दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देव सर्वाचा  उपयोग करतो

वनिथा रिस्नर

काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने विचार न करता असे काही उद्गार काढले की त्यांमुळे मी दुखावली गेले. माझा पहिला प्रतिसाद म्हणजे मी  अस्वस्थ झाले.  नंतर मी मनामध्ये तिच्याबद्दलच्या तक्रारींचा मनातला मनात पाढा वाचू लागले – इतर ज्या ज्या वेळी तिने मला दुखावले होते त्याची आठवण करत.

हे कदाचित तिथेच थांबले असते. पण मी ए. डब्लू टोझरचे हे शब्द वाचले आणि मग त्या परिस्थितीविषयी वेगळा विचार करू लागले: “मला जे काही होते ते मला ख्रिस्तासारखे अधिक बनवण्यासाठी असते, हे जेव्हा मला समजते तेव्हा माझी काळजी मोठ्या प्रमाणात निवारली जाते.”
जे काही माझ्या बाबतीत घडते ते मला ख्रिस्तासारखे अधिक बनवण्यासाठी असते. त्यामध्ये कोणतीच गोष्ट वगळता येत नाही. आनंद आणि दु:ख. शांती आणि गोंधळ. पूर्णता आणि रितेपण.  दु;ख आणि स्वास्थ्य.  माझ्यावर प्रेम करून काळजी घेणारे लोक किंवा मला दुखवणारे व टाळणारे लोक.

देव प्रत्येक तपशील ताब्यात ठेवतो

देव प्रत्येक बाबीचा उपयोग मला अधिक ख्रिस्तासारखे बनवण्यासाठी वापरतो याची जाणीव माझी चिंता कमी करते. माझे संघर्ष हे ख्रिस्तामध्ये देवाची दंडाज्ञा नाही (रोम ८:१). देव हा नेहमी माझ्या बाजूचा आहे (रोम ८:३२), माझ्या सर्व परिस्थितीची तो माझ्या अनंतकालिक कल्याणासाठी रचना करतो (रोम ८:२८). माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट मला ख्रिस्ताकडे नेते. आणि असेच व्हायला हवे.

अचानक मी माझ्या मैत्रिणीच्या टीकेबद्दल चिडचिड करणे थांबवले आणि विचार करू लागले. ही परिस्थिती देवाने माझ्या जीवनात का आणली असावी? हा साधा प्रश्न होता. पण त्याच्या उत्तराने तिच्यापेक्षा माझेच ह्रदय उघडे केले गेले. माझ्या मैत्रिणीची कृती ही माझ्या जीवनातील पापाचा एक स्तर दाखवण्याचा देवाचा मार्ग होता. जो मी कदाचित पाहिलाही नसता. जेव्हा  माझ्या प्रतिसादामध्ये मला पाप  दिसले तेव्हा मी ते देवाजवळ पश्चात्ताप करून कबूल करू शकले.

जेव्हा जेव्हा मला राग येतो किंवा हताश वाटते, चीड येते तेव्हा तेव्हा देव मला बाहेर लक्ष देण्याऐवजी माझ्या स्वत:च्या अंत:करणाचे परीक्षण करण्यास बोलावतो.  कदाचित माझी चिडचिड हे देवाकडून आमंत्रण असते जे मला त्याच्याबरोबर खोल जायला लावते. मला जे काही होत आहे त्यापेक्षा देव माझ्यामध्ये अधिक महत्त्वाचे आणि आणि टिकणारे असे काहीतरी घडवत आहे.

जे काही माझ्या मार्गात येते त्यावर देवाचा ताबा असल्याने कोणताही अनुभव हा कधीच वाया जात नाही. त्या सर्वाचा उपयोग मला ख्रिस्ताकडे वळवण्यासाठी होतो कारण अखेरीस तो सर्व गोष्टी आपल्या कल्याणासाठी करतो. माझ्या कठीण परिस्थिती ह्या ख्रिस्तावरचे माझे अवलंबून असणे वाढवतात. अधिक  कळकळीने प्रार्थना करायला शिकवतात.  मला सेवेसाठी संधी देतात. माझे यश हे मला देवाची स्तुती व आभार मानायला शिकवते. त्याला गौरव द्यायला शिकवते. माझ्या गर्वाचे पाप पाहून ते कबूल करायला शिकवते. प्रसिद्धीमध्ये सुद्धा खालचे स्थान घेऊन नम्रता शिकवते. प्रत्येक गोष्ट ही पवित्र होण्यासाठी एक एक पायरी असते.

तुमच्या परीक्षेच्या पराकाष्ठेच्या वेळी आशीर्वादित

एखाद्या मैत्रीणीच्या अविचारामुळे दु:खी होणे ह्याची जोडीदाराने दगा देणे किंवा एखाद्या कमजोर करणाऱ्या आजाराला तोंड देणे  याच्याशी तुलनाही होऊ शकत नाही.  मी या तिन्ही परीक्षांना तोंड दिले आहे आणि साक्ष देऊ शकते की देवाने अश्रूंतून का असेना पण या प्रत्येकाचा उपयोग मला त्याच्याजवळ ओढण्यासाठी केला. आणि जशी मी त्याच्या जवळ जाते आणि प्रभूच्या कवेत शिरते तशी मी अधिक त्याच्या पुत्रासारखी बनते.

युजीन पीटरसन यांनी मत्तय ५:३- ४ वर केलेले स्पष्टीकरण हे विचार सुंदरतेने मांडते: “ जेव्हा तुमच्या  परीक्षेची पराकाष्ठा होत असते तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्ही कमी आणि कमी होत असताना देव आणि त्याचा अधिकार अधिक असतो. जेव्हा तुम्हाला सर्वात प्रिय ते तुम्ही गमावले आहे असे जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. अगदी अशाच वेळी तुमचा सर्वात प्रिय असणारा प्रभू तुम्हाला जवळ घेतो.”

जेव्हा तुमच्या  परीक्षेची पराकाष्ठा होत असते तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. तुम्हाला सर्वात प्रिय ते तुम्ही गमावले आहे असे जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. जगाच्या दृष्टीने हे वेडेपणाचे वाटते. हे जगाच्या आशीर्वादाच्या व्याख्येच्या अगदी विरुद्ध  आहे. जगासाठी आशीर्वादित असणे म्हणजे तुम्हाला जे  काही हवे ते मिळणे आणि अधिक मिळणे. तुमची स्वप्ने पुरी होणे. त्यामध्ये परीक्षेची पराकाष्ठा आणि प्रिय असणे ते गमावणे येत नाही.

पण देवाच्या अर्थशास्त्रात आशीर्वादित होणे याला नवा अर्थ दिला जातो. जेव्हा आपल्याला मानवी साधने नसतात तेव्हा आपण आशीर्वादित असतो. जेव्हा आपल्याला कुठे आणि कोणाकडेच वळता येत नाही, जेव्हा काहीच सुरळीत चालत नसते, तेव्हाच आपल्या जीवनात देव आणि त्याचा अधिकार वाढू लागतो. आपण कमी होत जातो आणि देव अधिक होत जातो. जेव्हा जगामध्ये आपल्याला जे सर्वांत प्रिय आहे ते आपण गमावतो तेव्हा आपल्या स्वर्गीय पित्याची जवळीक आपल्याला अधिक किंमती वाटू लागते. त्याची जवळीक ही आपण गमावलेल्या कशापेक्षाही अधिक प्रिय, अधिक किंमती, अधिक सुंदर असते.

त्याचा प्रेमळ हात पहा

१७ व्या  शतकातील मॅडम गियॉन ह्या फ्रेंच लेखिकेला कठीण आयुष्याला तोंड द्यावे लागले ज्यामध्ये आजार, दुर्लक्ष आणि मानहानी होती. १६व्या वर्षी तिच्या पित्याने तिला तिच्याहून २२ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या आणि संधिवाताचा व्याधी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह करण्यास भाग पाडले. ती त्याची नर्स बनली आणि सासूच्या घरी अथकपणे त्याची शुश्रुषा करू लागली. तिची सासू सतत तिच्याविरुद्ध खोट्या कंड्या पिटीत असे.

गियॉनची प्रार्थना तिचा देवावरचा खोल विश्वास व भरवसा प्रगट करते. ती लिहिते, “माझ्या देवा, मला विवाह न करता तुझी सेवा करायची होती पण तू माझ्या पित्याला मला फसवण्यास मुभा  दिली. माझ्या देवा, तू माझ्या सासूला माझ्याविरुद्ध त्या लबाड्या पसरवण्यास मुभा दिली यासाठी की मी तुझ्याकडे नम्रतेने वळावे व तू माझ्यावर किती प्रीती करतोस हे मला दिसावे.”

तिला ज्या यातना झाल्या त्यामुळे कटू न होता, देवाच्या चांगुलपणाला प्रश्न न विचारता तिने त्यामध्ये देवाचा प्रीतीचा हात पाहण्याचे निवडले. आणि तिच्या सर्व परिस्थिती या देवाजवळ जाण्याच्या संधी म्हणून पाहिले. ती देवावर पूर्णपणे भरवसा ठेवण्यास आणि त्याला सर्व समर्पण करण्यास तयार होती.

सर्व काही त्याचे सेवक

स्तोत्र ११९: ९०-९१ म्हणते, “तुझी सत्यता पिढ्यानपिढ्या आहे; तू पृथ्वी स्थापली व ती तशीच कायम आहे.  तुझ्या निर्णयांविषयी म्हणावे तर ते आजपर्यंत टिकून आहेत, कारण सर्व पदार्थ तुझे सेवक आहेत.”            
सर्व गोष्टी देवाचे सेवक आहेत. सर्व गोष्टींचा देव आपला चांगला हेतू पूर्ण करण्यासाठी उपयोग करू शकतो आणि करील. त्यामुळे  सार्वकालिक आनंद आणि त्याच्या लोकांचे गौरव होईल.

आपण ज्याला ज्याला तोंड देतो ते आपल्याला अधिक पवित्र करू शकते. आपला राग आपले आपले पाप प्रकट करू शकतो. जे लोक आपल्याला दुखावतात ते आपल्याला क्षमा करण्यासाठी संधी देतात. आपले शारीरिक आजार आपल्याला देवावर अवलंबून राहायला शिकवतात. आपली बंडखोर मुले आपल्याला निरंतर प्रार्थना करण्यास शिकवतात. आपल्या जीवनात जे काही कठीण आणि चुकीचे वाटते हे आपण देवाकडे वळावे म्हणून त्याने दिलेले आमंत्रण आहे.

अशा दृष्टिकोनाने पूर्णपणे जगण्यासाठी आपण प्रत्येक क्षणासाठी हजर असण्याची गरज आहे. देव आपल्याला काय दाखवत आहे हे शोधण्याची गरज आहे. देव आपल्या जीवनात नेहमीच कार्यरत आहे व प्रत्येक परिस्थिती आपल्याला त्याच्याजवळ नेण्यासाठी आहे असा भरवसा ठेवण्याची गरज आहे.

Previous Article

कमकुवतपणाशी युद्ध थांबवा

Next Article

ईयोब -धडा २ रा

You might be interested in …

 ख्रिस्तजन्माचा सण: यशया ५३:२

“ तो त्यांजपुढे रोप्यासारखा, रुक्ष भूमितील अंकुरासारखा वाढला”  (यशया ५३:२). जगाच्या आणीबाणीच्या जागतिक परिस्थितीसाठी, देवाच्या चुकलेल्या मंडळीसाठी देवाच्या अद्वितीय वचनात, बायबलमध्ये अगदी अनुरूप असा प्रभूच्या दु:खाचा, अपमानाचा, गरीबीचा, निरोप सर्वत्र पेरलेला आहे. वरील प्रतीक यशयाच्या […]

त्याने एकाकरता सर्वस्व विकले डेविड मॅथिस

येशूने एका माणसाबद्दल एका वाक्याचा दाखला सांगितला की “त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले.” तो एक व्यापारी होता. त्याला इतके मौल्यवान काही सापडले की त्याला प्रिय वाटणाऱ्या सर्व खजिन्यापेक्षा ते सरस होते. “स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा […]

आपला मृत्यू पुढे ठेपला असता कसे जगावे

वनिथा रिस्नर आपण लवकरच मरणार आहोत हे ठाऊक असताना आपण कसे जगावे? अर्थातच आपल्या सर्वांना ठाऊक आहे की एक दिवस आपण मरणार आहोत. पण आपल्याला लवकरच मरण येणार आहे – आपल्याला जर काही आठवडे, महिने […]