डेव्हीड मॅथिस
बेथलेहेम हे परिपूर्ण शहर ठरणार होते.
प्राचीन इस्राएलमध्ये या शांत पण आशादायक जन्मासाठी यापेक्षा चांगले स्थान नव्हते. हा राजेशाही वारस, एका दुर्लक्षित गावात वाढणार होता पण राजधानीत मरणार होता.
तसे हे छोटे शहर फार महान नव्हते. ते भव्य यरुशलेमासारखे नव्हते तर नाझरेथ गावासारखे होते. परंतु बेथलेहेम त्याच्या क्षमतेसाठी प्रतिष्ठित होते – दाविदाचे नगर – सिंहासनावर बसण्यापूर्वी आणि राजांचे शहर स्थापन करण्यापूर्वी, याच ठिकाणी हा इस्राएलचा सर्वात महान राजा जन्मला आणि वाढला.
यरुशलेमाच्या वैभवापेक्षा किंवा अगदीच नगण्य नाझरेथपेक्षा, बेथलेहेमाचे वैभव झाकलेले होते. येशूच्या जन्माचा दिवसही असाच होता. सर्वांना दिसणारे, हे नवजात सामान्य बालक होते, अगदी या जगाचेच – बाळंत्याच्या कपड्यांमध्ये गुंडाळलेले होते आणि आसपास गोठ्यातील जनावरे चरत असलेल्या ठिकाणी ठेवले होते. तसेच त्याचे पहिले पाहुणे देखील साधे आणि गावंढळ होते: रात्रीच्या वेळी पहारा देणारे मेंढपाळ.
तरीही स्वर्गातील भव्य सैन्य या जन्माची घोषणा करण्यासाठी आली होती. काहीतरी भव्य लवकरच घडणार होते – पण नम्रपणे, हळूहळू, धीराने. त्यासाठी यरुशलेमसारख्या मोठ्या शहराला तीन दशकांहून अधिक काळ दूर वाट पहावी लागणार होती.
बेथलेहेम: वैभवापासून ते शून्यापर्यंत
ख्रिस्तजन्म म्हणजे स्वर्गाचे वैभव “सोडून” येणाऱ्या शाश्वत दैवी पुत्राचे प्रकट होणे. हे सत्य आहे की, तो स्वर्ग न सोडता पृथ्वीवर आला, कारण त्याने देव राहण्याचे थांबवले नाही; त्याचवेळी त्याने आपल्या मानवतेला स्वतःकडे घेतले. “तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले” आणि त्या बेथलेहेमात “मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले” (फिलिप्पै. २:६-७). त्याने देवत्व गमावून नव्हे तर आपली मानवता स्वीकारून “स्वतःला रिकामे केले.” आणि तो केवळ जन्मतःच बेथलेहेमच्या झाकून टाकलेल्या वैभवात उतरला नाही, तर नासरेथमधील त्याच्या बालपणात आणखी खालच्या पातळीवर उतरला.
यशयाने सात शतकांपूर्वी भाकीत केल्याप्रमाणे,
“कारण तो त्याच्यापुढे रोपासारखा, रुक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला; त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते” (यशया ५३:२).
“सोंदर्य नव्हते” याचा अर्थ असा नाही की तो अगदी कुरूप होता – त्यामुळे देखील चुकीचे लक्ष वेधू शकले जाते – परंतु तो अगदी सामान्य होता – “त्याच्याकडे पाहिले तर त्याला कोणतेही रूप किंवा वैभव नव्हते.” तो काही सौंदर्याचा पुतळा नव्हता, इतका देखणा नव्हता की तो सर्वात उठून दिसेल आणि लक्ष वेधून घेईल.
त्याने मानवतेने आपले दैवी वैभव झाकून टाकले. तो आपल्यामध्ये, आपल्यापैकी एक म्हणून, तीन दशकांहून अधिक काळ ज्यामध्ये काही “वैभव नाही” अशा सामान्य मानवतेत राहिला.
गालील: मानवाद्वारे वैभव
अनेक दशके अस्पष्टतेत राहिल्यानंतर, येशू तिशीमध्ये आल्यावर लोकांचा शिक्षक आणि मानवांना शिष्य बनवणारा असा “प्रसिद्धीस आला.” त्याचे अनुसरण करणारे त्याच्या सौंदर्यामुळे, संपत्तीमुळे किंवा राजकीय शक्तीमुळे त्याच्या मागे जात नव्हते, तर ते त्याच्या असाधारण शब्दांनी आणि देवाला गौरव देण्यासाठी त्याने केलेल्या चमत्कारांनी जिंकले गेले होते. म्हणून लूक ९:४२-४३ मध्ये असे म्हटले आहे, “तो जवळ येत आहे इतक्यात भुताने त्याला आपटले व पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले; आणि मुलाला बरे करून त्याच्या बापाजवळ परत दिले. देवाचे हे महान सामर्थ्य (वैभव) पाहून सर्व लोक थक्क झाले.”
अशा परिस्थितीत त्याचे शब्द इतके स्पष्ट होते आणि त्याचे वागणे इतके नम्र होते की, त्याच्या स्वतःच्या नव्हे तर देवाच्या वैभवाने लोकांना आश्चर्यचकित केले, हे किती आश्चर्यकारक आहे. वैभव हेच करते: ते आश्चर्यचकित करते, ते थक्क करते, ते भारून टाकते. ते विस्मय निर्माण करते आणि मानवी अंतःकरणाला चकित करते. ते अशा प्रकारच्या वैभवाचे चित्रण करते की जे उपासनेस पात्र आहे (प्रेषित. १९:२७). जरी येशू स्वतः इतका स्पष्ट, इतका सामान्य, इतका मानवी होता; तरी कोणीही या माणसासारखे बोलले नाही (योहान ७:४६), आणि तो जे करू शकत होता ते केले नाही (योहान ९:३२). तरीही त्याने नेहमीच वर पाहिले आणि स्वर्गाकडे बोट दाखवले. जेव्हा लोक त्याच्यामुळे विस्मित झाले आणि त्याची अस्वस्थ करणारी सामान्यता त्यांनी पाहिली, तेव्हा ते देवाच्या वैभवाने चकित झाले.
डोंगरावर: मानवातील वैभव
जमावाने त्याच्याद्वारे पाहिलेले दैवी वैभव लवकरच त्याच्या शिष्यांना त्याच्यामध्ये दिसणार होते. पेत्र, याकोब आणि योहान यांच्या त्याच्या आतील वर्तुळाला; त्याच्या येणाऱ्या उघड वैभवाची पहिली झलक वेळेआधीच पाहायला मिळणार होती.
पर्वतावर त्याच्या “रूपांतराच्या” वेळी, पित्याने त्यांना येणारे वैभव दाखवले, जे येशूच्या देहस्वरूपाच्या काळात त्याच्या नम्र स्थितीत झाकले गेले होते. नंतर पेत्र त्यांनी पाहिलेल्या दृश्याबद्दल सांगणार होता. विशेषतः याकोब आणि योहान यांच्याबद्दल बोलताना तो लिहितो, “कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथांना अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व आगमन ह्यांसंबंधाने तुम्हांला कळवले असे नाही; तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाला; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली ” (२ पेत्र १:१६-१८).
पेत्राला त्या तिघांपैकी एक होण्याचा बहुमान मिळाला ज्यांनी त्याच्या वैभवाचे – म्हणजेच येशूचे स्वतःचे दैवी-मानवी वैभव जे वधस्तंभाच्या पलीकडे सुरक्षित आणि प्रकट होणार होते – ते आधीच पाहिले. त्याच्या पुनरुत्थित, गौरवशाली स्थितीत हा देव-मानव, जो सर्व अनंतकाळापासून दैव होता, आणि आता कायमचा पूर्णपणे मानवरूपात आहे – तो त्याच्या अतुलनीय मानवी वैभवात येईल. जो अनंतकाळापासून दैवी वैभवात सहभागी होता (स्वर्गात) आणि त्याच्या अपमानास्पद अवस्थेत (बेथलेहेम आणि नाझरेथ) ज्याने मानवात नसलेले वैभव स्वीकारले आणि दैवी वैभवाकडे (गालील) निर्देश केला, तो लवकरच यरुशलेममध्ये दैवी वैभवाने चमकणार होता आणि कायमचा दैवी वैभवाचा पुरुष होणार होता (नवीन यरुशलेम).
यरुशलेम: वधस्तंभावरील वैभव
त्या रूपांतराच्या वेळी, त्याच्यापुढे अजूनही समोर असलेली गोष्ट म्हणजे वधस्तंभ – जो निंदनीय आणि वैभवशाली, भयानक आणि अद्भुत असा होता. येथे यरुशलेममध्ये, त्याचे शेवटचे आणि पराकाष्ठेचे मानहानीचे कृत्य देखील कालांतराने, त्याला उंचावणारे आणि विश्वव्यापी वैभवाचे पहिले महान कृत्य असल्याचे सिद्ध होणार होते. जसे तो योहान १२:३१-३२ मध्ये म्हणतो, पवित्र शहरात पोहोचल्यानंतर, वधस्तंभाच्या जवळ येत असताना,
“आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल; आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.”
योहान पुढे म्हणतो की “येशूने आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवण्याकरता तो असे बोलला” (योहान १२:३३). त्याला वधस्तंभावर उंचावणे हे त्याचे स्वत:ला नम्र करण्याचे, शेवटचे महान कृत्य असणार होते आणि त्याच वेळी, त्याचे पहिले गौरवासाठी उंचावणे देखील असणार होते.
सीयोन: सिंहासनावरचा राजा
तीन दिवसांनंतर आच्छादन उचलण्यात आले. त्याच्या पित्याने त्याला पूर्णपणे मानवी, गौरवशाली, नवीन जीवनासाठी उठवले. त्यानंतर चाळीस दिवसांपर्यंत, त्याचे दैवी-मानवी वैभव अधिक सामर्थ्याने चमकू लागले, त्यानंतर पुन्हा वर उचलले गेले, जेथे आता तो स्वर्गात, अंतिम सन्मानाने, “उच्चस्थानी असलेल्या राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे” बसला आहे (इब्री १:३; तसेच ८:१).
त्याचे ध्येय पूर्ण झाले, पापांसाठी शुद्धीकरण पूर्ण झाले, त्याचे वैभव पूर्ण झाले: स्वर्गातून, पृथ्वीवर, नासरेथ आणि गालीलमध्ये, शेवटी यरुशलेममध्ये आणि परत स्वर्गात, तो आता एक अंतिम कृती करण्याची वाट पाहत आहे: नवीन यरुशलेम स्वर्गातून पृथ्वीवर खाली येत आहे, जिथे येशू आपल्या कल्पनेपलीकडे असलेल्या दैवी-मानवी वैभवाने राज्य करेल. मग तो शेवटी मीखा ५ मधील महान बेथलेहेम भविष्यवाणी पूर्ण करेल:
“हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे. तो परमेश्वराच्या सामर्थ्याने, आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाच्या प्रतापाने उभा राहील, तो कळप चारील; आणि ते वस्ती करतील, कारण त्याची थोरवी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पसरेल” (मीखा ५:२, ४).
मानवी आणि दैवी. तो दाविदाचा पुत्र आहे, तरीही ज्याचा उदय प्राचीन काळापासून आहे. इस्राएलमध्ये आणि सर्व राष्ट्रांवर एक राज्यकर्ता, तो सर्वशक्तिमान देवाच्या सामर्थ्याने आणि सर्वशक्तिमान देव म्हणून आणि देवाच्या स्वतःच्या नावाच्या वैभवाने सर्वांना सांभाळील. शेवटी राजा आला आहे, देवाने दिलेल्या गौरव आणि वैभवासह (स्तोत्र २१:५), मशीहा जो त्याच्या वैभवात “सत्य, नम्रता आणि नीतिमत्ता यांच्यासाठी विजयी स्वारी करतो” (स्तोत्र ४५:४).
बेथलेहेम अशा जन्मासाठी परिपूर्ण होते. शांतपणे आणि अनपेक्षितपणे जसा तो आला, तसाच ख्रिस्तजन्मदिन देखील वेळेनुसार सर्वकाही बदलेल आणि स्वर्ग आणि पृथ्वी दोन्हीची पुनर्निर्मिती करेल.
आता विश्वासाने, आपण त्याला उंचावलेले पाहतो. लवकरच आपण त्याचे पूर्ण वैभव प्रत्यक्षात पाहू.




Social