदनेकडे दुर्लक्ष करणे कठीण असते – फक्त ते सहन करणाऱ्यांसाठी नाही तर ते पाहणाऱ्यांसाठी सुद्धा. आपले डोळे आणि ह्रदय आपोआपच दु:खासाठी स्वत:ला बंद करून घेतात. ख्रिस्ती […]