मार्च 6, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

विश्वासाला आव्हाने?

 सॅमी विल्यम्स

धडा ३ रा                                       

ईयोब १:६-१२                                               

जुना करार ही ख्रिस्ताची सावली आहे तर नवा करार आपल्याला ख्रिस्त उघडपणे दाखवतो. कळसाचे अंतिम दु:ख सहन करणारी पवित्र व्यक्ती ख्रिस्त आहे. ईयोब हा दु:ख सहन करणारा असून तो एक पवित्र संत असूनही अखेर शंका घेतो. सैतान नव्हे तर देव त्याच्यावर परीक्षा पाठवतो. रानात परीक्षा व्हावी म्हणून कोणाला पाठवले होते? मत्तय ४: १-११ नुसार सैतानाकडून त्याची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला रानात नेले असे आपण वाचतो. येशूची परीक्षा होणार होती पण तो अखेर पापरहितच राहणार होता.                                                                             

या वचनांमध्ये आपण स्वर्गातील देखावा पहात आहोत. तेथे न्यायालय उघडले असून न्यायदरबार भरला आहे, आणि न्यायाधीश यहोवा देव न्यायासनावर आसनस्थ आहे. तेथे देवकुमार देवासमोर जमले आहेत. त्यांच्यात एक नावडती व्यक्ती सैतानही आहे. हा काय करत आहे तिथे? देवाशी संवाद करत आहे. तो तेथे येण्यास अपात्र आहे, पण त्याला तेथे येण्याची परवानगी आहे. पण तो देवाशी बरोबरी करू शकत नाही. तो देवाच्या परवानगीशिवाय बोलू शकत नाही. देव त्याला बोलते करतो. ईयोबाला हात लावायची  सैतानाची ताकद नाही. देवाचे सैतानावर नियंत्रण आहे. देव अधर्मावरही नियंत्रण ठेवतो.         

देव तीन प्रकारे नियंत्रण करतो असे येथे आढळते.

पहिले – सैतानावर नियंत्रण.  वचन ६-७

अ. कोर्टाचा  दरबार देवाने ठरवलेल्या एका वेळी भरतो असे आढळते. हे देवकुमार म्हणजे देवपुत्र कोण आहेत? वचनातच ईयोब ३८:७ मध्ये याचे उत्तर सापडते. हे निर्मितीचे वर्णन आहे. अजून मानव निर्मिलेला नाही. तेव्हा हे कोण गाऊन जयजयकार करतात? हे सैतानाच्या पतनापूर्वीचे सर्व पवित्र देवदूत गीत गात आहेत. मानवाच्या निर्मितीपूर्वी देवदूतांची निर्मिती झाली आहे व सैतानाचे पतन मानवाच्या पतनापूर्वी झाले आहे हे स्पष्ट होते. देवाच्या देवदूतांचे शिस्तबद्ध सैन्य आपापल्या पदाप्रमाणे सरसेनापती, सेनापती…अशा क्रमाने या दरबारात त्याच्यासमोर सादर होतात असे दिसते. यहोशवा २४:१ मध्ये आपल्या शिस्तबद्ध देवाचे लोक देखील सैन्याप्रमाणे त्याच्यासमोर कसे सादर होत असत पहा. याप्रमाणे देवदूत आपापल्या कामाचा देवासमोर वरचेवर अहवाल देत असतात. आणि पुढच्या कामाच्या आज्ञा घेत असतात. पूर्वी सैतान त्यांच्यात होता आणि येथेही त्यांच्यात सामील व्हायला देवाच्या परवानगीने तो हजर आहे. शत्रूला या सभेसाठी देवाने बोलावलेले आहे. नावासह त्याची नोंद आहे. सैतान अजून नरकात नाही. नरकावरही देवच नियंत्रक सेनापती आहे. आणि सैतान हा त्याच्या शत्रूंवर दोषारोप करायला तेथे आहे. कोणाविरुद्ध तो आरोप करतो? देवाच्या बंधुजनांवर. पुराव्यादाखल तो आरोप करतो. जखऱ्या ३:१ मध्ये तो मुख्य याजकावर आरोप करतो व प्रकटी.१२:१० मध्ये तो बंधुजनांवर आरोप करतो. हे त्याचे कामच आहे. येशू पेत्राला सावध करत म्हणाला होता, “शिमोना, शिमोना, तुला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने तुला मागितले. पण मी तुझ्यासाठी विनवणी केली.” स्वर्गीय न्यायालयात देवाच्या लोकांवर आरोप करण्यासाठी तो हजर असतो. देव त्याच्या स्वत:च्या गौरवार्थ त्याला तेथे येण्याची परवानगी देतो.

वचन ७ अ – यहोवा सैतान व अधर्मावरही नियंत्रक आहे, सैतान नाही. देवासमोर बोलायचीही सैतानाला हिम्मत व कुवतही नाही. देवच त्याला बोलते करतो हे लक्षात घ्या. अशुद्ध आत्मेही देवापुढे थरथर कापतात. येथे देव बोलतो व त्याच्या परवानगीमुळेच सैतान प्रत्युत्तर देतो. आजही सैतान देवाच्या लोकांना त्रस्त करत असतो. ज्या मार्टिन लूथरने सत्यासाठी लढा दिला त्याला कॅथोलिक धर्मपुढार्यांना ९५ प्रबंध लिहून विश्वासाचे समर्थन केल्याबद्दल तीन वर्षे तुरुंगवास घडला. तेव्हा एकटे राहून, काही सहभागिता नसता त्याने विश्वासात डळमळ, निराशा, दडपण अशा अनेक गोष्टींशी सैतानाला कटू लढा दिला.                                                                                                    

ब – दुहेरी ईश्वरज्ञान

ते सांगते की जगात बरे, वाईट दोन्ही आहे, कधी बऱ्याचा तर कधी वाईटाचा जय होतो. याला बायबल नकार देते. बऱ्याचाच, सत्याचाच, देवाचाच विजय खात्रीचा आहे. सैतानाला शत्रुंचा प्रमुख अधिकारी म्हणून देवाने जगात राहू दिले आहे. त्याचे स्थान ना जगात ना स्वर्गात आहे, त्याचे स्थान मध्येच अंतराळात आहे म्हणून त्याला अंतरिक्षाचा अधिपती म्हटले आहे; इफिस ६:१२. देव वाईटाचा उगम नाही पण त्याच्या गौरवार्थ तो वाईट, संकटे, परीक्षा, क्लेश ही घडू देतो; याकोब १:१३. देव बऱ्यावाईटावर नियंत्रक व सार्वभौम आहे. काही क्रोधाची पात्रे त्याने आपल्या गौरवार्थ निवडली आहेत.  वाईट घडले की आपण म्हणतो सैतानामुळे घडले. म्हणून वाईटाचा नियंत्रक सैतान व चांगल्याचा नियंत्रक  देव आहे असे म्हणतो. पण असे नसून बरे व वाईट दोन्हींचा नियंत्रक देव आहे.                          

दुसरे- देवाचे त्याच्या लोकांवर नियंत्रण आहे. वचन ७ १०

सैतानाला देव प्रश्न करतो, मग तो उत्तर देतो. येथे काय दिसते? तो भटका आहे. निर्हेतुक, उद्देशहीन आहे.  पण नाही. तोही कामात व्यस्त असतो. तो विशेष इच्छेने फिरत असतो. रमत गमत जात नसतो. १ पेत्र ५:८. वचन ८ मध्ये यहोवा त्याला आव्हान देतो  व ईयोबाकडे पहायला लावतो. तू देवाच्या लोकांवर पाळत ठेवतोस ना? मग ईयोबावर तुझे लक्ष गेले का? त्याचा कधी विचार केलास का? देव हे दाखवत आहे की, माझा ईयोब तुझ्यापुढे पतन पावणार नाही. ईयोब त्याच्या फासात अडकणार नाही. ही देवाला खात्री आहे. अविश्वासी तर सैतानाचे आहेतच. तो विश्वासीयांना लज्जित करायला टपलाय. देव त्याच्या लोकांविषयी खात्री बाळगतो व त्यांना कसोटीमधून जाऊ देतो आणि सांभाळतो. कारण त्यांच्या मध्ये जे चांगले काम त्याने सुरू केले आहे ते तोच पूर्ण करणार. जे देवाशी विश्वासू आहेत त्यांना सैतान चाळायला, ढवळायला पहातो. सैतान कुटुंबात पण फूट पाडतो. (म्हणून पत्नीने पतीला एकटे सोडायचे नाही.) सैतानाची पाशरूप पद्धत आपल्याला अडकवणारी आहे. आमचे तारण प्रभूवर अवलंबून आहे हे किती उत्तम आहे! देव ईयोबाचे वर्णन कसे करतो? ‘माझा सेवक.’ म्हणजे देवाला प्रभू, मालक म्हणून तो त्याच्यावर अवलंबून व अधीन राहाणारा, सात्विक, सरळ, देवाला भिऊन व पापापासून दूर रहाणारा आहे. त्याच्या तोडीचा जगात कोणी नाही. अशा लोकांना सैतान कसोटीस लावून परीक्षा घेतो. तारणानंतर आपल्यामध्ये देवाचे प्रभुत्व चालते आणि आपण फक्त त्याचे दास, गुलाम आहोत. आपण त्याला फक्त आपले पाप द्यायचे, तो आपल्यासाठी सर्वकाही करतो. हे पुस्तक देवाच्या शत्रूंची शिकवण देत नाही तर देवाच्या सेवकांचे दु:खसहन शिकवते. ईयोब आपल्या मुलांसाठी कित्तादाखल यज्ञार्पणाचे जीवन जगत होता. देव अविश्वासीयांपेक्षा विश्वासीयांवर अधिक दु:खे पाठवतो.

वचन ९-१० देव आपल्या अंत:करणावर सार्वभौम आहे.                                             

अ- सैतानाचा आरोप आहे की देवाने ईयोबाला आशीर्वादित केले म्हणून तो देवावर प्रेम करतो. इब्री ११ मध्ये अशा विश्वासवीरांची यादी आहे की ज्यांचे आशीर्वाद दूर केले तरी तेव्हाही त्यांनी देवाची स्तुती केली. हे पुस्तक काय दाखवते? देवाच्या लोकांचा विश्वास ऐहिक आशीर्वादांसाठी नसून त्याहून विशेष खोल, श्रेष्ठ आहे.                                                                               

ब- वचन १० मध्ये तो दोन कारणे देतो.
१- त्याच्याभोवती तू कुंपण केले आहे.   २- तू त्याला संपन्न केले आहेस.
सैतानाचे हे आरोप योग्य आहेत का? ईयोब तर म्हणाला “मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे; परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम!” (१:२१) असा खडकासारखा स्तुती गायन करायला लावणारा अढळ विश्वास देव देतो. सर्व गमावले असता तो स्तवन करतो. जे माझे आहे ते सर्व देवाचे आहे, म्हणून ते गमावले तरी मी त्याचे सौंदर्य अधिक पहाणार, त्याच्यावर प्रेम करणार. हे मान्य करा की:

१- जे माझे आहे ते सर्व देवाचे आहे. २- ज्याची मला गरज आहे ते देवाचे आहे. ३- तो माझ्यासाठी पुरेसा आहे.                                                    

तिसरे-  देवाचे दु:खसहनावर नियंत्रण आहे.  (वचन ११-१२)                                                

सैतान देवाची परवानगी घेतो. देव त्याला सांगतो, की त्याच्या सर्वस्वाला हात लाव पण त्याला काही करू नको. देव पाप करायला भाग पाडत नसतो. पण संकटे आपत्ती, विपत्ती, दु:ख, परीक्षा कसोट्या त्याच्या परवानगीशिवाय येत नाहीत. विलापगीत ३;३८. इष्ट, अनिष्ट सर्व देवापासून येतात, सैतान त्याशिवाय ती आणू शकत नाही. देव अशा विनंत्या करायला त्याला परवानगी देतो. १ पेत्र १:६-७; त्यावरून आपला विश्वास सिद्ध होतो. देवाचे स्तवन व गौरव होते. छळातून गेलेले लोकच अधिक फलद्रूप होतात.          

वचन १२ पहा – जगात दोन स्तरांवर घटना घडत असतात.
१- प्रत्यक्ष बाह्य कारणामुळे २- देवाच्या संमतीच्या कारणामुळे.

येशूला कोणी मारले? प्रत्यक्षात त्याला पिलाताने, रोमी लोकांनी, मुख्य याजक, धर्मपुढारी, यहुद्यांनी मारले. त्यासाठी ते जबाबदार आहेतच. पण प्रे.कृ २:२३ नुसार देवाच्या युगारंभापूर्वीच्या पूर्वयोजनेनुसार तो स्वत:हून त्यांच्या स्वाधीन झाल्यावरच ते त्याला मारू शकले.                    
देवाच्या सार्वभौमत्वाने देव सैतानाला मर्यादा घालतो. त्याला जेवढी परवानगी मिळते तेवढेच तो करतो. देव इजा करण्यापासून त्याला आवरतो, आणि कितीही आपत्ती आल्या तरी देव त्यातून आपल्याला सांभाळतो.                                                                               
विश्वासी व्यक्ती  अशुद्ध आत्म्याने झपाटली जाते का? नाही. ते विश्वासीयाच्या जीवनात प्रवेशच करू शकत नाहीत. येशू आपल्या जीवनाचा प्रभू असल्यावर आपण सुरक्षित असतो. आपल्याला भुताशी बोलण्याची गरज नाही. त्यांच्यावर नियंत्रण असणाऱ्या देवाशी आपण बोलावे.

                                                  

Previous Article

त्याने एकाकरता सर्वस्व विकले

Next Article

ख्रिस्ती लोक कोणत्या भावी  न्यायाला तोंड देतील?

You might be interested in …

तुमचे भटकणारे अंत:करण उपकारस्तुतीने भरून टाका जॉन ब्लूम

वासनेपेक्षा समर्थ काय हे ठाऊक आहे? उपकारस्तुती. हे स्पष्ट करण्यापूर्वी मला त्याचे उदाहरण देऊ द्या. जेव्हा पोटीफराच्या बायकोने योसेफाला भुरळ घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या कृतीला तो का बळी पडला नाही? तो स्पष्ट करतो, “हे […]

एक गोष्ट तुम्ही कधीही गमावू नका

जॉन ब्लूम देवाने तुम्हाला सर्वात प्रथम जबाबदारी दिली आहे ती म्हणजे तुम्ही दक्ष कारभारी असावे. यामध्ये सर्व गोष्टींहून अधिक राखायची एक प्रमुख बाब आहे. तुमच्या जीवनातील इतर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. ती म्हणजे: तुमचा जीव […]