अक्टूबर 20, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

अश्लील साहित्य आणि जगासाठीचा संघर्ष

ग्रेग मोर्स

मरण्याचा तो एक दयनीय मार्ग होता. त्या दृश्याची कल्पना केल्याने वाचकाला, विशेषतः पुरुष वाचकाला, अस्वस्थ वाटते.

वेळ अत्यंत कपटीपणे आखलेली आणि पूर्णपणे फसवणुकीची होती. योजना यशस्वी झाली. बापरे, शत्रूचा नाश करण्यापूर्वी त्याला पांगळे करून निःशस्त्र करणारे याकोबाचे पुत्र किती निर्दयी होते! व्यर्थ धडपडत आणि लंगडत  फिरणाऱ्या शहरातील सर्व पुरुषांना ठार मारण्यासाठी सुडाने पेटलेले फक्त दोन पुरुष पुरे होते.

मी कल्पना करतो की पीडितांना प्रश्न पडला असेल — शत्रू असा हल्ला करूच कसा शकतो? या पुरुषांना लाज कशी वाटत नाही? आम्ही स्वतःचा बचावही करू शकत नसताना ते आमचा नाश करणार काय? आम्हाला अशा कपटी, लज्जास्पद आणि धूर्त मार्गाने संपवण्यासाठी आलेली अशीही माणसे देवाची आहेत की दानवाची?

तीन दिवसांपूर्वी शहरातील सर्व पुरुषांची सुंता झाली होती. कल्पना करा, अशा अवस्थेत असताना झालेल्या अचानक हल्ल्यामुळे त्यांना किती मोठा धक्का बसला असेल. लडखडणारे, तोल जाणारे, डगमगणारे, कोलमडणारे, वेदनेने विव्हळणारे, कौशल्य, शक्ती, आणि बळ तात्पुरते गमावलेले असे केविलवाणे पुरुष नजरेसमोर आणा.

याकोबाच्या मुलांनी हामोर आणि त्याचा मुलगा शखेम यांना वचन दिले होते. ते असे की, जर त्यांचे सर्व पुरुष इब्री करारानुसार आवश्यक असलेली सुंतेची प्रक्रिया करतील तरच, ते त्यांच्या इब्री मुलींशी विवाह करू शकतील. — विशेषतः दीना, जिच्यावर शखेमचे प्रेम जडले होते आणि जरी त्याने तिला भ्रष्ट केले होते.

शखेमने जराही कां कूं केली नाही— दीनासाठी काही पण! त्याने आंतरजातीय विवाहाद्वारे इस्राएली लोकांचे पशुधन आणि मालमत्तेचे विलोभन दाखवून सर्व पुरुषांना आपल्या बाजूला वश केले. आणि प्रत्येक पुरुषावर सुंतेचा चाकू चालला. मग ते पुरुष वेदनेने व्याकूळ असताना, शिमोन आणि लेवी यांनी त्यांच्यावर लंगड्या झेब्रांच्या कळपावर सिंहाने घालावी तशी झडप घातली.

“तिसऱ्या दिवशी, त्यांचे दुखणे वाढले, तेव्हा याकोबाचे दोन मुलगे, शिमोन आणि लेवी, दिनेचे भाऊ यांनी आपापली तलवार घेतली व नगर बेसावध असता त्यावर येऊन सर्व पुरुषांना जिवे मारले (उत्पत्ती ३४:२५).

प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते, असे म्हणतात. पण हे भीषण दृश्य त्या म्हणीला पराकोटीला पोचवते.

मी ही गोष्ट का समोर आणत आहे? कारण आज मंडळीतील अनेक पुरुषांसोबत सैतान काय करत आहे, यावर प्रकाश टाकण्यासाठी. तो त्यांच्याशी खोटे बोलतो, त्यांना नपुंसक बनवण्यासाठी, आपल्या बांधवांसाठी लढण्याची कुवत, किंवा सैतानाविरुद्धच्या युद्धात पराकोटीने लढण्याची त्यांची क्षमता खच्ची करण्यासाठी त्यांच्याच हातात सुरा दिला आहे.  निष्प्रभ, नालायक, निरुपयोगी आणि ठार मारले जाण्याच्या धोक्यात आहेत. अशा पुरुषांनी आपली कुटुंबे भरलेली आहेत.

देवाच्या माणसांना अधू करण्याचा आणि महान आज्ञेच्या प्रगतीला पंगू करण्याचे आजचे सर्वात परिणामकारी माध्यम कोणते आहे? अश्लील साहित्य.

अपात्र

जगभरात देवाचे राज्य आणि आत्म्यांसाठीच्या महान युद्धात, देवाच्या सैनिकांची एकजूट होऊ शकत नाही. घरोघरी, सैनिकागणिक, सैतान आपल्या मोठ्या योजना लपवून छुप्या सुखांचे आमिष दाखवत आहे. अश्लीलता ख्रिस्ती व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनातील एक अल्पकालीन आणि शोकजन्य पतन आहे असे मानण्याकडे आपला कल असतो.  — पण या सर्वातून आपण कशाचा संचय करतो?

 सैनिकांच्या संपूर्ण तुकड्या बाद झाल्या,  युद्धाचे प्रयत्न क्षीण झाले, कोटांवर रक्षक नाहीत आणि ते ओसाड पडले.

प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या दैनंदिन संघर्षाकडे व्यापक दृष्टीने पहा — त्याचे मोह, त्याची दैहिक वासनेची लालसा, त्याची लाज — काय दिसेल कल्पना करा. युद्धयोजनेच्या खोलीत जा, नकाशा पाहा, सैनिकांच्या तुकड्या मोजा आणि नजर फिरवा. कित्येक जण रणांगणात लढायला हजर नाहीत, कारण ते घरी अश्लील साहित्यात रममाण होऊन बसलेत. तुम्हीच  साक्ष द्या, बरेच जण महान सेवेसाठी सैनिकी पोशाखात सज्ज होऊन देवाचे वीरपुरुष म्हणून उभे राहू शकले असते, पण आता ते सामान्य नागरिकाचे कपडे घालून  बसले आहेत कारण त्यांनी देहाच्या कामवासनेचा त्याग केलेला नाही आणि ते गुप्त लज्जेच्या बेड्यांमध्ये जखडलेले आहेत. ते स्वतः शमशोनाप्रमाणे शत्रूवर चाल करून जाऊ शकले असते, पण या दलीलाने त्यांच्या केसांना आणि सामर्थ्याला कात्री लावली आहे. तिने किती जणांना शत्रूला विकले आहे?

मी हे स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे. एका अत्यंत गरजू भागात वसलेले चर्च, मदतीसाठी पुरुषांना आर्ततेने हाक मारत  असूनही, तिथे मनुष्यबळाची कमतरता कायम राहणेच जणू ठरलेले आहे. पुरुष अर्ज करतात, पण त्यांपैकी अनेकांना अश्लीलतेच्या व्यसनात सतत अपयश येते. गरजांची दखल घेणारे कोणी नाही, आत्म्यांना ख्रिस्त ऐकायला मिळतच नाही, कारण पवित्रतेच्या अभावी निकामे होऊन पुरुष घरातच बसून आहेत.

रोम १०:१४-१५ मध्ये पौलाच्या युद्धाच्या आवाहनात सैतानाचा कसा समावेश आहे ते पाहा :

“तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला ते कसे हाक मारतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही, त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणारा नसला तर ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते कसे घोषणा करतील?”

आणि जर ते कामवासनेचे गुलाम असताना त्यांना कोण पाठवील?

पुरुष, स्त्रिया आणि मुलांच्या गळ्यात फास टाकून त्यांना गुदमरवण्यात, सत्त्य माहीत नसलेल्या पिढ्यांमागून पिढ्या  देवाच्या न्यायासनासमोर आणण्यात सैतान यशस्वी होतो. कारण ज्यांना सत्य ठाऊक होते आणि जे जाऊ शकले असते, ते कधीच गेले नाहीत. का? कारण ते आपल्या अंधाऱ्या खोलीत स्वतःवर ताबा ठेवू शकले नाहीत. शखेमच्या सैनिकांप्रमाणे, त्यांनी स्वतःला नामर्द केले.

ही लढाई न जिंकल्यामुळे देवाचे किती सेवक आपल्या पदावरून गायब आहेत! किती तरी पुरुष स्थानिक मंडळीचे पाळक होऊ शकले असते किंवा सुवार्ता न पोचलेल्या दुर्गम ठिकाणी मंडळी रोपण करू शकले असते पण असे झाले नाही कारण त्यांना महत्त्वाकांक्षा नव्हती असे नाही तर या अश्लीलतेच्या युद्धात विजय न मिळवल्याने. म्हणूनच कितीतरी  पुरुष या कामगीरीला मुकले आहेत!— पितृत्व मिळाले असते परंतु दैहिक वासनांच्या आहारी गेल्यामुळे जे ख्रिस्तकेंद्रित कुटुंब उभारू शकले नाहीत आणि मुले जन्माला आणू शकले नाहीत असे कितीतरी  पुरुष असू शकतील!

तुम्हाला त्याचा द्वेष नाही का?

पुरुषांना कमी लेखण्याचा माझा हेतू नाही. स्त्रियादेखील वाढत्या प्रमाणात अश्लील साहित्याच्या समस्येशी झगडत असल्या तरी, त्या  इतर पापांत असल्यामुळेही याकडे दुर्लक्ष होत आहे. माझा हेतू एवढाच आहे की, प्रत्येक संताच्या मनात या पापाबद्दल घृणा निर्माण करावी. अश्लील साहित्याचा मला द्वेष आहे. ते तरुण पुरुषांमध्ये जे करते त्याचा मला तिरस्कार आहे; ते विवाह उद्ध्वस्त करते त्याची मला चीड येते; जेष्ठ पुरुष तसेच धाव पूर्ण करत असलेल्या देवाच्या जेष्ठ सेवकांना ते कशी ठेच खायला लावते त्याचा मला तिरस्कार आहे. मला त्याच्या सहजतेचा तिटकारा आहे; मला त्याच्या चोर पावलांची घृणा आहे; ज्या स्त्री-पुरुषांना खूप मोठ्या गोष्टी करण्यासाठी निर्माण केले आहे, त्यांना हतबल  करण्यासाठी सैतानाने ते कसे आखले, त्याचा मला वीट आहे.

या कुवासनेच्या छुप्या हल्ल्याला बळी पडून अनेक युद्धनौका सागरतटी अडकून पडतात. अनेक लोकांनी अजून सुवार्ता ऐकलेली नाही, कारण जे कापणीच्या कामात मजूर असायला हवे होते, ते रुपेरी पडद्याला खिळून बसले आहे. देवाच्या राज्याची वाढ जेवढी व्हावी त्याच्या अंशतःच होत आहे; जगाचा प्रकाश असलेल्यांचा प्रकाश अंधुक पडत आहे. प्रत्येक रात्री चंद्र पाहतो की, स्त्री पुरुष स्वर्गीय योजनेच्या बदल्यात लयास जाणाऱ्या लैंगिक सुखाचा व्यापार करतात.

तुम्हाला अश्लीलतेचा द्वेष नाही का? अनेक सैनिकांना पक्षघाती करणारी एक फसवणूक, अनेक हिब्रूंना गिळंकृत करणारा एक तांबडा समुद्र, दानीएल होऊ शकणाऱ्यांना गिळंकृत करणाऱ्या सिंहांची एक गुहा, राजांचे पतन करणारे छतावरील एक भटकणे, सुज्ञांचे ह्रदय बहकवणाऱ्या विदेशी रखेल्यांचा एक कुंटणखाना, इस्त्राएलाच्या छावणीत राहून त्यांना युद्धात हरविण्यात कारणीभूत ठरलेला एक आखान, तारणाऱ्याने त्याच्या शरीरात वाहिलेल्या पातकांची पर्वतरांग अशी ही अश्लीलता!

स्वर्गात ती अंतिम न्याय करणार नाही तरी, पृथ्वीवर ती एक मोठा प्रहार करते. ती इस्राएलाचे शस्त्रास्त्र हिरावून घेते, आपल्या रथांच्या घोड्यांच्या पायांचे स्नायू जायबंदी करते आणि आपला नाश करू पाहणाऱ्यांचा मार्ग मोकळा करते. देवाच्या लोकांनो, अश्लीलतेला ठार मारा. आणि बेधडक युद्धात सामील व्हा. अश्लीलतेच्या घाणीतून बाहेर पडा. यापेक्षा उदात्त कार्यासाठी तुमची निवड झाली आहे — हे तुम्हाला माहीत आहे, सैतानाला माहीत आहे आणि ख्रिस्तालाही माहीत आहे.

बंधूंनो, स्वप्न पाहा

‘हे फक्त एकदाच कर, ते एक क्षणभरचेच पतन आहे,’ अशा विचारांनीच फसवणूक होते. तो प्राणघातक दिवस येईपर्यंत,  हमोरच्या माणसांना सुरक्षित वाटत होते, जसे कदाचित आजही अनेकांना वाटत असेल — जेव्हा अर्ज करण्याची किंवा मुलाखतीस सामोरे जाण्याची वेळ येते आणि तुम्हाला विचारले जाते की, “तुम्ही शेवटचे अश्लील साहित्य केव्हा पाहिले, लैंगिक कल्पनाविश्वात शेवटी केव्हा रमलात किंवा शेवटचे हस्तमैथुन केव्हा केले? आम्हाला सांगा, तुमच्या वैचारिक जीवनाच्या शुद्धतेबद्दल आम्हाला काय सांगू शकाल?” मग ती फसवणूक उघडकीस येते आणि अर्जदाराचा अर्ज नाकारला जातो. मग त्या सैनिकाला घरी पाठविण्यात येते. परिणामी तेथील रहिवाशांच्या खोटेपणाला आव्हान देणारे  कोणी नाही आणि त्यांचे तारणच  होत नाही.

स्वप्न बघा बंधूंनो, स्वप्न बघा. केवळ अश्लीलतेपासून पूर्णपणे मुक्त जीवन कसे असेल — तुमच्या घरातून सिंह काढून टाकल्याबद्दलच नव्हे तर — तर देवाच्या प्रभुत्वाखाली तुमचे जीवन कसे असेल हे स्वप्न बघा: कुटुंबाने भरलेले घर, ख्रिस्ताविषयी ऐकणारे शिष्य, जे या जगापेक्षा अधिक काळ टिकणाऱ्या विजयाकडे कूच करत आहेत. पुनरुत्थित राजाच्या आनंदी बांधवांनो, हेच तुमचे गीत आणि आनंदी संकल्प बनवा:

काळेकुट्ट असत्य जिथे, सत्याचा शुद्ध किरण न्या तिथे;
घोर गुन्हे घडतात जिथे, तारणाचे निशाण झळकवा तिथे.
थकल्या भागलेल्यांना दुःख नसलेला तो देश सांगा,
बहिष्कृत आणि निराधारांना दया आणि शांती सांगा.
ध्वज फडकत राहो, आत्म्याची तलवार म्यानात न जावो जोवर
जगातील राज्ये देवाची होत नाहीत तोवर.

Previous Article

नातेसंबंधातील बहुतेक संघर्ष कसे सोडवावेत

You might be interested in …

कदाचित उद्या

स्कॉट हबर्ड ज्यांना चालढकल करायला आवडते त्यांना ‘उद्या’ हा जादूचा शब्द वाटतो. उद्याच्या एका साध्या झटकाऱ्याने खरकटी भांडी नाहीशी झाल्यासारखे वाटते, कठीण संभाषणे नाहीशी होतात, इमेल्स लपल्या जातात, घराचे प्रकल्प शांतपणे बाजूला उभे राहतात. आज […]

एक स्थिर अस्तित्व

जो रिनी आपल्या कुटुंबाचे संरक्षण करून  त्याला पुरवठा करण्यासाठी बापांना पाचारण करण्यात आले आहे. हे चांगल्या रीतीने करण्यासाठी त्यांनी सावध  वृत्तीचे आणि स्थिर / खंबीर असण्याची गरज आहे. असे वडील आपल्या कुटुंबाला आनंदाने, धैर्याने, शहाणपणाने […]

तुमच्या जीवनात तुम्ही करू शकता अशी सर्वात महान गोष्ट लेखक : जॉन ब्लूम

तुम्ही आणि तुमच्या जीवनासंबंधी सर्वात अद्भुत आणि आशादायक गोष्ट  ह्या खालील साध्या नम्र वाक्यामध्ये पकडली गेली आहे. “तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे तसे त्याने चालावे” (१ करिंथ ७;१७). […]